17 September, 2026

*सेवा संकल्प अभियान व्यापक प्रमाणात राबवा*- पालकमंत्री नरहरी झिरवाळ


हिंगोली, दि. १७ (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे, यामध्ये व्यापक प्रमाणात उपक्रम राबविण्याचे आवाहन हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज केले. 
 अभियानातील प्रत्येक उपक्रम नागरिकाभिमुख, परिणामकारक आणि व्यापक सहभागातून राबविण्यात यावा.
अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी सेवा सेतू अभियान राबविण्यात येणार आहे. तालुकास्तरावर शिबिरे घेऊन विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
यामध्ये प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, स्वामित्व सनद वाटप, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, वनहक्क दावे, नवीन नळजोडणी, विद्युत जोडणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, आधारकार्ड, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र तसेच ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करण्यासह विविध सेवा देण्यात येणार आहेत.
‘सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत गाव व वाड्यांमध्ये स्थानिक गरजेनुसार स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य तपासणी, जलस्रोत स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, रस्ते सुरक्षा, सायबर सुरक्षा, मतदार जागृती, सरकारी योजनांची माहिती आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
तसेच सेवा ज्योत यात्रा, आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, अंगणवाडी उत्सव, नमो सेवा गाथा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, राष्ट्रीय इनोव्हेशन चॅलेंज आणि जनसेवक महाकुंभ यांसारखे उपक्रमही अभियानाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहेत.
शासनाच्या योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल यशोगाथांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवावा.  या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येकाने समन्वय ठेऊन कार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे. 
*****

No comments:

Post a Comment