▶️ सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी मेळावा उत्साहात
▶️जामगव्हाण आश्रमशाळेत ‘नमो-७३’ प्रयोगशाळेचे उद्घाटन
हिंगोली, दि. १७ (जिमाका) : आदिवासी बांधवांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासोबतच शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
गुंडलवाडी येथे आयोजित आदिवासी मेळाव्यास पालकमंत्री झिरवाळ यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जिवकुमार कांबळे, प्रकल्प अधिकारी डॉ. सुनील बारसे, संतोष टारफे, गणाजी बाले आदी उपस्थित होते.
मेळाव्याच्या प्रारंभी पालकमंत्री झिरवाळ यांनी दुष्काळाच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा सत्कार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. गुंडलवाडी येथील शासकीय आश्रमशाळेत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू करण्याची मागणी सरपंच विजय डवरे यांनी केली. त्यासाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मेळाव्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांच्यातर्फे चित्ररथ तयार करण्यात आला होता. ‘सेवा संकल्प अभियान’निमित्त महसूल प्रशासनामार्फत स्टॉल उभारण्यात आले होते. गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांनी तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. अडचणी आल्या तरी खचून न जाता यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न करा, असे झिरवाळ यांनी सांगितले.
*जामगव्हाण आश्रमशाळेत ‘नमो-७३’ प्रयोगशाळा*
मेळावा संपल्यानंतर पालकमंत्री झिरवाळ यांनी शासकीय आश्रमशाळा, जामगव्हाण येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या हस्ते शाळेतील ‘नमो-७३ प्रयोगशाळेचे’ उद्घाटन करण्यात आले.
पालकमंत्र्यांनी शाळेचा परिसर व तेथील व्यवस्थेची पाहणी केली. प्रकल्प अधिकारी डॉ. सुनील बारसे यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. शाळेत नवीन उपक्रम राबविण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. यावेळी शाळेचे प्राचार्य नारायण गायकवाड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment