18 September, 2026

*कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर* *छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद*



मुंबई, दि.१८ सप्टेंबर : 
राज्यातील काही भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील विविध भागांना भेटी देऊन ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच, या दौऱ्यादरम्यान दोन्ही महसूल विभागांतील पिकांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकींना संबंधित पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पावसाची स्थिती आणि त्याचा शेतीपिकांवर होत असलेल्या परिणामाचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कार्यालयीन पातळीवरील अहवालातून जाणून न घेता मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि बळीराजाशी थेट संवाद साधावा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हा दौरा होत आहे.
या दौऱ्यात पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांची सद्यस्थिती, सुकलेल्या किंवा नुकसानग्रस्त पिकांची पाहणी तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेतली जाणार आहे. यासोबतच स्थानिक प्रशासन, कृषी विभागाचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणांकडूनही परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.
“शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी केवळ कार्यालयातील अहवाल पुरेसे नाहीत; त्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्या पिकांची आणि परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे एकटे सोडले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेतली असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या दौऱ्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, पिकांची सद्यस्थिती आणि स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेतल्या जातील. प्रत्यक्ष पाहणी आणि उपलब्ध वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर केला जाईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न केले जातील,” असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेऊन परिस्थितीनुसार तातडीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. 

दि.१९ सप्टेंबर : नांदेडमध्ये आढावा बैठक; नांदेड–हिंगोली–वाशिममध्ये पिकांची पाहणी

दि.१९ सप्टेंबर रोजी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्याची सुरुवात नांदेड येथून होणार आहे. सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता नांदेड जिल्ह्यातील पुयणी येथे पिकांची पाहणी करण्यात येणार आहे. पुढे हिंगोली जिल्ह्यातील बोराला व हिवरा, तसेच वाशिम जिल्ह्यातील झोडगा, सुपखेला, वरुड बुद्रुक, कुपटा आणि खेरडा या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे. पावसाचे प्रमाण, पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर सायंकाळी अकोला येथे मुक्काम करण्यात येणार आहे.

दि. २० सप्टेंबर : अकोला येथे अमरावती विभागाचा आढावा

दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात अमरावती महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विभागातील पिकांची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२.०५ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आयोजित उद्घाटन व शिवार फेरी कार्यक्रमास कृषीमंत्री उपस्थित राहतील.

No comments:

Post a Comment