24 November, 2025
जिल्ह्यात वाचन संस्कृती बळकटीसाठी ‘वाचन वीर प्रकल्प’अंतर्गत 31 मॉडेल शाळांची निवड
• निपुण हिंगोली 2.0 अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पाची अंमलबजावणी
हिंगोली (जिमाका), दि. 24: निपुण हिंगोली 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी, तसेच स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांची सक्षम तयारी करता यावी यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वाचन वीर प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून 31 मॉडेल शाळांची निवड करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात एकूण 5 तालुके असून 877 जिल्हा परिषद शाळा आहेत. यामध्ये 82 हजार 473 विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये मुले 39 हजार 901 व मुली 42 हजार 572 आहेत.
वाचन वीर प्रकल्पांतर्गत निवडलेल्या 31 मॉडेल शाळांमध्ये 8 हजार 847 एवढी विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये 4 हजार 396 मुले व 4 हजार 451 मुलींचा समावेश आहे.
या प्रकल्पांतर्गत सर्व 31 शाळांमध्ये वाचन कक्ष व सुसज्ज ग्रंथालये उभारण्यात येणार असून, या कक्षांमध्ये स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सर्वांगीण अभ्यासासाठी आधुनिक, सुस्थित व वायुवीजनयुक्त वाचन कक्ष उपलब्ध असणार आहे. वाचन कक्ष २४x७ खुले राहणार असून विद्यार्थ्यांना विद्यार्थी-अनुकूल सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
व्यवस्थापनासाठी क्लास मॉनिटर व शिक्षक-प्रभारी नियुक्त करण्यात येणार आहे. सतत वीजपुरवठ्यासाठी सौरऊर्जेवर आधारित कक्ष असणार आहे. पॉवर बॅकअपची सुविधा उपलब्ध असणार आहे. सध्या गावठाण फीडरवरील 12 ते 16 तासांच्या वीजपुरवठ्याऐवजी वाचन कक्षांसाठी पूर्णवेळ वीज मिळणार आहे. प्रत्येक शाळेला अंदाजे दीड लाख रुपये किमतीची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. युपीएससी, एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, एनडीए, आरआयएमसी, नीट, शिष्यवृत्ती परीक्षा आदी विषयांवरील पुस्तके समाविष्ट असणार आहेत. हे सर्व वाचन कक्ष ग्रामीण शाळांमध्ये उभारण्यात येणार आहेत. निवडणुका पूर्ण झाल्यानंतर वाचन कक्षांच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.
अतिरिक्त उपक्रम
जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्पास सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेनुसार शंका समाधान सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार व रविवार ‘रीडिंग डे’ कार्यक्रम राबवून कादंबरी वाचनास प्रोत्साहन दिले जाणार आहे, असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले
***

No comments:
Post a Comment