24 November, 2025

शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र महाविस्तार एआय

हिंगोली (जिमाका), दि. 24 : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय हे अत्याधुनिक ॲप विकसित करण्यात आले आहे. हे कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आधारित ॲप शेतकऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट डिजिटल सहाय्यक ठरत आहे. शेती संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचे कार्य करते. महाविस्तार ॲप पारंपारिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यातील अंतर कमी करते. या ॲपमुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचवून उत्पादन वाढवण्यासाठी मदत होणार आहे. महाविस्तार ॲपमुळे हवामान अंदाज व बाजार भावावर आधारित तात्काळ निर्णय घेता येतो. पिकांसाठी योग्य खत विनियोजन करता येईल. तसेच कीडरोग नियंत्रणाच्या उपाययोजना वेळेवर राबविता येते. याशिवाय या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय योजनांविषयी माहिती मिळणार आहे. शेतीसंबंधी समस्या सोडविण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा परिचय होणार आहे. ॲपच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन दर्जा सुधारेल. शेती व्यवसाय अधिक सुलभ व परिणामकारक बनेल. तसेच संपूर्ण कृषी समुदायाला आधुनिक तांत्रिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध करुन देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा व्यवसाय अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित व लाभदायक करण्याचे कार्य करणार आहे. ॲपमधील चॅट बॉटद्वारे शेतकऱ्यांना मराठी भाषेत प्रश्न विचारुन तात्काळ शासकीय स्त्रोतांकडून खात्रीलायक उत्तरे प्राप्त होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर महाविस्तार ॲप डाउनलोड करुन आपला मोबाईल क्रमांक वापरुन सहज नोंदणी करुन शकतात. नोंदणी झाल्यानंतर ॲपमध्ये उपलब्ध सर्व सुविधा पूर्णपणे मोफत वापरता येतात. तसेच सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांना लीडर बोर्डवर स्थान मिळेल. ज्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये ज्ञानवर्धनासोबत स्पर्धात्मकता निर्माण होईल. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या सर्व सभासदांकडून ॲप डाऊनलोड करावे आणि नियमितपणे या ॲपचा उपयोग करुन आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment