23 November, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रांची तपासणी
• पात्रता परीक्षेला ५०६२ उमेदवारांची उपस्थिती तर २४६ अनुपस्थित
हिंगोली, दि. २३ (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी आज आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ हिंगोली शहरातील ११ परीक्षा केंद्रांवर शांततेत आणि सुरळीत पार पडली. परीक्षेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वतः विविध परीक्षा केंद्रांना भेट देत तपासणी केली.
ही परीक्षा सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांमध्ये पार पडली. या दोन सत्रात झालेल्या परीक्षेला एकूण ५३०८ उमेदवार पात्र होते.
परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक परिरक्षक तसेच प्रत्येक केंद्रावर परीक्षा केंद्रसंचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकानुसार पेपर-१ सकाळी १०.३० ते १.०० मध्ये २४४२ पैकी २३३९ उपस्थित तर १०३ गैरहजर राहिले आणि पेपर-२ दुपारी २.३० ते ५.०० या वेळेत २८६६ पैकी २७२३ परीक्षार्थी उमेदवारांनी उपस्थिती दर्शविली आणि १४३ गैरहजर राहिले.
जिल्हा परीषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी यावेळी परीक्षा केंद्रांवर भेटी देत आढावा घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी केंद्रप्रमुखांना आवश्यक सूचना दिल्या तसेच सर्व व्यवस्था प्रत्यक्ष पाहून समाधान व्यक्त केले.
परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित संनियंत्रण अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल शिक्षणाधिकारी (प्रा.), जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेचे संपूर्ण सत्र शिस्तबद्ध व सुरळीत रीतीने पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
ही परीक्षा शहरातील पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश, स्कूल जवळा पळशी रोड हिंगाली,
अनसुया विद्यामंदिर खटकाळी परिसर हिंगोली भाग-१,
आदर्श महाविद्यालय, हिंगोली इमारत भाग-१, शांताबाई मुंजाजी दराडे हायस्कूल, हिंगोली, सरजुदेवी भि.भा. आर्य कन्या विद्यालय, हिंगोली, विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल हिंगोली, सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल हिंगोली, शिवाजी महाविद्यालय कोथळज रोड, माउंट लिटेरा झी स्कूल नरसी फाटा हिंगाेली आणि अनसुया विद्यामंदिर खटकाळी परिसर हिंगोली येथे घेण्यात आली.
*****

No comments:
Post a Comment