26 November, 2025

संविधान दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश

हिंगोली (जिमाका), दि. 26 : दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ असून, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांची मूल्ये अंगीकारण्याचा संदेश यातून दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने 2015 पासून संविधान दिन देशभर उत्साहात साजरा केला जात आहे. संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व गणराज्य मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत तसेच संविधानाबद्दल आदर, जागरुकता आणि जबाबदार नागरिकत्व विकसित व्हावे, या हेतूने राज्य शासनाने शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनच्या सहकार्याने राज्यातील सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यास सामंजस्य करार केला आहे. पुढील पाच वर्षांत सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होणार आहे. त्याअंतर्गत संविधान दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांनी संविधान दिन प्रभात फेरी, व्याख्यानमाला, चित्रकला व पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, पथनाट्य, पोवाडे, गाणी व सांस्कृतिक सादरीकरण, मानवी साखळी निर्मिती, आय लव्ह कॉन्स्टिट्यूशन सेल्फी पॉइंट आणि संविधानावर आधारित हस्तकला स्पर्धा आदी उपक्रम राबवावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. संविधान दिन प्रभात फेरी : संविधानाबद्दल आदर, जनजागृती आणि नागरिकत्वभावना वृद्धिंगत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संविधानाशी संबंधित घोषवाक्यांसह फलक तयार करणे, देशभक्तीपर गीतांसह प्रभात फेरी काढणे. संविधान व्याख्यानमाला/सेमिनार : संविधान निर्मिती प्रक्रिया, मूलभूत हक्क-कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांविषयी मार्गदर्शनासाठी संविधान अभ्यासक, वकील, प्राध्यापक यांची व्याख्याने आयोजन. प्रश्नोत्तर व चर्चासत्राचे आयोजन करावे. चित्रकला व पोस्टर स्पर्धा : “आपले संविधान – आपला अभिमान”या विषयावर स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेला वाव देणे आणि शाळेत प्रदर्शन लावणे. संविधान प्रश्नमंजुषा : संविधान विषयक ज्ञान वाढविण्यासाठी वर्गनिहाय/गटनिहाय प्रश्नमंजुषा स्पर्धा. विजेत्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे द्यावेत. पथनाट्य सादरीकरण : संविधानिक मूल्यांची जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाव, शाळा व सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादर करणे. पोवाडे, गाणी व सांस्कृतिक सादरीकरण : लोककलेच्या माध्यमातून संविधानाविषयी अभिमान व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचवणे, मानवी साखळी निर्मिती : विद्यार्थ्यांनी “आम्ही भारताचे लोक”घोषवाक्यासह एकता व अखंडतेचा संदेश देण्यासाठी मानवी साखळी तयार करणे व प्रास्ताविकाचे वाचन करावे. “आय लव्ह कॉन्स्टिट्यूशन सेल्फी पॉइंट : विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमातून संविधानाशी जोडण्यासाठी शाळेत सेल्फी पॉईंट उभारणे आणि संविधानावर आधारित हस्तकला स्पर्धा : संविधानातील प्रतीके व राष्ट्रीय मूल्ये दर्शविणारी विविध मॉडेल्स तयार करणे व प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनच्या जिल्हा व तालुका समन्वयकांचे सहकार्य उपलब्ध राहणार आहे. या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी शिक्षण संचालक, पुणे यांना दि. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर करावा, असे निर्देश राहुल रेखावार यांनी दिले आहेत. ******

No comments:

Post a Comment