08 November, 2025
शासकीय परिसरात मिरवणुका, घोषणा व सभा आयोजनास निर्बंध
हिंगोली (जिमाका), दि. 08 : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात मिरवणुका काढणे, घोषणा तसेच सभा घेण्यास निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल गुप्ता यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश 3 डिसेंबरपर्यंत अंमलात राहणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 4 नोव्हेंबर, 2025 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. जिल्ह्यातील नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त, न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच निवडणुकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणुकीसंदर्भातील पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटिंग्स, होर्डिंग्स लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, आवारात निवडणूकविषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे तसेच निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल, अशी कृती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.
भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 3 डिसेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले आहेत.
******
No comments:
Post a Comment