07 November, 2025
उद्योजकांनी एमएसएमई हेल्पलाईन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 07 : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे कणा आहेत. महाराष्ट्र राज्यातही त्यांचे महत्त्व विशेष आहे. राज्य शासनाने एमएसएमई क्षेत्राच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले असून, या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा उद्योग केंद्रांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
या संदर्भात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर, पुणे यांच्या पुढाकाराने व्हॉटस्अप आधारित “एमएसएमई हेल्पलाईन”(8308809334) ही योजना सुरु केली आहे. ही योजना शासनाच्या चालू प्रयत्नांना पूरक ठरू शकते. ही योजना मोफत तज्ज्ञ सल्ला सेवा उपलब्ध करून देते. गेल्या वर्षभरात 32 जिल्ह्यांतील 2 हजारापेक्षा अधिक एमएसएमई उद्योगांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. या योजनेसाठी 50 हून अधिक तज्ज्ञांची नोंदणी करण्यात आली असून ते शासनाच्या विविध योजनांबाबत अर्ज प्रक्रिया, व्यवसाय स्थापनेबाबत, कायदेशीर अनुरूपता (कॉम्प्लायन्स) व जीएसटी संदर्भात सल्ला, वित्तीय सल्ला व कर्ज, शासन योजना सुलभता, विपणन, ब्रँडिंग व डिजिटल उपस्थिती याबाबत मार्गदर्शन, सरकारी ई-मार्केटप्लेस नोंदणी व सहभाग, निर्यात–आयात सल्ला व धोरणात्मक अनुरूपता या क्षेत्रांमध्ये मार्गदर्शन करते.
हिंगोली जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग उद्योजकांनी व्हॉटस्अप सेवेद्वारे उपलब्ध तज्ज्ञ मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment