29 December, 2025
अनुसूचित जाती व नवबौद्ध नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि.29 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने सन 2015 मध्ये जाहीर केलेल्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी भरण्यास सहाय्य करण्यासाठी विशेष योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन एकूण प्रकल्प किमतीतील लाभार्थी हिस्स्यामधील 15 टक्के मार्जिन मनी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर व संबंधित बँकेने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के रक्कम राज्य शासनाकडून देण्यात येईल.
या योजनेचा लाभ स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजकांना देण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांनी आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या नावे अनुदान मागणीपत्र विहित विवरणपत्रात सादर करणे आवश्यक आहे.
प्रस्तावासोबत उद्योजक आधार नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज मंजुरी पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच बँक कर्ज खात्याचे विवरणपत्र जोडणे बंधनकारक आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र नवउद्योजकांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र व्यक्तींनी विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment