29 December, 2025

अखंड हरिनाम सप्ताहात बालविवाह मुक्त भारत उपक्रमांतर्गत जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 29 : हिंगोली येथील आनंद नगर व चंद्रश्लोक नगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाच्या निमित्ताने बालविवाह मुक्त भारत या उपक्रमांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित भाविक भक्तांना जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम, बालकांचे हक्क तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम, 2006 संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. बालविवाहामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान याबाबत त्यांनी उपस्थितांना जागरूक केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भाविकांकडून बालविवाह न करण्याची व बालविवाहास प्रतिबंध करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. समाजातून बालविवाह हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमास चाइल्ड हेल्पलाइन 1098 चे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, पर्यवेक्षक विकास लोणकर व राजरत्न पाईकराव उपस्थित होते. त्यांनी बालविवाह संदर्भातील तक्रार नोंदविण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइन 1098 या क्रमांकाची माहिती देत गरजूंना तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकते, असे सांगितले. या कार्यक्रमामुळे भाविकांमध्ये बालविवाहाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होऊन बालविवाहमुक्त समाज घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. *****

No comments:

Post a Comment