29 December, 2025

अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 29: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन 2025–26 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्याच्या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी दिनांक 01 जानेवारी 2026 पासून संबंधित कार्यालयाकडून विनामूल्य अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्जासोबत बचत गट शासकीय कार्यालयाकडे नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत महाराष्ट्र राज्य जीवन्नोनती अभियान व्यवस्थापन कक्ष येथे ऑनलाईन नोंदणी केलेले प्रमाणपत्र व सर्व सदस्यांची नोंद असलेली यादी किंवा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), हिंगोली यांच्याकडून प्राप्त ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, बचत गटात किमान 10 सदस्य असणे आवश्यक, गटातील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे व त्यांची जात प्रमाणपत्रे, बचत गटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे, बचत गटाचे पॅन कार्ड, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून आधार कार्डाची प्रत, तसेच यापूर्वी बचत गटाने किंवा गटातील कोणत्याही सदस्याने या योजनेचा लाभ घेतलेला नाही, असे शपथपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या योजनेचा पात्र बचत गटांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment