जिल्हा वार्षिक योजनेच्या 278 कोटी 95 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता
- पालकमंत्री नरहरी झिरवाळ
हिंगोली, दि. 19(जिमाका) : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण आणि विशेष घटक, आदिवासी उपयोजना अशा एकूण जिल्हा वार्षिक योजना (2026-27)च्या 278 कोटी 95 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीची बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत सांगितले.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे पार पडलेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीला विधान परिषदेचे सदस्य विक्रम काळे, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत नवघरे, प्रधान सचिव तथा पालक सचिव श्रीमती रिचा बागला, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक नीलभ रोहण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जी. जी. चितळे, प्रदीप नळगीरकर यांच्यासह जिल्हा कार्यन्वयीन यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातील 28 मे 2025 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीचे इतिवृत्त आणि अनुपालन अहवाल अंतिम करण्यात आला. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना) सन 2025-26 या चालू वर्षात डिसेंबर-2025 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 साठीच्या प्रारुप आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण योजना 201.66 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 54 कोटी, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना 23.79 कोटी अशा एकूण शासनाने ठरवून दिलेल्या कमाल नियतव्ययाच्या मर्यादेत 278 कोटी 95 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आज झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये सर्व कार्यान्वयीन यंत्रणेकडून 583 कोटी 45 लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. यावेळी पुनर्विनियोजन प्रस्ताव, क वर्ग तीर्थक्षेत्र मान्यतेस्तव प्राप्त प्रस्ताव आणि डोंगरी विकास कार्यक्रम 2025-26 च्या आराखड्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
आमदार तानाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री पाणंद रस्ते निर्मितीसाठी वाढीव निधीची मागणी केली असून, हे रस्ते झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आमदार मुटकुळे यांनी केली तसेच चिरागशाह तलावातील गाळ काढून त्याचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली. तर आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे यांनीही रस्ते, तसेच सती पांगरा येथील तलाव दुरुस्ती आणि सुशोभिकरण करण्याबाबत आग्रही मागणी केली.
या बैठकीला ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली असून, पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आगामी बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याचे सादरीकरण केले.
*****


No comments:
Post a Comment