19 January, 2026

विशेष लेख


श्री गुरु तेगबहादूर जी : मानवमूल्यांचा तेजस्वी दीपस्तंभ   


जगात समानतेचा विचार हा नेहमीच संघर्षातून पुढे आलेला आहे. जात, धर्म, वंश, भाषा, लिंग, संपत्ती आणि सत्तेच्या आधारावर माणसामाणसांत भेद निर्माण करण्यात आले. अशा असमानतेविरुद्ध आवाज उठवणारे संत, विचारवंत आणि समाजसुधारक इतिहासात विरळाच. शीख परंपरेतील नववे गुरु श्री गुरु तेगबहादूर जी (१६२१–१६७५) हे अशाच महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्यांनी आपल्या विचारांतून, बाणीतून आणि सर्वोच्च बलिदानातून मानवी समानतेचा विश्वव्यापी संदेश दिला. त्यांच्या 350 व्या बलिदान पर्वानिमित्त त्यांच्या महान कार्याचे स्मरण करणे प्रेरणादायी ठरेल. मानवी समानता म्हणजे सर्व मानव जन्मतः समान आहेत, त्यांच्यात कोणताही उच्च-नीच भेद असू नये, प्रत्येकाला स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि न्याय मिळावा. ही संकल्पना आधुनिक लोकशाही, मानवाधिकार आणि संविधानांची मूलभूत चौकट आहे. मात्र, श्री गुरु तेगबहादूर जी यांनी हा विचार १७ व्या शतकात, जेव्हा समाज कर्मकांड, जातीयता आणि धार्मिक कट्टरतेने ग्रासलेला होता, तेव्हाच प्रत्यक्ष आचरणात आणला. 


श्री गुरु तेगबहादूर जी यांच्या काळात भारतीय समाज अनेक स्तरांवर विभागलेला होता. त्यात जातीय विषमता, स्त्रियांचे दुय्यम स्थान, धार्मिक असहिष्णुता, जबरदस्तीचे धर्मांतर, गरीब व दुर्बल घटकांचे शोषण याचा प्रामुख्याने समावेश होता. मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळात धर्माच्या नावाखाली अत्याचार वाढले होते. अशा वातावरणात मानवी समानतेचा विचार मांडणे आणि त्यासाठी उभे राहणे हे अत्यंत धाडसी कृत्य होते. श्री गुरु तेग बहादूर यांनी औरंगजेब याच्या विचारांना स्वतःचे बलिदान देऊन उत्तर दिले. त्यांच्या बलिदानामुळे हिंदू धर्माचे रक्षण झाले. श्री गुरु तेगबहादूर जी यांच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू म्हणजे ईश्वर एक असून तो सर्व मानवांत समानरीत्या वास करतो. त्यामुळे कोणताही माणूस उच्च किंवा नीच ठरत नाही. 

 

त्यांच्या बाणीत ते स्पष्ट सांगतात की, “ईश्वर मंदिर, मशिद किंवा तीर्थस्थळापुरता मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे.” यातूनच मानवी समानतेचा मूलभूत विचार पुढे येतो. जर ईश्वर सर्वांत समान आहे, तर माणसांमध्ये भेद कसा असू शकतो ? असा प्रश्न त्यांनी समाजासमोर उपस्थित केला. 

 

श्री गुरु तेगबहादूर जी यांनी बाह्य धार्मिक आडंबरांना नाकारले. कर्मकांड, तीर्थयात्रा, व्रत-वैकल्य यांमुळे माणूस श्रेष्ठ ठरत नाही, तर त्याची नैतिकता आणि करुणा त्याला श्रेष्ठ बनवते. 


“तीर्थ फिरौ, अरु दान करौ… अंतर की मलु न उतरै…” हा संदेश समाजातील त्या वर्गांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, ज्यांना धार्मिक विधीमध्ये वंचित ठेवले जात होते. श्री गुरु तेगबहादूर जी यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले की, ईश्वरप्राप्तीसाठी कोणत्याही सामाजिक दर्जाची गरज नाही. गुरु परंपरेतच जातिभेदाला नकार दिला आहे. गुरु नानक देवांपासून सुरू झालेली ही परंपरा श्री गुरु तेगबहादूर जी यांनी अधिक ठामपणे पुढे नेली. सर्व मानव एकाच परमेश्वराची निर्मिती आहे , कोणालाही जन्माच्या आधारे श्रेष्ठत्व नाही आणि सेवा, साधना आणि सदाचार हाच खरा धर्म अशी शिकवण त्यांनी दिली यातून मानवी समानतेची सामाजिक पायाभरणी झाली. श्री गुरु तेगबहादूर जी यांचे मानवी समानतेतील सर्वात मोठे योगदान म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा पुरस्कार.काश्मिरी पंडितांचे धर्मांतर जबरदस्तीने केले जात असताना त्यांनी त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. ते स्वतः शीख गुरु असूनही इतर धर्माच्या लोकांच्या रक्षणासाठी उभे राहिले.

 

हे कृत्य मानवी समानतेच्या इतिहासातील अद्वितीय उदाहरण आहे. “धर्म वेगळे असू शकतात, पण मानवतेचे मूल्य एकच आहे.”हेत्यांनीसिद्धकेले. दिल्लीतील चांदणी चौक येथे दिलेले श्री गुरु तेगबहादूर जी यांचे बलिदान हे केवळ धार्मिक नव्हे, तर मानवी समानतेसाठी दिलेले बलिदान होते. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन सांगितले की, कोणालाही जबरदस्तीने धर्म बदलायला लावणे हा अन्याय आहे, प्रत्येक माणसाला श्रद्धेचे स्वातंत्र्य आहे, सत्तेपेक्षा मानवतेचे मूल्य मोठे आहे. औरंगजेब जरी तलवारीच्या जोरावर सत्ता टिकवू शकला तरी गुरुजीनी सामाजिक व धार्मिक रक्षण करत इतिहासात अजरामर असे स्थान निर्माण केले. म्हणूनच त्यांना “हिंद दी चादर” असे संबोधले जाते. मानवी समानतेसाठी निर्भयता आवश्यक असते. श्री गुरु तेगबहादूर जी यांच्या बाणीत निर्भय जीवनाचा आदर्श दिसतो.

 

“भय काहू को देत नहिं, नहिं भय मानत आन…”


जो स्वतः भयमुक्त आहे, तोच इतरांच्या समानतेचा सन्मान करू शकतो. भयावर उभा असलेला समाज कधीही समानतेकडे जाऊ शकत नाही, हे गुरु तेग बहादूर जी यांनी स्पष्ट केले.आजही जग जातीय संघर्ष, धार्मिक असहिष्णुता, वर्णद्वेष आणि सामाजिक विषमतेने ग्रासलेले आहे. अशा काळात श्री गुरु तेगबहादूर जी यांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात. भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, मानवाधिकारांची संकल्पना, धर्मनिरपेक्षतेचा विचार या सर्व मूल्यांची बीजे श्री गुरु तेगबहादूर जी यांच्या तत्त्वज्ञानात दिसतात.

 

श्री गुरु तेगबहादूर जी यांच्या विचारांचा शिक्षणातून प्रसार होणे आवश्यक आहे. म्हणजे मानवी समानतेचा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत सहज पोहोचवता येईल. मानवी समानता ही केवळ संकल्पना नसून ती जगण्याची पद्धत आहे, हे गुरु तेगबहादूर जी यांनी सिद्ध केले. त्यांच्या बाणीतून आत्मशुद्धीचा, तर त्यांच्या बलिदानातून निर्भयतेचा आणि सहिष्णुतेचा संदेश मिळतो.

 

आजच्या असमानतेने ग्रस्त जगात श्री गुरु तेगबहादूर जी हे मानवतेचे नैतिक दिशादर्शक ठरतात. त्यांच्या विचारांचा स्वीकार केल्याशिवाय खऱ्या अर्थाने समतामूलक समाजनिर्मिती शक्य नाही.

 

प्रो. डॉ. दीपक मो. शिंदे 

परीक्षा नियंत्रक, केंद्रीय जन जाती विद्यापीठ, विजयानगरम (विशाखापट्टणम ) 

माजी संचालक – श्री गुरु गोबिंद सिंघ जी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 

000000



No comments:

Post a Comment