22 January, 2026

 ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेब यांचा ३५० वा शहीदी दिन – महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे मनिंदर पाल सिंग यांच्याकडून कौतुक


पुणे , दि. २२ (जिमाका वृत्तसेवा):‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस मनिंदर पाल सिंग यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे मनापासून अभिनंदन केले.

आज पुणे ग्रँड टूरच्या तिसऱ्या टप्याचे सासवड ते बारामती हे १३७ किलोमीटरच्या स्पर्धेच्या वेळी ही प्रतिक्रिया दिली.

नांदेडच्या पवित्र भूमीवर श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या विचारांचा आणि बलिदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. गुरु तेग बहादूरजींनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी दिलेले बलिदान सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे ग्रँड टूरचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, गुरु तेग बहादूरजींची विचारधारा ही समाजात एकता, बंधुभाव आणि धार्मिक सौहार्द टिकवण्याची प्रेरणा देणारी आहे. त्याच विचारधारेतून सायकलिंगच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील जनतेने तसेच प्रशासनाने गुरुजींच्या विचारांचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल मनिंदर पाल सिंग यांनी आभार मानले. नांदेड येथे २४ तारखेला होणारा मुख्य सोहळा यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गुरु तेग बहादूर साहेब यांनी दिलेला धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेचा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा असून, तो खेळाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवला जात आहे, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

*******

No comments:

Post a Comment