22 January, 2026

 हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमांतून ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी


हिंगोली, दि. २२ (जिमाका) : ‘हिंद दी चादर’ या नांदेड येथे‌ आयोजित गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक व सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून विविध स्तरावर व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज व बॅनर लावून कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यात आली असून नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, वक्तृत्व, चित्रकला, घोषवाक्य लेखन आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, देशभक्ती व ऐतिहासिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव देवेंद्र फडणवीस, नरहरी झिरवाळ तसेच राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये अधिक सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमांमुळे ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचा संदेश घराघरात पोहोचत असून सामाजिक एकात्मता, सांस्कृतिक जाणीव व राष्ट्रीय ऐक्य मजबूत करण्यास मोठी मदत होत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

**** 




No comments:

Post a Comment