22 January, 2026

नैसर्गिक आपत्ती, अनुदानासाठी तात्काळ  ईकेवायसी करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



• जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांची दुचाकीवरून ‘जलजीवन’ कामांची पाहणी


हिंगोली, दि. २२ (जिमाका) : गतवर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान खात्यावर मिळण्यासाठी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. तसेच मुख्यमंत्री पाणंद रस्ते व शेतरस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

या गावभेटी दौऱ्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, संजय कुलकर्णी, विजय बोरोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील माळेगाव, बिबगव्हाण, कळमनुरी, झरा, तुप्पा, नवखा व शिवणी बु. या गावांचा जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी आज गावभेटींवर भर देत दौरा करून ग्रामीण भागातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, महसूल व सेवाविषयक कामांचा सखोल आढावा घेतला.

माळेगाव येथील जलजीवन मिशनची झालेली कामे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दुचाकीवर बसून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.

दौऱ्यादरम्यान नैसर्गिक आपत्ती, सार्वजनिक वितरण प्रणाली, संजय गांधी निराधार योजना आदी योजनांतर्गत प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्वरित निराकरण करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या दप्तर तपासणीसह ई-चावडी, ई-हक्क प्रणाली, ई-फेरफार (नोंदणीकृत व अनोंदणीकृत) प्रकरणांची तपासणी करून ती तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. नागरिकांच्या निवेदनांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. तसेच तीन स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.

तुप्पा येथील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून केवळ वीज जोडणी अभावी नागरिकांना पाणीपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावर महावितरणला तात्काळ वीजजोडणी करून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले.

या दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचून त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जाणार असून, शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी नमूद केले.

*****









No comments:

Post a Comment