22 January, 2026

हिंद दी चादर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन



हिंगोली, दि. 22 (जिमाका): हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन दि.24 व 25 जानेवारी 2026 रोजी मोदी मैदान, वाघाळा –नांदेड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील जास्तीत-जास्त सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन क्षेत्रिय समितीचे अशासकीय सदस्य ॲङ संतोष राठोड यांनी केले आहे. 

नांदेड येथे तख्त श्री हुजूर साहिब हिंद दी चादर, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वी शहीदी राज्यस्तरीय समिती, समस्त गुरु नानक नाम लेवा संगत, शिख, सिकलकर, लभाना, बंजारा, मोहयाल, सिंधी, उदासीन, तथा नामदेव भगत, आणि वाल्मिकी संप्रदाय समाज महाराष्ट्र आयोजित कार्यक्रमात वरील सर्व समाजबांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे. या भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमातून मानवता, धर्मरक्षण सर्वधर्म समभावाची शिकवण वृद्धिंगत होणार आहे, असे श्री. राठोड यांनी सांगितले. 

 श्री. गुरु तेग बहादूर साहिब यांच्या या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. श्री गुरु तेग बहादूर यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठी आणि ते ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सर्वधर्मिय भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन अशासकीय सदस्य ॲङ संतोष राठोड यांनी केले आहे. 

******

No comments:

Post a Comment