22 October, 2026

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान व जंत नाशक दिन बाबत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

 

        हिंगोली दि. 22 ऑक्टो (जिमाका):- ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणि तळागाळातील घटकांपर्यंत दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १ एप्रिल २०२६ पासून 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा गट विकास अधिकारी माया वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील पंचायत समिती सभागृहामध्ये पार पडली.

        गट विकास अधिकारी माया वानखेडे यांनी सांगितले की, सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्नाने "आरोग्य संपन्न गाव" करण्यासाठी लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे. प्रत्येकाने तळमळतेने काम केले पाहिजे.

        तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी प्रास्ताविकात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानची रूपरेषा मांडली.

तसेच दुपारच्या सत्रात येत्या २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 'राष्ट्रीय जंतनाशक दिना'निमित्त तालुकास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.

 १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व बालके व किशोरवयीन मुलांना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. मुलांचे आरोग्य उत्तम राहणे, पोषण स्थिती सुधारणे, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी व्यापक प्रमाणात जनजागृती करून ही मोहीम १०० टक्के यशस्वी करावे, असे आवाहन माया वानखेडे यांनी केले.

    जंत नाशक दिन कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन डॉ. गणेश जोगदंड यांनी केले.

        यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, सहायक गट विकास अधिकारी श्रीनिवास लांडगे, महिला बाल विकास अधिकारी श्रीमती पुष्पा राठोड, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, आरोग्य सेवक आरोग्य सेविका आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

"माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान आणि राष्ट्रीय जंतनाशक दिन या मोहिमेच्या तालुका स्तरीय कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रदीप आंधळे, रामेश्वर रोडे, शैलेश मुंदडा, मारोती सोलापूर, शेख अनवर, रवींद्र भालेराव यांनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment