28 November, 2025

तूर पिकांवरील होणाऱ्या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

हिंगोली (जिमाका), दि. 28: जिल्ह्यामध्ये तूर पीक हे फुलोऱ्यावर आहे व काही ठिकाणी शेंगा लागण्यास सुरुवात झालेली आहे. रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या आळीच्या वाढीस पोषक असते. प्रादुर्भाव होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी), पिसारी पतंग व शेंग माशी या तिन्ही किडी कळ्या, फूल व शेंगावर आक्रमण करुन तुरीच्या उत्पादनात लक्षणीय घट आणू शकतात. वेळोवेळी सर्वेक्षण करुन प्रादुर्भाव ओळखून आवश्यकतेनुसार व्यवस्थापन करण्याचा हा कालावधी आहे. शेतकरी बांधवांनी जागरुक राहुन या तिन्ही किडीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकतेनुसार खालीलप्रमाणे एकात्मिक व्यवस्थापन करावे. फूलगळ व चट्टेगळ जास्त प्रमाणात होत असल्यास 13:00:45 हे 100 ग्राम अधिक एनएए2 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंगा पोखरणी अळी व फायटोप्थेरा मर या समस्येवर पहिली फवारणी 50 टक्के फुलोरावर असतांना निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली किंवा आझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली किंवा एचएएपीव्ही 500 एलई किंवा बॉसलिस थुरिनजिएंसीस 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी. 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करावी. यासाठी 4 इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 3 ग्रॅम किंवा लेब्डा सायहॅलोमथ्रीन 5 टक्के ईसी 10 मिली किंवा ईथिऑन 50 टक्के ईसी 25 मिली किंवा क्लोनेंनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के एससी प्रवाही 2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीसाठी किटकनाशकाची शिफारस केलेली मात्रा साध्या पंपासाठी असून पॉवर ऑपरेटेड पंपासाठी तीन पट मात्रा वापरावी. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरील उपाययोजनांचा तात्काळ अवलंब करुन तूर पिकांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment