26 November, 2025

आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात जनजागृती उपक्रमांना प्रारंभ

हिंगोली (जिमाका), दि. 26: आंतरराष्ट्रीय दत्तक महिना (नोव्हेंबर) निमित्त हिंगोली जिल्ह्यात “विशेष गरजा असलेल्या मुलांचे (दिव्यांग मुले) संस्थाबाह्य पुनर्वसन” या प्रमुख थीमअंतर्गत जनजागृती उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. आर. दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या नियोजनानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमांअंतर्गत प्रथम जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेऊन जनजागृती मोहिमेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीगृह वॉर्ड, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम व आहार तज्ञ श्रीमती सुप्रिया इंगोले यांच्या सहकार्याने पोषण पुनर्वसन केंद्र (0 ते 5 वर्षे बालक) येथे दत्तक प्रक्रियेबाबत माहितीपत्रके, पोस्टर्स व बॅनर्सद्वारे जनजागृती करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांची भेट घेऊन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात जागृती साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच हिंगोली रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्टर राजकुमार, रेल्वे पोलीस कर्मचारी चांदु खंदारे आणि पॉइंट मॅन सोपान गांजरे यांच्या उपस्थितीत स्टेशन परिसरात दत्तक प्रकियेवरील कायदेशीर माहिती पत्रके लावून जनजागृती करण्यात आली. नोव्हेंबर महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा केला जात असून, या कालावधीत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईन 1098 यांच्या वतीने बालकांच्या हक्क, सुरक्षा, पुनर्वसन आणि दत्तक प्रक्रियेवरील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कोणतेही बालक परस्पर किंवा अनौपचारिकरित्या दत्तक घेणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. इच्छुक पालकांनी दत्तक प्रक्रियेसाठी www.missionvatsalya.wcd.gov.in या संकेतस्थळावर विधिसंमत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक अंकुर पाटोडे, राजरत्न पाईकराव व तथागत इंगळे उपस्थित होते. *****

No comments:

Post a Comment