27 January, 2026

वसमत हळदीच्या भौगोलिक मानांकनासाठी शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी – डॉ. पी. पी. शेळके

 


हिंगोली, दि. 27 : हिंगोली जिल्ह्याची ओळख असलेल्या वसमत हळदीला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळवून देण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, या मानांकनाचा अधिकृत वापर करता यावा यासाठी वसमत व परिसरातील सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी केले आहे.

आज मंगळवार, (दि. 27) रोजी वसमत येथील सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वसमत हळदीच्या मानांकनासंदर्भात विशेष ऑनलाईन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस नाबार्ड, पुणे विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, नाबार्डचे हिंगोली जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. लहाने, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी. पी. शेळके तसेच सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड उपस्थित होते.

या बैठकीत नाबार्डच्या पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘वसमत हळद’ जी.आय. टॅगचा अधिकृत वापर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला. ही प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने सूर्या एफपीसीला सहकार्य करावे तसेच शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना नाबार्डकडून देण्यात आल्या.

यावेळी माहिती देताना सांगण्यात आले की, शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली असून, अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणीसाठी हळद पीक पेरा दर्शविणारा सातबारा उतारा, आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि केवळ १० रुपये नोंदणी शुल्क आवश्यक आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. पी. पी. शेळके म्हणाले की, “श्री. प्रल्हाद बोरगड व सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने वसमतच्या हळदीला राष्ट्रीय व जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. या प्रक्रियेत कृषी विज्ञान केंद्र पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील.”

भविष्यातील बाजारपेठ, दरवाढ आणि हळदीच्या ब्रँडिंगचा लाभ लक्षात घेता वसमत व परिसरातील सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या तेलगाव (ता. वसमत) येथील कार्यालयात तातडीने संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. शेळके यांनी केले. 

या बैठकीस डॉ. हरिदास जटाळे यांच्यासह इतर मान्यवरही ऑनलाईन उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि., कार्यालय वसमत–परभणी रोड, तेलगाव, ता. वसमत, जि. हिंगोली यांच्याशी संपर्क साधावा, आवाहन करण्यात आले आहे.

*******

No comments:

Post a Comment