29 January, 2026

शेतक-यांनी कापूस पिकातील फरदड काढून टाकावी

 

•  किड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन


हिंगोली, दि. २९ (जिमाका) : खरीप हंगाम सन २०२५ मध्ये हिंगोली जिल्ह्यात सुमारे ३७,२५९ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आतापर्यंत कापसाच्या ३–४ वेचण्या पूर्ण झाल्या असल्या तरी जानेवारी महिना संपत आला असूनही अनेक ठिकाणी कापूस पिक शेतात उभे असल्याचे निदर्शनास आले आहे.


शेतात उभे असलेले कापूस पीक मातीतील पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेत असल्यामुळे कीड व रोगांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते. कापूस पिकातील कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच पुढील हंगामातील उत्पादन वाढीसाठी फरदड कापूस निर्मूलन करणे अत्यंत आवश्यक आहे. फरदड कापूस हा गुलाबी बोंडअळी, तुडतुडे, मावा तसेच विविध रोगांचा आश्रयदाता ठरतो, त्यामुळे पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.


या पार्श्वभूमीवर कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना कापूस काढणीनंतर उरलेली फरदड पिके तात्काळ उपटून नष्ट करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शेतात उरलेली कापसाची झाडे मुळासकट उपटून, चिरडून किंवा खोल नांगरट करून नष्ट करावीत. यामुळे किडींचे जीवनचक्र खंडित होऊन पुढील हंगामात कीड व्यवस्थापनास मदत होणार आहे.



फरदड निर्मूलन केल्यास गुलाबी बोंडअळी व इतर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, रोगांचा प्रसार आटोक्यात येतो, पुढील हंगामात उत्पादनाचा दर्जा सुधारतो तसेच कीटकनाशकांवरील खर्चात बचत होते. तरी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी फरदड कापूस शेतात ठेवू नये व तात्काळ निर्मूलन करून मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.


*****

No comments:

Post a Comment