31 October, 2026

आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठीमंत्री प्रकाश आबिटकर यांचा हिंगोलीतून आरोग्य संवाद

सुधारित दौरा कार्यक्रम 2 
हिंगोली, दि. 31 (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीत राज्यभर ‘आरोग्य संवाद यात्रा’राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर सोमवार, 2 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत असून आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेणार आहेत. तसेच विविध स्तरांवरील पदाधिकारी, अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

मंत्री आबिटकर 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांच्यासमवेत नांदेड येथून वसमतकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी 10 वाजता वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रास मंत्री आबिटकर भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर 10.30 वाजता वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयासही भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी करणार आहेत. सकाळी 11 वाजता वसमत तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
कळमनुरी तालुक्यातील बाळापूरकडे सकाळी 11.30 वाजता आमदार संतोष बांगर यांच्या समवेत प्रयाण. दुपारी 12.30 वाजता कळमनुरी तालुक्यातील बाळापूर येथे विविध आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेऊन आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी एक ते दीड हा वेळ राखीव असून दुपारी दीड वाजता बाळापूर येथून ते हिंगोलीकडे प्रयाण करतील. 

दुपारी दोन वाजता हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन कॅथलॅब व अन्य वैद्यकीय सुविधांची पाहणी करतील. दुपारी 2.30 वाजता हिंगोली शहरातील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल आणि ढाले हॉस्पिटल येथे मंत्री आबिटकर सदिच्छा भेट देतील.

दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहातून दूरदृश्यप्रणालीद्वारे हिंगोली जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत विविध आरोग्य समित्यांचे पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी आरोग्य संवाद साधणार आहेत. त्यानंतर सोयीनुसार हिंगोली येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण करतील.

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनराष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शपथ

हिंगोली, दि. 31 ऑक्टोबर : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार श्री. गोळेगावकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. देशाची एकता, अखंडता व सार्वभौमत्व जपण्याबरोबरच राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

30 October, 2026

१ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पाचवी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम

• *अभियानाच्या पूर्वतयारीचा अधिदान व लेखा कार्यालयात आढावा*
• *केंद्र शासनाचे अवर सचिव दीपक गुप्ता यांची भेट*
• *निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादरीकरणाचे प्रात्यक्षिक*

मुंबई, दि. ३० : केंद्र शासनाच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागामार्फत देशभरातील २,००० शहरे व जिल्ह्यांमध्ये १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पाचवी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाचे अवर सचिव दीपक गुप्ता यांनी मुंबई येथील अधिदान व लेखा कार्यालयास भेट दिली.

राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाचे वितरण नियमित सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा सादर करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘जीवन प्रमाण’ प्रणालीद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे पात्र निवृत्तीवेतनधारकांना आधार आधारित बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करून सादर करता येते.

या भेटीदरम्यान अवर सचिव गुप्ता यांनी अधिदान व लेखा अधिकारी प्रगती धनावडे तसेच संचालनालय, लेखा व कोषागारे आणि अधिदान व लेखा कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कार्यालयातील निवृत्तीवेतन शाखा आणि निवृत्तीवेतन मदत कक्षाला भेट दिली.

यावेळी उपस्थित निवृत्तीवेतनधारकांना ‘जीवन प्रमाण’ पोर्टल व मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करून सादर करण्याच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच या सुविधेचा वापर करून प्रत्यक्ष बँक किंवा कोषागार कार्यालयात उपस्थित न राहता हयातीचा दाखला सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी अधिदान व लेखा अधिकारी प्रगती धनावडे यांनी राज्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुविधेचा लाभ घेऊन ‘जीवन प्रमाण’ प्रणालीद्वारे हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन केले.
0000

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला मुदतवाढ

• १३ नोव्हेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार
• अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

हिंगोली, दि. ३० (जिमाका) : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार मतदार यादीतील नावांबाबतचे दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत आता १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच दावे आणि हरकतींच्या नोटीस टप्प्यातील कार्यवाही व त्यांचा निपटारा करण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, अंतिम मतदार यादी  ३० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

 भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असेल. नोटीस टप्पा आणि दावे-हरकतींचा निपटारा २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

महाराष्ट्रासह १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करून विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मतदारांना आपले नाव, तपशील तसेच मतदार यादीतील नोंदी तपासून आवश्यक दावे व हरकती दाखल करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
००००००

योजनांच्या नावाखाली पैशांची मागणी, गैरप्रकार खपवून घेणार नाही– महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील

हिंगोलीत महामंडळाच्या योजनांचा आढावा; लाभार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश

हिंगोली, दि. ३० (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा आढावा घेतानाच लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोली येथे आढावा बैठक व लाभार्थी समस्या निवारण मेळावा घेण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. 

तसेच उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

दौऱ्याच्या प्रारंभी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचे कौतुक केले. ही योजना आदर्श ठरल्यामुळे अन्य २६ महामंडळांमध्येही अशा स्वरूपाच्या योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. महामंडळाच्या कार्यपद्धती व मार्गदर्शनामुळे मागील आर्थिक वर्षात सुमारे ७५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.

वाहन व्यवसायासोबतच इतर क्षेत्रांतही उद्योग सुरू करण्याचे आवाहन

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या युवकांनी वाहन व्यवसायापुरते मर्यादित न राहता सेवा, उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही उद्योग सुरू करावेत. स्वतःचा व्यवसाय उभारण्यासोबतच इतर युवकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक सहन करणार नाही

महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीने किंवा ऑनलाइन सेवा केंद्राने पैशांची मागणी करणे चुकीचे आहे. योजनांच्या नावाखाली होणारा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक किंवा दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला. अशा प्रकारांचा अनुभव आल्यास लाभार्थ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

लाभार्थ्यांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाहीचे निर्देश

समस्या निवारण मेळाव्यात अध्यक्षांनी लाभार्थ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. संबंधित जिल्हा समन्वयकांच्या माध्यमातून या समस्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. उपोषणकर्त्यांशी संवाद साधताना लाभार्थ्यांची नावे, अर्ज क्रमांक आणि समस्यांचा सविस्तर तपशील महामंडळाकडे सादर करण्याचे आवाहन केले. सन २०२४-२५ मधील पात्रता प्रमाणपत्रांशी संबंधित कामकाज तसेच कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

दुपारी ३.३० वाजता आयोजित पत्रकार परिषदेत महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा, लाभार्थ्यांच्या समस्या आणि उपोषणकर्त्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती देण्यात आली.

यावेळी कळमनुरीचे माजी आमदार  गजानन घुगे, मराठा महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अडकिने, विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी, लाभार्थी, महामंडळाचे विभागीय समन्वयक प्रवीण आगवण पाटील आणि जिल्हा समन्वयक कालिदास थावरे उपस्थित होते.

बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेच्या कृती आराखड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

हिंगोली, दि. 30 (जिमाका) : ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षातील प्रस्तावित कृती आराखड्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत वन स्टॉप सेंटर, जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र, हिंगोली तसेच महिला हेल्पलाइनच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी आर्थिक वर्षात योजनेंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि त्यासाठीच्या कृती आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सन 2026-27 या वर्षासाठीचा ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले. बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद हिंगोलीचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष दरपलवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

- मंत्रिमंडळ उपसमितीच्या अभ्यासगटाच्या बैठकीत चाऱ्याचे दर निश्चित ; पशुपालकांना दिलासा
*- दुष्काळ जाहीर कालावधीत सुधारित आधारभूत दर लागू ; सुका चारा प्रतिकिलो कमाल १२ रुपये; मुरघासासाठी कमाल ८ रुपये*
 
            मुंबई, दि. ३० : दुष्काळजन्य परिस्थितीतील संभाव्य चारा टंचाईवर मात करून पशुपालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने चारा खरेदीचे दर निश्चित केले आहेत. पशुधनासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या सुक्या चाऱ्याची कमाल आधारभूत किंमत वाहतूक खर्च वगळून प्रतिकिलो १२ रुपये, तर मुरघासाची कमाल आधारभूत किंमत वाहतूक खर्च वगळून प्रतिकिलो ८ रुपये निश्चित केली आहे, अशी माहिती पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. चाराटंचाईच्या काळात पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनांना यामुळे मदत होणार आहे.

            राज्यातील खरीप हंगामातील परिस्थितीचा आढावा घेऊन आतापर्यंत एकूण ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने अभ्यासगटाची स्थापना केली होती. या अभ्यासगटात पंकजा मुंडे सदस्य असून या अभ्यास गटाने राज्यासह इतर राज्यांमधील चारा व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचा अभ्यास करून उपलब्ध चारा, संभाव्य उत्पादन आणि आगामी काळातील गरज लक्षात घेऊन अहवाल सादर केला. या अहवालाला २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

            मदत व पुनर्वसन विभागाने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या कालावधीसाठी हे दर लागू राहतील. जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन कार्यकारी समितीने अभ्यासगटाच्या अहवालातील तरतुदी आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्देशांनुसार चारा खरेदीची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच वाहतुकीसाठी परिवहन आयुक्तांनी वेळोवेळी निश्चित केलेले दर लागू राहतील. चाऱ्याच्या गुणवत्तेबाबतही शासनाने निकष निश्चित केले आहेत. खरेदी करण्यात येणाऱ्या सुक्या चाऱ्यातील ओलावा कमाल १५ टक्के असावा. चारा चांगला दिसणारा तसेच आंबट किंवा कुबट वास, बुरशी, कीड आणि माती नसलेला असावा. ज्वारी आणि बाजरीच्या चाऱ्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. मुरघास हवाबंद आणि बुरशीमुक्त असणे आवश्यक आहे. त्यामधील ओलावा ६२ ते ७० टक्के, पीएच ३.५ ते ४.४ आणि क्रूड प्रोटीन किमान ७ टक्के असावे. अन्य घटकांसाठी भारतीय मानक ब्युरोच्या आयएस १९५६२ : २०२६ मधील निकष लागू राहतील.

*पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार*

            राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर शेतीबरोबरच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होतो. पशुधन हे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन असल्याने दुष्काळाच्या काळात त्यांना चारा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. याच उद्देशाने सुका चारा व मुरघासासाठी आधारभूत दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ चाऱ्याचे दर निश्चित करणे एवढाच या निर्णयाचा उद्देश नसून, पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळावा, यासाठी गुणवत्तेचे निकषही ठरविण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी करून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

000

निवृत्तीवेतनधारकांनी 1 नोव्हेंबरपूर्वी हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

*डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी जीवनप्रमाण प्रणालीचा* 
*लाभ घेण्याचे कोषागार अधिकाऱ्यांचे आवाहन*

हिंगोली (जिमाका), दि. ३० : महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम ३३५ नुसार राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी दरवर्षी १ नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी विहित पद्धतीने हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेतात, त्या बँकेच्या माध्यमातून हयातीचा दाखला जिल्हा कोषागार कार्यालयात सादर केला जातो. तसेच शासनाच्या धोरणानुसार अधिकाधिक निवृत्तीवेतनधारकांनी ‘जीवनप्रमाण’ प्रणालीद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करताना निवृत्तीवेतनधारकांनी बँक खाते क्रमांक, पीपीओ क्रमांक अचूक नमूद करावा. तसेच ‘Sanctioning Authority’ या पर्यायामध्ये ‘State Government of Maharashtra’ आणि ‘Disbursing Authority’ या पर्यायामध्ये ‘Maharashtra State Treasury’ निवडून कोषागाराच्या नावासाठी ‘Hingoli’ हा पर्याय अचूक निवडावा.

तरी सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी संबंधित बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000

बालकांच्या सुरक्षिततेसाठी ‘सुरक्षित बचपन अभियान’;बाल लैंगिक शोषण व बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती


हिंगोली (जिमाका), दि. ३० : बालकांचे लैंगिक शोषण रोखणे, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे तसेच बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथांविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती, हिंगोली यांच्या वतीने अनसूया विद्या मंदिर येथे ‘सुरक्षित बचपन अभियान’ राबविण्यात आले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्रीकांत एल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२ संदर्भात अखिल भारतीय शालेय जनजागृती मोहिमेंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. जी. दुबाले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा वकील संघाचे विधिज्ञ ॲड. डी. बी. खंदारे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. आर. घुगे आणि अनसूया विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ एन्ट्रन्सचे प्राचार्य पी. आर. गुरुसुडे उपस्थित होते.

यावेळी ॲड. डी. बी. खंदारे यांनी विद्यार्थ्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींसोबत जाणे टाळावे, अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत, वैयक्तिक अवयवांना चुकीच्या हेतूने स्पर्श केल्यास स्पष्टपणे विरोध करावा, तसेच अशा प्रकारचा अनुचित प्रसंग घडल्यास न घाबरता शिक्षक, पालक किंवा विश्वासू व्यक्तींना तातडीने सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात न्यायाधीश एस. जी. दुबाले यांनी अभियानाची ‘ना बालविवाह, ना बालशोषण’ ही संकल्पना स्पष्ट केली. बालविवाह हा बालकांच्या हक्कांचे उल्लंघन आणि शोषणाचा प्रकार असल्याचे सांगून बालविवाह करणे तसेच लावणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे त्यांनी नमूद केले. मुलीचे विवाहाचे वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. परिसरात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित यंत्रणेला माहिती देऊन असे विवाह रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना बालसुरक्षेविषयक माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या वतीने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ या संकल्पनेअंतर्गत ॲड. खंदारे यांनी भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी नागरिकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात सहशिक्षक के. व्ही. सूर्यवंशी यांनी भ्रष्टाचार रोखण्याबाबत उपस्थितांना शपथ दिली. त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहशिक्षक एस. एस. परांडे यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक डी. बी. हनवते व कनिष्ठ लिपिक एन. एस. दिंडे यांनी शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने अभियान यशस्वी केले.
00000

गावांना जलसमृद्ध करण्यासाठी ‘वॉटर कप’अभियानासाठी गावनिहाय नियोजन करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


*‘सत्यमेव जयते वॉटर कप’ अभियानाच्या नियोजनासाठी बैठक संपन्न*

हिंगोली, दि. ३० (जिमाका) : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळाची दाहकता अधिक असलेल्या गावांना पाणीदार व दुष्काळमुक्त करण्यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. यासाठी प्रत्येक तालुक्याने दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या गावांची यादी तयार करावी. तसेच या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक गावातील ५ ते ६ व्यक्तींची निवड करून त्यांची नावे प्राधान्याने सादर करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

‘सत्यमेव जयते वॉटर कप’ अभियानाच्या नियोजनासाठी पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगनवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, जलसंधारण व मृदसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली ढोके, पाणी फाउंडेशन विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर सर्व तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

टंचाईग्रस्त गावांची निवड करून आतापासूनच नियोजन करा

जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने आतापासूनच विविध उपाययोजनांचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या असून, संबंधित यंत्रणांना टंचाई आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, दीर्घकालीन उपाययोजनांच्या दृष्टीने जलसंधारणाची कामे लोकसहभागातून हाती घेणे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे दुष्काळाची दाहकता अधिक असलेल्या गावांची प्राधान्याने निवड करावी. प्रत्येक गावातून ५ ते ६ इच्छुक, सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या आणि प्रत्यक्ष काम करण्याची तयारी असलेल्या व्यक्तींची प्रशिक्षणासाठी नावे निश्चित करावीत. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी असलेल्या गावांचाही या उपक्रमात समावेश करावा, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले.
लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभारणार

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येणारी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही जलसंधारण व पाणलोट व्यवस्थापनावर आधारित महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गावागावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी करणे, पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि पाणी व्यवस्थापनाबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.

पाणी फाउंडेशन गेल्या दहा वर्षांपासून पाणी आणि शेती या विषयांवर ग्रामीण भागात प्रशिक्षण, जनजागृती व लोकसहभागातून विविध उपक्रम राबवित आहे. या कार्याला शासनाचेही सहकार्य मिळत आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान व त्यांच्या सहकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत यंदा संपूर्ण महाराष्ट्रात ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या अभियानाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातही आगामी काळात जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. स्पर्धेचे स्वरूप, अंमलबजावणीची पद्धत, विविध शासकीय विभागांची भूमिका आणि विभागनिहाय सहकार्य याबाबत पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
जलसंधारणाची कामे केवळ शासकीय यंत्रणांपुरती मर्यादित न ठेवता ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, गावपातळीवरील नेतृत्व आणि विविध विभागांचा समन्वय यांद्वारे व्यापक लोकचळवळ उभी करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. गावांनी एकत्रित प्रयत्न केल्यास पाणीटंचाईवर मात करून जलसुरक्षित व दुष्काळमुक्त गावांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.
00000

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण

 ‘माझी वसुंधरा’ अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषद हिंगोलीच्यावतीने आयोजन
हिंगोली, दि. ३० : पर्यावरणाचे संरक्षण, हरित क्षेत्रात वाढ आणि स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक शहरनिर्मितीच्या उद्देशाने स्वच्छ सर्वेक्षण २०२६-२७ तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही वृक्षारोपणात सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

नगरपरिषद हिंगोलीच्या वतीने आयोजित या उपक्रमातून शासकीय कार्यालयांच्या परिसरात हरित क्षेत्र विकसित करण्यासोबतच नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाढते शहरीकरण, पर्यावरणीय असमतोल आणि बदलते हवामान यांचा विचार करता वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करणेही महत्त्वाचे आहे. या दृष्टीने नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने स्वच्छता, हरित परिसर आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवून नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्राजंली मुंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
00000

29 October, 2026

३० ऑक्टोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी ;अध्यात्म शक्तीला राष्ट्र निर्मितीशी जोडणारे संत

 विशेष लेख / 

                भारतीय संतपरंपरेने अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन, समता आणि मानवतेची मूल्ये जपली आहेत.या परंपरेला आधुनिक राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विसाव्या शतकातील एक लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्य मिळविणे हे राष्ट्रनिर्मितीचे अंतिम उद्दिष्ट नसून, स्वतंत्र भारताला समताधिष्ठित, स्वावलंबी, एकात्म आणि समृद्ध बनविणे ही खरी जबाबदारी आहे, याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली. म्हणूनच त्यांचे कार्य केवळ संतपरंपरेपुरते मर्यादित न राहता नवभारताच्या उभारणीशी जोडले गेले.

आज त्यांच्या पुण्यतिथीला त्यांना अभिवादन करताना त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शावर समाजाने आणि समाजातील संत समुदायाने वाटचाल करणे आवश्यक वाटते.या भारताच्या नवनिर्माणासाठी कोणत्याही काळामध्ये या ठिकाणच्या सज्जनशक्तीने एकत्रित येणे आवश्यक वाटते.

 स्वातंत्र्यानंतर संघटन करण्याचा ध्यास 

स्वातंत्र्यानंतर भारतासमोर सामाजिक विषमता,धर्माधर्मातील असंतोष, निरक्षरता, ग्रामीण दारिद्र्य, जातिभेद आणि राष्ट्रीय एकात्मतेची आव्हाने होती. या परिस्थितीत समाजाच्या मनावर प्रभाव टाकणाऱ्या संतांनी राष्ट्रनिर्मितीच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, अशी भूमिकातत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी मांडली. या भूमिकेला राष्ट्रव्यापी करण्याचे ध्येय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी घेतले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याशी संबंधित चरित्रपर संदर्भांतूनही राष्ट्रसंतांच्या कार्याला मिळालेल्या राष्ट्रीय मान्यतेचे महत्त्व स्पष्ट होते. राष्ट्रपती भवनातील त्यांच्या खंजिरी भजनाने आणि राष्ट्रभक्तिपर विचारांनी त्यांचे कार्य राष्ट्रीय स्तरावर पोहोचले.

संतांचा प्रभाव केवळ धार्मिक श्रद्धेपुरता न राहता तो लोकशिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि देशसेवेसाठी उपयोगात यावा, हा त्यांच्या कार्याचा गाभा होता. देशभरातील संतांना व्यापक राष्ट्रहिताच्या कार्यासाठी एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना १९५६ मध्ये महत्त्वाचे वळण मिळाले. दिल्ली येथे विविध आखाड्यांतील,राज्यातील,धर्मपिठातील धर्माचार्य आणि संतांच्या सहभागातून भारत साधू समाजाची स्थापना झाली. गुरुकुंज आश्रमाच्या जीवनदर्शनविषयक नोंदीनुसार, या संस्थेच्या स्थापनेत राष्ट्रसंतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांची प्रथम अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. संतशक्तीला संघटित सामाजिक कार्याची दिशा देणारा हा प्रयत्न त्यांच्या राष्ट्रनिर्माणविषयक दृष्टिकोनाचा महत्त्वाचा आविष्कार होता. संत कसा असावा. भारताच्या नवनिर्माणात संतांची भूमिका कशी सर्वसमावेशक असावी, याचा वस्तुपाठ राष्ट्रसंतानी आपल्या साहित्यातून घालून दिला आहे.

 स्वातंत्र्यलढ्यातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा 

राष्ट्रसंतांचे राष्ट्रकार्य स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरू झाले नव्हते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या काळात त्यांच्या राष्ट्रभक्तिपर रचनांनी जनमानसात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली. चिमूर, आष्टी,यावली या भागात राष्ट्रसंतांच्या शब्दांनी राष्ट्रभक्तीच्या स्फुल्लिंग चेतविले. आते है नाथ हमारे या भजनातील 'झाडझडुले शस्त्र बनेगी! भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेगी, नाव लगेगी किनारे ' यांसारख्या स्फूर्तिगीतांनी ग्रामीण भागातील जनतेला आंदोलनाशी जोडण्याचे काम केले. ब्रिटिश सत्तेने त्यांना अटक केली आणि तुरुंगवासही भोगावा लागला.

त्यांनी लोकभाषेचा, लोकसंगीताचा आणि त्यांचा गावागावातील जनसंपर्काच्या प्रभावी माध्यमांचा उपयोग राष्ट्रीय जाणीव जागविण्यासाठी केला. त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता नव्हे; तर समाजातील अन्याय, अज्ञान आणि विषमतेतूनही मुक्तता होती.

 ग्रामविकासातून राष्ट्रविकासाचा मार्ग 

                 भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांची प्रगती झाल्याशिवाय देशाची सर्वांगीण प्रगती शक्य नाही, ही राष्ट्रसंतांची ठाम धारणा होती. याच विचारातून त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. ग्रामस्वच्छता, शिक्षण, श्रमप्रतिष्ठा, सहकार, व्यसनमुक्ती, नैतिकता, स्वावलंबन आणि लोकसहभाग या घटकांचा समन्वय साधणारा हा ग्रामविकासाचा विचार आहे.

गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा ही त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट करणारी ओळ आहे. ग्रामविकास हा केवळ रस्ते, पाणी आणि इमारतींच्या निर्मितीपुरता मर्यादित नसून गावातील माणसांच्या विचारांत, आचरणात आणि परस्पर संबंधांत परिवर्तन घडविण्याची प्रक्रिया आहे, असे त्यांच्या कार्यातून दिसते.

१९३५ मध्ये स्थापन केलेल्या गुरुकुंज आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा, सामुदायिक प्रार्थना आणि विधायक उपक्रमांना चालना दिली. अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा विचार व्यापक जनसमुदायापर्यंत पोहोचविला. गावकऱ्यांनी स्वतःच्या विकासाची जबाबदारी स्वीकारावी आणि श्रमदानातून सामूहिक प्रगती साधावी, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा संदेश होता.

 संकटकाळातील राष्ट्रसेवा आणि राष्ट्रीय एकात्मता 

राष्ट्रनिर्मिती म्हणजे केवळ विकासाच्या योजना नव्हेत, तर संकटाच्या वेळी देशबांधवांच्या मदतीला धावून जाणेही होय. बंगालच्या दुष्काळाच्या काळात, १९६२ मधील चीनच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, कोयना भूकंपानंतर आणि १९६५ मधील पाकिस्तानच्या आक्रमणाच्या काळात राष्ट्रसंतांनी मदतकार्य व जनजागृतीच्या माध्यमातून राष्ट्रसेवेचा आदर्श घालून दिला. त्यांचे कार्य अध्यात्म आणि कृती यांच्यातील अंतर मिटविणारे होते.अध्यात्मिक गुरूंनी,संतांनी,अध्यात्मिक प्रबोधनकारांनी समाज जागृती करताना देशाला अन्य कोणत्याही बाबीपेक्षा महत्त्व देणे आणि बंधुता जपणे आवश्यक असल्याचे सांगून जाते.

जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या पलीकडे जाऊन भारतीय समाजात बंधुभाव निर्माण करणे, हे त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पनेचे मूलभूत सूत्र होते. सामुदायिक प्रार्थनेतून त्यांनी सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. या भारतात बंधुभाव नित्य वसु दे...दे वरची असा दे', ही त्यांची प्रार्थना राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला अभिव्यक्त करते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरचे विद्यापीठ गीत हे त्यांचे हेच लोकप्रिय भजन आहे. राज्य घटनेत व्यक्त केलेल्या बंधुता या अपेक्षेला आपल्या प्रबोधनात मांडणारा राष्ट्रसंतांसारखा संत होणे नव्हे. अध्यात्मिक गुरूंनी किती सर्वसमावेशी असावे, याचे उदाहरणही त्यांनी त्यांच्या वाणीतून घालून दिले आहे.

 विश्वशांती परिषदेत बंधूभावाचा प्रचार 

१९५५ मध्ये जपानमध्ये आयोजित जागतिक धर्मपरिषद आणि विश्वशांतीविषयक परिषदांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देशाबाहेरही पोहोचविला. राष्ट्रनिर्मितीचा त्यांचा विचार भारताच्या सीमांपुरता मर्यादित नव्हता; तो विश्वशांतीच्या व्यापक मूल्यांशी जोडलेला होता.संत ज्ञानेश्वराच्या बंधू भावाच्या पसायदानाला त्यांनी आपल्या खंजिरीची साथ दिली.जापान मध्येही त्यांनी विश्वबंधुत्वाचा नारा देत जगातील सतप्रवृत्तींना एकत्रित आणण्याचे जागतिक कार्य केले.

 नवभारतासाठी आजही मार्गदर्शक विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनातून जनजागृती केली, संघटनातून समाजसेवेची शक्ती उभी केली आणि ग्रामगीतेतून ग्रामविकासाचा विचार मांडला. संतशक्तीला विधायक राष्ट्रकार्यात सहभागी करून घेणे, सामान्य माणसाला विकासाचा सक्रिय भागीदार बनविणे आणि सामाजिक एकात्मतेतून राष्ट्राची उभारणी करणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती.

आज विकसित भारताच्या संकल्पनेत ग्रामविकास, नागरिकांचा सहभाग, सामाजिक एकात्मता आणि स्वावलंबन यांना महत्त्व आहे. या सर्व मूल्यांचा आग्रह राष्ट्रसंतांनी आपल्या कार्यातून अनेक दशकांपूर्वी धरला होता. त्यांच्या पुण्यतिथीला त्यांचे स्मरण करताना त्यांच्या विचारांना केवळ गौरवोद्गारांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत आणणे आवश्यक आहे.

 राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या... 

अशी जगण्याची माफक अपेक्षा ठेवणारे आणि सामान्यातील सामान्य माणसाच्या आयुष्यातील समाधानांना शोधणारे तुकडोजी महाराज यांचे साहित्य त्यांच्या वैचारिक वारशाला अधोरेखित करते.बंधुभावाने जोडलेला समाज, स्वावलंबी खेडी आणि सेवाभावी नागरिक यांच्या बळावरच नवभारताची भक्कम पायाभरणी होऊ शकते, हा त्यांच्या जीवनकार्याचा आजही प्रेरणा देणारा संदेश आहे.आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध जातीपंथातील संत परंपरेने देखील खरे राष्ट्र निर्माण काय असते.यासाठी राष्ट्रसंतांनी निर्माण केलेले साहित्य राष्ट्रसंतांनी समाजाला दिलेले विचार आणि सामाजिक बंधुता आजही सर्वांना प्रेरणादायी आहे.आज त्यांच्या पुण्यतिथीला त्यांना विनम्र अभिवादन.

***

 प्रवीण टाके

उपसंचालक (माहिती)विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर                                               9702858777

निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी विजयाचे प्रमाणपत्र प्रदान सलग ४५ तासांहून अधिक काळ मतमोजणी ; अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून प्रक्रिया पूर्ण

 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील १८ हजार १२४ मतांनी विजयी


डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ८५ हजार ८७६, तर सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते

३९ उमेदवारांच्या वगळणीनंतर अंतिम निकाल जाहीर ; विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराला गाठता आला नाही

छत्रपती संभाजीनगर, दि. २९ (विमाका) :- विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे १८ हजार १२४ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ८५ हजार ८७६ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. पसंतीक्रमानुसार ३९ उमेदवारांची वगळणी व मतहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतमोजणीत डॉ. पाटील यांनी सर्वाधिक मते मिळवली. भारत निवडणूक आयोगाकडून निकालासंदर्भातील पुढील प्रक्रियेस मान्यता प्राप्त झाल्यानंतर गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी डॉ. पाटील यांना विजयी घोषित केले.

निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते डॉ. प्रतापसिंह पाटील यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे-चावरे, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे - चवरे यांच्या देखरेखीखाली मतमोजणी पार पडली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव या आठ जिल्ह्यांतील ८४२ मतदान केंद्रांवर झालेल्या या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीसाठी ७० टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती.

वैध मतांच्या आधारे ८८ हजार ५५८ मतांचा कोटा निश्चित

मतमोजणीच्या प्रारंभी मतपत्रिकांची पडताळणी व वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी तीन फेऱ्यांत पूर्ण करण्यात आली. पहिल्या फेरीत ७० हजार ५१९, तर दुसऱ्या फेरीअखेर एकत्रित १ लाख ४० हजार ५४३ मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या आकडेवारीनुसार एकूण १ लाख ७७ हजार ११५ मते वैध, तर १६ हजार ५४० मते अवैध ठरली. वैध मतांच्या आधारे विजयासाठी ८८ हजार ५५८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

पहिल्या पसंतीच्या मतमोजणीअखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ७३ हजार ९३१, सतीश चव्हाण यांना ६० हजार ७६८, अपक्ष उमेदवार रविराज उर्फ अण्णासाहेब सावळे-पाटील यांना १९ हजार ८३५, तर दिलीप घुगे यांना ८ हजार ४३९ मते मिळाली. कोणत्याही उमेदवाराने विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केला नसल्याने निवडणूक नियमांनुसार कमी मते मिळालेल्या उमेदवारांची टप्प्याटप्प्याने वगळणी करून त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार मतहस्तांतरणाची प्रक्रिया राबविण्यात आली.

३९ उमेदवारांच्या वगळणीनंतर अंतिम निकाल

मतहस्तांतरण प्रक्रियेत वगळण्यात आलेल्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार उर्वरित उमेदवारांना मते देण्यात आली. दिलीप घुगे यांच्या मतपत्रिकांमधून २ हजार २८५ मते डॉ. पाटील यांना, तर १ हजार ८८१ मते सतीश चव्हाण यांना हस्तांतरित झाली. त्यानंतर ३९व्या वगळणीत रविराज सावळे-पाटील यांच्या मतपत्रिकांमधून ६ हजार ४६९ मते डॉ. पाटील यांना, तर ३ हजार २४१ मते सतीश चव्हाण यांना हस्तांतरित झाली.

एकूण ४१ उमेदवारांपैकी ३९ उमेदवारांच्या वगळणीनंतर डॉ. प्रतापसिंह पाटील व सतीश चव्हाण हे दोन उमेदवार शिल्लक राहिले. या टप्प्यावरही कोणत्याही उमेदवाराने निश्चित कोटा पूर्ण केला नव्हता. अंतिम मतमोजणीत डॉ. पाटील यांना ८५ हजार ८७६, तर सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. डॉ. पाटील यांना १८ हजार १२४ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी अधिकृत निकाल जाहीर करून डॉ. पाटील यांना विजयी घोषित केले.

अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सलग ४५ तासांहून अधिक काळ कामकाज

मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी पहाटे अंतिम निकाल घोषित होईपर्यंत सलग ४५ तासांहून अधिक काळ सुरू होती. मतपत्रिकांची पडताळणी, वर्गीकरण, पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी, उमेदवारांची वगळणी, पुढील पसंतीक्रमानुसार मतहस्तांतरण, अंतिम आकडेवारीची तपासणी व निकाल निश्चिती या प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली पार पाडण्यात आल्या.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामकाज केले. मतमोजणी पथक, मतपत्रिका वर्गीकरणासाठी नियुक्त पथक व त्यांच्या सहकाऱ्यांनीही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

मतमोजणी केंद्र व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतमोजणी कालावधीत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. याशिवाय मतमोजणी केंद्रावरील सुविधा, साहित्य, स्वच्छता व अन्य आवश्यक व्यवस्थांसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, सेवक तसेच कंत्राटी मनुष्यबळाचेही सहकार्य लाभले.


मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध यंत्रणांनी जबाबदारीने काम केले. निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी निवडणूक निरीक्षक, मतमोजणी प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच सहाय्यक यंत्रणांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

मौजे सावा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी; ८ लाख लिटर पाणीसाठा होणार भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा पुढाकार ; पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी जलस्रोतांना मिळणार बळकटी




हिंगोली, दि. २९ ऑक्टो (जिमाका) : सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांसह परिसरातील शेतकऱ्यांच्या जलस्रोतांना बळकटी मिळावी, या उद्देशाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, हिंगोली कार्यालयामार्फत मौजे सावा, ता. जि. हिंगोली येथे २९ ऑक्टोबर 2026 रोजी वनराई (वसंत) बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. या बंधाऱ्यामुळे अंदाजे ८ लाख लिटर भू-पृष्ठीय पाणीसाठा निर्माण होणार असून, त्याचा उपयोग सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि काही सिंचन स्रोतांच्या बळकटीकरणासाठी होणार आहे.


भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे येथील आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. बंधाऱ्यासाठी १२ मीटर रुंद, ०.६० मीटर उंच आणि १२० मीटर लांबीपर्यंत पाणीसाठा निर्माण होऊ शकेल, असे योग्य स्थळ निवडण्यात आले होते. या ठिकाणी पावसाचे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग होण्यास मदत होणार आहे.


*अधिकारी व ग्रामस्थांचे श्रमदान*


वनराई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगनवार, सहाय्यक भूवैज्ञानिक दीपक वाबळे, सय्यद आशफाक, रमेश रिठे, राजेश राठोड, अनिल सोळंके, प्रफुल्ल विणकरे, भारत खुडे, संतोष बेले, पंढरीनाथ शिंदे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी श्रमदान केले. स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा साठा वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

00000

बालसुरक्षेसाठी विद्यार्थ्यांना कायद्याचे बळ; ‘बोलो, बताओ, बचाओ’चा संदेश हिंगोलीत ‘सुरक्षित बचपन अभियान’द्वारे पॉक्सो कायद्याविषयी जनजागृती; दक्षता सप्ताहात भ्रष्टाचारविरोधी शपथ

 





हिंगोली, दि. २९ ऑक्टो (जिमाका) : बालकांवरील लैंगिक अत्याचारांना प्रतिबंध घालणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि गैरवर्तनाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठविण्यास प्रोत्साहित करणे, या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती, हिंगोलीतर्फे ‘सुरक्षित बचपन अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पोदार इंटरनॅशनल स्कूल, शिवाजी महाविद्यालय आणि ए. बी. एम. इंग्लिश हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना पॉक्सो कायदा, सुरक्षित-असुरक्षित स्पर्श आणि बालकांच्या कायदेशीर हक्कांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम विशद करून प्रामाणिकतेची शपथ देण्यात आली.


तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम आयोजित करण्यात आले.


पॉक्सो कायद्याची माहिती; गैरवर्तनाविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन


पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्री. एस. जी. दुबाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विधिज्ञ ॲड. एन. एस. घुगे यांनी बालकांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बालकामगार प्रतिबंध आणि पॉक्सो कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. अनुचित स्पर्श करणारी व्यक्ती परिचित किंवा नातेवाईक असली, तरी त्याबाबत पालक अथवा शिक्षकांना सांगण्याचे आवाहन करण्यात आले.


शिवाजी महाविद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्री. व्ही. एम. मानखैर होते. ॲड. एम. एम. मोरे यांनी पॉक्सो कायदा मुला-मुली दोघांनाही संरक्षण देतो, हे स्पष्ट करत कायद्यातील तरतुदी आणि गुन्ह्यांच्या स्वरूपाविषयी मार्गदर्शन केले. अनुचित स्पर्श ओळखून त्याला विरोध करावा आणि अशा घटनेची माहिती पालक किंवा शिक्षकांना द्यावी, असे आवाहन श्री. मानखैर यांनी केले.


ए. बी. एम. इंग्लिश हायस्कूल येथे तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्री. ए. जी. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ॲड. एम. एम. गांजरे यांनी पॉक्सो कायद्यातील तरतुदी, गुन्हे आणि शिक्षांची माहिती दिली. ‘बोलो, बताओ, बचाओ’ या संदेशातून बालकांनी गैरवर्तनाच्या घटनांबाबत न घाबरता पालक, शिक्षक, मुख्याध्यापक किंवा विश्वासातील व्यक्तीला सांगावे, असे आवाहन श्री. नाईक यांनी केले. बालक स्वतःहून व्यक्त होऊ शकत नसल्यास संबंधितांनी पुढाकार घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.


‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’चा संदेश


२६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित दक्षता जनजागृती सप्ताहांतर्गत तिन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम, प्रामाणिकतेचे महत्त्व आणि भ्रष्टाचार प्रतिबंधासाठी नागरिकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिवाजी महाविद्यालयात प्रा. डी. व्ही. शिराळे यांनी याबाबत विचार मांडले. यावेळी उपस्थितांना भ्रष्टाचारविरोधी शपथ देण्यात आली.


मान्यवरांची उपस्थिती; समितीच्या कर्मचाऱ्यांचे आयोजन


कार्यक्रमांना जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. आर. घुगे, संबंधित शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संबंधित संस्थांतील प्रतिनिधींनी केले. तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक श्री. डी. बी. हनवते आणि कनिष्ठ लिपिक श्री. एन. एस. दिंडे यांनी शैक्षणिक संस्थांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या अभियानाच्या आयोजनासाठी योगदान दिले.

00000

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा हिंगोली दौरा


हिंगोली, दि. 29 ऑक्टो (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे

अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे हिंगोली दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 


शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन. सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे महामंडळाचे लाभार्थी व मराठा समाजातील विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महामंडळाच्या योजनांबाबत, लाभार्थ्यांच्या अडचणीबाबत, प्रलंबित प्रकरणांबाबत बैठक घेतील. दुपारी 3 वा. हिंगोली येथे पत्रकार परिषदेस उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 6 वा. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून परभणीकडे प्रयाण करतील. 

                                                                                  00000

28 October, 2026

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गुणात्मक परिवर्तनासाठी सर्वेक्षणाची मदत होईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.२८:  शासकीय योजनांची व्याप्ती वाढविणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता तपासणे महत्वाचे असल्याने यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनाच्या  प्रभावी अंमलबजावणी बरोबरच त्यामध्ये गुणात्मक परिवर्तन  होण्यास मदत होईल, असा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

माहिती व जनसंपर्क विभागामार्फत नियुक्त ॲक्सिस माय इंडिया या संस्थेमार्फत विविध विभागांच्या योजनांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासंदर्भात सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि योजना पश्चात सर्वेक्षणाबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने  योजनांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. योजनांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास, लाभार्थ्यांच्या माहितीचे विश्लेषण, योजनांमुळे साध्य झालेल्या परिणामांचे मूल्यमापन आणि त्यातून पुढील सुधारणांसाठी आवश्यक बाबी निश्चित करणे, अशा विविध स्तरांवर काम केले जात आहे. राज्यातल्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी या सर्वेक्षणांचा चांगला उपयोग होऊ शकतो. योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्वेक्षणातून मिळणारी माहिती केवळ माहितीपुरती मर्यादित न ठेवता, त्यातून प्रत्यक्ष कामकाजात सुधारणा घडवून आणण्यास मदत होईल. उपलब्ध माहितीच्या आधारे योजनांची सद्यःस्थिती समजून घेणे, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी ओळखणे आणि अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांनी आवश्यक  सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या सर्वेक्षणाच्या माध्यमातून योजनांबद्दलची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच शासनाच्या योजनांसाठी असणारा प्रतिसाद समजण्यास मदत होईल. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अचूक डेटा बेस तयार होईल आणि लोकांना शासकीय योजनांचा अधिक लाभ मिळण्यास मदत होईल.  या सर्वेक्षणातून शासकीय योजनांबाबत अधिक विश्वासार्हता निर्माण होऊन राज्य शासनास अचूक माहिती मिळेल आणि गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल.

*क्षेत्रीय कार्यालयांचा सहभाग महत्वाचा*
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, योजनांची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांची भूमिका महत्वाची आहे. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आवश्यक सहकार्य करून  माहिती संकलन व विश्लेषणाच्या प्रक्रियेत समन्वय साधावा आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पूरक वातावरण निर्माण करावे. 

  शासकीय यंत्रणा आणि संबंधित संस्थेने एकसंघ भावनेतून काम केल्यास योजनांच्या अंमलबजावणीत अधिक चांगले परिणाम साधता येतील. उपलब्ध माहितीचा योग्य वापर, समन्वयपूर्ण कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव यांच्या आधारे प्रशासकीय कामकाजात सुधारणा घडवून आणता येईल. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना अधिक परिणामकारक होण्यासह नागरिकांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचविण्याच्या प्रक्रियेत गुणात्मक परिवर्तन घडविणे शक्य होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

बैठकीस राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव उपस्थित होते. तर  विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
०००००

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गुणात्मक परिवर्तनासाठी सर्वेक्षणाची मदत होईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.२८: शासकीय योजनांची व्याप्ती वाढविणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता तपासणे महत्वाचे असल्याने यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनाच्या प्रभावी अंमलबजावणी बरोबरच त्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 
माहिती व जनसंपर्क विभागामार्फत नियुक्त ॲक्सिस माय इंडिया या संस्थेमार्फत विविध विभागांच्या योजनांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासंदर्भात सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि योजना पश्चात सर्वेक्षणाबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने योजनांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. योजनांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास, लाभार्थ्यांच्या माहितीचे विश्लेषण, योजनांमुळे साध्य झालेल्या परिणामांचे मूल्यमापन आणि त्यातून पुढील सुधारणांसाठी आवश्यक बाबी निश्चित करणे, अशा विविध स्तरांवर काम केले जात आहे. राज्यातल्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी या सर्वेक्षणांचा चांगला उपयोग होऊ शकतो. योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्वेक्षणातून मिळणारी माहिती केवळ माहितीपुरती मर्यादित न ठेवता, त्यातून प्रत्यक्ष कामकाजात सुधारणा घडवून आणण्यास मदत होईल. उपलब्ध माहितीच्या आधारे योजनांची सद्यःस्थिती समजून घेणे, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी ओळखणे आणि अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांनी आवश्यक सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या सर्वेक्षणाच्या माध्यमातून योजनांबद्दलची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच शासनाच्या योजनांसाठी असणारा प्रतिसाद समजण्यास मदत होईल. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अचूक डेटा बेस तयार होईल आणि लोकांना शासकीय योजनांचा अधिक लाभ मिळण्यास मदत होईल. या सर्वेक्षणातून शासकीय योजनांबाबत अधिक विश्वासार्हता निर्माण होऊन राज्य शासनास अचूक माहिती मिळेल आणि गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल.

*क्षेत्रीय कार्यालयांचा सहभाग महत्वाचा*
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, योजनांची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांची भूमिका महत्वाची आहे. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आवश्यक सहकार्य करून माहिती संकलन व विश्लेषणाच्या प्रक्रियेत समन्वय साधावा आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पूरक वातावरण निर्माण करावे. 

  शासकीय यंत्रणा आणि संबंधित संस्थेने एकसंघ भावनेतून काम केल्यास योजनांच्या अंमलबजावणीत अधिक चांगले परिणाम साधता येतील. उपलब्ध माहितीचा योग्य वापर, समन्वयपूर्ण कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव यांच्या आधारे प्रशासकीय कामकाजात सुधारणा घडवून आणता येईल. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना अधिक परिणामकारक होण्यासह नागरिकांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचविण्याच्या प्रक्रियेत गुणात्मक परिवर्तन घडविणे शक्य होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
बैठकीस राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव उपस्थित होते. तर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
०००००

51 व्या ग्रंथभेट योजनेसाठी 1 हजार 183 ग्रंथांची निवड; 31 ऑक्टोबरपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन


        हिंगोली, दि. २८ ऑक्टो (जिमाका) : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या 51 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत 1 हजार 183 ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. सन २०२४ मध्ये प्रकाशित होऊन ग्रंथालय संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड केलेल्या या ग्रंथांची यादी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यत ग्रंथालय संचालनालयाच्या संकेतस्थळावर अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

        निवडलेल्या ग्रंथांमध्ये 685 मराठी, 246 हिंदी आणि 252 इंग्रजी ग्रंथांचा समावेश आहे. या ग्रंथयादीतील ग्रंथांचे वितरण ग्रंथालय संचालनालयाच्या नियमानुसार २५ टक्के ग्रंथ सूट दराने करणे संबंधितांसाठी बंधनकारक आहे.

सूचना, हरकती व आक्षेप 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत

        ग्रंथ यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना, हरकत अथवा आक्षेप असल्यास ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई-४०० ००१ यांच्याकडे कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात सादर करावेत. सूचना व हरकती हस्तबटवड्याने, पोस्टाने अथवा संचालनालयाने नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविता येतील.

        विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या सूचना, हरकती अथवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे संबंधितांनी यादीचे वेळेत अवलोकन करून आवश्यक असल्यास आपले म्हणणे मुदतीत सादर करावे.

        ग्रंथयादीतील ग्रंथाचे नाव, लेखक, प्रकाशक किंवा किंमत यामध्ये काही बदल अथवा तफावत आढळल्यास ती संचालनालयाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी आवाहन केले आहे. ग्रंथालय संचालनालयाचे संकेतस्थळ : www.dol.maharashtra.gov.in 

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ : आतापर्यंत १५ उमेदवारांची वगळणी!

 

        ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू आहे. विजयासाठी आवश्यक ८८,५५८ मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण न केल्याने सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारांची टप्प्याटप्प्याने वगळणी करण्यात येत आहे.

        बाराव्या वगळणीत ८४ मते असलेले प्रा. डॉ. अश्विनकुमार क्षीरसागर कोळीकर, तेराव्या वगळणीत ९२ मते असलेले कबाडी भागवत मदन, चौदाव्या वगळणीत ९४ मते असलेले ॲड. विठ्ठल कडवे, तर पंधराव्या वगळणीत ९६ मते असलेले डॉ. भाऊसाहेब केशवराव झिरपे यांची वगळणी झाली आहे.

        आतापर्यंत ४१ पैकी १५ उमेदवारांची वगळणी झाली असून, २६ उमेदवार शिल्लक आहेत. वगळलेल्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार मतांचे हस्तांतरण सुरू आहे. अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.

    #औरंगाबादपदवीधरमतदारसंघ #मतमोजणी२०२६ #ElectionCounting #GraduatesElection #ChhatrapatiSambhajinagar

 इसापूर धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन सिंचन आवर्तने; 

पहिली पाणीपाळी 1 नोव्हेंबरपासून

शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज सादर करावेत; जलसंपदा विभागाचे आवाहन

        हिंगोली, दि. २८ ऑक्टो (जिमाका) : पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून सन २०२६-२७ मध्ये रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन सिंचन आवर्तने प्रस्तावित करण्यात आली आहेत. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन असून, सिंचनासाठी इच्छुक शेतकरी व लाभधारकांनी विहित नमुन्यात पाणी मागणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

पाणी आरक्षणानंतर उपलब्ध साठ्यानुसार सिंचनाचे नियोजन

        राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार, अल् निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर दि. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण करण्यात आले आहे. त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या शिल्लक पाणीसाठ्याच्या आधारे रब्बी व उन्हाळी हंगामाचा प्राथमिक सिंचन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

प्रस्तावित सिंचन आवर्तनांचे वेळापत्रक

* रब्बी हंगाम : पहिले आवर्तन १ ते २४ नोव्हेंबर २०२६ आणि दुसरे आवर्तन २० डिसेंबर २०२६ ते १३ जानेवारी २०२७.

* उन्हाळी हंगाम : पहिले आवर्तन १ ते २४ मार्च २०२७ आणि दुसरे आवर्तन २० एप्रिल ते १४ मे २०२७.

        पावसामुळे किंवा अन्य आकस्मिक कारणांमुळे आवर्तनांच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. सिंचनाची गरज, प्राप्त पाणी मागणी अर्जांची संख्या आणि उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पाणीपाळ्यांमध्ये बदल करण्याचे अधिकार सनियंत्रण समितीकडे राहतील.

पाणी मागणी अर्जासोबत परवानगीची प्रत आवश्यक

        इसापूर उजव्या कालव्याच्या वितरण व्यवस्थेद्वारे तसेच धरण जलाशय, अधिसूचित नदी-नाले आणि मुख्य कालव्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे पाणी घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारकांनी नमुना क्रमांक ७ व ७-अ मध्ये अर्ज भरून संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. उपसा सिंचनाद्वारे पाणी घेणाऱ्यांनी अर्जासोबत संबंधित परवानगीची प्रत जोडावी. पिकांचे मागणी क्षेत्र २० आरच्या पटीत असणे आणि थकीत पाणीपट्टी पूर्ण भरणे आवश्यक आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

        कालवा संचलन कार्यक्रमानुसारच सिंचनासाठी पाणी वापरणे बंधनकारक आहे. कालव्याचे पाणी शेतापर्यंत नेणाऱ्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची राहील. विनापरवानगी विद्युत मोटारी किंवा ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा कालव्याचे गेट उघडणे यांसारख्या प्रकारांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पाणीपट्टी न भरणाऱ्या किंवा पाणी मागणी अर्ज मंजूर नसलेल्या लाभधारकांना सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जाणार नाही.

        अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास तसेच कालव्याच्या दुरुस्तीची आवश्यकता भासल्यास पाणीपाळीच्या नियोजनात बदल होऊ शकतो. त्यामुळे सर्व लाभधारकांनी विहित मुदतीत पाणी मागणी अर्ज सादर करून प्रचलित नियम व अटींचे पालन करावे आणि सिंचन व्यवस्थापनासाठी जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे उपकार्यकारी अभियंता ग.स.कोरे यांनी केले आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ : आतापर्यंत ११ उमेदवारांची वगळणी !

        ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू आहे. विजयासाठी आवश्यक ८८,५५८ मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण न केल्याने सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारांची टप्प्याटप्प्याने वगळणी करण्यात येत आहे.

        दहाव्या वगळणीत ६८ मते असलेले गंगाधरे भालचंद्र लक्ष्मण, तर अकराव्या वगळणीत ७० मते असलेल्या मनिषा उर्फ मंदा खरात यांची वगळणी झाली आहे.

        आतापर्यंत एकूण ११ उमेदवारांची वगळणी झाली असून, ४१ पैकी ३० उमेदवार शिल्लक आहेत. वगळलेल्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार उर्वरित उमेदवारांना मते हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.

        #औरंगाबादपदवीधरमतदारसंघ #मतमोजणी२०२६ #ElectionCounting #GraduatesElection #ChhatrapatiSambhajinagar

एक राष्ट्र, एक निवडणूक’ विषयावर हिंगोलीत विकसित भारत युथ पार्लमेंट युवकांना लोकशाही प्रक्रिया, नेतृत्वगुण व तर्कशुद्ध विचार मांडण्याची संधी


                                                   

          हिंगोली, दि. २८ ऑक्टोबर : युवकांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, नेतृत्वगुण, वक्तृत्वकौशल्य आणि तर्कशुद्ध विचार विकसित करण्याच्या उद्देशाने माय भारत, हिंगोली यांच्या वतीने विकसित भारत युथ पार्लमेंट २०२६-२७ या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे.

        या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण मते मांडण्याची आणि लोकशाही व्यवस्थेतील विविध पैलू समजून घेण्याची संधी मिळणार आहे. सहभागी युवकांकडून ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या संकल्पनेच्या अनुषंगाने निवडणुकांचे नियोजन, प्रशासकीय यंत्रणेवरील परिणाम, विकासकामांमध्ये सातत्य, निवडणूक खर्च तसेच लोकशाही प्रक्रियेसमोरील संधी व आव्हाने या विविध बाबींवर विचार मांडण्यात येणार आहेत.

युवकांच्या सक्रिय सहभागातून लोकशाही बळकटीकरण

        भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी एक असून, लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी युवकांचा जागरूक आणि सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. विकसित भारत @ २०४७ या राष्ट्रीय संकल्पनेच्या अनुषंगाने युवकांमध्ये नेतृत्वक्षमता, संसदीय कार्यपद्धतीची समज, चिकित्सक विचार आणि प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

        माय भारतच्या माध्यमातून आयोजित या युथ पार्लमेंटमुळे युवकांना राष्ट्रीय विषयांचा अभ्यास करून त्यावर आपली मते प्रभावीपणे मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच युवकांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करून त्यांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.



औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ : तिसऱ्या फेरीअखेरची मतमोजणी आकडेवारी


        ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीअखेर एकूण १,९३,६५५ मतपत्रिकांची मोजणी झाली. त्यापैकी १,७७,११५ मते वैध, तर १६,५४० मतपत्रिका हस्तांतरणास अपात्र ठरल्या आहेत. विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा ८८,५५८ निश्चित झाला आहे.

        पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना ७३,९३१, सतीश भानुदासराव चव्हाण यांना ६०,७६८, तर रविराज उर्फ अण्णासाहेब साबळे-पाटील यांना १९,८३५ मते मिळाली आहेत.

        कोणत्याही उमेदवाराने आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केलेला नसून पुढील पसंतीक्रमानुसार दुसऱ्या क्रमांकाची मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ : पहिल्या फेरीची मतमोजणी आकडेवारी

           ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पहिल्या फेरीत ७०,५१९ मतपत्रिकांची मोजणी झाली. त्यापैकी ६४,८१० मते वैध, तर ५,७०९ मते अवैध ठरली.

        पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना २७,९९४, सतीश भानुदासराव चव्हाण यांना २०,११६, तर रविराज उर्फ अण्णासाहेब सावळे-पाटील यांना ७,४२४ मते मिळाली आहेत.

        पहिल्या फेरीत डॉ. पाटील हे ७,८७८ मतांनी आघाडीवर आहेत. ही प्राथमिक फेरीची आकडेवारी असून पुढील मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.

        पहिल्या फेरीत ५७०९ मतपत्रिका अवैध ठरल्या आहेत.

        #औरंगाबादपदवीधरमतदारसंघ #मतमोजणी२०२६ #GraduatesElection #ElectionCounting #ChhatrapatiSambhajinagar

27 October, 2026

राहिली (बु) येथील अंगणवाडी शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिनी बालकांना अल्बेंडाझोल गोळ्याचे वाटप

हिंगोली, दि. २७ ऑक्टो:-हिंगोली तालुक्यातील राहिली (बु)  येथील अंगणवाडी शाळेला 'राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांनी भेट देऊन पाहणी केली. 

या प्रसंगी डॉ. रवींद्र पुरी यांच्या हस्ते अंगणवाडीतील बालिकेला जंतनाशक गोळीचा डोस पाजण्यात आला
यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि अंगणवाडी मदतनीस उपस्थित होत्या.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, विकास नगर येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनी अल्बेंडाझोल गोळ्याचे वाटप


हिंगोली, दि. २७ ऑक्टो:-कळमनुरी शहरातील  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, विकास नगर येथे 'राष्ट्रीय जंतनाशक दिन' शुभारंभ कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी प्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, गटविकास अधिकारी अमित मुंढे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेषराव नरवाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, खांडेगाव येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीम शुभारंभ!

हिंगोली, दि. २७ ऑक्टो:- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, खांडेगाव ता. वसमत  येथे 'राष्ट्रीय जंतनाशक दिन' शुभारंभ कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, शिक्षण विस्तार अधिकारी जी. डी.साखरे
केंद्रप्रमुख श्रीमती जळकोटे
यांची उपस्थिती होती. 
मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच निरोगी व निकोप आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता याविषयी आरोग्य शिक्षण देऊन जंत नाशक दिनाचे महत्त्व सांगण्यात आले.

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र हट्टा येथे १० हजार ४०८ लाभार्थ्यांना जंतनाशक औषधांचे वाटप

हिंगोली, दि. २७ ऑक्टो:- राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, हट्टा अंतर्गत कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांना व बालकांना जंतनाशक औषध देण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एकूण ३० शासकीय शाळा, ८ खासगी शाळा आणि ४७ अंगणवाड्यांमधील बालकांना जंतनाशक औषध देण्याचे नियोजन करण्यात आले होते.

या मोहिमेसाठी एकूण ११ हजार ४०३ मुले व मुली लाभार्थी म्हणून निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी १० हजार ४०८ लाभार्थ्यांना जंतनाशक औषध देण्यात आले. या उपक्रमाद्वारे बालकांचे आरोग्य सुधारण्यास, त्यांच्यातील कृमी संसर्गाचे प्रमाण कमी करण्यास आणि आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्यास मदत होणार आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आणि तालुका आरोग्य अधिकारी वसमत डॉ. संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, हट्टा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. सिद्दिकी व डॉ. बद्रीनाथ कदम, तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शाळा व अंगणवाडी स्तरावर समन्वय साधून ही मोहीम यशस्वी राबविण्यात आली.

राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या माध्यमातून बालकांना कृमी संसर्गापासून संरक्षण मिळावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

माणिक स्मारक विद्यालय येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

हिंगोली, दि. २७ ऑक्टों : आरोग्य विभाग जिल्हा परिषद, हिंगोलीच्या वतीने  माणिक स्मारक विद्यालय हिंगोली येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यकाम पार पडला.

 जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालक-किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील माणिक स्मारक विद्यालयामध्ये आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस आणि शिक्षण अधिकारी (माध्यमिक) विपुल भागवत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांच्या हस्ते करण्यात आले.

 *जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके* यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले की बालकांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी जंत नाशक गोळी ही दर सहा महिन्यातून एकदा सेवन करणे आवश्यक आहे.“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे,” यासाठी जंत नाशक मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. असे त्यांनी  स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी जंतनाशक गोळ्याचे सेवन करण्यासाठी पालक व शिक्षकांना आवाहन केले आहे.

 *जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस* यांनी जंतनाशक मोहिमेचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले की, लहान मुलांमध्ये जंतसंसर्गमुळे होणारा कृमी आजारा मुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक वाढीवर, पोषणावर आणि एकूण आरोग्यावर दुष्परिणाम होतो. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जंतनाशक गोळीचे सेवन करणे आवश्यक आहे. 

 *जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र पुरी* यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना असे सांगितले की शासनाची ही मोहीम बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण असून, जंतनाशक गोळ्यां सेवन केल्यामुळे आतड्यातील जंतसंसर्गावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. आणि विद्यार्थ्यांची शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी मदत होते. 

यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. एस. राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता डुडळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, डॉ. रणजीत मस्के, डॉ. विजय चुकेवार, औषध निर्माण अधिकारी राहुल घुगे, डिपीएचएन मनिषा वडकुते, स्वाती जरांडे, कार्यक्रम सहाय्यक प्रदीप आंधळे, कमलेश इसी, विजय पाठक, नागसेन भालेराव राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील सदस्य आणि शाळेतील शिक्षेक विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. के एस राठोड यांनी आभार मानले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १४ हजार ७८७ कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे

दहा वर्षे किंवा अधिक सेवा पूर्ण केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतनश्रेणी; वार्षिक ९८३.८० कोटी रुपये खर्चास मान्यता


मुंबई, दि. २७ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आणि तांत्रिक खंड वगळून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या १४ हजार ७८७ पात्र कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने एकवेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. या पदांवर पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी वार्षिक ९८३.८० कोटी रुपये खर्चालाही शासनाने मंजुरी दिली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास आणि अन्य विभागांतील समकक्ष नियमित मंजूर पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार वेतनश्रेणी देण्यात येईल. यामध्ये अपेक्षित वेतनासाठी ९७८.८० कोटी रुपये आणि प्रवास भत्त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या कर्मचाऱ्यांचे सध्या मिळणारे मूळ वेतन संरक्षित राहील. त्यांना महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता लागू राहील. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या योजनेंतर्गत सध्या देय असलेल्या रजाही अनुज्ञेय असतील. मात्र, या अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना तसेच सेवानिवृत्ती अथवा कुटुंब निवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळणार नाही.

ही अधिसंख्य पदे व्यक्तिसापेक्ष असतील. संबंधित कर्मचारी कार्यरत असेपर्यंतच ती अस्तित्वात राहतील. कमाल वयोमर्यादा, राजीनामा, आजारपण, मृत्यू अथवा अन्य कारणामुळे पद रिक्त झाल्यास ते व्यपगत होईल आणि त्यावर नव्याने नियुक्ती केली जाणार नाही. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीही अनुज्ञेय राहणार नाही.

शासनाने या पदनिर्मितीला अपवादात्मक परिस्थितीत एकवेळची विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून, अन्य विभागांतील कोणत्याही योजना किंवा प्रयोजनासाठी याचा पूर्वोदाहरण म्हणून वापर करता येणार नाही.

“राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १४ हजार ७८७ अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून, राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख होण्यास मदत होईल.”


— प्रकाश आबिटकर

मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य

महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन

 विशेष लेख                                                                                                                  दि. 26 ऑक्टोंबर 2026

                  
व्याख्यानमाला, निबंध-वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथप्रदर्शने, 

प्रशिक्षण कार्यशाळा आणि पर्यावरणविषयक जनजागृतीवर भर

        महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध विभागांच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करणारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. व्याख्यानमाला, ग्रंथवाचन, चित्रपट व माहितीपटांचे प्रसारण, निबंध-वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यशाळा आणि पर्यावरणविषयक जनजागृती अशा विविध माध्यमांतून महात्मा जोतीराव फुले यांचे विचार समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.

शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम

        शाळा, महाविद्यालये, शासकीय व सार्वजनिक ग्रंथालये तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीतगायन, रांगोळी स्पर्धा, प्रभातफेरी आणि पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रंथालयांमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याची प्रदर्शने, सामूहिक वाचन आणि त्यांच्या विचारांवर आधारित कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

    महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर माहितीपट व लघुचित्रफिती तयार करून समाजमाध्यमांसह विविध माध्यमांतून प्रसारित करण्याचेही नियोजन आहे. त्यांच्या साहित्याचा विविध भाषांमध्ये अनुवाद व प्रकाशन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे.

महिला सक्षमीकरण व सामाजिक समतेसाठी उपक्रम

        महात्मा जोतीराव फुले यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, तसेच महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित निबंध, वक्तृत्व आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

    अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणे, त्यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेणे आणि त्यांच्या कार्याची माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे.

कौशल्य विकास व उद्योजकतेला प्रोत्साहन

    व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून ‘महात्मा फुले तांत्रिक प्रदर्शनी’ आणि ‘सत्यशोधक’ या संकल्पनांवर आधारित उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तांत्रिक प्रकल्प स्पर्धा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरीय कार्यक्रम तसेच ग्रामीण व दुर्गम भागांतील बेरोजगार युवक आणि महिलांसाठी उद्योजकता कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कृषी व पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती

        पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने शाश्वत शेती व जलसंवर्धन विषयक परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत. बदलते हवामान, सेंद्रिय शेती, पीकपद्धतीतील बदल, जलव्यवस्थापन, जलसंवर्धन, बांबू लागवड आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या प्रयोगांवर या परिषदांमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

        पर्यावरण संवर्धनासाठी विद्यापीठांच्या सहकार्याने ग्रामीण भागात पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर, ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे, वृक्षलागवड आणि सौरऊर्जेचा वापर यांसारख्या विषयांवर जनजागृती केली जाणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणविषयक घोषवाक्य, समाजमाध्यमांवरील लघुचित्रफिती आणि बॅनर स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

महसुली प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी विशेष अभियान

        महसूल विभागामार्फत ‘महात्मा जोतीराव फुले महसूल अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी स्तरावरील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विविध महसुली दाव्यांचा व अपिलांचा निपटारा करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच विविध स्तरांवर लोकअदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे.

विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचविण्यावर भर

        महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणारे विविध उपक्रम हे केवळ त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यापुरते मर्यादित नसून, त्यांनी मांडलेल्या समता, शिक्षण, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता आणि शेतकरी कल्याणाच्या विचारांना कृतीत उतरविण्याची संधी आहेत. शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, ग्रंथप्रदर्शने, स्पर्धा, कौशल्य विकास कार्यशाळा, उद्योजकता प्रोत्साहन, शाश्वत शेती व पर्यावरण संवर्धनविषयक जनजागृती तसेच महसुली प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी राबविण्यात येणारे विशेष अभियान अशा विविध उपक्रमांतून त्यांच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्यावर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा विकसित करणे, युवक व महिलांना कौशल्य आणि उद्योजकतेच्या संधींशी जोडणे, शेतकरी व नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीविषयी जागरूकता निर्माण करणे आणि शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभतेने उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, ग्रंथालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा समाजजीवनाशी अधिक दृढ संबंध प्रस्थापित होण्यास मदत होईल. त्यांच्या सत्यशोधक, विवेकनिष्ठ आणि परिवर्तनवादी विचारांमधून प्रेरणा घेत समताधिष्ठित, शिक्षित आणि प्रगत समाजनिर्मितीच्या दिशेने वाटचाल करणे, हेच द्विजन्मशताब्दी वर्षाच्या उपक्रमांचे व्यापक उद्दिष्ट आहे.


अलका पाटील,

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय, 

हिंगोली

‘हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र’ विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 •संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम नाशिक येथे होणार

        

हिंगोली, दि. २७ : संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणारे ‘हर घर संत रविदास विचार–विकसित महाराष्ट्र’ हे विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संत रविदास महाराजांनी मांडलेले मानवता, समता, करुणा आणि दुःखमुक्त समाजाचे विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावेत. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा उभारावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

        मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित विशेष अभियानाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रवींद्र चव्हाण, संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक  रवींद्र राठोड उपस्थित होते. 

        तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक सामाजिक आणि वैचारिक अभिसरण घडवून आणणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संत रविदास महाराजांनी समता, मानवता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाची शिकवण दिली. हे विचार केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावेत, यासाठी प्रयत्न करावेत. संत रविदास महाराजांच्या विचारांवर आधारित हे अभियान समाजातील सर्व घटकांना जोडणारे आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करणारे ठरेल.

        विविध सामाजिक परंपरांमधील साम्यस्थळे आणि संतविचारांतील एकात्मतेचा संदेश समाजासमोर आणून सामाजिक सलोखा व बंधुभाव अधिक दृढ करण्यासाठी या अभियानाचा उपयोग होईल. ‘हिंद की चादर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध समाजघटकांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. त्याच धर्तीवर संत रविदास महाराजांच्या जयंती वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांतूनही सामाजिक एकतेचा व्यापक संदेश दिला जावा.या अभियानासाठी संबंधित विभागांनी स्वतंत्र अंमलबजावणी यंत्रणा उभारून निर्धारित कार्यक्रम वेळेत पूर्ण करावेत. अभियानाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतच्या कामांचा सातत्याने आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कुंभमेळ्याच्या माध्यमातून व्यापक जनजागृतीवर भर – मंत्री गिरीश महाजन

        जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम नाशिक येथे  होणार आहे. या कुंभमेळ्यात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक व नागरिक सहभागी  होतात. या पार्श्वभूमीवर संत रविदास महाराजांचे विचार आणि त्यांच्या जयंती वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या अभियानाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविता येईल.कुंभमेळ्यात येणाऱ्या दहा कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत कमी खर्चात प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव आहे. व्यापक जनसहभागाच्या माध्यमातून संत रविदास महाराजांच्या विचारांचा प्रसार करणे शक्य होईल, असे त्यांनी नमूद केले.

समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  व्यक्तींचा सन्मान करणार – मंत्री संजय शिरसाट

        सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकत्रितपणे पुरस्कार देऊन सन्मानित करावे. नागपूर विभाग, यवतमाळ तसेच राज्यातील अन्य भागांत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विभागनिहाय मर्यादित न ठेवता एकाच व्यासपीठावर सन्मानित करण्याची यामागील संकल्पना आहे. या उपक्रमातून समाजातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले.

संत रविदास महाराजांच्या नावाने विशेष योजना– मंत्री संजय सावकारे

        वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी संत रविदास महाराजांच्या नावाने विशेष योजना सुरू करण्याची सूचना मांडली. या योजनेत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती तसेच नव्या क्षेत्रांत काम करणाऱ्या युवकांना आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद असावी. संत रविदास महाराजांचे साहित्य महाराष्ट्रात अधिक व्यापक स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी त्याचे संकलन, प्रचार आणि प्रसार करण्यासंदर्भात नियोजन करण्यात यावे. अनुसूचित जातीतील युवकांच्या नवकल्पना आणि उद्योजकीय उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी संत रविदास महाराजांच्या नावाने स्वतंत्र निधी किंवा विश्वस्त संस्था स्थापन करून आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी मांडली.

संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रम

        संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांनी प्रास्ताविक केले. संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षाचे सहसमन्वयक रविंद्र राठोड यांनी सादरीकरण करून उपक्रमांची माहिती दिली यामध्ये संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत ‘हर घर संत रविदास विचार–विकसित महाराष्ट्र’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

        विविध शासकीय विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानात धार्मिक स्थळे, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, व्यापारी आणि कामगार संघटना, महिला बचतगट, युवक मंडळे, शासकीय क्षेत्रीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महामंडळे आणि आरोग्य संस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामस्तरावरील समित्यांच्या माध्यमातून अभियानाची अंमलबजावणी करण्यात येईल.

        राज्यातील १ लाख ८ हजार १३९ शाळा, ५ हजार ८४१ महाविद्यालये, ६५ विद्यापीठे आणि ११ हजार १५० सार्वजनिक ग्रंथालयांना या अभियानाशी जोडण्याचे नियोजन आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, संतसाहित्य वाचन, संशोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. यासोबतच विविध सामाजिक सेवा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता आणि मानवतेच्या मूल्यांची रुजवण केली जाणार आहे.अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, नेत्र व दंत तपासणी, महिला व बाल आरोग्य, पोषण, व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेविषयी जनजागृती असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. श्रमाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी ‘श्रमवीर सन्मान’, कारागिरांच्या उत्पादनांचे प्रदर्शन, महिला आर्थिक स्वावलंबन आणि युवा सेवा सप्ताह यांचे आयोजन केले जाईल.

        राज्यातील ६५० गावांमध्ये विचारसभा आणि वृक्षारोपणाचे नियोजन आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन प्रचार वाहनांच्या माध्यमातून संत रविदास महाराजांच्या विचारांचा प्रसार केला जाणार आहे. चित्रफिती, पॉडकास्ट, मुलाखती आणि संवादात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत अभियानाचा संदेश पोहोचविण्यात येईल.डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यासाठी ‘डिजिटल रविदास ६५०’, ई-ग्रंथालय, डिजिटल प्रश्नमंजुषा आणि ६५० प्रेरणादायी व्हिडिओ कथांचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून संत रविदास महाराजांचे विचार, सामाजिक समतेचा संदेश आणि अभियानातील उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल.या अभियानाचा राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम १३ व १४ फेब्रुवारी २०२७ रोजी नाशिक येथे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमात बेगमपुरा संकल्पना, संत संगम, सांस्कृतिक कार्यक्रम, समता महामंच, संत रविदास वारसा प्रदर्शन, संवाद केंद्र आणि सामुदायिक अन्नसेवा यांचा समावेश असेल.

        मुख्य कार्यक्रमानंतर ‘समाजकुंभ’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक परंपरांना एकत्र आणून समता, बंधुता, सामाजिक एकात्मता आणि मानवतेच्या विचारांचा प्रसार करण्यासंदर्भातील नियोजन करण्यात आले.