02 October, 2026

सेवा संकल्प अभियानातून हिंगोलीत विविध उपक्रमांना गती -मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

▶️ स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पोषण आणि लाभार्थी-केंद्रित उपक्रमांवर भर 

▶️सेवा संकल्प अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन

▶️८७५ शाळांमध्ये उपक्रम; ५०२ अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी उत्सव; लाभार्थ्यांच्या यशकथा ठरताहेत प्रेरणादायी
हिंगोली, दि. २ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पोषण, वृक्षारोपण तसेच नागरिकांना विविध शासकीय सेवांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासोबतच ‘स्वच्छ सेवा आकलन’ उपक्रमही जिल्ह्यात राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिली. या अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते अभियानाची सुरुवात

सेवा संकल्प अभियानाची सुरुवात १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आली. सेनगाव येथे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तसेच विविध गावांमध्ये रॅलीच्या माध्यमातून नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय सेवांची माहिती देण्यात आली.

 *८७५ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग* 

अभियानांतर्गत २६ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या ८७५ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रॅलीही काढण्यात आल्या. गावागावांत स्वच्छता मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात आला.

 *पंचायत समित्यांमध्ये स्वच्छता मोहीम* 

जिल्ह्यातील पाचही पंचायत समित्यांच्या परिसरात १७ सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तालुकास्तरावर विविध गावांमध्येही स्वच्छता उपक्रम आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.

 *'सेवा सेतू'मधून दाखल्यांचे वितरण* 
सेवा सेतू उपक्रमांतर्गत कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी येथे विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. याच ठिकाणी १४ घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या घरांचा लाभ देण्यात आला.

 *विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे* 

जिल्ह्यात विविध ठिकाणी पाच आरोग्य शिबिरे घेण्यात आली. नागरिकांना आरोग्यविषयक सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.

 *५०२ अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी उत्सव* 
अंगणवाडी उत्सवांतर्गत जिल्ह्यातील ५०२ अंगणवाड्यांमध्ये उपक्रम घेण्यात आले. यामध्ये अंगणवाडीतील बालकांच्या माता तसेच स्तनदा मातांचा सहभाग घेण्यात आला. त्यांच्या कार्याचा आणि सहभागाचा गौरव करण्यात आला.

 *नागरिकांच्या सहभागातून सेवा ज्योत यात्रा* 
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सुमारे १५० नागरिकांच्या सहभागातून ‘सेवा ज्योत यात्रा’ काढण्यात आली. शासकीय सेवा आणि विकासकामांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

 *लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’* 
शासकीय सेवांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित केला. या उपक्रमातून लाभार्थ्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलाचा यातून संदेश देण्यात आला.
 
 *भारताच्या आकारातील मानवी रांगोळी* 
सुमारे ८६४ लाभार्थ्यांच्या घरी रांगोळी काढण्यात आली. भारताच्या नकाशाच्या आकारातील मानवी रांगोळीच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली.

 *शेतीतील उत्पन्नवाढीच्या यशकथा* 
शेतकऱ्यांना मिळालेल्या विविध लाभांमुळे त्यांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीच्या यशकथा अभियानातून पुढे आणल्या जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना आणि बिरसा मुंडा क्रांती योजनेतून विहिरींचा लाभ मिळालेल्या काही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी ५० ते ६० हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळविणाऱ्या काही लाभार्थ्यांना आता शेतीतून ८ ते ९ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळत असल्याचे यशकथांमधून समोर आले आहे. अशा लाभार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या यशकथा तयार करण्यात येत आहेत.

 *पोषणविषयक जनजागृतीवरही भर* 
जिल्ह्यात ‘माझ्या बाळाची पोषण कहाणी’ या उपक्रमातूनही जनजागृती करण्यात येत आहे. बालकांचे पोषण, आरोग्य आणि कुटुंबाचा सहभाग याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सेवा संकल्प अभियान आणि स्वच्छ सेवा आकलनाच्या माध्यमातून शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पोषण आणि लोकसहभागाला चालना देण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी सांगितले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय जिल्हा ग्रंथालयात ‘विशेष सभासद नोंदणी अभियान’ सुरू




ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी नागरिकांनी 

QR कोड स्कॅन करून पुस्तकांची शिफारस करण्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांचे आवाहन


हिंगोली, दि. १ ऑक्टोबर (जिमाका) : जिल्ह्यात वाचन संस्कृती वाढीस लागावी तसेच नव्याने स्थलांतरित झालेल्या सुसज्ज शासकीय जिल्हा ग्रंथालयाच्या अद्ययावत सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी ‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत विशेष सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. यासोबतच जिल्हा ग्रंथालय अधिक समृद्ध व वाचकाभिमुख करण्यासाठी नागरिकांकडून ग्रंथ शिफारसी मागविण्यात येत आहेत.


शासकीय जिल्हा ग्रंथालय आता सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा नवीन प्रशस्त इमारतीत पूर्ण क्षमतेने सेवेत

दाखल झाले आहे. येथे वाचकांसाठी खालीलप्रमाणे विविध कक्ष व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात

आल्या आहेत:

स्वतंत्र अभ्यासिका: मुले आणि मुलींसाठी शांत व स्वतंत्र अभ्यासिका कक्ष.

ग्रंथसंजीवनी डिजिटल ग्रंथालय: डिजिटल युगाशी सुसंगत अशा ई-ग्रंथालय व डिजिटल सेवा.

महिला व बाल विभाग: लहान मुले व महिलांसाठी उपयुक्त तसेच मनोरंजक साहित्याने समृद्ध

विभाग.

वाचन कक्ष / ज्येष्ठ नागरिक कक्ष : ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी बैठक व्यवस्थेसह वृत्तपत्रे,

नियतकालिके व संदर्भ वाचन कक्ष.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्ष : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत संदर्भ

ग्रंथ, मासिके व पूरक अभ्यास साहित्य.


QR कोड स्कॅन करा आणि व्हा ग्रंथालयाचे सभासद!


नागरिकांना घरबसल्या सहजतेने नावनोंदणी करता यावी, यासाठी विशेष ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सोबत दिलेला ‘सभासद नोंदणी QR कोड’ आपल्या मोबाईलवरून स्कॅन करून नागरिक, अभ्यासक, महिला व विद्यार्थ्यांनी तातडीने ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच ज्या नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन नोंदणी करावयाची आहे, त्यांना ' जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, महसूल कॉलनी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, हिंगोली' येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून देखील सभासदत्व मिळवता येईल. सर्व नागरिकांनी ग्रंथालयाचे नियमित सभासद होऊन समृद्ध ग्रंथसंपदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


ग्रंथालयाच्या समृद्धीसाठी नागरिकांच्या सहभागाचे आवाहन (ग्रंथ शिफारस):

हिंगोलीचे शासकीय जिल्हा ग्रंथालय हे संपूर्ण जिल्ह्यासाठी एक आदर्श व परिपूर्ण ज्ञानकेंद्र बनावे, हा प्रशासनाचा मानस आहे. ग्रंथालयातील ग्रंथसाठा अधिक वैविध्यपूर्ण व उपयुक्त होण्यासाठी ग्रंथालयात

कोणती पुस्तके असणे गरजेचे आहे, याबाबत वाचक व नागरिकांकडून थेट शिफारसी मागविण्यात येत आहेत. यासाठी स्वतंत्र ‘ग्रंथ शिफारस QR कोड’ जारी करण्यात आला असून, हा कोड स्कॅन केल्यावर उघडणाऱ्या गुगल फॉर्ममध्ये नागरिकांनी पुस्तकाचे नाव, लेखक आणि प्रकाशक अशी संक्षिप्त माहिती नोंदवून ग्रंथालयाला शिफारस करावी. नागरिकांच्या मागणीनुसार शिफारस केलेल्या महत्त्वपूर्ण पुस्तकांचा समावेश जिल्हा ग्रंथालयाच्या ग्रंथसाठ्यात प्राधान्याने करण्यात येईल.


जिल्ह्यातील सर्व वाचकप्रेमी, विद्यार्थी, साहित्यिक, अभ्यासक व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन शासकीय जिल्हा ग्रंथालयाशी जोडून घ्यावे व सभासद व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी, हिंगोली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

मतदारांनी बीएलओंना आवश्यक कागदपत्रे सादर करून सहकार्य करावे

मतदारांनी बीएलओंना आवश्यक कागदपत्रे सादर करून सहकार्य करावे

– जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता

▶️मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही

▶️ ३,४,१०,११ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

हिंगोली, दिनांक ०१ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या अनुषंगाने ज्या मतदारांना जुळवणी न झाल्यामुळे (No Mapping) किंवा जुळवणीमध्ये तार्किक विसंगती (Logical Discrepancy) आढळल्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे, अशा मतदारांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचनांनुसार संबंधित मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे व पुरावे स्वीकारतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.

नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना आवश्यक कागदपत्रे व पुरावे संबंधित BLO यांच्याकडे प्रत्यक्ष तसेच व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही सादर करता येतील. तार्किक विसंगती असलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित विसंगतीशी निगडित कागदपत्रे किंवा BLO यांच्या पडताळणी अहवालाच्या आधारे कार्यवाही करण्यात येणार आहे. आवश्यक पुरावे उपलब्ध नसलेल्या किंवा उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेणे शक्य नसलेल्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी शक्यतो ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतील. अशा सुनावणीस मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतीही प्रौढ व्यक्ती उपस्थित राहू शकते.

तसेच ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी आयोजित मतदान केंद्रनिहाय विशेष शिबिरांमध्येही नोटीस प्राप्त मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करता येणार आहेत. बेघर मतदार, कामगार, गरीब व्यक्ती, आदिवासी समाजातील विशेषतः PVTG गटातील व्यक्ती, अनाथ गटातील मतदार आदी असुरक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे व मदत कक्ष आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एकही पात्र मतदार मतदार यादीत समावेशापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी येणाऱ्या BLO यांना सहकार्य करावे. तसेच मतदारांशी संपर्क साधणे व कागदपत्रे जमा करून घेण्यासाठी BLO राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींशी समन्वय ठेवतील. सर्व संबंधित मतदारांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकतिसऱ्या दिवशी २० इच्छुकांनी घेतले ४० नामनिर्देशन पत्रे; दोन उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक

तिसऱ्या दिवशी २० इच्छुकांनी घेतले ४० नामनिर्देशन पत्रे; दोन उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

आतापर्यंत ६६ इच्छुकांना ११५ नामनिर्देशन पत्रांचे वितरण

छत्रपती संभाजीनगर, दि. १ : ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६ साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज तिसऱ्या दिवशी २० इच्छुक अर्जदारांना एकूण ४० नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच, आज दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये कृष्णा त्रिंबकराव पवार (महा जनता परिवर्तन पार्टी) आणि बाळासाहेब भुजंगराव उगले (अपक्ष) यांचा समावेश आहे.

नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाल्यापासून आजअखेर एकूण ६६ इच्छुक व्यक्तींना ११५ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी आजअखेर दोन उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी, ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत विभागीय आयुक्त कार्यालयातील नामनिर्देशन कक्ष नामनिर्देशन पत्रांचे वाटप व स्वीकारण्यासाठी सुरू राहणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. ७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार असून, ९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

---

महात्मा गांधी : वन मॅन आर्मी

*विशेष लेख / उद्या २ ऑक्टोबरसाठी आवश्यक* 

 महात्मा गांधी : वन मॅन आर्मी

महात्मा गांधींचे नाव घेतले की, आपल्या डोळ्यांसमोर हातात काठी घेतलेला, पंचा नेसलेला, कृश देहयष्टीचा आणि चेहऱ्यावर विलक्षण शांत हास्य असलेला एक माणूस उभा राहतो. त्यांच्याकडे ना बंदूक होती, ना सैन्यदल; ना सत्ता होती, ना राज्ययंत्रणा. तरीही विसाव्या शतकातील सर्वांत शक्तिशाली साम्राज्याला आव्हान देणाऱ्या या माणसाला इतिहासाने असामान्य नैतिक शक्तीचा नेता म्हणून स्थान दिले. म्हणूनच महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले, तर त्यांना तत्कालीन व्यवस्थेत ‘वन मॅन आर्मी’ असे म्हणण्यामागचा अर्थ लक्षात येतो.

२ ऑक्टोबर गांधी जयंतीला या महामानवाला अभिवादन करताना निद्रिस्त देशाला त्याच्या हक्काची जाणीव निर्माण करून संघर्ष करायला उभे करणाऱ्या या चेतनापुरुषापुढे प्रत्येक भारतीयाने आदराने नतमस्तक होणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. मात्र येथे ‘वन मॅन आर्मी’ म्हणजे शस्त्र हातात घेऊन लढणारा एकटा सैनिक नव्हे. उलट, शस्त्राशिवाय हजारो निराधार, नि:शस्त्र, गरीब लोकांमध्ये लढण्याचे बळ निर्माण करणारा महापुरुष म्हणजे महात्मा गांधी. ज्यांचा कुणी नेता नाही, ज्यांच्या अन्यायाला वाचा नाही, ज्यांच्याकडे कोणतेही साधन-साहित्य-सामग्री नाही, अशा समुदायाला संघर्ष करण्याची शक्ती निर्माण करणारा एक माणूस, असा त्याचा अर्थ आहे.

कारण गांधीजींची सेना होती सत्याची; त्यांचे शस्त्र होते अहिंसा; त्यांची ढाल होती करुणा,त्यांची ताकद होती संयम आणि त्यांचे सर्वांत मोठे सामर्थ्य होते माणसाच्या अंतःकरणावरील विश्वास. या एका महामानवाने अत्यंत विदारक परिस्थितीमध्ये सर्व जाती धर्म गुण्यागोविंदाने नांदतील अशा भारताची स्वप्ने बघितली होती. नव्हे त्याची बीजे स्वतःच्या जीवनशैलीतून पेरली होती. आज भारत त्यांनी पेरलेल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर उभा राहिला आहे. एका माणसाने आपल्या समर्थकांच्या, अनुयायांच्या हजारो हातांनी हा देश उभा केला. म्हणून गांधी वन मॅन आर्मी आहेत.

 *गांधींना ‘महात्मा’ ही उपाधी कोणी दिली* 

रवींद्रनाथ टागोर यांनी १९१५ मध्ये गांधींना ‘महात्मा’ म्हटले. गांधी स्मृतीच्या माहितीनुसार नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ४ जून १९४४ रोजी आझाद हिंद रेडिओवरून गांधींना ‘Father of the Nation’ म्हणून संबोधले. राष्ट्रपिता म्हटले. परंतु ‘One-Man Boundary Force’ हा उल्लेख या लेखाच्या शीर्षकाशी अधिक जवळचा आहे. भारताच्या फाळणीच्या काळात एकीकडे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात असूनही हिंसा सुरू होती. त्याच वेळी दुसरीकडे  गांधीजी कलकत्त्यात हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी काम करीत होते. २६ ऑगस्ट १९४७ रोजी लॉर्ड माउंटबॅटन यांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रात पंजाबमधील ५५ हजार सैनिकांचा संदर्भ देत बंगालमध्ये ‘one-man’ अशी एक आपली शक्ती असल्याचे नमूद केले. त्यांचा इशारा गांधीजींकडे होता. त्यांच्या बंगाल प्रांतातील एकट्या लढ्याकडे होता. गांधीजींना “One-Man Boundary Force” म्हणून त्यांनी त्या विदारक परिस्थितीत आदरांजली अर्पण केली. त्यामुळे ही उपमा का महत्त्वाची आहे, हे कलकत्त्याच्या घटनांमधून समजते.

१९४७ च्या ऑगस्टमध्ये कलकत्ता सांप्रदायिक हिंसेच्या छायेत होता. गांधीजींनी सुरक्षित जागा शोधण्याऐवजी हिंसाग्रस्त भागात जाण्याचा निर्णय घेतला. १३ ऑगस्टला ते हुसैन शहीद सुहरावर्दी यांच्यासह बेलियाघाटा येथील हैदरी मॅन्शनमध्ये राहायला गेले. हा परिसर त्या वेळी तणावग्रस्त होता. गांधींच्या प्रार्थना, संवाद आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाण्याच्या प्रयत्नांचा तेथील हिंसेवर परिणाम झाला. 'गांधी हेरिटेज पोर्टल ' या कालखंडाला कलकत्त्यातील ‘Miracle of Calcutta’ म्हणून नोंदवते. इथे गांधीजींच्या ‘वन मॅन आर्मी’चे खरे स्वरूप दिसते. त्यांनी सैन्य उभे केले नाही; त्यांनी माणसाच्या विवेकाला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोधकाला शत्रू मानले नाही. त्याच्या अंतःकरणाला आवाहन केले. त्यामुळे त्यांचा संघर्ष केवळ राजकीय नव्हता; तो माणसाच्या मनावर चालणारा संघर्ष होता.

 *दक्षिण आफ्रिकेतील पाळेमुळे* 

या शक्तीची मुळे दक्षिण आफ्रिकेत सापडतात. १८९३ मध्ये पीटरमार्टिझबर्ग येथे वैध तिकीट असूनही वर्णभेदामुळे गांधींना रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकण्यात आले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांवरील भेदभावाविरुद्ध त्यांनी संघर्ष उभारला. याच काळात सत्याग्रहाची संकल्पना आकाराला आली. सत्याग्रह म्हणजे केवळ सरकारविरुद्ध आंदोलन नव्हते. गांधींच्या दृष्टीने सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह आणि अन्यायाविरुद्ध अहिंसक प्रतिकार. त्यामध्ये विरोधकाचा विनाश नव्हता; त्याच्या विवेकाला जागवण्याचा प्रयत्न होता. म्हणूनच गांधींची अहिंसा ही निष्क्रियता नव्हती. ती कृतीची, धैर्याची आणि आत्मसंयमाची पद्धत होती.

 *दांडी मार्च प्रभावी उदाहरण* 

दांडी मार्च हा त्याचा अत्यंत प्रभावी नमुना. १२ मार्च १९३० रोजी गांधी ७९ सहकाऱ्यांसह साबरमतीहून दांडीकडे निघाले. ब्रिटिश साम्राज्याच्या दृष्टीने क्षुल्लक वाटणाऱ्या मिठाच्या कायद्याला त्यांनी साम्राज्यविरोधी जनआंदोलनाचे प्रतीक बनवले. पुढे हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले. दांडी मार्चने सत्य आणि अहिंसेच्या नैतिक शक्तीला व्यापक जनशक्तीत रूपांतरित केले. म्हणूनच गांधीजींची ‘सेना’ ही संख्येची नव्हती; ती विश्वासाची होती. त्यांच्या एका आवाहनाने सामान्य माणूस मिठाचा कायदा मोडण्यासाठी समुद्राकडे निघाला. त्यांच्या एका आवाहनाने परदेशी वस्त्रांचा त्याग झाला. त्यांच्या एका आवाहनाने लाखो लोक स्वातंत्र्याच्या संघर्षात सहभागी झाले. त्यांनी रायफल किंवा मशीनगनच्या शक्तीऐवजी सामान्य माणसामध्ये असलेल्या नैतिक शक्तीला जागृत केले. याच कारणामुळे गांधीजींचा प्रभाव भारताच्या सीमा ओलांडून गेला.

 *जगभरात गांधीजींचे अनुयायी* 

जगामध्ये सर्वाधिक पुतळे विविध देशांत असणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा गांधी. अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीचे नेते मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर, दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला आणि इतर अनेक नेत्यांवर गांधींच्या विचारांचा प्रभाव पडला. राष्ट्रपतींच्या संदेशातही गांधींच्या विचारांनी किंग, मंडेला आणि इतर जागतिक नेत्यांना प्रभावित केल्याचे नमूद आहे. गोलमेज परिषदेला जेव्हा गांधीजी लंडनला गेले त्यावेळी ब्रिटनमधील नागरिक त्यांना बघायला रस्त्यांवर गर्दी करत. प्रचार-प्रसाराचा तो काळ नव्हता. आपल्या विरोधकांच्या मनामध्ये देखील त्यांनी या देशाबद्दल आत्मीयता निर्माण करण्याचे काम आपल्या वर्तनातून केले.

अल्बर्ट आइनस्टाइन यांनी गांधींबद्दल केलेले प्रसिद्ध विधानही त्यांच्या जागतिक प्रभावाचे द्योतक आहे. “अशा प्रकारचा माणूस प्रत्यक्ष रक्तामांसात या पृथ्वीवर चालत होता, यावर पुढील पिढ्यांचा विश्वास बसणे कठीण जाईल.”

गांधींच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे करुणा. त्यांच्यासाठी अहिंसा केवळ राजकीय तंत्र नव्हते. ती जीवनपद्धती होती. शब्दांतही हिंसा नको, विचारांतही हिंसा नको, विरोधकाबद्दलही द्वेष नको—अशी त्यांची भूमिका होती. विरोधकांमधल्या गुणवानांचीही कदर कशी करावी हे गांधींनी आपल्या पूर्ण आयुष्यात दाखवून दिले. त्यामुळे त्यांचे पक्के विरोधकही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात असायचे.

 *बिकट परिस्थितीला सामोरे जाणारे व्यक्तिमत्त्व* 

नोआखली असो, बिहार असो किंवा कलकत्ता—गांधी हिंसेच्या केंद्रात गेले. १९४६-४७ च्या सांप्रदायिक हिंसेच्या काळात ते लोकांमध्ये राहिले, पायी फिरले, प्रार्थना केली, संवाद साधला आणि गरज पडली तेव्हा उपोषण केले. नोआखलीत त्यांचा पदयात्रेचा कालखंड हा त्यांच्या अहिंसक शांतता-प्रयत्नांचा महत्त्वाचा अध्याय आहे. याच ठिकाणी ‘वन मॅन आर्मी’ या शब्दाचा खरा अर्थ स्पष्ट होतो. जगात युद्धे जिंकण्यासाठी सैन्य असतात; पण माणसांच्या मनातील द्वेषावर विजय मिळवण्यासाठी कोणते सैन्य असते? गांधीजींनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या आचरणातून दिले. त्यांनी सांगितले की शत्रूला पराभूत करण्यापेक्षा त्याच्या मनातील शत्रुत्व बदलणे अधिक मोठा विजय आहे.

आज जग पुन्हा हिंसा, युद्ध, द्वेष आणि असहिष्णुतेच्या प्रश्नांशी झुंजत आहे. अशा वेळी गांधीजींचे महत्त्व केवळ इतिहासातील एका स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यापुरते मर्यादित राहत नाही. त्यांची पद्धत आपल्याला वेगळा प्रश्न विचारते—शस्त्रांनी शांतता निर्माण करता येते का, की शांततेसाठी माणसाच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी नैतिक शक्ती आवश्यक असते? गांधींचे उत्तर स्पष्ट होते. त्यांनी १९२० मध्ये Young India मध्ये अहिंसेला मानवजातीच्या सर्वांत मोठ्या शक्तींपैकी एक मानले. त्यांच्या दृष्टीने अहिंसा म्हणजे दुर्बलतेचा स्वीकार नव्हता; ती अन्यायाला न झुकता, अन्याय करणाऱ्याविषयीही द्वेष न बाळगता लढण्याची शक्ती होती.

म्हणूनच महात्मा गांधींना ‘वन मॅन आर्मी’ म्हणणे ही शस्त्रबळाची उपमा नाही; ती नैतिक शक्तीची उपमा आहे. एका माणसाने स्वतःभोवती बंदुका जमवल्या नाहीत; त्यांनी माणसे जोडली. त्यांनी सैन्य उभे केले नाही; त्यांनी समाजाच्या विवेकाला जागे केले. त्यांनी हिंसेला हिंसेने उत्तर दिले नाही; त्यांनी सत्य, अहिंसा आणि करुणेला संघर्षाचे सामर्थ्य बनवले.

म्हणूनच माउंटबॅटन यांनी कलकत्त्यातील त्या विलक्षण परिस्थितीत गांधींना ‘One-Man Boundary Force’ म्हटले, ही घटना गांधींच्या जीवनातील केवळ एक प्रशंसात्मक नोंद नाही. ती त्यांच्या नेतृत्वाच्या एका अद्वितीय स्वरूपाची ऐतिहासिक साक्ष आहे. गांधींची सेना माणसांची होती; तिचे शस्त्र सत्य होते, तिची शक्ती अहिंसा होती आणि तिचे अंतिम ध्येय माणुसकी होते. म्हणूनच गांधी केवळ अहिंसेचे पूजारी नव्हते; ते अहिंसेला संघर्षाची शक्ती बनवणारे ‘वन मॅन आर्मी’ होते.

प्रवीण टाके
उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
9702858777

*******

01 October, 2026

हिंगोली जिल्ह्यात "एक दिन, एक घंटा, एक साथ" महा-श्रमदान उत्साहात

 



हिंगोली, दि. १ ऑक्टोबर (जिमाका) : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा - २ अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ दरम्यान राबविण्यात येत असलेल्या "स्वच्छता ही सेवा" मोहिमेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यावर्षीच्या मोहिमेची संकल्पना "स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत - विकसित भारत" अशी आहे.

या मोहिमेचाच एक भाग म्हणून १ ऑक्टोबर २०२६ रोजी "एक दिन, एक घंटा, एक साथ" या देशव्यापी श्रमदान मोहिमेचे आयोजन हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आले.


नरसी (ना.) येथे विशेष श्रमदान मोहीम


हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन, धार्मिक व अध्यात्मिक स्थळ असलेल्या नरसी (ना.) येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर परिसर आणि कयाधू नदी घाट किनाऱ्यावर विशेष स्वच्छता व श्रमदान मोहीम राबविण्यात आली. सदर ठिकाणी मंदिर परिसर, नदी घाट, गावातील सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी श्रमदानातून साफसफाई करण्यात आली.


सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद हिंगोलीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे, विस्तार अधिकारी  विष्णू भोजे, ग्रामविकास अधिकारी डी. एन. इंगोले, पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे तज्ञ सल्लागार संवाद तज्ञ शामसुंदर मस्के, राजेंद्र सरकटे, रघुनाथ कोरडे, नरसी (नामदेव) मंदिर विश्वस्त मंडळ, पंचायत समिती कर्मचारी प्रमोद मोहिते, संतोष चव्हाण, आसिफ खान पठाण, सरपंच, ज्येष्ठ नागरिक, युवक, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी, स्काऊट गाईडचे शाळेतील विद्यार्थी व गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उस्फूर्तपणे सहभाग घेतला.


मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही श्रमदान मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली.                    

विविध विभागाचे विभाग प्रमुख, पंचायत समिती गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी ,कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

अ. जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी ‘फूड प्रोसेस’ प्रशिक्षण नाव नोंदणीची अंतिम मुदत ८ ऑक्टोबर २०२६


हिंगोली, दि. १ ऑक्टोबर (जिमाका) : जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली आयोजित विशेष घटक योजनेंतर्गत औंढा नागनाथ तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी ‘फूड प्रोसेस’ या विषयावरील मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


या प्रशिक्षणासाठी उमेदवार किमान ८ वी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी करताना आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, टी.सी. आणि बँक पासबुकची प्रत जमा करावी.


इच्छुक उमेदवारांनी ८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी कार्यक्रम आयोजक किसन धाबे (मो. ९३७०६३१४६१), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांच्याशी संपर्क साधावा. संपर्काचे ठिकाण : जिल्हा उद्योग केंद्र, एस-१२, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली.


या प्रशिक्षणाचा इच्छुक युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोलीचे सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) ए. एस. कदम तथा प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

00000

पाण्याची टंचाई भासणार नाही, याची दक्षता घेऊन प्रस्ताव सादर करावेत – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न


हिंगोली, दि. १ ऑक्टोबर (जिमाका) : दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी पाण्याची बचत व उपलब्धतेला प्राधान्य देणारी कामे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रस्तावित करावीत. शासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात आज वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सन २०२६-२७ अंतर्गत तालुकानिहाय प्राप्त प्रस्तावांचा आढावा घेतला. बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रदीप धर्माधिकारी तसेच सर्व पंचायत समित्यांचे संबंधित अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तांडा वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याशी संबंधित कामांना प्राधान्य द्यावे. ग्रामपंचायतींनीही पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करून प्रस्ताव सादर करावेत. ३० सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.


सध्याच्या परिस्थितीत अंतर्गत रस्ते, गटारे आणि समाजमंदिरांची कामे प्रस्तावित करू नयेत. त्याऐवजी शाळांमधील सार्वजनिक शौचालये, वाचनालयासाठी स्वतंत्र कक्ष तसेच पुस्तकांसाठी आवश्यक सुविधा याबाबतचे कामाना प्राधान्य देऊन प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.


योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावांवर पुढील आठवड्यात पुन्हा आढावा घेण्यात येणार असून, त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सविस्तर आढावा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर द्या; कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता




हिंगोली, दि. १ ऑक्टोबर (जिमाका) : जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. पाणीपुरवठ्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयातून आज जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त गणेश गांजरे उपस्थित होते.


बैठकीत हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव आणि कळमनुरी शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन व जुन्या योजना, पाणीपुरवठ्याचे स्रोत, उपलब्ध साठवणूक क्षमता, मोठ्या व छोट्या पाण्याच्या टाक्या, तसेच पाण्याचा साठा व वितरण याबाबतची माहिती घेण्यात आली. काही ठिकाणी दोन ते तीन दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता व पुरेशी साठवणूक क्षमता आहे, तेथे योग्य नियोजन करून नियमित पाणीपुरवठा करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.


पाणीपुरवठा सुरळीत करण्यात काही तांत्रिक अडचणी येत असल्यास त्या प्राधान्याने दूर कराव्यात. पाणीपुरवठ्याच्या कामांचा नियमित आढावा घेण्यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करावी. नागरिकांना वेळेत आणि सुरळीत पाणी मिळेल, यासाठी कोणतीही हयगय करू नये, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले.


हिंगोली शहरासाठी नियमित पाणीपुरवठ्याचे नियोजन


हिंगोली शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या मागण्या आणि उपलब्ध पाणीपुरवठा यांचा आढावा घेऊन नवीन पाणीपुरवठा योजनेतील कामे पूर्ण होण्याची अपेक्षित कालमर्यादा निश्चित करावी. नवीन योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील नागरिकां