04 November, 2026

हिंगोलीतील सर्वोत्कृष्ट कल्पनांना मिळणार प्रोत्साहन -जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज-2026’चे जिल्हास्तरीय सादरीकरण; 50 उमेदवारांचा सहभाग

हिंगोली, दि. 4  (जिमाका) : जिल्ह्यातील स्थानिक समस्या सोडविणाऱ्या सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण कल्पनांना शासनामार्फत प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी उमेदवारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज-2026’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण सत्र 4 व 5 नोव्हेंबर रोजी  हिंगोलीतील भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात जिल्ह्यातील सुमारे 50 उमेदवारांनी सहभाग नोंदविला आहे.

जिल्हाधिकारी  गुप्ता यांनी सादरीकरण सत्राला भेट दिली. उमेदवारांनी मांडलेल्या कल्पना जाणून घेतल्या. जिल्ह्यातील सर्वोत्तम कल्पनांना प्रोत्साहन दिले. तसेच नाविन्यपूर्ण विचारांना चालना देण्याचे आवाहन केले. सादर केलेल्या कल्पना आणि परीक्षक मंडळाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

या उपक्रमाचा उद्देश विविध क्षेत्रांतील समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे हा आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, कायदा व न्यायव्यवस्था, संशोधन आणि नाविन्यपूर्ण विकास अशा क्षेत्रांतील संकल्पनांचे मूल्यमापन करण्यासाठी एकूण 12 तज्ज्ञ परीक्षक उपस्थित आहेत. निवडलेल्या उत्कृष्ट संकल्पनांना शासनामार्फत गौरविण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी शिवराज बोथीकर आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त समाधान किरवले उपस्थित होते.

औंढा नागनाथ पाणीपुरवठा योजनेची कामे गतीने पूर्ण करावेत- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

औंढा नागनाथ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी व प्रगतीचा आढावा

        हिंगोली, दि. ४ नोव्हेंबर (जिमाका) : औंढा नागनाथ शहरातील नागरिकांना संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी सुरू असलेली पाणीपुरवठा योजना निर्धारित वेळेत पूर्ण करून डिसेंबर 2026 अंतीपर्यंत शहरापर्यंत पाणी पोहोचावे व संपूर्ण योजना लवकरात लवकर पूर्ण करावी , असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. त्यांनी आज योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.

        यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ‘रॉ वॉटर रायझिंग मेन’च्या कामाची विशेष पाहणी केली. डिसेंबर महिण्याच्या अखेरपर्यत कोणत्याही परिस्थितीत शहराला पाणी उपलब्ध झाले पाहिजे. नागरिकांना पाणीटंचाईमुळे त्रास होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कंत्राटदार प्रतिनिधींनी दिलेल्या विहित मुदतीत योजनेद्वारे प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले.

        प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या वितरण प्रणाली आणि जलकुंभांच्या कामांचाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा घेतला. नगरपंचायत प्रशासनाकडून कामावर नियमित लक्ष ठेवण्यात येत असून, प्रकल्पाचे काम प्रगती पथावर  आहे. उर्वरित कामे अधिक वेगाने पूर्ण करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देशही त्यांनी दिले. नागरिकांना लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

        या वेळी औंढा नागनाथ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धनंजय महाजन उप्पलवाड, प्रकल्प व्यवस्थापक मारोती जोगदंड, श्री. मुळे, श्रीमती काळे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे अभियंता महेश सुरेकर आणि कंत्राटदार प्रतिनिधी सोपान फड उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांची बावनखोली जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट

 

विद्यार्थ्यांशी इंग्रजी व्याकरणातील ‘टेन्स’ विषयावर संवाद; शैक्षणिक गुणवत्तेचा घेतला आढावा

        हिंगोली, दि. ४ (जिमाका) : हिंगोली शहरातील बावनखोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सदिच्छा भेट देऊन शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयातील आकलनाची पडताळणी करत अध्यापन पद्धती, शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेतील विविध सुविधांचा आढावा घेतला.

        शाळेत आगमनानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इंग्रजी व्याकरणातील ‘टेन्स’ अर्थात वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या घटकावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची उजळणी घेतली. विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे आणि विषयाचे आकलन जाणून घेत त्यांनी इंग्रजी विषयातील गुणवत्तावाढीवर भर दिला.

अध्यापन पद्धतींची पाहणी

        विद्यार्थ्यांशी संवादानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षकांच्या अध्यापन पद्धतींचा आढावा घेतला. इंग्रजी व्याकरणातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शिक्षक कोणत्या पद्धतींचा आणि शैक्षणिक साहित्याचा वापर करतात, याची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना विषय सहज समजावा आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढावे, यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी दखल घेतली.

        यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, भौतिक सुविधा आणि राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचीही पाहणी करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आवश्यक सूचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन आणि विद्यार्थ्यांचे आकलन जाणून घेण्याच्या उद्देशाने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.

महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा जागर ; ग्रंथप्रदर्शन व सामूहिक वाचन उत्साहात


हिंगोलीची भव्य ग्रंथालय इमारत जिल्ह्याचे सांस्कृतिक केंद्र बनवा; मोठ्या संख्येने सभासद व्हा;  सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांचे आवाहन

हिंगोली, दि. ४ (जिमाका) : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शन व सामूहिक वाचन उपक्रम उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात संपन्न झाला. महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या विचारांचा प्रसार आणि वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात साहित्यिक, अभ्यासक, विद्यार्थी आणि ग्रंथप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, विलास वैद्य, जिल्हा ग्रंथालय संघ व विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, विभागीय ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह राम मेकले, प्रा. मुपकलवार, अनिल बाविसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा फुले यांच्या विचारांचे सामूहिक वाचन

उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवर, साहित्यिक, अभ्यासक व वाचकांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनचरित्रावर, सामाजिक क्रांतीच्या विचारांवर तसेच त्यांच्या साहित्यावर आधारित ग्रंथांचे सामूहिक वाचन केले. या उपक्रमातून महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता अधोरेखित झाली.

यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे म्हणाले, हिंगोली येथे उभारण्यात आलेली भव्य ग्रंथालय इमारत ही जिल्ह्याची अभिमानास्पद वास्तू आहे. ही वास्तू केवळ पुस्तकांचे भांडार न राहता साहित्यिक, विचारवंत, वाचनप्रेमी आणि नागरिकांच्या सहभागातून जिल्ह्याचे जिवंत सांस्कृतिक केंद्र बनली पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि अभ्यासकांनाही या ग्रंथालयाचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत.

महात्मा फुले यांचे विचार घराघरांत पोहोचविण्यासाठी डिजिटल युगातही पुस्तकांशी नाते घट्ट ठेवणे गरजेचे आहे. नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने ग्रंथालयाचे सभासद होऊन वाचन संस्कृती समृद्ध करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

वर्षभर विविध प्रबोधनात्मक उपक्रम

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले. महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध प्रबोधनात्मक व वैचारिक उपक्रमांची माहिती देत त्यांनी समाजातील सर्व घटकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले.

ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, विलास वैद्य आणि खंडेराव सरनाईक यांनीही महात्मा फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा आजच्या समाजजीवनातील महत्त्वपूर्ण संदर्भ स्पष्ट केला.

कार्यक्रमास विविध संस्थांचे प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, ग्रंथपाल, साहित्यिक, वाचक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शन आणि सामूहिक वाचनाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करत कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.

मस्तानशहानगर येथील प्रलंबित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

                                                                                                                                                                                       हिंगोली, दि. 4 (जिमाका) : नगरोत्थान योजनेंतर्गत हिंगोली शहरातील मस्तानशहानगर येथे प्रस्तावित असलेल्या प्रलंबित रस्त्याची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. या रस्त्याचे काम रखडलेल्या स्थितीत असल्याची दखल घेत त्यांनी नगरपालिका प्रशासनाला तातडीने काम सुरू करून रस्ता पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

                                                                                                                                                                                     शहरातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंजूर विकासकामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रलंबित रस्त्याच्या कामातील अडचणी तातडीने दूर करून कामाला गती द्यावी. तसेच रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

        यावेळी नगर परिषद प्रशासनचे सहायक आयुक्त  गणेश गांजरे,  हिंगोली नगर परिषद मुख्याधिकारी प्रांजली मुंढे, नगर अभियंता स्नेहल आवटे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

03 November, 2026

टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

*-राज्यात ३०० अत्याधुनिक ट्रूनॅट यंत्रे बसविणार*

*-ग्रामीण आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार*

  मुंबई, दि. ३: क्षयरोगाचे जलद व अचूक निदान करून ‘टीबीमुक्त महाराष्ट्र’ करण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. राज्यातील दुर्गम व ग्रामीण भागांतील नागरिकांनाही जलद व  गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी ३०० अत्याधुनिक ‘ट्रूनॅट क्वात्रो’ आण्विक निदान यंत्रे बसविण्यात येणार आहेत.

  राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यभर प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हास्तरीय आरोग्य संस्थांमध्ये ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेल्या या आधुनिक यंत्रांमुळे क्षयरोगाचे लवकर आणि अचूक निदान करणे शक्य होणार आहे.

  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, सुमारे ४१.९२ कोटी रुपये खर्चाच्या आणि २१ महिने कालावधीच्या या प्रकल्पासाठी बीपीसीएल फाउंडेशन, एचआयटीईएस–एचएलएल इन्फ्रा टेक सर्व्हिसेस लिमिटेड ही कार्यान्वयन संस्था आणि सहसंचालक, आरोग्य सेवा (क्षयरोग व कुष्ठरोग) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागांतही आधुनिक निदान सुविधांचा विस्तार होईल.

  ‘ट्रूनॅट क्वात्रो’ यंत्रांद्वारे अवघ्या एका तासात क्षयरोगासह रिफॅम्पिसिन-प्रतिरोधक क्षयरोगाचे निदान करता येणार आहे. ही यंत्रे पोर्टेबल आणि बॅटरीवर चालणारी असल्यामुळे दुर्गम भागांतही त्यांचा सहज वापर करता येईल. यंत्रे हाताळण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून, निक्षय प्लॅटफॉर्मद्वारे संपूर्ण कामकाजाचे डिजिटल निरीक्षण केले जाणार आहे.

  या प्रकल्पामुळे राज्यात दरवर्षी सुमारे ९ लाख ३६ हजार तपासण्या करण्याची क्षमता निर्माण होईल. त्यातून अंदाजे १ लाख १२ हजार क्षयरुग्ण आणि ४ हजार ६८० रिफॅम्पिसिन-प्रतिरोधक क्षयरुग्ण लवकर ओळखता येतील. निदानातील विलंब कमी झाल्यामुळे संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होईल तसेच ग्रामीण व वंचित भागांतील नागरिकांना सुलभ आणि आधुनिक आरोग्यसेवा मिळेल.
०००००

महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

*विशेष वृत्त* 
हिंगोली, दि.३ (जिमाका) : भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सन २०२७  द्विशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने महात्मा जोतीराव फुले यांचे सामाजिक समता, स्त्रीशिक्षण, शेतकरी कल्याण, सामाजिक न्याय आणि मानवमुक्तीविषयक विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व शासकीय विभागांनी आपापल्या स्तरावर वर्षभर विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

     महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १० एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार, दि. ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे. राज्य शासनाने यासाठी महिनानिहाय कृती आराखडाही निश्चित केला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने केवळ शैक्षणिक संस्थांपुरते कार्यक्रम मर्यादित न ठेवता सर्व विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृतीपर उपक्रम राबवून या महापुरुषांचे विचार समाजाच्या घराघरात पोहोचवावेत, असे विभागीय आयुक्तांनी म्हटले आहे.

    या उपक्रमांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांचे सहकार्य घ्यावे. संबंधित विभागांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती, छायाचित्रे आणि वृत्त जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसारित करावे. वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, समाजमाध्यमे तसेच अन्य उपलब्ध प्रसिद्धी माध्यमांचा प्रभावी वापर करून महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याची व्यापक जनजागृती करावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

   राज्य शासनाच्या कृती आराखड्यानुसार जागृती रॅली, भित्तिपत्रक अभियान, जीवनपरिचय सप्ताह,  जलसंवर्धन, शेतकरी व जलव्यवस्थापनविषयक उपक्रम, बालसभा आणि स्वच्छता अभियान; सामाजिक समता कथा, चर्चा, ग्रामभेट, समता भिंत आणि समता दौड;  वृक्षारोपण, देशभक्तीपर गीत कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, महात्मा फुले साहित्य वाचन अभियान ,शिक्षक गौरव, नवोपक्रम स्पर्धा, विज्ञान व माहिती-तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम; स्त्री सक्षमीकरण, भूमिका अभिनय, पोस्टर स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन आणि महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह,  संविधानविषयक पुस्तकांचे वाचन, अभिरूप ग्रामपंचायत व जिल्हा परिषद उपक्रम, पोवाडा स्पर्धा,जनजागृती रॅली,सांस्कृतिक महोत्सव, चित्रकला स्पर्धा, संशोधन, स्थानिक इतिहासाचा अभ्यास, मुलाखती व प्रकल्प सादरीकरण; वादविवाद, निबंध, पोस्टरनिर्मिती आणि प्रकल्प सादरीकरण स्पर्धा; तर मार्चमध्ये समारोप कार्यक्रम, पुरस्कार वितरण, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व शिक्षकांचा विशेष सन्मान,अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
   
   या सर्व उपक्रमांमध्ये सामाजिक समता, स्त्रीशिक्षण, शिक्षणाचे महत्त्व, शेतकरी कल्याण, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विचारांना प्राधान्य देण्यात यावे. विविध विभागांनी त्यांच्या कामकाजाच्या स्वरूपानुसार व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, प्रदर्शन, जनजागृती मोहिमा आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करावेत. तसेच शासनाच्या निर्देशानुसार कार्यक्रमांचे नियोजन करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे.

   छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या आठही जिल्ह्यांतील सर्व शासकीय यंत्रणांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या कार्यातून दिलेला समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

पीक कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज द्या- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

▶️ दत्तक गावातील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट 
निर्देश

हिंगोली, दि.३ (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावे, तसेच नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बँकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. 

या बैठकीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत उद्योग कर्ज वितरण तसेच पीक कर्ज वाटपाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बँकांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

पीक कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळण्यासाठी बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार दत्तक गाव असलेल्या बँकेतून किंवा ज्या बँकेत त्यांचे पूर्वीचे पीक कर्ज माफ झाले आहे, त्याच बँकेमार्फत पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी आवश्यक आर्थिक मदत वेळेत मिळण्यास मदत होईल. पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.

शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि हिंगोली जिल्ह्याचा महत्त्वाचा आधार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध झाल्यास त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके तसेच शेतीच्या इतर आवश्यक बाबींसाठी आर्थिक नियोजन करणे सुलभ होते. त्यामुळे पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया अधिक गतिमान, सुलभ करून पात्र शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून देण्याची आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.

*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग कर्ज वाटपाला गती द्या*

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, नवउद्योजक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच युवकांना स्वावलंबी होण्याची संधी मिळते. त्यामुळे या योजनेअंतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणांचा बँकांनी प्राधान्याने निपटारा करावा. पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी व वितरणासाठी अनावश्यक विलंब करू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिल्या.

जिल्ह्यातील सर्व बँकांनी पीक कर्ज वाटप आणि उद्योग कर्ज वितरणाबाबत समन्वयाने काम करावे. शेतकरी आणि नवउद्योजकांना बँकिंग सेवांचा लाभ सुलभतेने मिळेल, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्याच्या दृष्टीने बँकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाची तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग कर्ज वितरणाची सद्यस्थिती जिल्हाधिकारी गुप्ता यांनी जाणून घेतली. शेतकरी आणि नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी अधिक संवेदनशीलतेने व जबाबदारीने काम करावे, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले.

दुष्काळात शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करू नये. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

मायक्रो फायनान्स कंपन्यांना जिल्हा प्रशासनाच्या सूचना; दबाव तंत्राचा वापर टाळण्याचेही आवाहन 
हिंगोली, दि. ३ नोव्हेंबर (जिमाका) : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांकडून कर्जाच्या हप्त्यांची सक्तीने वसुली करू नये. तसेच कर्जवसुलीसाठी कोणत्याही प्रकारच्या दबाव तंत्राचा वापर करू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत.

दुष्काळी परिस्थितीतही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांकडे कर्जाच्या हप्त्यांची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक (ता. ०२) घेण्यात आली.
 दुष्काळी परिस्थिती घोषित 
तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित अल्पमुदतीच्या कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करू नये. कर्जवसुलीसाठी दबाव आणू नये. तसेच वसुलीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यांना नैराश्य येऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश बैठकीत जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले आहेत.

या बैठकीस जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सुरेखा फुपाटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे, तसेच मायक्रो फायनान्स व इतर फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
*****

एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी क्रमांकपट्टी बसविणे बंधनकारक

क्रमांकपट्टी न बसविल्यास दंडात्मक कारवाईसह वाहनविषयक विविध सेवांवर निर्बंध

हिंगोली, दि. ३ (जिमाका) : जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. एचएसआरपी बसविण्याची निर्धारित मुदत संपुष्टात आली असून, १ जुलै २०२६ पासून अशा क्रमांकपट्ट्या न बसविलेल्या वाहनांवर वायुवेग पथकांमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश मरगू जाधव यांनी दिली आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० नुसार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी बसविण्याची तरतूद आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. १३०२९/१९८५ (एम.सी. मेहता विरुद्ध केंद्र शासन) या प्रकरणात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत.

एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांच्या मालकांना वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे आदी कामांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच अशा वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल आणि परवाना नूतनीकरण यांसारखी कामे थांबविण्यात येणार आहेत. यात योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास अपवाद ठेवण्यात आला आहे.

तरी हिंगोली जिल्ह्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांना तातडीने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी बसवून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश मरगू जाधव यांनी केले आहे.

02 November, 2026

दर्जेदार आरोग्य सुविधेला प्राधान्य द्या- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

⏺️जन आरोग्य संवाद यात्रेदरम्यान कॅथलॅबची पाहणी 
⏺️जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामाचे केले कौतुक
हिंगोली, दिनांक 2 (जिमाका) : अतिशय उच्च अशा दर्जाची सुविधा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कॅथलॅबच्या माध्यमातून हिंगोली वासियांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशाच प्रकारच्या दर्जेदार आरोग्य सुविधेला प्राधान्य द्या. रुग्णांनीही जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्ज स्वरूपात निर्माण करण्यात आलेल्या कॅथलॅब व जिल्हा सामान्य रुग्णालयातील इतर सुविधांची पाहणी मंत्री आबिटकर यांनी केली. आमदार संतोष बांगर, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके तसेच छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संतोष कडले उपस्थित होते.

यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या कॅथलॅबसह इतर सर्व विभागाची पाहणी मंत्री आबिटकर यांनी केली. तसेच आमदार बांगर यांनीही जिल्हा सामान्य रुग्णालयात देण्यात येत असलेल्या सेवेचे कौतुक करत जिल्ह्यातील रुग्णांना रुग्णालय उत्तम सेवा सुविधा देत असल्याचे सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक यांनीही रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सेवेबाबत सविस्तर माहिती दिली. 
********

मौजे कनका येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची आरोग्यमंत्र्यांकडून प्रशंसा!

हिंगोली, दि. २ नोव्हेंबर : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मौजे कनका येथे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली.  राष्ट्रीय बाल संस्थे कार्यक्रमाचा आढावा घेतला असता समाधान व्यक्त करून प्रशंसा केली.   यावेळी आमदार संतोष बांगर, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर आणि संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आयुक्त संजय काटकर यांनी प्रास्ताविक केले.  यामध्ये हिंगोली जिल्ह्यांमध्ये ९५२ हृदयविकारग्रस्त बालकांचे हृदयविकार शस्त्रक्रिया करून   बालकांचे भविष्य निरोगी केले  नमूद केले.  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत लाभ दिलेल्या बालकांना मंचावर बोलवून गुलाब पुष्प देऊन पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.  यामुळे बालकांच्या चेहऱ्यावर नवीन आशा निर्माण झाल्याचे दिसून आले.  हेच या कार्यक्रमाचे यश असल्याचे निष्पन्न झाले. तसेच यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते क्षय रुग्णास कोरडा पोषण देण्यात आला.

यानंतर आरोग्यमंत्री  प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित पालक, विद्यार्थी व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.  आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवून आपल्या बालकांच्या उपचारासाठी सहकार्य करणाऱ्या पालकांचे त्यांनी विशेष कौतुक केले व यापुढे भविष्यात सर्व  गावकऱ्यांचे  शासकीय योजना सहकार्य मिळण्यासाठी आवाहन केले.

 आरोग्य विभागाच्या सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

“आरोग्य यंत्रणेवर पालकांनी ठेवलेला विश्वास हीच आमची ताकद आहे. भविष्यातही कोणतेही बालक  आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रभावीपणे आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातील,” असा विश्वास आरोग्यमंत्री  प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.

यावेळी शाळेतील विद्यार्थी, त्यांचे पालक, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून वसमत महिला व बाल रुग्णालयाची पाहणी;

'RBSK' योजनेमुळे पुनर्जन्म मिळालेल्या पाच महिन्यांच्या चिमुकलीला उचलून घेत केले कौतुक
वसमत: दि.02 -राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी 'आरोग्य संवाद यात्रा'' च्या निमित्ताने वसमत येथील महिला व बाल रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा'मुळे (RBSK) दुर्धर आजारावर मात केलेल्या पाच महिन्यांच्या सिया गौतम भंडारे या चिमुकलीला आरोग्य मंत्र्यांनी स्वतःच्या कडेवर उचलून घेत तिच्या प्रकृतीची अत्यंत आपुलकीने विचारपूस केली. हा हृदयस्पर्शी क्षण उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

सिया अवघ्या १० दिवसांची असताना तिच्यावर मुंबईतील नामांकित कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची ‘बॅड क्लोजर विथ आर्च रिपेअर’ (Bad Closure with Arch Repair) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली होती. शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळून चिमुकली आज ठणठणीत असल्याने आरोग्य मंत्र्यांनी समाधान व्यक्त करत तिच्या पालकांना दिलासा दिला व डॉक्टरांच्या अभिनंदन केले.
या पाहणी दौऱ्यात आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची तपासणी करून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला. सामान्य नागरिकांना, माता व बालकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळायलाच हव्यात, अशा सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

आरोग्य सेवेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यमंत्र्यांकडून आरोग्य सुविधांची पाहणी ; बालकांची आस्थेवाईकपणे विचारपूस
हिंगोली, दि. २ नोव्हेंबर (जिमाका) : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयाला आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देणार अशी ग्वाही त्यांनी दिली. 
आरोग्य संवाद यात्रा 2026 अंतर्गत आयोजित या भेटीदरम्यान आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य संस्थेतील विविध सुविधांचा आढावा घेतला. यावेळी आमदार संतोष बांगर, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके तसेच छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संतोष कडले उपस्थित होते.

*आरोग्य सुविधांचा घेतला आढावा* 

आ. बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, माता व बाल आरोग्य सेवा, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीची माहिती आरोग्यमंत्र्यांनी घेतली. उपलब्ध वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ, औषधसाठा आणि दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.  

ग्रामीण नागरिकांशी थेट संवाद साधून आरोग्य सेवा वेळेत व नियमितपणे मिळतात का, उपचार घेताना कोणत्या अडचणी येतात, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ उपक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबाबत नागरिकांमध्ये असलेली जागरूकता तसेच योजनांचा लाभ मिळत असल्याबाबतही त्यांनी विचारणा केली.

*हृदयशस्त्रक्रिया झालेल्या बालकांची विचारपूस*

उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांची प्रत्यक्ष माहिती घेतली. नागरिकांच्या अडचणी आणि सूचनांची दखल घेत आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयशस्त्रक्रिया झालेल्या बालकांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत बालकांना पुढील उपचार व आरोग्य सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वी शस्त्रक्रीया झालेल्या बालकांनी मंत्री श्री. आबीटकर यांना पुष्प देवून स्वागत केले. यावेळी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरणही करण्यात आले.
00000

समतचे हरिद्रा संशोधन केंद्र राज्याच्या हळद उद्योगासाठी महत्त्वपूर्ण - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

वसमतचे हरिद्रा संशोधन केंद्र  राज्याच्या हळद उद्योगासाठी महत्त्वपूर्ण

- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

हळद प्रक्रिया उद्योगातून स्थानिक रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार

मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे कौतुक ; संशोधन, प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या संधींची घेतली माहिती

 


हिंगोली, दि. २ नोव्हेंबर (जिमाका) : हळद उत्पादन, संशोधन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा राज्यातील हळद उद्योगाला गतिमान करणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल. तसेच या केंद्रामुळे जिल्ह्यासह राज्याच्या विकासाला कृषी व औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

आरोग्य संवाद यात्रा २०२६ अंतर्गत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन केंद्राच्या कार्याची माहिती घेतली व कौतुक केले. हळद उत्पादनापासून संशोधन, प्रक्रिया, उत्पादनांची गुणवत्ता आणि मूल्यवर्धनापर्यंतच्या विविध बाबींच्या दृष्टीने या केंद्राचे महत्त्व त्यांनी जाणून घेतले.

या भेटी प्रसंगी केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, केंद्राचे संचालक लक्ष्मीनारायण मूरक्या, सदाशिव पुंड, रितेश जुजाराव, संचालक आरोग्य सेवा पुणे डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आदी उपस्थित होते.

हळद हे मराठवाड्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून हिंगोली जिल्ह्यातही या पिकाला विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्यांना या पिकातून अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी पारंपरिक शेती पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. सुधारित लागवड तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण तसेच काढणीनंतरच्या योग्य प्रक्रियेमुळे हळदीची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढविता येईल. यासाठी शेतकऱ्यांना शास्त्रीय मार्गदर्शन व प्रशिक्षण या केंद्रातून उपलब्ध होत आहे असे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

हळदीवर प्रक्रिया करून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास शेतमालाला अधिक बाजारमूल्य मिळू शकते. हळद स्वच्छ करणे, उकळणे, वाळविणे, दळणे, प्रतवारी करणे, पॅकिंग तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध उत्पादने तयार करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ कच्च्या शेतमालाच्या विक्रीवर अवलंबून न राहता प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करता येण्यासाठी केंद्र सज्ज आहे अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले.

मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हळद उत्पादक शेतकऱ्यांना संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. हळद प्रक्रिया उद्योगांशी संबंधित लघुउद्योग, उद्योजकता आणि पूरक व्यवसायांना प्रोत्साहन मिळाल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. कृषी उत्पादनाला प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल. शेतकरी, कृषी तज्ज्ञ, संशोधक आणि उद्योजक यांच्यात समन्वय साधून हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादनाला व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरेल, असेही  नमूद केले.

यावेळी केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांनी केंद्राच्या कार्याची सविस्तर माहिती दिली, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासह आरोग्य निर्देशांकात सुधारणा करा* - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासह आरोग्य निर्देशांकात सुधारणा करा 

- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर 

वसमत महिला रुग्णालयातील आरोग्य सुविधांची केली पाहणी



 

हिंगोली, दि. २ नोव्हेंबर (जिमाका) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वसमत येथील शासकीय महिला रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सुविधांची पाहणी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासह जिल्ह्याच्या आरोग्य निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार राजू नवघरे, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा, पुणेचे संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. कांचन वानरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आणि छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संतोष कडले उपस्थित होते.

 

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी रुग्णालयातील माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, औषधसाठा आणि दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. तसेच प्रसूतिगृह, शस्त्रक्रियागृह, आयुष्मान भारत योजना, ईसीजी सुविधा आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना कक्षांची पाहणी केली. यावेळी महिला रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

 

*हृदयविकारग्रस्त चिमुकल्यांना आरोग्यमंत्र्यांचा मायेचा आधार!*

 

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साधला शस्त्रक्रियेनंतरच्या बालकाशी संवाद

 

हृदयविकाराशी झुंज देणाऱ्या चिमुकल्यांना नवजीवन देणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या कार्याचा गौरव करत महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान महिला रुग्णालय, वसमत येथे हृदयरोगावरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झालेल्या बाल लाभार्थ्यांशी आस्थेने संवाद साधला. यावेळी त्यांनी बालकांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली.

 

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गरजू बालकांचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर मोफत उपचार व हृदयशस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या योजनेमुळे अनेक बालकांना निरोगी आयुष्याची नवी संधी मिळत आहे.

 

या प्रसंगी आरोग्य विभागाचे आयुक्त श्री. काटकर,  उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानेरे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस , डॉक्टर संदीप काळे तालुका आरोग्य अधिकारी वसमत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी RBSK पथकाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला वेळेत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि आरोग्य संस्थांच्या कामकाजात गुणवत्ता व पारदर्शकता वाढविणे याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले. यावेळी वसमत येथे प्रस्तावित १०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली.

 

यावेळी स्त्री शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा विभाग, प्रसूती विभाग, औषधी भांडार, लसीकरण कक्ष, अंतररुग्ण व बाह्य रुग्ण विभागासह सर्व विभागाला भेटी देऊन पाहणी केली.

 

00000

01 November, 2026

बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्याविषयी जनजागृती आवश्यकहिंगोलीतील कै. बाबुराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात ‘सुरक्षित बचपन अभियान’

हिंगोली, दि. १ नोव्हेंबर : बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण करण्यासाठी कायद्याविषयी जागरूकता, योग्य खबरदारी आणि गुन्ह्यांची निर्भयपणे तक्रार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक प्रेमलता एन. जगताप यांनी केले. तालुका विधी सेवा समिती, हिंगोली यांच्या वतीने बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (पोक्सो), २०१२ अंतर्गत अखिल भारतीय शालेय जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून कै. बाबुराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात ‘सुरक्षित बचपन अभियान’ राबविण्यात आले.

तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, डी. व्ही. भंडारी होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक प्रेमलता एन. जगताप, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस. आर. घुगे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डी. पी. इंगळे उपस्थित होते.

पोक्सो कायद्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पोलीस उपनिरीक्षक प्रेमलता जगताप यांनी पोक्सो कायद्यातील विविध तरतुदी व कलमांची माहिती देत बालकांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार, त्यामागील कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय स्पष्ट केले. नातेसंबंधातील अतिविश्वास, पालकांचे दुर्लक्ष, मोबाईलवरील समाजमाध्यमांचा गैरवापर आणि वाईट संगत यांमुळे बालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. अशा गुन्ह्यांचे परिणाम पीडित बालकासह संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेल्या बालकांची ओळख गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे भीती न बाळगता अशा घटनांची तक्रार करावी, जेणेकरून पुढील अनर्थ टाळता येईल, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि दामिनी पथकाच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांना दिल्या जाणाऱ्या भेटींबाबतही त्यांनी माहिती दिली.

अध्यक्षीय समारोपात न्यायाधीश डी. व्ही. भंडारी यांनी ‘जागरूक बचपन, सशक्त भारत’या अभियानाच्या संकल्पनेचे महत्त्व विशद केले. बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये जागरूकता आणि योग्य वेळी मदत मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी तालुका ते राज्य स्तरापर्यंत विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध होणाऱ्या मदतीची माहिती दिली. तसेच, अशा गुन्ह्यांना बळी पडल्यास पीडितांनी पुढील कायदेशीर कार्यवाही कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना सावध केले.

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचारविरोधी शपथ

महाराष्ट्र शासनाच्या वतीने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ या संकल्पनेवर सहशिक्षक व्ही. बी. अंभोरे यांनी मार्गदर्शन केले. भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांची माहिती देत त्यांनी उपस्थितांना भ्रष्टाचार न करण्याची शपथ दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा वकील संघाचे सचिव तथा विधिज्ञ एम. ए. कांबळे यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले. तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक डी. बी. हनवते आणि कनिष्ठ लिपिक एन. एस. दिंडे यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन केले.

आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठीमंत्री प्रकाश आबिटकर यांचा हिंगोलीतून आरोग्य संवाद

> *सुधारित दौरा कार्यक्रम ३ *

हिंगोली, दि. १ (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीत राज्यभर ‘आरोग्य संवाद यात्रा’राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर सोमवार, 2 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेणार आहेत. तसेच विविध स्तरांवरील पदाधिकारी, अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

मंत्री आबिटकर 2 नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांच्यासमवेत नांदेड येथून वसमतकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी ११ वाजता वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रास मंत्री आबिटकर भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर ११.३० वाजता वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयासही भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी करणार आहेत. सकाळी १२ वाजता वसमत तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

कळमनुरी तालुक्यातील बाळापूरकडे सकाळी १२.३० वाजता आमदार संतोष बांगर यांच्या समवेत प्रयाण. दुपारी १ वाजता कळमनुरी तालुक्यातील बाळापूर येथे विविध आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेऊन आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी दीड ते दोन हा वेळ राखीव असून दुपारी २ वाजता बाळापूर येथून ते हिंगोलीकडे प्रयाण करतील. 

दुपारी २.३० वाजता हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन कॅथलॅब व अन्य वैद्यकीय सुविधांची पाहणी करतील. दुपारी ३ वाजता हिंगोली शहरातील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल आणि ढाले हॉस्पिटल येथे मंत्री आबिटकर सदिच्छा भेट देतील.

दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहातून दूरदृश्यप्रणालीद्वारे हिंगोली जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत विविध आरोग्य समित्यांचे पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी आरोग्य संवाद साधणार आहेत. त्यानंतर सोयीनुसार हिंगोली येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण करतील.

चारा साक्षरता अभियानातून पशुपालकांना चारा व्यवस्थापनाचे मार्गदर्शन

युरिया प्रक्रियेद्वारे निकृष्ट चारा सकस करण्यासह मुरघास, अझोला व हायड्रोपोनिक्स चाऱ्याची माहिती
हिंगोली, दि. १ नोव्हे (जिमाका) : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी भविष्यात उद्भवणारी चारा टंचाई टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय चिकित्सालय, आखाडा बाळापूर, ता. कळमनुरी अंतर्गत रुद्रावाडी येथे ३१ ऑक्टोबर रोजी चारा साक्षरता अभियान राबविण्यात आले.

या अभियानांतर्गत पशुपालकांना युरिया प्रक्रियेद्वारे निकृष्ट चारा सकस करण्याच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अझोला उत्पादन, मुरघास निर्मिती आणि हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. संभाव्य दुष्काळी परिस्थितीत चारा व पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन, चाऱ्याची साठवणूक आणि पर्यायी चारा उत्पादनाच्या उपाययोजनांचे महत्त्व यावेळी विशद करण्यात आले.

यावेळी उपस्थित पशुपालकांना व्हीएमडीडीपी (VMDDP) योजनेंतर्गत विविध घटकांची माहिती देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत चारा बियाण्यांची मागणी नोंदविण्यासाठी गुगल अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पशुधन विमा योजनेची माहिती देऊन पशुधनाच्या संरक्षणासाठी विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

पुढील तीन महिन्यांनंतर उद्भवू शकणारी चारा टंचाई लक्षात घेता, नागरिकांनी व्हीबी-जी राम जी (VB-G RAM G) योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक कामांमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.