हिंगोलीची भव्य ग्रंथालय इमारत जिल्ह्याचे सांस्कृतिक केंद्र बनवा; मोठ्या संख्येने सभासद व्हा; सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांचे आवाहन
हिंगोली, दि. ४ (जिमाका) : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शन व सामूहिक वाचन उपक्रम उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात संपन्न झाला. महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या विचारांचा प्रसार आणि वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात साहित्यिक, अभ्यासक, विद्यार्थी आणि ग्रंथप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, विलास वैद्य, जिल्हा ग्रंथालय संघ व विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, विभागीय ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह राम मेकले, प्रा. मुपकलवार, अनिल बाविसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्या विचारांचे सामूहिक वाचन
उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवर, साहित्यिक, अभ्यासक व वाचकांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनचरित्रावर, सामाजिक क्रांतीच्या विचारांवर तसेच त्यांच्या साहित्यावर आधारित ग्रंथांचे सामूहिक वाचन केले. या उपक्रमातून महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता अधोरेखित झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे म्हणाले, हिंगोली येथे उभारण्यात आलेली भव्य ग्रंथालय इमारत ही जिल्ह्याची अभिमानास्पद वास्तू आहे. ही वास्तू केवळ पुस्तकांचे भांडार न राहता साहित्यिक, विचारवंत, वाचनप्रेमी आणि नागरिकांच्या सहभागातून जिल्ह्याचे जिवंत सांस्कृतिक केंद्र बनली पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि अभ्यासकांनाही या ग्रंथालयाचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत.
महात्मा फुले यांचे विचार घराघरांत पोहोचविण्यासाठी डिजिटल युगातही पुस्तकांशी नाते घट्ट ठेवणे गरजेचे आहे. नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने ग्रंथालयाचे सभासद होऊन वाचन संस्कृती समृद्ध करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
वर्षभर विविध प्रबोधनात्मक उपक्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले. महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध प्रबोधनात्मक व वैचारिक उपक्रमांची माहिती देत त्यांनी समाजातील सर्व घटकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, विलास वैद्य आणि खंडेराव सरनाईक यांनीही महात्मा फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा आजच्या समाजजीवनातील महत्त्वपूर्ण संदर्भ स्पष्ट केला.
कार्यक्रमास विविध संस्थांचे प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, ग्रंथपाल, साहित्यिक, वाचक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शन आणि सामूहिक वाचनाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करत कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.

No comments:
Post a Comment