17 December, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची बळसोंड, भिरडा, कलगाव व भांडेगाव येथे भेट; अतिवृष्टी अनुदान ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक कॅम्पसह विविध विकास कामाची केली पाहणी
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज हिंगोली तालुक्यातील बळसोंड, भिरडा, कलगाव व भांडेगाव या गावांना भेट देऊन अतिवृष्टी अनुदान ई-केवायसी कॅम्प व ॲग्रीस्टॅक कॅम्प तसेच विविध विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित कामकाजाची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
या दौऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) संजय कुलकर्णी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बळसोंड येथे ग्रामपंचायतीत नागरिकांशी संवाद साधून स्थानिक समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच अतिवृष्टी अनुदान ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक कॅम्पच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी नारी शक्ती महिला प्रभाग संघाच्या कार्यालयास तसेच बचत गटाच्या स्टॉललाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली.
भिरडा येथे स्मार्ट व्हिलेजअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. अतिवृष्टी अनुदान ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक कॅम्पला भेट देण्यात आली. तसेच जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीची पाहणी करून संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
कलगाव येथे स्मार्ट व्हिलेजअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून अतिवृष्टी अनुदान ई-केवायसी कॅम्पला भेट देण्यात आली. यावेळी एक दिवस गावकऱ्यांसोबत आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. भांडेगाव येथेही स्मार्ट व्हिलेजअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अपेक्षा व अडचणी जाणून घेतल्या तसेच ई-केवायसी कॅम्पच्या प्रगतीचा आढावा घेतला.
या दौऱ्यादरम्यान विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**
वाळू व गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात कठोर कारवाईचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 17 : वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर व अवैध वाहतूक यांना आळा घालण्यासाठी तसेच राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांच्या कामकाजात समानता व धोरणात्मक एकसूत्रता राहावी, या दृष्टीने राज्य परिवहन प्राधिकरणाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. दि. 26 नोव्हेंबर, 2025 रोजी निर्गमित शासन परिपत्रकान्वये मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 86 मधील तरतुदीनुसार विभागीय कारवाई करण्याचा निर्णय राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांनी घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
त्याअनुषंगाने वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध, अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करी रोखण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कठोर कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या गुन्ह्यात संबंधित वाहनाचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित करून वाहन अटकावून ठेवण्यात येईल. दुसऱ्या गुन्ह्यात 60 दिवसांसाठी परवाना निलंबित करून वाहन अटकावून ठेवण्यात येईल. तर तिसऱ्या गुन्ह्यात वाहन अटकावून ठेवून संबंधित परवाना रद्द करण्याची कार्यवाही प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे.
त्यामुळे संबंधित वाहतूकदारांनी गौण खनिजांच्या उत्खनन व वाहतुकीसाठी शासनाची रीतसर परवानगी घेऊनच उत्खनन व वाहतूक करावी. अन्यथा शासन परिपत्रकानुसार वरीलप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
***
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 17 : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असतानाही प्रवेश न मिळालेल्या तसेच निवास, भोजन व इतर सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ न शकणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध स्तरावरील महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम थेट आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी या योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच भरलेल्या अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावी.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे.
****
16 December, 2025
वाचक सभासद नोंदणी अभियानाचा सर्वांनी लाभ घ्यावा – ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर
हिंगोली (जिमाका), दि. 16 : येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक 15 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत वाचक सभासद नोंदणी अभियान व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. गाडेकर यांनी वाचकांनी मोठ्या प्रमाणात या अभियानाचा लाभ घ्यावा तसेच विशेषतः बालवाचकांनी ग्रंथालयाचा नियमित वापर करावा, असे आवाहन केले. वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी शासकीय ग्रंथालये महत्त्वाची भूमिका बजावत असून अधिकाधिक नागरिकांनी ग्रंथालयाचे सभासद व्हावे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी प्रस्तावित शासकीय जिल्हा ग्रंथालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील मुटकुळे, उपअभियंता अमोल इढोळे, कनिष्ठ अभियंता, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, राज्य ग्रंथालय निरीक्षक प्रताप सूर्यवंशी, मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, गजानन शिंदे, संतोष ससे, प्रभाकर पेडणेकर, मिलिंद सोनकांबळे, शंभुनाथ दुभळकर तसेच वाचक व ग्रंथालय पदाधिकारी उपस्थित होते.
हे ग्रंथप्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरू नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे सर्वांसाठी खुले असून सर्व नागरिकांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा तसेच शासकीय ग्रंथालयाचे वाचक सभासद व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
*****
जल जीवन मिशन अंतर्गत कामे तातडीने पूर्ण करावीत – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जलजीवन मिशन तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस सचिव तथा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, सर्व उपविभागांतील संबंधित उपअभियंते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागाचे उपअभियंते, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड या त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्थेचे प्रतिनिधी तसेच वॅपकॉस (WAPCOS) लिमिटेड या अंमलबजावणी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडील शालेय शौचालय बांधकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी यांनी कामांची सद्यस्थिती मांडली. उर्वरित शालेय शौचालयांची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
यानंतर पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची माहिती सादर करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 211 नळ पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित योजनांच्या प्रगतीच्या विविध टप्प्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. माहे सप्टेंबर 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत उपविभागनिहाय देण्यात आलेल्या उद्दिष्टांनुसार पूर्ण करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सखोल आढावा घेतला.
डिसेंबर 2025 अखेरपर्यंत देण्यात आलेल्या उद्दिष्टांनुसार सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले. तसेच ज्या कामांची उद्दिष्टपूर्ती झाली नाही, त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांतील सर्व उपांगांच्या कामांची जिओ-टॅगिंग करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
*****
जलयुक्त शिवार अभियान 2.0 व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत कामांना गती द्यावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 16 : जलयुक्त शिवार अभियान 2.0 व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 तसेच गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार योजना अंतर्गत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी, हिंगोली व वसमतचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंपदा अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक तसेच जलसंधारण अधिकारी (लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद) उपस्थित होते.
बैठकीत कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 चा आढावा घेण्यात आला. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 39 गावांची निवड करण्यात आली असून, कळमनुरी तालुक्यातील 2 व सेनगाव तालुक्यातील 1 असे 3 प्रकल्प मंजूर झाले आहेत. कळमनुरी तालुक्यातील प्रकल्प क्रमांक 1 निळकठेंश्वर संस्थेकडे तर प्रकल्प क्रमांक 2 तालुका कृषी अधिकारी, कळमनुरी यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी मृद व जलसंधारण कामांची केवळ 25 ते 27 टक्केच प्रगती झाल्याने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामांच्या प्रगतीत वाढ न झाल्याने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस देण्याचे आदेश त्यांनी दिले. सेनगाव तालुक्यातील प्रकल्प क्रमांक 3 बाबत समाधान व्यक्त करून उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच इतर प्रकल्पांनी प्रकल्प क्रमांक 3 प्रमाणे सुधारणा करावी, असे निर्देश दिले. सर्व प्रकल्पांची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत असून, विहित कालावधीत आराखड्यानुसार कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
उत्पादन पद्धतीमधील वैयक्तिक शेतकरी लाभार्थ्यांना शेती साहित्य खरेदीसाठी प्रोत्साहित करावे तसेच अनुदान खर्च होण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी यांनी विशेष मोहिम राबवून कामांच्या प्रगतीत वाढ करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रत्येक प्रकल्पात एक अमृत सरोवर सादर करण्याच्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यातून मौजे बन (ता. सेनगाव) येथील एक प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पुणे कार्यालयास सादर करण्यात आला आहे. तसेच कळमनुरी तालुक्यातील मौजे तोंडापूर, येडशी व भुरक्याचीवाडी येथील प्रस्ताव जिल्हास्तरीय बैठकीत सादर करण्यात आले. अमृत सरोवर हे शासकीय गायरान अथवा शासकीय जमिनीवर घ्यावेत तसेच प्रस्तावात कामांचे फोटो, पाणीसाठा व पिकाची माहिती नमूद करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील 73 गावांची निवड करण्यात आली असून, या अभियानात जलसंधारण विभाग, लघुसिंचन (ल.पा. जि.प.), कृषी विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पूर्णा पाटबंधारे व भूजल सर्वेक्षण विभाग सहभागी आहेत. कृषी विभाग वगळता इतर विभागांनी सुमारे 90 टक्के कामे पूर्ण केली असून कृषी विभागाच्या कामांमध्ये अपेक्षित प्रगती न झाल्याने जिल्हाधिकारी गुप्ता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुधारित आराखड्यानुसार कामांची यादी सादर करून मुदतीत कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. या अभियानाची मुदतही 31 मार्च 2026 पर्यंत आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रत्यक्ष स्थळ पडताळणीबाबत जिल्ह्याला 19 हजार 858 लक्ष्य देण्यात आले असून त्यापैकी 11 हजार 948 कामांची स्थळ पडताळणी पूर्ण झाली आहे. जलसंधारण विभागाने लक्ष्य पूर्ण करून अतिरिक्त 6 हजार 473 स्थळ पडताळणी केली असून कृषी विभागाने मात्र केवळ 2 ते 3 टक्के काम केले आहे. कृषी विभागाने ते तात्काळ पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले.
याशिवाय “जलशक्ती अभियान – जल संचन जन भागीदारी” ही 1 जून 2025 ते 31 मे 2026 या कालावधीत राबविण्यात येणारी कालबद्ध मोहीम असून, पावसाच्या पाण्याची साठवणूक व प्रत्येक थेंबाचे जतन या अनुषंगाने सर्व जलसाठ्यांची गणना व जिओ टॅगिंग करण्याबाबत संबंधित सर्व विभागांना तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
******
विशेष शिबिराचे आयोजन करुन ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 16 : शेतकरी ओळख क्रमांक (ॲग्रीस्टॅक) निर्मितीबाबत व्यापक प्रचार-प्रसिद्धी करुन विशेष धडक मोहीम राबवावी तसेच प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. यासाठी क्षेत्रीय स्तरावर जनजागृती मोहीम राबवून ॲग्रीस्टॅक पोर्टलवर पीएम किसान लाभार्थ्यांपैकी नोंदणी न झालेल्यांची यादी काढून ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करावी. नेमपॅच स्कोअरशी संबंधित प्रलंबित प्रकरणेही तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
गावनिहाय विशेष शिबिरे आयोजित करुन ॲग्रीस्टॅक नोंदणी, अतिवृष्टी अनुदान, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना यासह इतर योजनांचे ई-केवायसी तात्काळ पूर्ण करावेत. या शिबिरांना तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून प्रलंबित ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी पूर्ण करावी. याबाबत शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात येणार असून सर्वांनी परिपूर्ण माहितीसह उपस्थित राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी आयोजित ऑनलाईन बैठकीत दिले.
पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत-जिल्हाधिकारी
दरम्यान, पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणाबाबतही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. पाणंद रस्त्यांबाबत निर्णय झालेल्या ९९ शेतरस्त्यांचे मजबुतीकरण व दुतर्फा वृक्ष लागवड तातडीने करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. यासाठी लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन त्यांच्या निधीतून, १५ वा वित्त आयोग निधी, जनसुविधा व नागरी सुविधा निधीचा वापर करावा. आदिवासी बहुल गावांतील पाणंद रस्त्यांची कामे आदिवासी उपयोजनेंतर्गत करावीत. उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर बैठका घेऊन कामाचे नियोजन करावे तसेच कामासाठी योग्य कंत्राटदारांची निवड करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
या ऑनलाईन बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
******
15 December, 2025
सुशासन सप्ताहांतर्गत प्रशासन गाव की ओर या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन
• सुशासन सप्ताहानिमित्त विविध विभागांनी समन्वयाने विशेष उपक्रम राबविण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 15: सुशासन सप्ताहांतर्गत प्रशासन गाव की ओर या उपक्रमाअंतर्गत तहसील व पंचायत समिती स्तरावर नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ व सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दि. 19 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
या कालावधीत तहसील व पंचायत समिती यांच्यामार्फत गावपातळीवर समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी विशेष मोहिमा, कार्यक्रम, उपक्रम, शिबिरे तसेच महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. सुशासन सप्ताहातील कार्यक्रमांचे नियोजन करताना संबंधित विभागांशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सुशासन सप्ताहाच्या वेळापत्रकानुसार दि. 19 डिसेंबर 2025 रोजी नागरिकांच्या सनदेचे वाचन करून सुशासन सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दि. 20 डिसेंबर रोजी सामाजिक सहाय्य योजनांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शिबिरे, पांदण, शेत व शिवार रस्ते मोकळे करणे, महसूल अभिलेख नोंदी, भटक्या व विमुक्त जातींसाठी जात प्रमाणपत्र व शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी विशेष शिबिरे, प्रलंबित वारस नोंदी निकाली काढण्याची विशेष मोहीम तसेच अकृषिक जमिनींची स्वतंत्र सातबारा मोहीम राबविण्यात येणार आहे.
दि. 21 डिसेंबर रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजना, राष्ट्रीय कृषी योजना, सूक्ष्म सिंचन योजना, मनरेगा अंतर्गत फळबाग योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना व मृदा आरोग्य योजनांसाठी गावपातळीवर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. दि. 22 डिसेंबर रोजी ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिबिरे, तर दि. 23 डिसेंबर रोजी शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना व अटल बांधकाम योजना यांच्या अंमलबजावणीसाठी गावपातळीवर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. दि. 25 डिसेंबर रोजी दहावीनंतरच्या शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार पीडित अर्थसहाय्य योजना, डॉ. बाबासाहेब स्वाधार योजना तसेच मागासवर्गीय मुला-मुलींसाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत.
याशिवाय दि. 19 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्डधारक व नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी गावपातळीवर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सुशासन सप्ताहाच्या अनुषंगाने कार्यालयांशी संबंधित प्रलंबित अर्ज व तक्रारींचे निवारण करून नागरिकांची कामे पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सुशासन सप्ताह कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांची फोटोसह माहिती पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक असून, दररोजचा प्रगती अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प अधिकारी उमाकांत मोकरे यांच्याकडे सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. या अहवालात विशेष शिबिरांतर्गत व सीपीजीआरएमएस तसेच राज्य पोर्टलवरील निकाली काढलेल्या सार्वजनिक तक्रारींची संख्या, ऑनलाईन सेवा वितरणाशी जोडलेल्या सेवांची व अर्जांची संख्या, सुशासन पद्धतींचा प्रसार, यशोगाथा व प्रसार कार्यशाळेचा तपशील समाविष्ट करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
******
14 December, 2025
हिंगोली येथील लोकअदालतीमध्ये ८ कोटी ५२ लाखांहून अधिक रकमेची प्रकरणे निकाली
हिंगोली (जिमाका), दि. १४ : येथील तालुका विधी सेवा समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालय परिसरात नुकतेच राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या लोकअदालतीत प्रलंबित असलेली एकूण १५५१ प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व ११ हजार १५९ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यापैकी लोकअदालतीमध्ये प्रलंबित २७१ प्रकरणे व वाद दाखलपूर्व १३३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या लोकअदालतीत प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये ८ कोटी ५२ लाख ९३ हजार ५०३ रुपयांची तडजोडीच्या आधारे रक्कम निश्चित करून प्रकरणे यशस्वीरीत्या निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीसाठी हिंगोली येथील न्यायिक अधिकारी व विधिज्ञांचा समावेश असलेले पाच पॅनल गठित करण्यात आले होते.
ही लोकअदालत मार्गदर्शन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. एस. माने, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ आर. एस. रोटे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व्ही. एम. मानखैर, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती पी. आर. पमनानी व तिसरे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती एस. एस. पळसुळे यांनी काम पाहिले.
*दिव्यांग महिला पक्षकाराची बाजू समजून घेण्यासाठी न्यायाधीश उतरले पॅनलवरुन खाली*
या लोकअदालतीत मानवी संवेदनशीलतेचा आदर्श ठरलेला प्रसंग घडला. श्रीमती उषाबाई परमेश्वर कोराडे या दिव्यांग महिला पक्षकाराला चालता येत नसल्याने त्या न्यायालयाच्या वरच्या मजल्यावर येऊ शकत नव्हत्या. ही बाब लक्षात घेऊन तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ आर. एस. रोटे यांनी स्वतः पॅनलवरून खाली उतरून न्यायालय इमारतीसमोरील आवारात उभ्या असलेल्या वाहनात जाऊन उषाबाई कोराडे यांची बाजू समजून घेतली. या प्रकरणात १९ लाख ३० हजार रुपयांच्या नुकसान भरपाईवर तडजोड होऊन प्रकरण निकाली काढण्यात आले. या प्रकरणात उषाबाई कोराडे यांची बाजू अॅड. एस. बी. गडदे यांनी मांडली.
राष्ट्रीय लोकअदालतीमुळे नागरिकांना जलद, सुलभ व खर्चमुक्त न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
******
13 December, 2025
हिंगोली जिल्ह्यात “प्लास्टिक कचरा गावमुक्त अभियान” विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी — मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड
हिंगोली, दि. 13 (जिमाका) :
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हिंगोली जिल्हा परिषदेमार्फत “प्लास्टिक कचरा गावमुक्त अभियान” ही विशेष मोहिम जिल्हाभर राबविण्यात आली. ही मोहीम दिनांक ६ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रभावीपणे राबविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांना या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ५६३ ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टिक कचरा संकलन, प्लास्टिक वापराविरोधात जनजागृती तसेच श्रमदान उपक्रम राबविण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या रॅली, स्वच्छता फेऱ्या तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आले. या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पंचायत समिती स्तरावर सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, कृषी गट, युवक मंडळे तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून आरोग्य व स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. ग्रामस्थांना गावातील प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा नियमित वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी या अभियानाचा समारोप करण्यात आला. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आली, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
******
12 December, 2025
आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
* एमएमआरडीए आणि ब्रुकफिल्ड कंपनी यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रकल्प उभारणार
मुंबई, दि.12: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण या तीन घटकांमुळे महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी अग्रगण्य ठरत आहे. यावर्षी जाहीर केलेले नवीन GCC धोरण राज्यात उच्च मूल्याच्या, कौशल्याधारित रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे 6 एकर जागेवर 20 लाख चौरस फूट भाडेतत्वावरील बांधकाम असलेला भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत बहुराष्ट्रीय बँकेचे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन केले जाणार आहे. हा करार 20 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या मोठ्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत जागतिक स्तरावर विश्वास दृढ झाला आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्याबरोबरच, स्थिर आणि सक्षम वातावरण पुरवण्यास राज्य शासन तत्पर आहे.
सदर प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होणार असून, यामध्ये 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे तसेच 30,000 हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) व ब्रुकफिल्ड यांच्या नेतृत्वाखाली भागीदार बी. एस. शर्मा यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, ही उभारणी महाराष्ट्रातील गुंतवणूकदार-अनुकूल वातावरणाबाबत जागतिक कंपन्यांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारी आहे. प्रकल्पासाठी 100 टक्के हरित उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट असून इमारत बाजारातील सर्वोत्तम शाश्वत बांधकाम मानकांनुसार उभारली जाणार आहे. यामुळे मुंबईचे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हब म्हणूनचे स्थान आणखी मजबूत होणार आहे.
2024 मध्ये ब्रुकफिल्डने पुण्यात एका मोठ्या वित्तीय सेवा कंपनीसाठी ‘बिल्ड-टू-सूट’ टॉवर उभारला होता. याच वर्षी MMRDA सोबत 12 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. जून 2025 मध्ये कंपनीने बांद्रा-कुर्ला संकुलात 2.1 एकर जागा खरेदी केली आहे.
ब्रुकफिल्डचे वरिष्ठ गुंतवणूक अधिकारी अंकुर गुप्ता म्हणाले , “आशिया खंडातील कार्यालय विकास क्षेत्रात नवा मापदंड ठरेल असा हा आयकॉनिक प्रकल्प आम्ही उभारत आहोत. मुंबईत करण्यात आलेली गुंतवणूक आता 4 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. उच्च दर्जाची, शाश्वत आणि आधुनिक कार्यस्थळे निर्माण करण्यासाठी ब्रुकफिल्ड कटिबद्ध आहे.”
ब्रुकफिल्ड ही भारतातील सर्वात मोठ्या कार्यालयीन मालक आणि ऑपरेटर कंपन्यांपैकी एक असून देशातील सात शहरांमध्ये सुमारे 55 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचे व्यवस्थापन करते. उच्च दर्जाच्या, ग्रेड-A प्रकल्पांची विकास व संचालन क्षमता कंपनीने सातत्याने सिद्ध केली आहे. पवईतील प्रस्तावित प्रकल्पाला उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, सामाजिक सुविधा व मोठ्या प्रमाणातील कुशल मनुष्यबळाचा लाभ मिळणार आहे.
0000
महाराष्ट्राला जीसीसी हब बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा
* मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार
मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.12 - महाराष्ट्राला GCC (जीसीसी) हब बनवण्याच्या दिशेने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे Global Capability Center (GCC) अर्थात जागतिक क्षमता केंद्र उभारणार आहे. या प्रकल्पातून 15,000 थेट आणि 30,000 अप्रत्यक्ष असे एकूण 45,000 रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जिओ कन्व्हेशन सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, सीईओ, ANSR , विक्रम आहुजा, ब्रुकफिल्डचे अंकुर गुप्ता यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या गुंतवणूक व तांत्रिक भागीदारी प्रकल्पाच्या अनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि उद्योगसुलभ वातावरणामुळे महाराष्ट्र जागतिक कॅपेबिलिटी सेंटरचे पसंतीचे ठिकाण ठरत आहे. नव्या GCC धोरणामुळे मोठ्या प्रमाणात कौशल्याधारित रोजगारनिर्मिती आणि आर्थिक वृद्धी साधली जाईल. जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रणी कंपनी FedEx देखील मुंबई–नवी मुंबई विमानतळ परिसरात आपल्या GCC आणि इतर ऑपरेशन्ससाठी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, मायक्रोसॉफ्टने आपल्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा विचार करावा, याबाबत त्यांना विनंती केली असून सध्या देखील त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्येच आहे. आगामी काळात मायक्रोसॉफ्ट मोठी गुंतवणूक करेल आणि महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्तेचे केंद्र बनवण्यासाठी पुढाकार घेईल.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने दिलेले मॉडेल देशभरासाठी दिशा देणारे
मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी आयोजित Microsoft AI Tour कार्यक्रमात सहभाग घेतला. सत्या नडेला यांनी महाराष्ट्र सरकारसोबत विकसित केलेल्या Crime AIOS प्लॅटफॉर्मचे विशेष प्रदर्शन या कार्यक्रमात केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने दिलेले मॉडेल देशभरासाठी दिशा देणारे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सत्या नडेला यांच्या सोबत झालेल्या या बैठकीत आरोग्य, शिक्षण, कृषी आणि सरकारी सेवा वितरणासाठी “AI Co-Pilots” विकसित करण्यावर चर्चा झाली. मायक्रोसॉफ्टने भारतातील त्यांच्या $17 अब्जांच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्राने विकसित केलेल्या “Marvel” प्लॅटफॉर्ममुळे सायबर आणि आर्थिक गुन्हे 3–4 महिन्यांच्या ऐवजी फक्त 24 तासांत शोधता येतात. ज्यामुळे लोकांचे पैसे वाचत आहेत आणि गुन्हेगारांना शोधणे अधिक जलद झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे सचिव डॉ.अनबलगन, यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते.
0000
अनंत प्राथमिक व रावसाहेब पाटील आश्रमशाळेतील शिक्षण सेवक भरती प्रक्रियेची जाहिरात रद्द
हिंगोली (जिमाका), दि. 12 : नेहा महिला मंडळ, जनार्धन नगर नांदेड यांच्या वतीने संचलित सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील अनंत प्राथमिक आश्रमशाळा, रावसाहेब पाटील माध्यमिक आश्रमशाळा व अहिल्यादेवी होळकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील प्राथमिक शिक्षण सेवक व माध्यमिक शिक्षण सेवक या दोन पदांच्या भरतीसाठी स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द करण्यात आली आहे.
स्थानिक वर्तमानपत्रात दि. 10 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीसंदर्भातील जाहिरात रद्द करण्यात आल्याची माहिती संबंधित आश्रमशाळांचे मुख्याध्यापकांनी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाला कळविले आहे. त्यामुळे ही जाहिरात पूर्णपणे रद्द करण्यात येत असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक यादव गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
*******
11 December, 2025
कळमनुरी तालुक्यातील विकास कामांची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पाहणी
हिंगोली (जिमाका), दि. 11 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दि. 10 डिसेंबर रोजी कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा, माळधामणी, सोडेगाव व उमरा या गावांना भेट देऊन विविध विकास कामांची सविस्तर पाहणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, तहसीलदार जीवककुमार कांबळे यावेळी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व ग्रामस्थांना आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शनही केले.
सेलसुरा येथे स्मार्ट व्हिलेज योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करण्यात आली. ग्रामपंचायतीत नागरिकांशी संवाद साधून स्थानिक समस्यांची माहिती घेण्यात आली. आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळा व स्मशानभूमीची पाहणी तसेच अतिवृष्टी अनुदान ई-केवायसी कॅम्पला भेट देऊन प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
माळधामणी येथे स्मार्ट व्हिलेजअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. नरेगा अंतर्गत तयार करण्यात आलेला गोठा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतील प्रगतीची पडताळणी, अतिवृष्टी अनुदान ई-केवायसी कॅम्प व ॲग्रीस्टॅक कॅम्पला भेट यांचा समावेश होता.
सोडेगाव येथे स्मार्ट व्हिलेजचे काम पाहणी करून अतिवृष्टी अनुदान ई-केवायसी कॅम्पला भेट देण्यात आली. उमरा येथेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्मार्ट व्हिलेज उपक्रमांची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अपेक्षा व अडचणी जाणून घेतल्या तसेच ई-केवायसी कॅम्पची प्रगती तपासली.
या दौऱ्यादरम्यान विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**
12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे भव्य आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 11 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली व जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर, 2025 या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचा प्रचार-प्रसार, युवा शक्तीचे सबलीकरण व स्थानिक खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी या सप्ताहाचे विविध ठिकाणी आयोजन होणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन दि. 12 डिसेंबर रोजी येथील तालुका क्रीडा संकुलावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. उद्घाटन दिवशी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन, स्थानिक खेळाडूंचे संचलन, तसेच विद्यार्थ्यांच्या समूहगानाचे आयोजन करण्यात येणार आहे.
उद्घाटनानंतर सकाळी 10.30 वाजता खुल्या मैदानी क्रीडा स्पर्धांना सुरुवात होणार असून पुढील सात दिवस जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक स्पर्धा, क्रीडा प्रात्यक्षिके व युवकांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत तालुका क्रीडा संकुल, हिंगोली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी कळविले आहे.
*******
जिल्हा वार्षिक योजना निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 11 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत दायित्वाचे व निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव आयपासवर अपलोड करुन निधी मागणीसाठी प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, समाज कल्याण सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
विविध विकास योजनांतील निधी वितरणासाठी संबंधित विभागांनी दायित्वाचे प्रस्ताव आयपासवर अपलोड करणे अत्यावश्यक आहे. प्रस्ताव अपलोड न झाल्यास निधी वितरीत करण्यात येणार नाही. वितरित निधी विहित पद्धतीचे पालन करून खर्च करावा. तसेच सन 2026-27 च्या वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
या बैठकीत 2025-26 मधील नवीन कामांच्या प्रशासकीय मान्यता, निधी वितरण प्रक्रिया, सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, पायाभूत सुविधा प्रकल्पांना युनिक आयडी देणे, पुनर्विनियोजन प्रस्ताव यावर सविस्तर आढावा घेण्यात आला. पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी महाराष्ट्र असेट रजिस्ट्रेशन सिस्टीम पोर्टलवरून युनिक आयडी घेण्याची कार्यवाही अनेक विभागांनी अद्याप सुरू केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
आरोग्य व शिक्षण विभागांनी सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शाळा व महाविद्यालयांचे सोमवारपर्यंत जीओ मॅपिंग पूर्ण करून अपलोड करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच सर्व विभागांनी जनपरिचय पोर्टलवरील नोंदणी पूर्ण करून पीएम गतिशक्ती पोर्टलवर प्रकल्पांची माहिती अपलोड करावी व प्रगती अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले.
सर्व शासकीय इमारती सुगम्य करण्याची कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी
या बैठकीत दिव्यांगांसाठी 5 टक्के राखीव निधी, सुगम इमारत संकल्पना, दिव्यांग छळ प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवरील कारवाई, रेशनकार्ड वाटप, संजय गांधी निराधार योजनेतील वाढीव अनुदान, तसेच वार्षिक योजनेतील एक टक्का निधी खर्च आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व शासकीय इमारतींचे सुगम इमारत निकषांनुसार क्रमांकन करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
अत्याचार प्रकरणांतील मृत पीडितांच्या वारसांना शासकीय सेवेत नोकरी देण्यासाठी 4 प्रस्तावांना मान्यता
दरम्यान, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 (सुधारित 2015) अंतर्गत अत्याचाराच्या प्रकरणांतील मृत पीडितांच्या वारसांना शासकीय, निमशासकीय सेवेत गट-ड मधील नोकरी देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्राप्त 18 प्रस्तावांपैकी 4 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. या बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण सहायक आयुक्त गीता गुठ्ठे व समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.
*******
10 December, 2025
जिल्हा रुग्णालयात मोफत त्वचारोग निदान व उपचार शिबीर
हिंगोली: दि. 10, (जिमाका): जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे आज मोफत त्वचारोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात त्वचारोग तज्ञ डॉ. छाया कोल्हाळ यांनी 70 संशयित रुग्णांची तपासणी करुन 1 असांसर्गिक कुष्ठरुग्णाचे निदान केले व त्यांना त्वरित बहुविध औषधोपचार देण्यात आले. यावेळी सहायक संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग) डॉ. राहुल गिते, अभियान नोडल अधिकारी डॉ. सुनील देशमुख व कर्मचारी उपस्थित होते.
उद्या गुरुवार दि. 11 डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय वसमत व शुक्रवार, दि. 12 डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे मोफत त्वचारोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तेव्हा नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले आहे.
***
बनावट परिवहन संकेतस्थळे व फसव्या लिंकपासून सावध राहा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
हिंगोली (जिमाका), दि. 10: अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन आदी परिवहन सेवांशी संबंधित बनावट संकेतस्थळे, फसवी मोबाईल अॅप्स (APK) तसेच मोबाईल एसएमएस व व्हॉटस्अपद्वारे पाठविण्यात येणाऱ्या खोट्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामधून वाहनचालक व वाहनमालकांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच ओळख गैरवापराचे प्रकार घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर सर्व वाहनचालक व वाहनमालकांनी केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहन नोंदणीसाठी VAHAN – https://vahan.parivahan.gov.in, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी SARATHI – https://sarathi.parivahan.gov.in, परिवहन सेवांसाठी https://www.parivahan.gov.in, तसेच ई-चलनासाठी https://echallan.parivahan.gov.in या संकेतस्थळांचा वापर करावा.
वरील सर्व अधिकृत संकेतस्थळे ही gov.in या डोमेनने समाप्त होतात. com, online, site, in इत्यादी डोमेन असलेल्या कोणत्याही संकेतस्थळांवर नागरिकांनी माहिती भरणे किंवा व्यवहार करणे टाळावे.
फसवणूक करणाऱ्यांकडून बहुधा “आपल्या वाहनाचे चलन प्रलंबित आहे, तत्काळ दंड भरा”, “ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड होणार आहे, त्वरित तपासा” अशा स्वरूपाचे धमकीवजा संदेश पाठवून अनधिकृत लिंक देण्यात येतात, याबाबत नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून कोणत्याही परिस्थितीत व्हॉटस्अपद्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी केले आहे.
******
वसमत तालुक्यातील 11 कृषि निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित
हिंगोली (जिमाका), दि. 10: जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी जवळपास पूर्ण झाली असून खताच्या दुसऱ्या डोससाठी शेतकऱ्यांकडून डीएपी व युरिया खताची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. वसमत तालुक्यात बाजारात खते उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना पुरवठा न केल्याबाबत तक्रारी तालुका गुणनियंत्रण निरीक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाद्वारे सलग चार दिवस वसमत येथील कृषि निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ज्या विक्री केंद्रांवर अनियमितता आढळून आली, त्या केंद्रांवर परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडून परवाना निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
खत नियंत्रण आदेश 1985 अन्वये वसमत शहरातील एकूण 11 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून त्यामध्ये जय किसान कृषि केंद्र, बसवेश्वर कृषि केंद्र, श्री व्यंकटेश्वरा अॅग्रो एजन्सी, शिवछत्रपती अॅग्रो सोल्युशन, माऊली कृषि केंद्र, श्री साई फर्टीलायझर्स, बाहेती कृषि सेवा केंद्र, हरी ओम कृषि केंद्र, ओम कृषि केंद्र, बजरंग कृषि केंद्र व गुरुकृपा कृषि केंद्र यांचा समावेश आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कोणताही कृषि निविष्ठा विक्रेता चढ्या दराने विक्री, साठवणूक, लिंकींग अथवा अन्य अनियमितता करत असल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी ताकीद जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली आहे.
******
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 28 डिसेंबर रोजी
हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) इयत्ता 8 वी साठी रविवार, दि. 28 डिसेंबर, 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा राज्यभरात एकूण 758 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून एकूण 13 हजार 789 शाळांनी सहभाग नोंदविला असून एकूण 2 लाख 50 हजार 544 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळांवर संबंधित शाळांच्या लॉगिनवर दि. 10 डिसेंबर, 2025 पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची राहणार आहे.
प्रवेशपत्रामधील विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यातील स्पेलिंग दुरुस्त करावयाची असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल करता येणार नाही) तसेच जन्मतारीख, जात, आधार क्रमांक इत्यादी बाबींमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनद्वारे दि. 27 डिसेंबर, 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त टपाल, समक्ष किंवा ई-मेलद्वारे तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या दुरुस्त्यांचा विचार करण्यात येणार नाही. या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर लागू करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी कळविले आहे.
******
09 December, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा
• रोगनियंत्रण व गुणवत्तावाढीवर लक्ष देण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 9 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रतिनिधी डॉ. नामदेव पवार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. शैलेजा कुपास्वामी, तसेच विविध आरोग्य कार्यक्रमांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हॉट एरिया मॅपिंग करून साखर कारखाने, वीटभट्ट्या, झोपडपट्टी वस्त्या आदी ठिकाणी विशेष तपासणी शिबिरे घेऊन क्षयरोग तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच गरोदर मातांची तपासणी करुन रुग्णांना उपचाराखाली आणून नियमित औषधोपचार देण्यावर भर देण्यात आला. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग शोध मोहिमेचा आढावा यावेळी घेण्यात आला.
एनसीडी पोर्टलवरील उच्च रक्तदाब, मधुमेह व कॅन्सर स्क्रीनिंगचे कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रमांतर्गत निर्धारित निर्देशांकांची पूर्तता करून या महिन्यात 9 आरोग्य संस्था व पुढील महिन्यात 11 आरोग्य संस्था एनक्यूएएस (NQAS) प्रमाणित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
निती आयोगाने घोषित आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत हिंगोली तालुक्याने आयोगाने दिलेल्या निर्देशांकानुसार कार्यवाही करून कामगिरीत सुधारणा करावी. यासाठी बेसलाईन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक दडपणाखाली असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करून सकारात्मक परिवर्तन घडविण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
तसेच गरोदर मातांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी एचएलएलमार्फत तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यकतेनुसार औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
******
दिव्यांग विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 9 : दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ऑनलाईन बैठकीत सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी भाकरे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गीता गुठ्ठे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व तहसीलदार ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी 5 टक्के दिव्यांग राखीव निधीबाबत करण्यात आलेली कार्यवाही, सुगम इमारत, दिव्यांग छळ प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी, सर्व आस्थापनांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारकांवर केलेली कारवाई, दिव्यांग व्यक्तींना रेशन कार्ड वाटप, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांगांसाठी वाढीव अनुदान तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील एक टक्का निधी खर्च आदी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांनी सुगम इमारतींच्या अनुषंगाने शासकीय इमारतींचे क्रमांकन (रँकिंग) निश्चित करून त्याचा सविस्तर अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच अपंग पुनर्वसन केंद्राच्या इमारतीची सद्यस्थिती, सुविधा व आवश्यकता यांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ वेळेत व पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून जबाबदारीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले.
*******
खरीप व रब्बी 2024 मधील पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सक्षम प्रशासकीय नेतृत्वाखाली व जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी समन्वयामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2024 व रब्बी हंगाम 2024-25 साठी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे.
या दोन हंगामांसाठी जिल्ह्यास 297 कोटी 50 लाख रुपयांची पिकविमा नुकसान भरपाई मंजूर झाली असून ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिक नुकसानीनंतर एचडीएफसी इआरजीओ विमा कंपनीमार्फत ही आर्थिक मदत वेळेत वितरित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पिकविमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वेळोवेळी आढावा बैठका घेऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनेनुसार पीक नुकसानीची माहिती तातडीने विमा कंपनीकडे सादर करून नुकसान भरपाईचे वितरण वेळेत पूर्ण करण्यात आले.
हंगामनिहाय सहभाग व विमा संरक्षण :
खरीप हंगाम 2024 मध्ये 4.72 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन 1661 कोटी रुपयांचा विमा संरक्षित केला होता, तर रब्बी हंगाम 2024 मध्ये 1.35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून 415 कोटी रुपये रकमेचा विमा संरक्षित केला आहे.
नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीनंतर एचडीएफसी इआरजीओ विमा कंपनीद्वारे हंगामनिहाय भरपाईची रक्कम वितरीत करण्यात येत आहे. यामध्ये खरीप 2024 यासाठी 195.45 कोटी रुपये, रब्बी 2024-25 साठी 102.05 कोटी रुपये अशी एकूण 297 कोटी 50 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. ही भरपाई रक्कम जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रातील अनिश्चिततेत मोठा आर्थिक आधार ठरली आहे.
प्रलंबित भरपाईबाबत सूचना :
खरीप व रब्बी हंगामातील मिळून एकूण 1 कोटी 37 लाख रुपयाची रक्कम विविध तांत्रिक कारणांमुळे (जसे की एक हजार रुपयांपेक्षा कमी दावे, केवायसी अपूर्ण असणे, खाते बंद असणे इ.) प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीने तात्काळ संबंधित लाभार्थ्यांशी संपर्क साधून बँक तपशील व केवायसी अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून उर्वरित रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली आहे.
***
ॲट्रॉसिटी खून प्रकरणातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरीसाठी 15 डिसेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.9 (जिमाका) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत नोंदवलेल्या खून प्रकरणांतील मृत व्यक्तींच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट-क वा गट-ड संवर्गातील शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याची तरतूद असून, यासाठी पात्र पीडितांनी आपली आवश्यक कागदपत्रे 15 डिसेंबर 2025 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती गिता गुठ्ठे यांनी केले आहे.
अत्याचारामुळे कुटुंबावर झालेला मानसिक-आर्थिक आघात, तसेच कमावत्या सदस्याच्या मृत्यूनंतर उद्भवलेली आर्थिक असुरक्षितता लक्षात घेता ही योजना कुटुबांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. नियुक्ती प्रक्रियेचा पहिला टप्पा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय दक्षता समितीमार्फत पूर्ण करण्यात येईल. समिती संबंधित खटला, मृत व्यक्तीची कौटुंबिक परिस्थिती आणि पात्रतेचे निकष तपासून शिफारसी समाज कल्याण व आदिवासी विकास विभागांना पाठवेल. उपलब्ध रिक्त पदांच्या आधारावर पात्र वारसास नियुक्ती दिली जाईल.
अर्ज सादर करताना वारसाचे वय किमान 18 वर्षे व कमाल 45 वर्षे असावे. मृत व्यक्तीची पत्नी किंवा पती प्रथम पात्र ठरतील. त्यानंतर विवाहित/अविवाहित मुलगा-मुलगी आणि मृत्यूपूर्वी कायदेशीर दत्तक घेतलेली मुले पात्र मानली जातील. मृत व्यक्तीचा मुलगा हयात नसल्यास सून अर्ज करू शकेल. घटस्फोटित, विधवा किंवा परित्यक्ता मुलगी अथवा बहीण पात्र मानली जाईल. मृत व्यक्ती अविवाहित असल्यास भाऊ किंवा बहीण अर्ज करू शकेल, या अटी व शर्तींची पूर्तता करण्याचे आवाहन श्रीमती गुठ्ठे यांनी केले आहे.
या नियुक्तीस अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार पुणे येथील समाज कल्याण आयुक्त कार्यालयास आहे. हिंगोली जिल्ह्यातील पात्र कुटुंबांनी कागदपत्रे 15 डिसेंबर 2025 पूर्वी जमा करावीत. अर्ज करण्यासाठी खालील कार्यालयात प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली, समाज कल्याण विभागाने सर्व पात्र लाभार्थ्यांना नियत मुदतीत कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
******
सेनगाव येथील अवैध तंबाखू विक्री करणाऱ्या पान टपऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही
हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार अधिष्ठाता चक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सेनगाव शहरात अवैध तंबाखू विक्री करणाऱ्या पान टपऱ्यांवर आज दि. 9 डिसेंबर 2025 रोजी धडक कार्यवाही करण्यात आली.
हिंगोली शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या कारवाईत सेनगाव शहरातील एकूण 10 अवैध तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असून एकूण 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ), आनंद साळवे (सोशल वर्कर), मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड, सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. खंदारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल के. एम. थिटे तसेच पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे आरोग्यविषयक दुष्परिणाम लक्षात घेता जिल्हाभरात अशीच तपासणी व दंडात्मक कार्यवाहीची मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
कोटपा कायदा-2003 नुसार कलम 4 अन्वये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी, कलम 5 अन्वये तंबाखूयुक्त कोणत्याही पदार्थाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीस बंदी, कलम 6 (अ) नुसार 18 वर्षांखालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थांची विक्री करणे किंवा त्यांच्याकडून विक्री करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. कलम 6 (ब) नुसार शैक्षणिक संस्थांच्या चारही बाजूंनी 100 मीटरच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्रीस बंदी आहे. तर कलम 7, 8, 9 नुसार तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकेटवर 85 टक्के भागावर चित्रात्मक व लिखित वैधानिक इशारा स्पष्टपणे छापलेला असणे बंधनकारक आहे.
******
दूरदर्शनच्या कृषी कार्यक्रमांचे नियोजन जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीचे वेळापत्रक निश्चित
हिंगोली (जिमाका), दि. 09 : दूरदर्शन केंद्र, मुंबई यांच्या कृषीविषयक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र येथे दि. 8 डिसेंबर 2025 रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘कृषिदर्शन’आणि ‘आमची माती, आमची माणसं’या कार्यक्रमांतील विषयांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांपर्यंत नवीन कृषी तंत्रज्ञान, संशोधन व नवकल्पनांची माहिती सोप्या भाषेत पोहोचवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. यासाठी दूरदर्शनचे अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतकरी यांनी एकत्रितपणे विषयनिहाय सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत निवडलेल्या विषयांनुसार आगामी कार्यक्रमांमध्ये चिया बियांची शेती, सेंद्रिय शेती पद्धती, गायीच्या शेणापासून धूप व अगरबत्ती निर्मिती, मोहाच्या फुलांपासून प्रक्रिया पदार्थ, हळद प्रक्रिया उद्योग, यशस्वी रोपवाटिका व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या यशोगाथा, आधुनिक कृषी अवजारे तसेच सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीचा समावेश करण्यात येणार आहे.
या बैठकीचे आयोजन तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके यांनी केले. बैठकीस दूरदर्शनचे मनोज जैन, विनायक मोरे व सुदर्शन चापके (परभणी) उपस्थित होते. संत नामदेव संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव माने यांनी दूरध्वनी संदेशाद्वारे उपस्थितांचे स्वागत करून हिंगोली जिल्ह्यातील सिंचन अनुशेषाबाबत दूरदर्शनने सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यांच्या वतीने श्री. महेंद्र माने व सौ. माधुरी माने उपस्थित होत्या.
यावेळी जालना येथील शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. सोनुने, पालघर येथील रिजवाना सय्यद तसेच तोंडापूर केव्हीकेचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव, श्रीमती रोहिणी शिंदे व डॉ. अतुल मुराई यांनी सहभाग घेतला. प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर असोले व चंद्रकांत देशमुख यांनीही सूचना केल्या.
आगामी काळात महिला शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच शेतीमालावर प्रक्रिया करून उत्पन्नवाढ कशी साधता येईल, याविषयीचे कार्यक्रम दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
******
08 December, 2025
भटक्या श्वानांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची 15 डिसेंबरपर्यंत अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 08 : भटक्या श्वानांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करून त्याचा सविस्तर अहवाल दि. 15 डिसेंबरपर्यंत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
भटक्या श्वानांच्या अनुषंगाने कार्यवाही तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्राणी जन्म नियंत्रण नियम, 2023 प्रभावीपणे राबविण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. बालाजी भाकरे, नगर पालिका प्रशासनाचे आश्विन माने तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण व जंतनिर्मूलन करावे. भटक्या श्वानांसाठी निवारे व आश्रयस्थाने उपलब्ध करून देणे तसेच त्यांना खाण्यासाठी निश्चित जागा ठरविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये अँटी-रेबीज लस व इम्युनोग्लोबुलिनचा आवश्यक साठा उपलब्ध राहील, यासाठी समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. भटक्या श्वानांबाबत तक्रारींच्या निवारणासाठी नगरपालिका व नगरपंचायत स्तरावर स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक विकसित करून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शैक्षणिक संस्था, सार्वजनिक व खासगी रुग्णालये, क्रीडा संकुल, बसस्थानके व रेल्वे स्थानक परिसरात आढळणाऱ्या भटक्या श्वानांना तात्काळ पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करून नियुक्त निवाऱ्यांमध्ये हलविण्यात यावे. अशा भटक्या श्वानांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
सर्व संबंधित यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अहवाल दि. 15 डिसेंबरपर्यंत सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिले.
*******
वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर कार्यक्रम राबविण्याचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 08: केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला स्वातंत्र्य चळवळीत विशेष स्थान असून, भारतीय जनतेला प्रेरणा देणारे हे गीत 7 नोव्हेंबर 1875 रोजी लिहिले गेले असे मानले जाते. 1896 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत प्रथम गायले. स्वातंत्र्य संग्रामाच्या अनेक ऐतिहासिक क्षणांमध्ये या गीताने राष्ट्रीय भावना जागृत केल्या. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेत तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी वंदे मातरम् ला राष्ट्रगीतातील ‘जन गण मन’ प्रमाणेच सन्मानाचा दर्जा असल्याचे जाहीर केले आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हा उपक्रम 7 ते 14 नोव्हेंबर 2025, 19 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026, 7 ते 15 ऑगस्ट 2026 (हरघर तिरंगा अभियान) व 1 ते 7 नोव्हेंबर 2026 (समारोप) या चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
दिनांक 24 ऑक्टोबर, 2025 तसेच 04 नोव्हेंबर, 2025 रोजी झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्राने कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली असून, त्यानुसार जिल्हास्तरावर व्यापक कार्यवाही करण्यात येणार आहे.
यानुसार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता देशभर सामूहिक गायन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, तहसील स्तरावरील केंद्रे, पोलीस विभाग, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, नागरिक हे सर्व सामुदायिक गायनात सहभागी झाले होते. तसेच प्रधानमंत्री यांचा कार्यक्रमही थेट प्रक्षेपित करण्यात आला आहे. .
प्रमुख उपक्रम
वंदे मातरम् चे सामूहिक गायन रेकॉर्ड करून मोहिमेच्या संकेतस्थळावर अपलोड करणे, शाळांमध्ये विशेष सभा, निबंध, वादविवाद, पोस्टर स्पर्धा, वंदे मातरमच्या इतिहासावर संशोधन व शिष्यवृत्ती, सीएपीएफ आणि राज्य पोलीस बँडद्वारे देशभक्तीपर कार्यक्रम, महत्त्वाच्या ठिकाणी वंदे मातरम् विषयक प्रदर्शन, प्रजासत्ताक दिन कार्यक्रमांत विशेष थीम, सार्वजनिक-खाजगी भागीदारीत ऑडिओ-व्हिडिओ बूथ उभारणी, पोर्टलवर कराओके सुविधा – नागरिकांना स्वतःच्या आवाजात गीत रेकॉर्ड करून अपलोड करण्याची संधी तसेच सर्व कार्यक्रमांचे मीडिया व सोशल मीडिया कव्हरेज आदी प्रमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.
कराओके अपलोड प्रक्रिया
1) मोबाईल/ईमेल तपशील भरून ओटीपी प्राप्त करणे, 2) पहिले दोन कडवी गाऊन व्हिडिओ रेकॉर्ड करणे, 3)राज्य, जिल्हा, नाव इ. तपशील भरून व्हिडिओ अपलोड करणे, 4) सहभागाचे प्रमाणपत्र डाउनलोड करणे.
स्थानिक स्तरावर आयोजित सर्व कार्यक्रम मोहिमेच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. केंद्र शासनाने सूचित केलेल्या सर्व बाबींची काटेकोर अंमलबजावणी करून उपक्रम यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
***
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजदिन निधी संकलनाला प्रारंभ, माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध-- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 08 : देशात शांतता व अखंडता टिकवून ठेवण्याचे काम सीमेवरील सैनिकांनी स्वत:च्या शौर्याने, धैर्याने कमीत कमी साधनसामग्रीद्वारे चांगल्या प्रकारे करत आहेत. आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता अविरतपणे सेवा करत आहेत. त्यांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित आहोत, असे सांगून माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन प्रारंभाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी योगेश मीना, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता पुढे म्हणाले, सर्व सैनिकांविषयी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावर्षी 31 लक्ष रुपये ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट होते. 41 लक्ष रुपये ध्वजदिन निधी संकलन करुन ध्वजदिन निधी संकलनामध्ये 133 टक्के उद्दिष्ट पूर्ण करुन जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वर्षीही राज्यात सर्वाधिक ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करु, असे सांगून जिल्ह्यातील सैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी, तक्रारी, गाऱ्हाणी, वेतन व इतर सोयीसुविधांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी लवकरच बैठक घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आपल्या देशाचे सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून दुर्धर परिस्थतीत देशाचे रक्षण करतात. त्या सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रम घेण्यात येतो. निधी संकलनाचे उदि्दष्टापेक्षा जास्त निधी संकलन केल्यामुळे सर्व यंत्रणेचे अभिनंदन केले. तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिबिरे घेऊन प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी संरक्षण दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करतात. त्यामुळेच आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या निधीतून माजी सैनिक, शहीद जवान अधिकारी यांचे कुटुंबियासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येते. हिंगोली जिल्ह्याने यावर्षी 133 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणेचे अभिनंदन केले. त्यामुळे पुढील वर्षाचे उद्दिष्ट कालावधीची वाट न पाहता वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले व देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाप्रती दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच यावेळी मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चमूने स्वागत गीत व देशभक्तीपर गीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केलेल्या कार्यालय प्रमुखांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. शहीद सैनिक गणपत भिकाजी रणवीर यांच्या मातेचा साडीचोळी देवून सत्कार केला. तसेच पतीच्या वाढदिवसानिमित्त एक महिन्याचे निवृत्तीवेतन ध्वजदिन निधीसाठी दिल्यामुळे सरस्वती बैरागी यांचा, माजी सैनिक चंपतराव कदम यांचा सपत्नीक तर माजी सैनिक मारोतराव टाक व सय्यद मीर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर इंगोले यांनी केले. तर आभार प्रदर्शन तुकाराम मुकाडे यांनी केले.
या कार्यक्रमास वीर माता-पिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Comments (Atom)



































