30 December, 2025
जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. ३० : जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, डॉ. बालाजी भाकरे, डॉ. किरण लोंढे, कुलदीप केळकर, आनंद साळवे, भाऊसाहेब पाईकराव, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक अप्पासाहेब उगले, मंगेश गायकवाड तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच महाविद्यालयांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बोधवड यांनी सर्व शासकीय कार्यालये स्वच्छ व नीटनेटकी ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कोटपा कायदा २००३ अंतर्गत कलम ४ नुसार २०० रुपये दंड आकारण्यात यावा आणि प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तंबाखू सेवनास मनाई असल्याबाबतचे निर्देश फलक लावण्यात यावेत, असे निर्देश दिले.
आरोग्य व पोलिस विभागाने जिल्ह्यात नियमित धाडसत्र राबवावीत, शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी तसेच नगर परिषदांनी शैक्षणिक परिसरातील पानटपऱ्या हटविण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. बोधवड यांनी संबंधित विभागांना दिल्या.
तद्नंतर उपस्थित मान्यवरांना तंबाखू विरोधी कायदा कोटपा–२००३ बाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment