24 December, 2025
एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल प्रवेशासाठी 1 मार्च रोजी प्रवेश परीक्षा
हिंगोली (जिमाका), दि. 24: इंग्रजी माध्यमांच्या एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही प्रवेश परीक्षा अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या अधिनस्त प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. 1 मार्च 2026 रोजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी, जि. हिंगोली अंतर्गत ही प्रवेश परीक्षा शासकीय आश्रम शाळा, जामगव्हाण, ता. कळमनुरी, जि. हिंगोली येथे होणार आहे. इयत्ता 6 वीकरिता प्रवेश परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत, तर इयत्ता 7 वी ते 9 वीकरिता सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत घेण्यात येणार आहे.
प्रवेश परीक्षेसाठी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज कळमनुरी प्रकल्प कार्यालय तसेच या कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या मुख्याध्यापकांकडे विनामूल्य उपलब्ध आहेत.
शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच सर्व शासनमान्य प्राथमिक व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 5 वी, 6 वी, 7 वी व 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण भरलेले प्रवेश अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे किंवा प्रकल्प कार्यालय, कळमनुरी येथे दिनांक 30 जानेवारी 2026 पर्यंत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment