आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासह आरोग्य निर्देशांकात
सुधारणा करा
- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
वसमत महिला रुग्णालयातील आरोग्य सुविधांची केली पाहणी
हिंगोली, दि. २ नोव्हेंबर (जिमाका) :
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वसमत येथील
शासकीय महिला रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सुविधांची पाहणी केली. ग्रामीण
भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासह जिल्ह्याच्या आरोग्य
निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी
संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा
(हळद) संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार राजू नवघरे, आरोग्य विभागाचे
आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा, पुणेचे संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. कांचन
वानरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके
आणि छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य
डॉ. संतोष कडले उपस्थित होते.
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी रुग्णालयातील
माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा तसेच शासनाच्या विविध आरोग्य
योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, औषधसाठा
आणि दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. तसेच प्रसूतिगृह, शस्त्रक्रियागृह, आयुष्मान भारत
योजना, ईसीजी सुविधा आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना कक्षांची पाहणी केली.
यावेळी महिला रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली
आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
*हृदयविकारग्रस्त चिमुकल्यांना आरोग्यमंत्र्यांचा
मायेचा आधार!*
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साधला
शस्त्रक्रियेनंतरच्या बालकाशी संवाद
हृदयविकाराशी झुंज देणाऱ्या चिमुकल्यांना
नवजीवन देणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या कार्याचा गौरव करत महाराष्ट्र
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान महिला रुग्णालय,
वसमत येथे हृदयरोगावरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झालेल्या बाल लाभार्थ्यांशी आस्थेने
संवाद साधला. यावेळी त्यांनी बालकांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांच्या पालकांशी
संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत
गरजू बालकांचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर मोफत उपचार व हृदयशस्त्रक्रिया केल्या
जात आहेत. या योजनेमुळे अनेक बालकांना निरोगी आयुष्याची नवी संधी मिळत आहे.
या प्रसंगी आरोग्य विभागाचे आयुक्त श्री.
काटकर, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानेरे
तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस , डॉक्टर संदीप काळे तालुका आरोग्य अधिकारी
वसमत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी RBSK पथकाचे वैद्यकीय अधिकारी
व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला वेळेत
गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत
पोहोचविणे आणि आरोग्य संस्थांच्या कामकाजात गुणवत्ता व पारदर्शकता वाढविणे याला प्राधान्य
द्यावे, असे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले. यावेळी वसमत येथे प्रस्तावित
१०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली.
यावेळी स्त्री शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा
विभाग, प्रसूती विभाग, औषधी भांडार, लसीकरण कक्ष, अंतररुग्ण व बाह्य रुग्ण विभागासह
सर्व विभागाला भेटी देऊन पाहणी केली.
00000

No comments:
Post a Comment