04 November, 2026

हिंगोलीतील सर्वोत्कृष्ट कल्पनांना मिळणार प्रोत्साहन -जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज-2026’चे जिल्हास्तरीय सादरीकरण; 50 उमेदवारांचा सहभाग

हिंगोली, दि. 4  (जिमाका) : जिल्ह्यातील स्थानिक समस्या सोडविणाऱ्या सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण कल्पनांना शासनामार्फत प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी उमेदवारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज-2026’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण सत्र 4 व 5 नोव्हेंबर रोजी  हिंगोलीतील भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात जिल्ह्यातील सुमारे 50 उमेदवारांनी सहभाग नोंदविला आहे.

जिल्हाधिकारी  गुप्ता यांनी सादरीकरण सत्राला भेट दिली. उमेदवारांनी मांडलेल्या कल्पना जाणून घेतल्या. जिल्ह्यातील सर्वोत्तम कल्पनांना प्रोत्साहन दिले. तसेच नाविन्यपूर्ण विचारांना चालना देण्याचे आवाहन केले. सादर केलेल्या कल्पना आणि परीक्षक मंडळाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

या उपक्रमाचा उद्देश विविध क्षेत्रांतील समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे हा आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, कायदा व न्यायव्यवस्था, संशोधन आणि नाविन्यपूर्ण विकास अशा क्षेत्रांतील संकल्पनांचे मूल्यमापन करण्यासाठी एकूण 12 तज्ज्ञ परीक्षक उपस्थित आहेत. निवडलेल्या उत्कृष्ट संकल्पनांना शासनामार्फत गौरविण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी शिवराज बोथीकर आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त समाधान किरवले उपस्थित होते.

No comments: