04 November, 2026

औंढा नागनाथ पाणीपुरवठा योजनेची कामे गतीने पूर्ण करावेत- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

औंढा नागनाथ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी व प्रगतीचा आढावा

        हिंगोली, दि. ४ नोव्हेंबर (जिमाका) : औंढा नागनाथ शहरातील नागरिकांना संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी सुरू असलेली पाणीपुरवठा योजना निर्धारित वेळेत पूर्ण करून डिसेंबर 2026 अंतीपर्यंत शहरापर्यंत पाणी पोहोचावे व संपूर्ण योजना लवकरात लवकर पूर्ण करावी , असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. त्यांनी आज योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.

        यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ‘रॉ वॉटर रायझिंग मेन’च्या कामाची विशेष पाहणी केली. डिसेंबर महिण्याच्या अखेरपर्यत कोणत्याही परिस्थितीत शहराला पाणी उपलब्ध झाले पाहिजे. नागरिकांना पाणीटंचाईमुळे त्रास होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कंत्राटदार प्रतिनिधींनी दिलेल्या विहित मुदतीत योजनेद्वारे प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले.

        प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या वितरण प्रणाली आणि जलकुंभांच्या कामांचाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा घेतला. नगरपंचायत प्रशासनाकडून कामावर नियमित लक्ष ठेवण्यात येत असून, प्रकल्पाचे काम प्रगती पथावर  आहे. उर्वरित कामे अधिक वेगाने पूर्ण करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देशही त्यांनी दिले. नागरिकांना लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

        या वेळी औंढा नागनाथ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धनंजय महाजन उप्पलवाड, प्रकल्प व्यवस्थापक मारोती जोगदंड, श्री. मुळे, श्रीमती काळे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे अभियंता महेश सुरेकर आणि कंत्राटदार प्रतिनिधी सोपान फड उपस्थित होते.

No comments: