01 November, 2026

चारा साक्षरता अभियानातून पशुपालकांना चारा व्यवस्थापनाचे मार्गदर्शन

युरिया प्रक्रियेद्वारे निकृष्ट चारा सकस करण्यासह मुरघास, अझोला व हायड्रोपोनिक्स चाऱ्याची माहिती
हिंगोली, दि. १ नोव्हे (जिमाका) : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी भविष्यात उद्भवणारी चारा टंचाई टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय चिकित्सालय, आखाडा बाळापूर, ता. कळमनुरी अंतर्गत रुद्रावाडी येथे ३१ ऑक्टोबर रोजी चारा साक्षरता अभियान राबविण्यात आले.

या अभियानांतर्गत पशुपालकांना युरिया प्रक्रियेद्वारे निकृष्ट चारा सकस करण्याच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अझोला उत्पादन, मुरघास निर्मिती आणि हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. संभाव्य दुष्काळी परिस्थितीत चारा व पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन, चाऱ्याची साठवणूक आणि पर्यायी चारा उत्पादनाच्या उपाययोजनांचे महत्त्व यावेळी विशद करण्यात आले.

यावेळी उपस्थित पशुपालकांना व्हीएमडीडीपी (VMDDP) योजनेंतर्गत विविध घटकांची माहिती देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत चारा बियाण्यांची मागणी नोंदविण्यासाठी गुगल अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पशुधन विमा योजनेची माहिती देऊन पशुधनाच्या संरक्षणासाठी विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

पुढील तीन महिन्यांनंतर उद्भवू शकणारी चारा टंचाई लक्षात घेता, नागरिकांनी व्हीबी-जी राम जी (VB-G RAM G) योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक कामांमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

No comments: