04 November, 2026
हिंगोलीतील सर्वोत्कृष्ट कल्पनांना मिळणार प्रोत्साहन -जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
औंढा नागनाथ पाणीपुरवठा योजनेची कामे गतीने पूर्ण करावेत- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
औंढा नागनाथ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी व प्रगतीचा आढावा
हिंगोली, दि. ४ नोव्हेंबर (जिमाका) : औंढा नागनाथ शहरातील नागरिकांना संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी सुरू असलेली पाणीपुरवठा योजना निर्धारित वेळेत पूर्ण करून डिसेंबर 2026 अंतीपर्यंत शहरापर्यंत पाणी पोहोचावे व संपूर्ण योजना लवकरात लवकर पूर्ण करावी , असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. त्यांनी आज योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ‘रॉ वॉटर रायझिंग मेन’च्या कामाची विशेष पाहणी केली. डिसेंबर महिण्याच्या अखेरपर्यत कोणत्याही परिस्थितीत शहराला पाणी उपलब्ध झाले पाहिजे. नागरिकांना पाणीटंचाईमुळे त्रास होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कंत्राटदार प्रतिनिधींनी दिलेल्या विहित मुदतीत योजनेद्वारे प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या वितरण प्रणाली आणि जलकुंभांच्या कामांचाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा घेतला. नगरपंचायत प्रशासनाकडून कामावर नियमित लक्ष ठेवण्यात येत असून, प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे. उर्वरित कामे अधिक वेगाने पूर्ण करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देशही त्यांनी दिले. नागरिकांना लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी औंढा नागनाथ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धनंजय महाजन उप्पलवाड, प्रकल्प व्यवस्थापक मारोती जोगदंड, श्री. मुळे, श्रीमती काळे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे अभियंता महेश सुरेकर आणि कंत्राटदार प्रतिनिधी सोपान फड उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांची बावनखोली जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट
विद्यार्थ्यांशी इंग्रजी व्याकरणातील ‘टेन्स’ विषयावर संवाद; शैक्षणिक गुणवत्तेचा घेतला आढावा
हिंगोली, दि. ४ (जिमाका) : हिंगोली शहरातील बावनखोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सदिच्छा भेट देऊन शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयातील आकलनाची पडताळणी करत अध्यापन पद्धती, शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेतील विविध सुविधांचा आढावा घेतला.
शाळेत आगमनानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इंग्रजी व्याकरणातील ‘टेन्स’ अर्थात वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या घटकावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची उजळणी घेतली. विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे आणि विषयाचे आकलन जाणून घेत त्यांनी इंग्रजी विषयातील गुणवत्तावाढीवर भर दिला.
अध्यापन पद्धतींची पाहणी
विद्यार्थ्यांशी संवादानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षकांच्या अध्यापन पद्धतींचा आढावा घेतला. इंग्रजी व्याकरणातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शिक्षक कोणत्या पद्धतींचा आणि शैक्षणिक साहित्याचा वापर करतात, याची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना विषय सहज समजावा आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढावे, यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी दखल घेतली.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, भौतिक सुविधा आणि राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचीही पाहणी करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आवश्यक सूचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन आणि विद्यार्थ्यांचे आकलन जाणून घेण्याच्या उद्देशाने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.
महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा जागर ; ग्रंथप्रदर्शन व सामूहिक वाचन उत्साहात
हिंगोलीची भव्य ग्रंथालय इमारत जिल्ह्याचे सांस्कृतिक केंद्र बनवा; मोठ्या संख्येने सभासद व्हा; सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांचे आवाहन
हिंगोली, दि. ४ (जिमाका) : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शन व सामूहिक वाचन उपक्रम उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात संपन्न झाला. महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या विचारांचा प्रसार आणि वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात साहित्यिक, अभ्यासक, विद्यार्थी आणि ग्रंथप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, विलास वैद्य, जिल्हा ग्रंथालय संघ व विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, विभागीय ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह राम मेकले, प्रा. मुपकलवार, अनिल बाविसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्या विचारांचे सामूहिक वाचन
उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवर, साहित्यिक, अभ्यासक व वाचकांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनचरित्रावर, सामाजिक क्रांतीच्या विचारांवर तसेच त्यांच्या साहित्यावर आधारित ग्रंथांचे सामूहिक वाचन केले. या उपक्रमातून महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता अधोरेखित झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे म्हणाले, हिंगोली येथे उभारण्यात आलेली भव्य ग्रंथालय इमारत ही जिल्ह्याची अभिमानास्पद वास्तू आहे. ही वास्तू केवळ पुस्तकांचे भांडार न राहता साहित्यिक, विचारवंत, वाचनप्रेमी आणि नागरिकांच्या सहभागातून जिल्ह्याचे जिवंत सांस्कृतिक केंद्र बनली पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि अभ्यासकांनाही या ग्रंथालयाचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत.
महात्मा फुले यांचे विचार घराघरांत पोहोचविण्यासाठी डिजिटल युगातही पुस्तकांशी नाते घट्ट ठेवणे गरजेचे आहे. नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने ग्रंथालयाचे सभासद होऊन वाचन संस्कृती समृद्ध करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
वर्षभर विविध प्रबोधनात्मक उपक्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले. महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध प्रबोधनात्मक व वैचारिक उपक्रमांची माहिती देत त्यांनी समाजातील सर्व घटकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, विलास वैद्य आणि खंडेराव सरनाईक यांनीही महात्मा फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा आजच्या समाजजीवनातील महत्त्वपूर्ण संदर्भ स्पष्ट केला.
कार्यक्रमास विविध संस्थांचे प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, ग्रंथपाल, साहित्यिक, वाचक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शन आणि सामूहिक वाचनाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करत कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.
मस्तानशहानगर येथील प्रलंबित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली, दि. 4 (जिमाका) : नगरोत्थान योजनेंतर्गत हिंगोली शहरातील मस्तानशहानगर येथे प्रस्तावित असलेल्या प्रलंबित रस्त्याची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. या रस्त्याचे काम रखडलेल्या स्थितीत असल्याची दखल घेत त्यांनी नगरपालिका प्रशासनाला तातडीने काम सुरू करून रस्ता पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
शहरातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंजूर विकासकामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रलंबित रस्त्याच्या कामातील अडचणी तातडीने दूर करून कामाला गती द्यावी. तसेच रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी नगर परिषद प्रशासनचे सहायक आयुक्त गणेश गांजरे, हिंगोली नगर परिषद मुख्याधिकारी प्रांजली मुंढे, नगर अभियंता स्नेहल आवटे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
03 November, 2026
टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत
पीक कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज द्या- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
दुष्काळात शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करू नये. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी क्रमांकपट्टी बसविणे बंधनकारक
02 November, 2026
दर्जेदार आरोग्य सुविधेला प्राधान्य द्या- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मौजे कनका येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून वसमत महिला व बाल रुग्णालयाची पाहणी;
आरोग्य सेवेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
समतचे हरिद्रा संशोधन केंद्र राज्याच्या हळद उद्योगासाठी महत्त्वपूर्ण - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
वसमतचे हरिद्रा संशोधन केंद्र राज्याच्या हळद उद्योगासाठी महत्त्वपूर्ण
- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
हळद प्रक्रिया उद्योगातून स्थानिक रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार
मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे
कौतुक ; संशोधन, प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या संधींची घेतली माहिती
हिंगोली, दि. २ नोव्हेंबर (जिमाका) : हळद उत्पादन, संशोधन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा राज्यातील हळद उद्योगाला गतिमान करणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल. तसेच या केंद्रामुळे जिल्ह्यासह राज्याच्या विकासाला कृषी व औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
आरोग्य संवाद यात्रा २०२६ अंतर्गत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन केंद्राच्या कार्याची माहिती घेतली व कौतुक केले. हळद उत्पादनापासून संशोधन, प्रक्रिया, उत्पादनांची गुणवत्ता आणि मूल्यवर्धनापर्यंतच्या विविध बाबींच्या दृष्टीने या केंद्राचे महत्त्व त्यांनी जाणून घेतले.
या भेटी प्रसंगी केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, केंद्राचे संचालक लक्ष्मीनारायण मूरक्या, सदाशिव पुंड, रितेश जुजाराव, संचालक आरोग्य सेवा पुणे डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आदी उपस्थित होते.
हळद हे मराठवाड्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून हिंगोली जिल्ह्यातही या पिकाला विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्यांना या पिकातून अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी पारंपरिक शेती पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. सुधारित लागवड तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण तसेच काढणीनंतरच्या योग्य प्रक्रियेमुळे हळदीची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढविता येईल. यासाठी शेतकऱ्यांना शास्त्रीय मार्गदर्शन व प्रशिक्षण या केंद्रातून उपलब्ध होत आहे असे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.
हळदीवर प्रक्रिया करून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास शेतमालाला अधिक बाजारमूल्य मिळू शकते. हळद स्वच्छ करणे, उकळणे, वाळविणे, दळणे, प्रतवारी करणे, पॅकिंग तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध उत्पादने तयार करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ कच्च्या शेतमालाच्या विक्रीवर अवलंबून न राहता प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करता येण्यासाठी केंद्र सज्ज आहे अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले.
मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हळद उत्पादक शेतकऱ्यांना संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. हळद प्रक्रिया उद्योगांशी संबंधित लघुउद्योग, उद्योजकता आणि पूरक व्यवसायांना प्रोत्साहन मिळाल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. कृषी उत्पादनाला प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल. शेतकरी, कृषी तज्ज्ञ, संशोधक आणि उद्योजक यांच्यात समन्वय साधून हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादनाला व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरेल, असेही नमूद केले.
यावेळी केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत
पाटील यांनी केंद्राच्या कार्याची सविस्तर माहिती दिली, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
प्रदीप कच्छवे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासह आरोग्य निर्देशांकात सुधारणा करा* - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासह आरोग्य निर्देशांकात
सुधारणा करा
- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
वसमत महिला रुग्णालयातील आरोग्य सुविधांची केली पाहणी
हिंगोली, दि. २ नोव्हेंबर (जिमाका) :
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वसमत येथील
शासकीय महिला रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सुविधांची पाहणी केली. ग्रामीण
भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासह जिल्ह्याच्या आरोग्य
निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी
संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा
(हळद) संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार राजू नवघरे, आरोग्य विभागाचे
आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा, पुणेचे संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. कांचन
वानरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके
आणि छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य
डॉ. संतोष कडले उपस्थित होते.
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी रुग्णालयातील
माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा तसेच शासनाच्या विविध आरोग्य
योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, औषधसाठा
आणि दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. तसेच प्रसूतिगृह, शस्त्रक्रियागृह, आयुष्मान भारत
योजना, ईसीजी सुविधा आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना कक्षांची पाहणी केली.
यावेळी महिला रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली
आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
*हृदयविकारग्रस्त चिमुकल्यांना आरोग्यमंत्र्यांचा
मायेचा आधार!*
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साधला
शस्त्रक्रियेनंतरच्या बालकाशी संवाद
हृदयविकाराशी झुंज देणाऱ्या चिमुकल्यांना
नवजीवन देणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या कार्याचा गौरव करत महाराष्ट्र
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान महिला रुग्णालय,
वसमत येथे हृदयरोगावरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झालेल्या बाल लाभार्थ्यांशी आस्थेने
संवाद साधला. यावेळी त्यांनी बालकांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांच्या पालकांशी
संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत
गरजू बालकांचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर मोफत उपचार व हृदयशस्त्रक्रिया केल्या
जात आहेत. या योजनेमुळे अनेक बालकांना निरोगी आयुष्याची नवी संधी मिळत आहे.
या प्रसंगी आरोग्य विभागाचे आयुक्त श्री.
काटकर, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानेरे
तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस , डॉक्टर संदीप काळे तालुका आरोग्य अधिकारी
वसमत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी RBSK पथकाचे वैद्यकीय अधिकारी
व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला वेळेत
गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत
पोहोचविणे आणि आरोग्य संस्थांच्या कामकाजात गुणवत्ता व पारदर्शकता वाढविणे याला प्राधान्य
द्यावे, असे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले. यावेळी वसमत येथे प्रस्तावित
१०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली.
यावेळी स्त्री शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा
विभाग, प्रसूती विभाग, औषधी भांडार, लसीकरण कक्ष, अंतररुग्ण व बाह्य रुग्ण विभागासह
सर्व विभागाला भेटी देऊन पाहणी केली.
00000





