23 October, 2026

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात २ लाख ८८ हजार २८१ बालकांना व किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे होणार वाटप

हिंगोली, दि. २३ ऑक्टोबर  :  हिंगोली, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत १ ते १९ वर्षे वयोगटातील सुमारे २ लाख ८८ हजार २८१ बालकांना व किशोरवयीन मुला-मुलींना शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रांमार्फत जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. 
हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, आणि नोडल अधिकारी डॉ. रविंद्र पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या समन्वयाने जिल्ह्यात प्रभावीपणे मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आतड्यांमधील जंतसंसर्गामुळे बालकांमध्ये रक्तक्षय व कुपोषण होण्याची शक्यता वाढते. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर, शैक्षणिक कामगिरीवर आणि सर्वांगीण विकासावर होऊ शकतो. जंतसंसर्गाचे प्रमाण कमी करून बालकांचे आरोग्य व पोषण सुधारण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्बेंडाझोल गोळी दिली जाणार आहे. वयोगटानुसार औषधाची मात्रा निश्चित करण्यात आली असून, आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार गोळी देण्यात येईल. शाळा व महाविद्यालयांतील शिक्षकांमार्फत, विद्यार्थ्यांना तर अंगणवाडीतील बालकांना व शाळाबाह्य मुला-मुलींना अंगणवाडी कार्यकर्त्यांमार्फत गोळ्या देण्यात येणार आहेत.

दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात येणार आहे.
जंतसंसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी नियमित हात धुणे, स्वच्छतागृहाचा वापर करणे, स्वच्छ पाणी पिणे तसेच शूज किंवा चप्पल वापरणे यांसारख्या स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जंतनाशक गोळी दिल्यानंतर काही त्रास किंवा शंका उद्भवल्यास संबंधित आरोग्य कर्मचारी अथवा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आरोग्यविषयक सल्ल्यासाठी टोल फ्री क्रमांक १०४ आणि तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी १०८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल

No comments: