हिंगोली, दि. १४ (जिमाका) : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह प्रवेश, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् या योजनांच्या प्रवेश प्रक्रियेला ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील बारावीनंतर व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजना राबविण्यात येतात. या योजनांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यासाठी शासनाने https://hmasnew.mahait.org/ हे प्रवेश पोर्टल कार्यान्वित केले आहे. यापूर्वी प्रवेश प्रक्रियेसाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती.
मात्र, वसतिगृहाच्या संकेतस्थळावर अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी १० ऑक्टोबर २०२६ पासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आता या तिन्ही योजनांची प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यास ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन संबंधित योजनांसाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment