26 October, 2026

हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘व्हिजिटर पास’ पद्धत लागू १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी; रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भेटीच्या वेळा निश्चित

          हिंगोली, दि. २६ ऑक्टोबर (जिमाका) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली येथे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना संसर्गमुक्त, स्वच्छ व शांततापूर्ण वातावरणात आरोग्यसेवा मिळावी, तसेच रुग्णालयातील गर्दीवर नियंत्रण ठेवून सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भेटीच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यासोबतच रुग्णालयात ‘व्हिजिटर पास’ पद्धत लागू करण्यात येणार असून, या नियमांची अंमलबजावणी १ नोव्हेंबर २०२६ पासून होणार आहे.

        रुग्णालय प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेनुसार, दुपारी १ ते ३ आणि सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेतच नातेवाईकांना रुग्णांना भेटता येईल. या निश्चित वेळांव्यतिरिक्त रुग्णांना भेटण्यासाठी रुग्णालयात प्रवेश दिला जाणार नाही.

        रुग्ण रुग्णालयात दाखल होताना एका नातेवाईकाला भेटीसाठी ‘व्हिजिटर पास’ देण्यात येईल. अत्यवस्थ रुग्णांच्या बाबतीत दोन नातेवाईकांना पास देण्याची व्यवस्था असेल. तथापि, रुग्णालयात रुग्णासोबत एका वेळी केवळ एकाच नातेवाईकाला थांबता येईल. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी निर्धारित वेळा आणि प्रवेशासंबंधीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

        रुग्णांवर वेळेत उपचार करणे, संसर्गाचा धोका कमी करणे आणि रुग्णालयात स्वच्छता व शांतता राखणे याला प्राधान्य देण्यात येत आहे. या नवीन व्यवस्थेमुळे डॉक्टर आणि परिचारिका यांना रुग्णांची देखभाल अधिक प्रभावीपणे करता येईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी नवीन नियमांचे पालन करून रुग्णालय प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुगल यांनी केले आहे.

No comments: