21 October, 2026

खत खरेदीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली ; हिंगोली जिल्ह्यात २२ ऑक्टोबरपासून लागू

शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून खत बुकिंगची सुविधा; शेतकरी ओळख क्रमांक किंवा आधार क्रमांक अनिवार्य.

हिंगोली, दि. २१ ऑक्टोबर (जिमाका) : अनुदानित रासायनिक खतांची खरेदी अधिक सुलभ, पारदर्शक आणि नियोजनबद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेली ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) प्रणाली हिंगोली जिल्ह्यात दि. २२ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना जवळच्या खत विक्री केंद्रावरील खतांची उपलब्धता तपासून घरबसल्या मोबाईलद्वारे खतांचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी दिली.

बुकिंगनंतर तीन दिवसांत खत खरेदीची सुविधा

या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या एफएफएस मोबाईल ॲपमध्ये शेतकरी ओळख क्रमांक किंवा आधार क्रमांकाच्या आधारे प्रवेश करता येईल. त्यानंतर शेतजमिनीचे क्षेत्र प्रमाणित करून पिकाची निवड करावी लागेल. पिकासाठी शिफारस केलेल्या खतांच्या प्रमाणानुसार किंवा स्वतःच्या गरजेनुसार खतांचे प्रमाण निश्चित करून जवळच्या खत विक्रेत्याकडे उपलब्ध खतांचे बुकिंग करता येईल. बुकिंग केल्यानंतर तीन दिवसांच्या आत संबंधित विक्री केंद्रावर जाऊन बुकिंग क्रमांक दाखवून खत खरेदी करता येईल. शेतकरी स्वतः किंवा आपल्या प्रतिनिधीमार्फतही खत घेऊ शकतील.

खतांची उपलब्धता तपासून खरेदीचे नियोजन शक्य

एफएफएस प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतांचा उपलब्ध साठा मोबाईलवर पाहता येणार असून, गरजेनुसार खत खरेदीचे नियोजन करता येईल. आगाऊ बुकिंगमुळे खत खरेदीसाठी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होईल. तसेच अनावश्यक खतांची किंवा इतर कृषी निविष्ठांची खरेदी टाळता येईल. खतांच्या छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्यास त्यावर आळा घालण्यास आणि खत विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासही या प्रणालीची मदत होणार आहे.

शेतकरी व खत विक्रेत्यांनी सहकार्य करावे

हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी तसेच खत विक्रेत्यांनी या पारदर्शक व सुलभ प्रणालीचा अवलंब करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी कृषी विभागाच्या वतीने केले आहे.

No comments: