14 October, 2026

हिंगोलीत आरोग्य सहाय्यकाची आढावा बैठक; 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' व "तिशीचा पल्ला तपासणी अन् सल्ला" अभियानांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

 

        ​हिंगोली, ( दि. १४ ऑक्टोबर):-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशिक्षण संघ, हिंगोली येथे जिल्ह्यातील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका आणि कार्यक्रम सहाय्यक यांची आढावा बैठक पार पडली.

 जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, तळागाळातील नागरिकांपर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचवणे आणि विविध शासकीय अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करणे, या मुख्य उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

​​बैठकीदरम्यान आरोग्य विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध विशेष मोहिमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 

यामध्ये प्रामुख्याने:

​'माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान'

​'सेवा संकल्प अभियान'

​'तिशीचा पल्ला तपासणी अन् सल्ला'

​या मोहिमांतर्गत गावपातळीवर आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि जनजागृती गतीने करण्याचे निर्देश देण्यात आले.

​ माता व बाल संगोपन आणि लसीकरण

​माता व बाल संगोपन उपक्रमांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना पुढील महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या:

​गरोदर माता नोंदणी: प्रत्येक गरोदर मातेची वेळेत आणि अचूक नोंदणी झालीच पाहिजे.

​नियोजित लसीकरण: लसीकरणाचे प्रत्येक सत्र वेळेवर सुरू झाले पाहिजे. कोणत्याही कारणास्तव लसीकरण सत्र रद्द केले जाऊ नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या.

​कुटुंब नियोजन: आरोग्य क्षेत्रांतर्गत कुटुंब नियोजन शिबिरांचे नियोजनबद्ध आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

​राष्ट्रीय जंतनाशक दिन व पोर्टल आढावा

​अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांनी आरसीएच पोर्टल आणि  यु-विन पोर्टल वरील कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

​तसेच येत्या २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 'राष्ट्रीय जंतनाशक दिना'निमित्त विशेष आवाहन करण्यात आले. १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व बालके व किशोरवयीन मुलांना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. मुलांचे आरोग्य उत्तम राहणे, पोषण स्थिती सुधारणे, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी व्यापक जनजागृती करून १००% उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन डॉ. पुरी यांनी केले.

​ कीटकजन्य व साथीच्या आजारांवर नियंत्रण

​साथरोगांचा प्रसार रोखण्यासाठी डॉ. प्रकाश जाधव यांनी डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरिया यांसारख्या आजारांच्या सद्यस्थितीची माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या:

​आरोग्य कर्मचाऱ्यांनी दैनंदिन भेटी देऊन सर्वेक्षण करावे. डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करावीत आणि साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा करावा. डासांची पैदास रोखण्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस 'कोरडा दिवस' म्हणून पाळण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी.

​यासोबतच आयुष्यमान भारत कार्ड आणि वय वंदना योजना कार्ड वाटपाच्या कामांचा आढावा घेऊन कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश देण्यात आले.

​या बैठकीस डॉ. मोसिन खान, अमोल कुलकर्णी, डीपीएचएन मनिषा वडकुते, स्वाती जरांडे, कमलेश इसी, श्री. नागर, सुनील मुनेश्वर, कृष्णा जिवणे, विजय पाठक, मुनाफ शेख यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, कार्यक्रम सहाय्यक व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

No comments: