22 May, 2026

येहळेगाव सोळंके येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न

 




हिंगोली(जिमाका) , दि. 22  :  महसूल विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर (टप्पा-1) अंतर्गत आजजिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली  येहळेगाव सोळंके येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाधान शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार हरीश गाडे उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार अनिता कोलगने यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिरामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके मंडळातील नागरिकांना महसूल व इतर विविध शासकीय विभागांच्या सेवा आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. शिबिरात शिधापत्रिका, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र यांचे वितरण करण्यात आले. तसेच जिवंत 7/12 नोंदी, 7/12 वरील शिवरस्ते नोंदी आदी महसुली कामकाजासंदर्भातील एकूण 280 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

याशिवाय संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती आदी विभागांच्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला.

यावेळी तहसीलदार हरीश गाडे यांनी उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले.

शिबिरास दुय्यम निबंधक श्री. मुरुटकर, पुरवठा निरीक्षक श्रीमती कल्याणी हटवार, कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर, मंडळ अधिकारी एस. एन. गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी एस. पी. कापसे, पुष्पलता जायभाये, डी. ए. पौळ, विमल टेकम, एन. एन. ठाकरे, तसेच केशव फलटणकर, विशाल भुक्तर, विनोद साळवे, अक्षय कांबळे, भगवान कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागासह विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यात आल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

****

नवीन कामगार संहितेबाबत हरकती व सूचना आमंत्रित

 



हिंगोली (जिमाका), दि. २२ : भारत सरकारने दि. २१ डिसेंबर २०२५ पासून नवीन चार कामगार संहिता अंमलात आणल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत औद्योगिक संबंध संहिता-२०२०, वेतन संहिता-२०१९, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता-२०२० तसेच सामाजिक सुरक्षा संहिता-२०२० या संहितांचे मसुदे अधिसूचनेद्वारे दि. २८ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

या संदर्भात औद्योगिक क्षेत्रातील कामगार संघटना, मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, दुकाने व आस्थापना, मालक संघटना तसेच संबंधित घटकांनी अधिसूचनेवरील हरकती अथवा सूचना कामगार आयुक्त, कामगार भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई– ४०००५१ या पत्त्यावर किंवा mh.labourcodes@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत म्हणजेच दि. १२ जून २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी हरकती व सूचना सादर कराव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.

*******

शासकीय कार्यालयात कर्तव्यावर असताना तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

 




हिंगोली (जिमाका), दि. २२ : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या तसेच तंबाखूयुक्त पदार्थ सोबत बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे.


या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये धडक कारवाई करण्यात येत आहे. दि. १९ मे २०२६ रोजी उपविभागीय कार्यालय (एस.डी.एम. कार्यालय) येथे ५ कर्मचाऱ्यांकडून एकूण ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच दि. २१ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद येथील विविध कार्यालयांमध्ये कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या व तंबाखूयुक्त पदार्थ बाळगून कोटपा-२००३ कायद्याच्या कलम ४ चे उल्लंघन करणाऱ्या ६ कर्मचारी व इतर व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ९५० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.


जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जारी केले असून, त्यानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाभरात ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असून, कोणत्याही शासकीय व निमशासकीय कार्यालयांना अचानक भेट देऊन तपासणी व कारवाई करण्यात येणार आहे.


कर्तव्यावर असताना कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने तंबाखूयुक्त पदार्थ, तंबाखू किंवा गुटखा सेवन करू नये तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनीही तंबाखू-गुटखा सेवन करून अथवा सोबत बाळगून कार्यालयात येऊ नये, असे आवाहन जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले आहे.


ही कारवाई आरोग्य विभागाच्या जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ) आनंद साळवे व श्रीमती अर्चना पवार उपस्थित होत्या.

कोटपा कायदा २००३ अंतर्गत प्रमुख तरतुदी :

कलम ४ : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी.

कलम ५ : तंबाखूयुक्त पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींना बंदी.

कलम ६ (अ) : १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विक्री करणे अथवा त्यांच्याकडून विक्री करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे.

कलम ६ (ब) : शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्रीस बंदी.

कलम ७, ८ व ९ : तंबाखू उत्पादनांच्या पॅकेटवर ८५ टक्के भागावर चित्रात्मक व लिखित वैधानिक इशारा असणे बंधनकारक आहे.

********

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी ३० मेपर्यंत अर्ज करा

 


हिंगोली(जिमाका), दि. २२ : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी अंमलबजावणीसाठी नवीन कार्यकारी सूचना उपलब्ध झाल्या असून, या अभियानाचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. सदर अभियानांतर्गत सोयाबीन व करडई पिकांसाठी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.

या अभियानामध्ये पिकनिहाय मूल्य साखळी समूह निवडणे, मूल्य साखळी भागीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी निवडणे, तांत्रिक सहाय्य संस्था म्हणून कृषि विज्ञान केंद्राची निवड, मूलभूत बियाणे खरेदी, प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी शेतीशाळा, माती परीक्षण, सीड हब, ब्लॉक प्रात्यक्षिके, काढणीनंतर सुविधा सहाय्य तसेच कृषि संप्रेषण पोर्टलवर लाभार्थ्यांची माहिती भरणे आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

सन 2026-27 या वर्षात मूल्य साखळी भागीदारामार्फत समूहामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी शेतीशाळा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने मूल्य साखळी भागीदार म्हणून निवड करण्यात येणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांसाठी खालील पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत.


पात्रता निकष :

कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक.

हिंगोली जिल्ह्यात समूह तयार झालेल्या क्षेत्रात किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्थेमध्ये किमान 200 शेतकरी नोंदणीकृत असावेत.

सहकारी संस्था असल्यास संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये तेलबिया पिकांशी संबंधित कामकाज नमूद असणे आवश्यक.

मागील 3 वर्षांची सरासरी वार्षिक उलाढाल 9 लाख रुपयांपेक्षा जास्त असावी.

शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचा किमान 3 लाख रुपयांचा समभाग असावा.

कमी उत्पादकता असलेल्या तालुक्यांमध्ये कार्यरत असलेल्या संस्थांना प्राधान्य देण्यात येईल.

शासनाकडून अनुदान प्राप्त केलेल्या शेतकरी उत्पादक संघांना प्राधान्य दिले जाईल.

रु.10,000 शेतकरी उत्पादक संघ योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या तसेच नाफेड, एनएससी-ओएस इत्यादी सार्वजनिक संस्थांकडे नोंदणीकृत तेलबिया संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांना पात्रता निकषांच्या अधीन राहून प्राधान्य देण्यात येईल.

हिंगोली जिल्ह्यातील पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दि. 30 मे 2026 पूर्वी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे प्रत्यक्ष सादर करावेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.

******

हायरिस्क गर्भवती माता, जन्मनोंदणी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष व इतर बैठकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

 




हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्ह्यातील हायरिस्क गर्भवती मातांवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेऊन, अशा सर्व गर्भवती महिलांसाठी जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र बंधनकारक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बालविवाह प्रतिबंध, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महिला-बाल कल्याण योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आसावरी काळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक झिंजाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांना याबाबत तत्काळ सूचना देण्याचे निर्देश दिले. एप्रिल व मे महिन्यात हायरिस्क गर्भवती मातांची झालेली प्रसूती यांची तालुकानिहाय यादी उपलब्ध करून द्यावी, तसेच जिल्ह्यात दररोज जन्मणाऱ्या बालकांची माहिती २४ तासांच्या आत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास सादर करण्याची कार्यपद्धती विकसित करावी, अशा सूचना आरोग्य विभागास त्यांनी दिल्या .

याशिवाय जिल्हा बाल कल्याण समिती समोर पीडित मुलगी व पालकांचे समुपदेशन करताना बाल कल्याण पोलीस अधिकारी (सीडब्ल्यूपीओ) व पोलीस अधिकारी उपस्थित राहणे बंधनकारक करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात बालविवाह होणाऱ्या ग्रामपंचायतींना कोणत्याही प्रकारचा निधी देण्यात येऊ नये, याबाबत चर्चा करून आवश्यक निर्णय घ्यावा. तसेच बालविवाह करणाऱ्या कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ थांबविण्याबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांनी जिल्ह्यात सन २०२५-२६ या कालावधीत ५२ बालविवाह रोखण्यात आले असून, चालू वर्षातील एप्रिल व मे महिन्यात २२ बालविवाह थांबविण्यात आल्याची माहिती दिली.

तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई बाल संगोपन योजना, चाईल्ड हेल्पलाईन १०९८ मार्फत करण्यात आलेली कार्यवाही, जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत राबविण्यात येणारी प्रायोजकत्व योजना, सामाजिक तपासणी व समुपदेशन उपक्रम, जिल्हा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी, सुधारित माहिती संकलन फॉर्म तयार करणे आदी बाबींचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

बालविवाह प्रतिबंधासाठी हॉटस्पॉट गावांना प्राधान्य देऊन जनजागृती कार्यक्रम राबविणे, किशोरी मुलींचे सर्वेक्षण करणे, प्रत्येक अंगणवाडी कार्यक्षेत्रात ‘बालमित्र’ निवडणे, मंगल कार्यालये व धार्मिक स्थळी बालविवाह होऊ नयेत यासाठी सूचना फलक लावणे, तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे आणि तालुकास्तरीय चॅम्पियन्स यांचे रिफ्रेशर प्रशिक्षण आयोजित करणे याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

*******

21 May, 2026

वैयक्तिक वनहक्क दावे व अपील प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 



हिंगोली (जिमाका), दि. 21 : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006, नियम 2008 तसेच सुधारित नियम 2012 अंतर्गत प्राप्त वैयक्तिक वनहक्क दावे व अपील प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय वनहक्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, उपविभागीय वन अधिकारी यांचे प्रतिनिधी सचिन माने तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे प्राप्त झालेले मूळ दावे व अपील अर्ज निकाली काढण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक ती पुनर्तपासणी करून अतिक्रमण नोंदवहीच्या सत्यप्रतीसह अभिप्राय अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विभागीय वन अधिकारी, हिंगोली यांना दिले.

तसेच वनहक्क दाव्यांबाबत आवश्यक पुरावे व कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित प्रकरणे समितीसमोर तात्काळ सादर करावीत, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांचे दावे व अपील प्रकरणे वेळेत निकाली काढता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वनहक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र वनवासी व पारंपारिक वन निवासी नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

*******

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी 30 मेपर्यंत अंतिम मुदत

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असूनही निवास, भोजन व इतर सुविधांच्या अभावामुळे पुढील शिक्षण घेण्यास अडचणी येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 30 मे 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.

शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामार्फत अर्जांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून सध्या 140 अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी विद्यार्थी लॉगीनकडे प्रलंबित आहेत.

सदर अर्जांमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना 30 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता न केल्यास त्यांना पुढील शैक्षणिक सत्रात अर्ज करता येणार नाही तसेच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.

त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्जातील त्रुटी तातडीने पूर्ण करून अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात जमा करावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.

******

पाणी टंचाई निवारणासाठी वसमत तालुक्यातील नवीन विंधन विहिरी व हातपंपांना प्रशासकीय मान्यता

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यातील पाणी टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने विविध गावांमध्ये नवीन विंधन विहिरी व हातपंप उभारणीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वसमत तालुक्यातील प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित कामांना अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे.

वसमत तालुक्यातील पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट तसेच प्रपत्र ‘ब’ प्राप्त झालेल्या 4 गावांमध्ये 5 नवीन विंधन विहिरींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये वसमत तालुक्यातील जवळा बु., लहाण, हिवरा खु. व आरळ या गावांचा समावेश आहे. प्रति विंधन विहिरीस 78 हजार 51 रुपये याप्रमाणे एकूण 3 लाख 90 हजार 255 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

 

******  

क्रीडा संकुलांच्या कामांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकुलांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, तालुका क्रीडा अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत हिंगोली तालुका क्रीडा संकुलातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

कळमनुरी तालुका क्रीडा संकुलामध्ये प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, संरक्षक भिंतीचे काम तसेच क्रीडांगण समपातळीत करण्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला. संबंधित कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

औंढा नागनाथ तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच वसमत तालुका क्रीडा संकुलामध्ये फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल मैदानांसह जॉगिंग ट्रॅक आदी सुविधा नव्याने निर्माण करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सेनगाव तालुका क्रीडा संकुलासाठी अद्याप जागा उपलब्ध नसल्याने संबंधित विभागांनी तातडीने जागा उपलब्ध करून पुढील कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

यावेळी जिल्हा क्रीडा संकुलासाठी नव्याने जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी 400 मीटर धावपट्टी, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल मैदान, स्केटिंग रिंग तसेच इतर अत्याधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व कामे गतीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

*******

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा रद्द

 


हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्या वतीने जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्या, शुक्रवार, दि. 22 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तथा प्लेसमेंट ड्राईव्ह रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी दिली आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, दि. 22 मे रोजी होणारा मेळावा पूर्णतः रद्द करण्यात येत आहे.

या संदर्भात इच्छूक व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच पुढील आयोजनाबाबतची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचेही सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी आवाहनाद्वारे स्पष्ट केले आहे.

*******

प्रकल्पबाधितांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा पुनर्वसन समिती स्थापन

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम  1976, 1986 व 1999 नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसनविषयक प्रश्न हाताळण्यासाठी तसेच पर्यायी जमीन व पुनर्वसित गावठाणामधील रहिवासी भूखंड संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुनर्वसन समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये सदस्य म्हणून लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, हिंगोली, वसमत-कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी तसेच आखाडा बाळापूर येथील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 4 चे कार्यकारी अभियंता यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय संबंधित प्रकल्पग्रस्तांपैकी दोन प्रतिनिधींची मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या मार्फत नामनिर्देशन करण्यात येणार आहे. तर समितीचे सदस्य सचिव म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कार्य पाहणार आहेत.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार समितीची बैठक दरमहा घेण्यात येणार असून, संबंधित प्रकरणांची नोंदवही व अभिलेख तयार करून तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या समितीमुळे प्रकल्पबाधित व्यक्तींच्या पुनर्वसनासंदर्भातील प्रश्न सोडविण्यास गती मिळणार असून, त्यांच्या तक्रारींचे प्रभावी व वेळेत निराकरण होण्यास मदत होणार आहे.

 

*******

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ

 



             हिंगोली (जिमाका), दि. 21 : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात आली.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*******

20 May, 2026

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

 


हिंगोली (जिमाका), दि. 20 : राज्यातील गाई-म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी व प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023” लागू केला असून, या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी अधिनस्त अधिकारी वर्गाला दिले आहेत.

राज्यात या कायद्याची अंमलबजावणी दि. 5 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. कृत्रिम रेतन प्रक्रियेद्वारे उत्तम दर्जाच्या व उच्च वंशावळीच्या वळूंचा वापर करून दुधाळ जनावरांची पैदास वाढविणे तसेच प्रजनन प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.

या अधिनियमांतर्गत राज्यातील सर्व रेत केंद्रे, भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था व सेवा पुरवठादारांना महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित संस्थांना केवळ प्रमाणित व उच्च वंशावळीच्या वळूंचेच रेत प्रजननासाठी वापरण्याची परवानगी राहणार आहे.

या सर्व प्रक्रियांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले असून, प्राधिकरणाला संबंधित केंद्रांची तपासणी, झडती तसेच नियमबाह्य साहित्य जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. क्षेत्रीय स्तरावर अनेक खाजगी कृत्रिम रेतन सेवा पुरवठादार व संस्था यांनी अद्याप प्राधिकरणाकडे नोंदणी केलेली नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांवर अधिनियमांतर्गत नियमोचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर प्राधिकरणाकडे नोंदणी करावी, असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन यांनी केले आहे.


दंड व शिक्षेच्या तरतुदी :

कलम 4 व 5 अन्वये नोंदणी प्रमाणपत्रधारक व्यक्तीने विहित मानकांचे पालन न केल्यास दोष सिद्ध झाल्यावर रु. 50 हजारांपर्यंत दंड आकारण्यात येईल. नोंदणी प्रमाणपत्राविना गोजातीय प्रजनन क्रिया करणे अथवा प्रमाणित वळूव्यतिरिक्त इतर वळूंपासून गोठवलेले रेत उत्पादन करणे किंवा अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास दोष सिद्ध झाल्यावर रु. 1 लाखांपर्यंत दंड आकारण्यात येईल. नोंदणी प्रमाणपत्रानुसार मंजूर सेवांबाबत चुकीची किंवा दिशाभूल करणारी जाहिरात अथवा प्रसिद्धी केल्यास दोष सिद्ध झाल्यावर सहा महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा रु. २ लाखांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.


शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना :

फक्त प्रमाणित व अधिकृत विर्यामात्रांचाच वापर करावा. सेवा घेण्यापूर्वी तंत्रज्ञाचा नोंदणी क्रमांक तपासून नोंदणीकृत तंत्रज्ञांकडूनच सेवा घ्यावी. कोणतीही अनियमितता आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवून पशुधनाचे संरक्षण करावे.


शेतकऱ्यांना होणारे फायदे :

सुधारित व उच्च उत्पादनक्षम वंशामुळे अधिक दूध उत्पादन मिळणार आहे. उत्तम प्रजनन कार्यक्षमतेमुळे जनावरांची संख्या व गुणवत्ता वाढणार आहे. वैज्ञानिक व नियंत्रित प्रजननामुळे दीर्घकालीन पशुधन विकास साध्य होणार आहे. दुग्ध व्यवसायात स्थैर्य निर्माण होऊन आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.

*******

19 May, 2026

हप्ता रखडलेल्या 'लाडक्या बहिणीं’ना टप्प्याटप्प्याने मिळणार लाभ

 


हिंगोली (जिमाका), दि. १९ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च व एप्रिल २०२६ या महिन्यांचे हप्ते इ-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. मात्र, शासन स्तरावर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू असून पात्र महिलांच्या खात्यात येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, हिंगोली यांनी दिली आहे.

दरम्यान, मागील सहा महिन्यांपासून लाभ प्राप्त न झालेल्या लाडक्या बहिणींनी सोशल मीडियावरील अथवा इतर अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणत्याही प्रकारची अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

*******

18 May, 2026

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी


• आदर्श आचारसंहिता लागू 




हिंगोली (जिमाका), दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवार, २५ मे २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, १ जून २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवार, २ जून २०२६ रोजी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरुवार, ४ जून २०२६ अशी आहे.

निवडणुकीसाठी गुरुवार, १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सोमवार, २२ जून २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरुवार, २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

*******

सेवा क्षेत्रातील रोजगार संधींसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन



हिंगोली (जिमाका), दि. १८ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्या वतीने जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि. २२ मे २०२६ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तथा प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात सेवा क्षेत्रातील नामांकित कंपनी व आस्थापना सहभागी होणार असून त्यामध्ये कैरोस सेक्युरिटी हेल्थ अॅन्ड कॅम्पोसाईट सर्व्हिस प्रा. लि., सिकिंद्राबाद तसेच पलटन सेक्युरिटी फोर्स, हिंगोली या आस्थापनांचा समावेश आहे. संबंधित आस्थापनांकडून एकूण १०० रिक्त पदांची मागणी प्राप्त झाली असून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.

१० वी, १२ वी, पदवीधर तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून संबंधित रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा.

त्यानंतर उमेदवारांनी दि. २२ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व बायोडाटासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-३, दुसरा मजला, हिंगोली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४५६-२२४५७४ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.

****

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी संप

 


* संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आगाऊ औषधे  खरेदी करावीत


हिंगोली (जिमाका), दि. १८ : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारला असल्याबाबतचे निवेदन अन्न व औषध प्रशासन विभागास प्राप्त झाले आहे.

या संपामध्ये संघटनेच्या सदस्यांनी सहभागी न होण्याबाबत दि. १८ मे २०२६ रोजीच्या पत्रान्वये विनंती करण्यात आली असली, तरी ज्या रुग्णांना नियमित औषधांची आवश्यकता आहे अशा रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

तसेच बंद कालावधीत गरजू रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास किंवा अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. ना. सी. भालेराव यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९४०५७८३६३६ वर संपर्क साधावा, असेही विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

****

17 May, 2026

अनाधिकृत खत विक्रीविरोधात कृषी विभागाची मोठी कारवाई

 


* मसोड येथे संशयास्पद जिप्सम पावडरच्या 500 गोण्या जप्त; 20.27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 




हिंगोली (जिमाका), दि. 17 : कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे अनाधिकृत खत विक्रीविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई करत संशयास्पद जिप्सम पावडरच्या 500 गोण्या व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 20 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात खत नियंत्रण आदेश 1985 व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 16 मे 2026 रोजी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार मसोड येथे उभ्या असलेल्या एका ट्रकची कृषी विभागाच्या पथकाने कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये ‘आर्य केमिकल्स अँड मिनरल इंडस्ट्रीज, नागोर (राजस्थान)’ यांचे बिल असलेली संशयास्पद जिप्सम पावडर आढळून आली. सदर ट्रकमधून 40 किलो वजनाच्या एकूण 500 गोण्या जप्त करण्यात आल्या.

जप्त करण्यात आलेल्या संशयास्पद खताचे नमुने घेऊन ते शासकीय खत तपासणी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून प्राप्त निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

या कारवाईत जिपचे कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, तालुका कृषी अधिकारी के. एम. जाधव, गुणवत्ता नियंत्रणचे कृषी अधिकारी लक्ष्मण काळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंकज राठोड, गुण नियंत्रणचे कृषी अधिकारी समीर वाळके व वसमत पंचायत समितीचे कृषी अधिकारी रामेश्वर गवळी यांनी सहभाग घेतला.

पथकाने 500 बॅगा संशयास्पद जिप्सम पावडर तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टाटा मोटर्स कंपनीचा RJ 07 GD 7095 क्रमांकाचा ट्रक जप्त केला आहे.

या प्रकरणात श्री. राम रतन (रा. सियागाव का मोहल्ला, स्वरूपदेसार, जि. बिकानेर, राजस्थान) व इतर एक जण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कळमनुरी गुण नियंत्रणचे कृषी अधिकारी समीर वाळके यांच्या तक्रारीवरून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, विभागीय कृषी अधिकारी अशोक तिडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

********

15 May, 2026

जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 

हिंगोली(जिमाका), दि. 15 : जलजीवन मिशन अंतर्गत विविध नळ पाणी पुरवठा योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून संबंधित गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर प्रगती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 

या बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, जलजीवन मिशनचे अभियंते तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत विविध नळ पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, तांत्रिक अडचणी तसेच योजनांच्या कार्यान्वयनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यात असलेल्या योजनांना गती देऊन नागरिकांना लवकरात लवकर शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

तसेच, नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत जोडण्यांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या योजनांसाठी महावितरणकडून विद्युत जोडणी प्रलंबित आहे, त्या प्रकरणांमध्ये तातडीने आवश्यक कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल दि. 20 मे 2026 पर्यंत सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जलजीवन मिशन अंतर्गत त्रयस्थ तांत्रिक तपासणी करण्यात आलेल्या योजनांचाही आढावा घेतला. तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या सर्व त्रुटी व मुद्द्यांची पूर्तता आठ दिवसांच्या आत करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

******

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार

 


 

 

 

हिंगोली(जिमाका), दि. 15 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महाटीईटी) 2026 परीक्षेचे रविवार दि. 21 जून रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र 21 जून रोजी नीट (NEET) या परीक्षेचे आयोजन एनटीएमार्फत संपूर्ण देशभरात विविध केंद्रावर करण्यात आलेले असून दोन्ही परीक्षांची बहुतांशी केंद्र एकच येत असल्याने परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व परीक्षार्थी हित लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2026 परीक्षेचे आयोजन 21 जून ऐवजी रविवार दि.  28 जून रोजी करण्यात आले आहे.

प्रवेशपत्राची ऑनलाइन प्रिंट 16 ते 28 जून या सुधारित कालावधीत काढता येणार आहे.  तर शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर क्रमांक एक दि. 28 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत होईल. तर शिक्षक पात्रता परीक्षेचा दुसरा पेपर त्याच दिवशी अर्थात 28 जून रोजी दुपारी 2.30 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. अद्ययावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

******

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : तहसील कार्यालय औंढा नागनाथ येथे महसूल विभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर टप्पा-1 अंतर्गत आज शुक्रवारी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरास  नगराध्यक्ष कपील खंदारे, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त रमेश काटकर उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शिबिरात तहसीलदार हरीश गाडे व नायब तहसीलदार अनिता कोलगणे उपस्थित होते.

या समाधान शिबिरामध्ये औंढा नागनाथ मंडळातील नागरिकांना मंडळ व तहसील स्तरावर विविध शासकीय सेवा प्रत्यक्ष उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये शिधापत्रिका वाटप, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र वितरण, सातबारा नोंदी, सातबारा वरील शिवरस्ते नोंदी आदी महसुली कामांचा समावेश होता. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती विभाग आणि इतर विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ नागरिकांना देण्यात आले.

यावेळी उपायुक्त रमेश काटकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरीश गाडे आणि नायब तहसीलदार अनिता कोलगणे यांनी उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक कल्याणी हटवार, कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर, मंडळ अधिकारी आशा गिते, तलाठी गजानन गुंजकर, विशाखा डोंगरे, जी. एस. मुकीर, भुसावळे, गजानन हजारे, रुपा कळसकर, केशव जगताप, इमरान पठाण, अक्षय कांबळे, वहीद पठाण, नितेश कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

******

खरीप हंगामासाठी बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्तापूर्ण उपलब्धतेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन




* शेतकऱ्यांनी तक्रारी व अडचणी नोंदविण्याचे कृषि विभागाचे आवाहन



हिंगोली (जिमाका), दि. 15 :  राज्यात शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाला अनन्यसाधारण महत्व असून राज्यातील शेतकरी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा वेळेत, गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

कृषि आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेत्यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या विविध अडचणींचे निवारण करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आयुक्तालय स्तरावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून शेतकरी, वितरक व विक्रेत्यांसाठी संपर्कासाठी व्हाट्सअप क्रमांक ९८२२४४६६५५ उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर देखील संपर्क साधता येणार आहे.

यासोबतच बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता, किंमत, साठेबाजी, लिकींग किंवा इतर संबंधित अडचणी व तक्रारी controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवरही नोंदवता येतील.

तक्रार नोंदविताना संबंधितांनी आपले नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक तसेच अडचण किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील नमूद करावा. सदर माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हाट्सअप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे अधिक सोयीस्कर होणार असल्याचे कृषि विभागाने स्पष्ट केले आहे.

ज्या शेतकऱ्यांना व्हाट्सअपचा वापर करणे शक्य नाही, त्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तोंडी तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एक भ्रमणध्वनी क्रमांक, एक टोल फ्री क्रमांक व एक ई-मेल तक्रार निवारणासाठी समर्पित करण्यात आले असून सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी व अडचणी नोंदवाव्यात, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

******

उष्मालाटीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



हिंगोली (जिमाका), दि. 15 : राज्यात वाढत्या तापमानामुळे निर्माण होत असलेल्या उष्मालाट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

वातावरणीय बदलामुळे उन्हाळी हंगामात तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून राज्यातील काही भागांमध्ये उष्मालाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा मानव, पशुपक्षी तसेच इतर घटकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दक्षता घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, महसूल, कृषी, पशुसंवर्धन तसेच इतर संबंधित विभागांना उष्मालाट प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः शासकीय कार्यालये व कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची सुविधा, विश्रांतीसाठी जागा तसेच मजुरांसाठी आवश्यक त्या मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

तसेच बांधकाम कामगार, शेतमजूर, रस्त्यावर काम करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व आजारी व्यक्ती यांनी दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे व हलक्या रंगाचे सूती कपडे वापरावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने उष्माघाताच्या लक्षणांबाबत जनजागृती करण्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पशुपालकांनीही जनावरांना सावली, स्वच्छ पाणी व योग्य काळजी उपलब्ध करून द्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व विभागांनी उष्मालाटीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

****

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र वाटपास प्रारंभ

 


हिंगोली (जिमाका), दि. १५ : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चे आयोजन दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्र. १ (इयत्ता १ ली ते ५ वी स्तर) व पेपर क्र. २ (इयत्ता ६ वी ते ८ वी स्तर) यांचा अंतिम निकाल दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आला होता.

या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्रे संबंधित जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद तसेच शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम/दक्षिण/उत्तर) यांच्या कार्यालयाकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ मधील पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्रांचे वाटप दिनांक १८ मे २०२६ ते ०८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in⁠ या संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचून आवश्यक मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद अथवा शिक्षण निरीक्षक, मुंबई (प/द/उ) यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केले आहे.

*******

हिंगोली जिल्ह्यासाठी 1766 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर

 


हिंगोली (जिमाका), दि. 15 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिमाह प्रति कुटुंब 1 किलोच्या सुलभ पॅकींगमध्ये साखर वितरणासाठी शासनामार्फत माहे जून ते नोव्हेंबर 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नियमित साखर नियतन मंजूर करण्यात आले आहे.

या कालावधीसाठी हिंगोली जिल्ह्यास एकूण 1765.98 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त झाले असून संबंधित स्वस्त धान्य दुकानांमार्फत पात्र शिधापत्रिकाधारकांना साखरेचे वितरण करण्यात येणार आहे. नियतनाची उचल करून लाभार्थ्यांपर्यंत वेळेत साखर पोहोचविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय साखर नियतन पुढीलप्रमाणे आहे : हिंगोली तालुका- 460.22 क्विंटल, कळमनुरी- 365.28 क्विंटल, वसमत- 347.34 क्विंटल, सेनगाव- 374.28 क्विंटल आणि औंढा नागनाथ- 218.46 क्विंटल अशा प्रकारे जिल्ह्यासाठी एकूण 1765.98 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे.

सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी आपल्या संबंधित स्वस्त धान्य दुकानातून नियमानुसार साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. 

*******

14 May, 2026

आज (१५ मे ) शेवटची संधी; नागरिकांनी तातडीने स्व-गणना करावी - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


*https://se.census.gov.in या पोर्टलवर अचूक माहिती भरावी*


हिंगोली, दि. १४ (जिमाका) : आज  (शुक्रवार, दि. १५ मे रोजी) स्व-गणना करण्याची अंतिम तारीख आहे,  अद्याप  ज्यांनी स्वगणना केली नाही, त्यांनी जनगणना विभागाच्या  https://se.census.gov.in या पोर्टलवर आपली माहिती अचूक भरावी. 


जनगणना ही देश व नागरिकांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जनगणनेत सहभागी व्हावे व स्व-गणना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

देशाच्या 2027 च्या जनगणनेची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही देशातील पहिलीच डिजिटल जनगणना आहे.  स्व-गणनेची प्रक्रिया झाल्यानंतर जिल्ह्यात दि. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणकांद्वारे प्रत्यक्ष घरगणना केली जाणार आहे.  त्यापूर्वी नागरिकांना स्वतःची माहिती भरण्यासाठी दि. 15 मे 2026 पर्यंत स्व-गणनेची विशेष सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.


नागरिकांनी https://se.census.gov.in या पोर्टलवर आपली माहिती भरून स्व-गणना करावी. दि. 15 मेपर्यंत नागरिकांनी माहिती भरता येईल. यानंतर मात्र हे पोर्टल बंद होणार आहे. 


*पोर्टलवर अशी भरा माहिती* - आपला मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून  जनगणनेच्या https://se.census.gov.in या पोर्टलच्या होम पेजवर ‘स्व-गणना’ (Self Enumeration) पर्यायावर क्लिक करा. तुमचा चालू मोबाईल क्रमांक द्या. त्यावर एक ओटीपी येईल, तो तिथे टाकून पडताळणी पूर्ण करा.  लॉगिन झाल्यानंतर सर्वप्रथम कुटुंबप्रमुखाचे नाव, वय, लिंग आणि इतर वैयक्तिक तपशील भरा.  नकाशावर आपल्या घराचे अचूक ठिकाण/स्थान दाखवा (चिन्हांकित करा). कुटुंबात एकूण किती सदस्य राहतात (पुरुष, महिला आणि इतर) त्यांची संख्या नमूद करा.  घराचा प्रकार (कच्चे/पक्के), पिण्याच्या पाण्याची सोय, वीज, शौचालय, वापरली जाणारी इंधने आदीसह वाहने, संगणक आदी सुविधांची माहिती द्या.  सर्व माहिती भरून झाल्यानंतर ती पुन्हा एकदा नीट तपासा. काही चूक असल्यास एडीट पर्यायावर जाऊन ती   दुरुस्त करा.  माहिती पूर्णपणे बरोबर असल्याची खात्री करून घ्या. खात्री पटल्यानंतर सबमीट बटण दाबा. अर्ज सबमिट झाल्यावर आयडी क्रमांक मिळेल, तो जतन करून ठेवा, त्याची प्रिंट काढा. तो घरगणनेवेळी  प्रगणकाला द्या.


*माहिती भरल्यानंतर मिळणारा आयडी जपून ठेवावा* -- पोर्टलवर माहिती यशस्वीरित्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक (आयडी) मिळणार आहे. हा आयडी नागरिकांनी मोबाईल किंवा वहीमध्ये  नोंदवून ठेवावा.

 

*घर भेटीदरम्यान प्रगणकांना द्यावा लागणार आयडी क्रमांक* - पोर्टलवर माहिती भरल्यानंतर दि. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देणार आहेत. यावेळी स्वयं गणना झाली असेल, तर संबंधित प्रगणकाला तो आयडी क्रमांक द्यावा लागणार आहे. हा आयडी प्रगणक आपल्याकडील पोर्टलवर अपलोड करेल. त्यामुळे संबंधित नागरिकांच्या कुटुंबाची सर्व माहिती अधिकृरित्या जनगणनेत नोंद होईल. यामुळे प्रश्न विचारणे आणि त्यानुसार माहिती भरणे यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.

  

*-*-*-*-*

मातंग समाज बांधवांसाठी विविध शासकीय योजनांविषयी जनजागृती कार्यशाळेचे 21 मे रोजी आयोजन

 



हिंगोली(जिमाका), दि. 14 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) हिंगोली, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली तसेच जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने मातंग समाज बांधवांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, रिसाला बाजार, हिंगोली येथे गुरुवार, दि. 21 मे 2026 रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस मातंग समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी जनजागृती व्हावी, योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा तसेच समाजातील युवक-युवतींना स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकल्पनेतून तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई यांच्या आदेशान्वये राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यशाळेत मातंग समाजातील 12 पोटजातीतील समाज बांधवांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजना, समाज कल्याण विभागाच्या योजना तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

या कार्यशाळेदरम्यान संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून विविध योजनांचे मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः स्वयंरोजगार, कर्ज योजना, आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण योजना तसेच युवक-युवतींसाठी उपलब्ध विविध लाभांविषयी माहिती देण्यात येणार आहे.

मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, हिंगोली येथील जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

******

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


 

 

 हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, सचिन जोशी, सी.आर.गोळेगावकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 

********  

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला गती द्या- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश



हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, साठवण तलाव, उच्च पातळी बंधारे, लिगो प्रकल्प तसेच अन्य विकास कामांच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीमती मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, सर्व उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रशांत बिलोलीकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या भूसंपादन प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये जलसंपदा प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, उच्च पातळी बंधारे, साठवण तलाव आदी प्रकल्पांतील प्रलंबित मावेजा वाटप, भूसंपादन मोजणी, लिगो प्रकल्पासंदर्भातील भूसंपादन प्रक्रिया तसेच इतर अनुषंगिक बाबींची चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वाटाघाटीद्वारे समितीसमोर ठेवावयाची प्रकरणे, दर निश्चिती, निवाडा पारित झालेल्या प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके, ताबा घेतलेल्या जमिनींच्या मावेजा वाटपाची स्थिती तसेच प्राधिकरणाकडे पाठवावयाच्या प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेतला.

भूसंपादन प्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरळीत व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया गतीमान करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.


*******

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते कामांना गती द्या - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


* प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


हिंगोली (जिमाका), दि. 14 : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात येणाऱ्या कामांना गती देऊन प्राधान्यक्रमानुसार प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (रोहयो), सर्व उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रशांत बिलोलीकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यापूर्वी प्रस्तावित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. आतापर्यंत पूर्ण झालेली कामे, अपूर्ण रस्ते, प्रगतीपथावरील कामे तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची माहिती त्यांनी तपासली.

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देताना सांगितले की, अद्याप सादर न करण्यात आलेल्या रस्ते कामांचे प्रस्ताव प्राधान्यक्रम ठरवून तातडीने सादर करावेत. प्रस्तावित करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामाची प्रत्यक्ष पडताळणी करूनच प्रस्ताव पाठविण्यात यावेत. तसेच कामांची द्विरुक्ती होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.

रस्त्यांची कामे करताना काम सुरू होण्यापूर्वीचे आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे जीओ-टॅगिंग फोटो तसेच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केलेले व्हिडिओ सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. योजनेंतर्गत दर्जेदार व पारदर्शक कामे करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा


यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठकही आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सन 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी तयार करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय पंचवार्षिक बृहत आराखड्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यादव गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

******

संभाव्य एल-निनोच्या पार्श्वभूमीवर टंचाई निवारण उपाययोजना तातडीने राबवा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



हिंगोली(जिमाका), दि. 14 : संभाव्य एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण व पाणीटंचाई निवारण उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित आढावा बैठकीत दिले. 

संभाव्य एल-निनो प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. 

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सर्व उपविभागीय अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगरपालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त, जिल्हा जलसंधारण अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जलयुक्त शिवार, सीसीटी, डीपसीसीटी, गॅबीयन बंधारे, नाला खोलीकरण, रिचार्ज शॉफ्ट, ढाळीचे बांध आदी जलसंधारणाची प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात सध्या टंचाईग्रस्त गावांमध्ये तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून 20 बोअरवेल व 26 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. जलजीवन मिशनअंतर्गत प्रलंबित विद्युत जोडणीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलयुक्त शिवाराची कामे, वृक्षलागवड, भूजल पातळी तपासणी तसेच बियाणे व खताचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. पुढील 15 दिवसांत टंचाई भासू शकणाऱ्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

याशिवाय, इसापूर, सिद्धेश्वर, येलदरीसह विविध धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्यात पिण्याच्या पाण्यास प्राधान्य द्यावे, प्रत्येक शासकीय कार्यालय परिसरात पावसाचे पाणी साठवण व्यवस्था करावी तसेच सर्व कामांचे जीओ-टॅग फोटो अपलोड करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

खत विक्रेत्यांनी खत लिंकिंग होत नसल्याबाबतचे फलक व हेल्पलाईन क्रमांक दर्शनी भागात लावावेत तसेच खतसाठा व दैनंदिन वापराचा नियमित आढावा घ्यावा. पशुधनासाठी संभाव्य चाराटंचाई टाळण्यासाठी आवश्यक चारा नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी बैठकीत दिल्या. 

****

13 May, 2026

राष्ट्रीय डेंग्यु दिनानिमित्त जनजागृती मोहिमेचे आयोजन

 

*डेंग्यु नियंत्रणासाठी लोकसहभाग आवश्यक – जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांचे आवाहन*


हिंगोली(जिमाका), दि. १३ : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १६ मे २०२६ रोजी राष्ट्रीय डेंग्यु दिन राज्यभर साजरा करण्यात येणार असून, हिंगोली जिल्ह्यातही विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. डेंग्यु प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.


राज्यात तापाच्या साथीमध्ये विशेषतः डेंग्यु रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हवामानातील बदल तसेच अनेक भागांतील पाणीटंचाईमुळे नागरिकांकडून पाणी साठवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अशा साठवलेल्या स्वच्छ पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पत्ती होत असल्याने डेंग्युचा धोका वाढत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

यावर्षी राष्ट्रीय डेंग्यु दिनाचे घोषवाक्य “डेंग्यु नियंत्रणासाठी लोकसहभाग : साठवलेल्या पाणीसाठ्यांची तपासणी करा, स्वच्छता राखा आणि ती भांडी झाकून ठेवा” असे आहे.


हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यु दिन यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये आरोग्य संस्थांचे अधिकारी व कर्मचारी, आशा सेविका, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांचा सहभाग राहणार आहे.


राष्ट्रीय डेंग्यु दिनानिमित्त पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सभा, जलद तापरुग्ण सर्वेक्षण, तालुकास्तरीय बैठका, जनजागृती रॅली, ग्रामसभा, बाजारपेठांमध्ये प्रदर्शन, हस्तपत्रिका वाटप, आशा सेविकांसाठी कार्यशाळा, कंटेनर सर्वेक्षण, स्वच्छता मोहीम, दिंडी, डासोत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे, फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण तसेच “एक दिवस कोरडा दिवस” पाळण्याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.


*डेंग्यु व चिकुनगुनियाची लक्षणे*


एडीस एजिप्टाय डासाच्या संक्रमित चाव्यानंतर साधारणपणे पाच ते सहा दिवसांनी डेंग्युची लागण होते. डेंग्यु ताप आणि डेंग्यु रक्तस्त्रावात्मक ताप हे गंभीर स्वरूपाचे असून काहीवेळा जीवघेणे ठरू शकतात. लहान मुलांमध्ये ताप सौम्य स्वरूपाचा असतो; मात्र प्रौढांमध्ये तीव्र ताप, डोकेदुखी, डोळेदुखी, अंगदुखी तसेच अंगावर लाल चट्टे येणे अशी लक्षणे दिसून येतात.


*मोफत उपचाराची सुविधा*


डेंग्यु व चिकुनगुनिया आजारांवर सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.


*प्रतिबंधात्मक उपाययोजना*


डेंग्यु ताप हा विषाणूमुळे होणारा आजार असून त्याचा प्रसार एडीस एजिप्टाय डासांद्वारे होतो. हा डास स्वच्छ साठवलेल्या पाण्यात वाढतो. कोणतेही पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवल्यास त्यामध्ये डासांची अंडी व अळ्या तयार होतात. त्यामुळे पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करणे, झाकून ठेवणे आणि आठवड्यातून एक दिवस “कोरडा दिवस” पाळणे आवश्यक आहे.


डासोत्पत्ती नियंत्रणासाठी गप्पी मास्यांचा वापर, परिसर स्वच्छता, मच्छरदाणीचा वापर, पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरणे तसेच डास चावू नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


किटकजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे.

*******

ज्येष्ठांसाठी मदतीचा विश्वासार्ह आधार : एल्डर लाईन १४५६७

 




            हिंगोली (जिमाका), दि. 13 : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य शासन यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ही सेवा जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

   महाराष्ट्रात ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या या हेल्पलाईनवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक कॉल्स प्राप्त झाले असून, ३० हजारांपेक्षा अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे. या हेल्पलाईनद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह, वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर याबाबत माहिती दिली जाते. तसेच मालमत्ता व कौटुंबिक वाद, कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण व कल्याण अधिनियम २००७ संदर्भात मार्गदर्शन केले जाते.

याशिवाय मानसिक ताण, चिंता, नैराश्य, एकटेपणा यांसारख्या समस्यांवर समुपदेशन करून भावनिक आधार दिला जातो. बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांना मदत व पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद साधणे, तसेच पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाते.

एल्डर लाईन १४५६७ ही केवळ हेल्पलाईन नसून ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्वासाचा हात आणि सुरक्षित आधार ठरत आहे. या सेवेद्वारे वृद्धांच्या गरजा समजून घेत त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. समाजातील प्रत्येकाने या सेवेबाबत जागरूकता निर्माण करून गरजू ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तिचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या हेल्पलाईनवर अनेक व्यथा, वेदना आणि तक्रारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक एल्डर लाईन १४५६७ हेल्पलाईनवर मोकळेपणाने मांडत असून, या माध्यमातून त्यांना आवश्यक मदत व आधार मिळत आहे.

******

‘लिगो इंडिया’ प्रकल्पाच्या पायाभूत विकासकामांवर भर

 




हिंगोली (जिमाका), दि. 13 : मौजे दुधाळा येथे प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘लिगो इंडिया’ प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध विकासकामांबाबत आज दूरदृष्यप्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीमध्ये विविध पायाभूत विकासकामांवर भर देण्यात आला असून, प्रकल्प पूर्ण करताना जिल्ह्याच्या विकासासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे या उच्चस्तरीय बैठकीत सांगण्यात आले. 


या बैठकीला अणुऊर्जा संशोधन आणि विकास विभागाचे संचालक नितीन जावळे, अणुऊर्जा वित्त विभागाचे सहसचिव मुथु कृष्णन शंकर नारायणन, लिगो इंडिया प्रकल्प प्रमुख सेंधील राजा एस तसेच लिगो इंडिया प्रकल्प समन्वयक समीर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.


तर जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा खनिकर्म अधिकारी अश्विन माने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, सहाय्यक संचालक नगर रचना विभाग, पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन तसेच जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते.


जिल्हा प्रशासनाकडून या प्रकल्पपूर्तीसाठी आवश्यक बाबी वेळेत पूर्ण करण्यात येतील. तसेच येथील प्रकल्पासाठी आवश्यक असणारे भूसंपादनही पूर्ण झाले असून, भविष्यात प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सेवा-सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे स्वत: प्रकल्पाला भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले. 


बैठकीदरम्यान लिगो इंडिया प्रकल्पाच्या सीमारेषेपासून 5 किलोमीटर, 15 किलोमीटर, 30 किलोमीटर आणि 60 किलोमीटर अंतराच्या परिघात लागू करण्यात आलेल्या विविध निर्बंधांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये स्टोन क्रेशर उद्योग, खाणकाम व ब्लास्टिंग आधारित उद्योग, 20 अश्वशक्तीपेक्षा अधिक ऊर्जा लागणारे रेसिप्रोकेटिंग उद्योग, नवीन वीज प्रकल्प, पवनचक्की उभारणीवरील निर्बंध लादण्याबाबत चर्चा करण्यात आली. 


हिंगोली जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाच्या दृष्टीने हे निर्बंध लिगो प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत शिथिल करण्यात यावेत, तसेच काही निर्बंधांमध्ये अंशतः सूट देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत केली. 


जिल्ह्यातील विकासकामांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये अणुऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिगो इंडिया एम्पावर्ड बोर्डामध्ये या सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल आणि सकारात्मक निर्णयासह आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाला बैठकीत दिले.


 या बैठकीमुळे हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच लिगो इंडिया प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुढील काळात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

******

महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

 


            हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.

माहे मे, 2026 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, (दि. 18 मे) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.  

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. 

******

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण




मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे यांसारख्या दिग्गज डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने या प्रवेशिकांचे परिक्षण केले. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली. या समितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकाद्वारे कुंभमेळा आयोजन आणि लोगो स्पर्धेबाबत माहिती दिली.

यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू, संत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी उपस्थित साधू संतांचे स्वागत केले.


*नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाविषयी*


नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, 'मायगव्ह' आणि 'असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी डिझाइन स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली. २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत मायगव्ह प्लॅटफॉर्मवर पार पडलेल्या या स्पर्धेत ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.

 सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले, त्याखालोखाल दिल्ली आणि तामिळनाडूचा क्रमांक लागला. 18 ते 24 वयोगटातील तरुणांनी या स्पर्धेत सर्वाधिक सक्रिय सहभाग नोंदवला.


➡️हे बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूगोल आणि धार्मिक परंपरांवर आधारित आहे.


➡️भगवान शंकराचे त्रिशूळ: आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक.


➡️त्र्यंबकेश्वर मंदिर: प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवणारी मंदिराची प्रतिकृती.


➡️काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदी: गोदावरी नदीला 'शिवलिंगा'च्या रूपात दर्शविण्यात आले असून, ते कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते.

00000

12 May, 2026

हिंगोली जिल्ह्यासाठी १४ व १५ मे रोजी यलो अलर्ट जारी

 

* नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी खबरदारी घ्यावी



हिंगोली(जिमाका), दि. १२ : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी मंगळवार (दि.१२) रोजी दिलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी दिनांक १४ व १५ मे २०२६ या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्माघाताची शक्यता अधिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच स्थूल व्यक्तींनी उष्णतेपासून बचावासाठी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने नमूद केले आहे.


*उष्मालाट काळात घ्यावयाची काळजी*


तहान नसली तरी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड किंवा यकृतविषयक आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थ घ्यावेत.

ओआरएस, लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ सेवन करावेत.

हलक्या रंगाचे, सैलसर व सुती कपडे वापरावेत.

घराबाहेर जाताना डोके झाकावे, टोपी, छत्री व गॉगलचा वापर करावा. त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर करावा.

अतिउष्णतेचा त्रास होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवावे.


*नागरिकांनी टाळावयाच्या बाबी*


विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात जाणे व श्रमाची कामे करणे टाळावे.

अनवाणी बाहेर फिरू नये.

अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करताना स्वयंपाकघर हवेशीर राहील याची काळजी घ्यावी.

दारू, चहा, कॉफी व शीतपेये यांचे सेवन टाळावे, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.

जास्त मीठ, तिखट, तेलकट तसेच उच्च प्रथिनयुक्त अन्नपदार्थ टाळावेत. शिळे अन्न सेवन करू नये.

उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात लहान मुले किंवा प्राणी ठेवू नयेत.

अनावश्यक उष्णता निर्माण करणारे चमकदार दिवे किंवा बल्बचा वापर टाळावा.

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


*******

मुरघास संयंत्र वाटप योजना : पशुपालकांना उद्योजक होण्याची सुवर्णसंधी




हिंगोली(जिमाका), दि. १२ : पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून पशुपालकांना स्वावलंबी व उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने शासनामार्फत “मुरघास संयंत्र वाटप योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पशुपालकांना मुरघास हार्वेस्टर व बेलर संयंत्र खरेदीसाठी भरघोस अनुदान देण्यात येणार असून, पात्र पशुपालक तसेच शेतकरी समुहगटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त  डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकाच वेळी चार ओळी हार्वेस्ट करणारे मुरघास हार्वेस्टर व मुरघास बेलर संयंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपकरणाची किंमत मर्यादा २६ लाख रुपये निश्चित करण्यात आली असून, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान (कमाल रु. १३ लाख) तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी ७५ टक्के अनुदान (कमाल रु. १९.५० लाख) देण्यात येणार आहे.


*पात्रता निकष*


योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे किमान १० मोठे पशुधन किंवा १०० शेळ्या / मेंढ्या असणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या मालकीचा किमान ५० एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर असणे बंधनकारक आहे. निवड प्रक्रियेत अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, वनहक्क धारक व महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी ५ टक्के तर महिलांसाठी ३० टक्के आरक्षण लागू राहील.


*आवश्यक कागदपत्रे*


योजनेसाठी अर्ज करताना पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पशुधन संख्या प्रमाणपत्र, ट्रॅक्टरचे आरसी कार्ड, बँकेचे कर्ज मंजुरी पत्र अथवा स्वनिधी उपलब्ध असल्यास त्यासंबंधी बँक स्टेटमेंट सादर करणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी प्रमाणपत्र तसेच बचत गट सदस्यांनी संबंधित प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.


*महत्त्वाच्या अटी*


निवड झालेल्या लाभार्थ्यांनी जिल्हा उपायुक्त कार्यालयाकडून कळविण्यात आल्यानंतर एका महिन्याच्या आत आवश्यक रकमेचा भरणा करणे आवश्यक राहील. मंजुरीनंतर तीन महिन्यांच्या आत संयंत्र खरेदी करणे बंधनकारक असून, अन्यथा प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल. उपकरणाच्या किंमतीत शासनाने निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च झाल्यास अतिरिक्त रक्कम लाभार्थ्यांना स्वतः भरावी लागेल. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे.

शेतकरी समुहगटांचाही समावेश

“वैरण विकास योजना” अंतर्गत “मुरघास संयंत्र वाटप योजनेव्दारे उद्योजकता विकास करणे” या उपक्रमात विविध शेतकरी समुहगटांचाही समावेश करण्यात आला आहे. यात सहकार अधिनियम अथवा धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी समूह, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत समूह आधारित संसाधन केंद्र तसेच उमेद अंतर्गत नोंदणीकृत प्रभाग संघांचा समावेश आहे.

सदर संस्थांकडे किमान ५० शेतकरी सदस्य असणे, किमान ५ लाख रुपयांचे भागभांडवल असणे, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण असणे व संस्था नफ्यात असणे आवश्यक आहे. पात्र समुहगटांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार असून, शासनाने नमूद केलेल्या इतर सर्व अटी लागू राहतील.

पशुपालकांना चारा टंचाईवर मात करून स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पात्र पशुपालक व शेतकरी समुहगटांनी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

*******

पाणी टंचाई निवारणासाठी नवीन विंधन विहिरी व हातपंपांना प्रशासकीय मान्यता



हिंगोली (जिमाका), दि. 12 : जिल्ह्यातील पाणी टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने विविध गावांमध्ये नवीन विंधन विहिरी व हातपंप उभारणीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वसमत, सेनगाव व हिंगोली तालुक्यातील प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित कामांना अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे.

वसमत व सेनगाव तालुक्यातील पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट तसेच प्रपत्र ‘ब’ प्राप्त झालेल्या 16 गावांमध्ये 23 नवीन विंधन विहिरींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये वसमत तालुक्यातील आंबा, पळशी, वाखारी, पळसगाव ता. माळवटा, सारोळा तसेच सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर, भंडारी, हत्ता तांडा, हत्ता, गोंडाळा, गोरेगाव, कहाकर बु., आजेगाव, सवना, कडोळी व उटीब्रम्हचारी या गावांचा समावेश आहे. प्रति विंधन विहिरीस 78 हजार 51 रुपये याप्रमाणे एकूण 17 लाख 95 हजार 173 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

तसेच हिंगोली तालुक्यातील पारोळा, समगा, घोटादेवी, बोराळा, बोराळवाडी, दुर्गधामणी व भांडेगाव या 7 गावांमध्ये 7 नवीन विंधन विहिरी व हातपंपाच्या कामांसाठी  प्रति विंधन विहिरी 78 हजार 51 रुपये याप्रमाणे एकूण 5 लाख 46 हजार 357 रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे.

याशिवाय हिंगोली तालुक्यातील खडकद बु., खानापूर बंगला, खंडाळा, देऊळगाव रामा व गाडीबोरी या 5 गावांमध्ये 6 नवीन विंधन विहिरी व हातपंपाच्या कामांचे सविस्तर अंदाजपत्रक शासन मान्य दराप्रमाणे तयार करण्यात आले असून, त्यासाठी 4 लाख 68 हजार 306 रुपयांच्या खर्चासही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

*******

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अडचणी सोडविण्यासाठी ‘कर्मचारी समाधान शिबिर’ आयोजित करण्याचे निर्देश

 



हिंगोली(जिमाका), दि. 12 : शासन सेवेत कार्यरत तसेच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधित विविध अडचणी वेळेवर व कार्यक्षमतेने सोडविण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात विशेष “कर्मचारी समाधान शिबिर” आयोजित करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

वेतन, बढती, बदली, निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती उपदान, रजा, सेवापुस्तिका अद्ययावतीकरण, वरिष्ठता आदी सेवाविषयक बाबींसाठी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनेक कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही किरकोळ कारणांमुळे प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याने कर्मचारी वर्गाला विभागीय कार्यालय तसेच मंत्रालय स्तरावर अर्ज सादर करण्यासाठी जावे लागत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी दि. 2 मे 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार हिंगोली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालय तसेच सर्व तालुका मुख्यालयांवर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी “कर्मचारी समाधान शिबिर” आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्या शुक्रवारी शासकीय सुट्टी असल्यास त्यापूर्वीच्या कार्यालयीन दिवशी शिबिर घेण्यात येईल.

जिल्हा मुख्यालयावरील शिबिर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका मुख्यालयावरील शिबिर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून संबंधित सर्व विभागांचे जबाबदार अधिकारी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करतील. सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. अपरिहार्य परिस्थितीत अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.

या शिबिरात संबंधित तक्रारदार अधिकारी-कर्मचारी तसेच कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय अडचणी जिल्हाधिकारी कार्यालयात, तालुकास्तरीय अडचणी तहसील कार्यालयात तर विभागीय स्तरावरील अडचणी विभागीय आयुक्त कार्यालयातील शिबिरात स्वीकारण्यात येणार आहेत.

परिपत्रक निर्गमित झालेल्या दिनांकापर्यंतची तसेच पुढील शिबिरापर्यंत प्राप्त होणारी सर्व प्रलंबित प्रकरणे प्रथम प्राधान्याने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी सर्व कार्यालयांनी सेवाविषयक प्रलंबित प्रकरणांची अद्ययावत यादी तयार करून त्यांचा शिबिरामध्ये समावेश करावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही सेवाविषयक अडचणी प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेऊन नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये उच्च प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक असल्यास निर्धारित कालावधीत प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे सादर करावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्येक कार्यालयाने प्राप्त प्रकरणांची नोंदवही अद्ययावत ठेवून तक्रारी निकाली काढेपर्यंत त्यामध्ये नियमित नोंदी कराव्यात. तसेच प्रत्येक महिन्याच्या अखेरीस स्थितीदर्शक अहवाल उपविभागीय कार्यालय, तालुका कार्यालय व इतर कार्यालयांनी पुढील महिन्याच्या 2 तारखेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.

*****

खरीप हंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पीकस्पर्धेचा निकाल जाहीर

 


हिंगोली(जिमाका), दि. 12 : राज्यामध्ये विविध पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२५ मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या ११ पिकांसाठी राज्यस्तरीय पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पीकस्पर्धेसाठी तालुका हा मूलभूत घटक मानण्यात येतो. स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांची उत्पादकता विचारात घेऊन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात येतात. ज्या शेतकऱ्यांच्या पिकाची उत्पादकता संबंधित तालुक्याच्या त्या पिकाच्या मागील पाच वर्षांच्या सरासरी उत्पादकतेच्या दीडपट किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येते.

खरीप हंगाम सन २०२५ पीकस्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीकस्पर्धा निकाल समितीद्वारे दि. ८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आले आहेत.

राज्यस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते वगळून जिल्हास्तरीय पीकस्पर्धा निकाल समितीमार्फत संबंधित जिल्ह्यातील स्पर्धकांमधून पीकनिहाय सर्वसाधारण व आदिवासी गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर तालुकास्तरीय समितीमार्फत संबंधित तालुक्यातील स्पर्धकांमधून तालुकास्तरीय विजेत्यांची निवड करून निकाल घोषित करण्यात येतील.

पीकस्पर्धेमध्ये उच्चतम उत्पादकता प्राप्त करणाऱ्या विजेत्या शेतकऱ्यांनी अवलंबिलेल्या आधुनिक पीक पद्धती व तंत्रज्ञानाची माहिती घडीपत्रिका तसेच विविध प्रचार-प्रसार माध्यमांद्वारे इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील कृषी उत्पादन वाढीस चालना मिळून इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

******

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका), दि. 12 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च 2026 च्या इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. इयत्ता 10 वी व 12 वीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना “राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार” योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येकी रुपये 5 हजार इतकी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. त्यामध्ये शाळेचे निकालपत्र, शाळेचे शिफारसपत्र, इयत्ता 10 वी/12 वी गुणपत्रक, जातीचा दाखला, बँक पासबुकाची छायांकित प्रत, आधार कार्ड प्रत आदी कागदपत्रांचा समावेश असावा.

यासंबंधीचे प्रस्ताव संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्राचार्य यांच्यामार्फत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, हिंगोली येथे सादर करण्यात यावेत, असे आवाहन समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.


********

11 May, 2026

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व सहाय्यक उपकरणे वाटपासाठी नोंदणी शिबिराचे आयोजन

 


हिंगोली(जिमाका), दि. ११ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली यांच्या वतीने भारत सरकारच्या “अटल वयो अभ्युदय योजना” (राष्ट्रीय वयोश्री योजना) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व सहाय्यक उपकरणे वाटपासाठी नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. २१ मे २०२६ रोजी गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांना गरजेनुसार व्हीलचेअर, श्रवणयंत्र, चष्मे, वॉकर, काठ्या, कमोड चेअर तसेच कृत्रिम दात (कवळी) यांसारखी सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक पात्र लाभार्थ्यास अंदाजे १२ हजार ५०० रुपये पर्यंतच्या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी लाभार्थ्यांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) धारक असावा किंवा त्यांचे मासिक उत्पन्न रु. १५ हजारांपेक्षा कमी असावे. यासाठी तहसीलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्राच्या दोन छायांकित प्रती, आधार कार्डाच्या दोन छायांकित प्रती तसेच दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक राहणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पूर्व नोंदणीसाठी दत्तात्रय मगर, समाजसेवा अधीक्षक, मो. ९३७३३७०७२२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल यांनी केले आहे. 


*******

10 May, 2026

हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये ७ कोटी २४ लाख ४५ हजार रुपयांची प्रकरणे निकाली




हिंगोली(जिमाका), दि. १० : येथील तालुका विधी सेवा समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयात दिनांक ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत प्रलंबित व वाद दाखलपूर्व अशा विविध प्रकारच्या प्रकरणांचा तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करण्यात आला.

लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली १ हजार ३४६ प्रकरणे तसेच महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांच्या वाद दाखलपूर्व ९ हजार ६४० प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी प्रलंबित १७६ तर वाद दाखलपूर्व ३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या लोकअदालतीत प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण तब्बल ७ कोटी २४ लाख ४५ हजार ६३ रुपयांची तडजोडीअंती रक्कम निश्चित करण्यात येऊन संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. 

लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी न्यायिक अधिकारी व विधिज्ञांचा समावेश असलेले एकूण सहा पॅनल गठीत करण्यात आले होते.

या लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. एस. माने, जिल्हा न्यायाधीश-२ आर. एस. रोटे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही. एम. मानखैर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी. आर. पमनानी, तिसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस. एस. पळसुळे  तसेच दुसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती डी. व्ही. भंडारी  यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले.


सयद गौस सयद अली यांच्या कुटुंबाला लोकअदालतीमार्फत ६४ लाखांची नुकसानभरपाई


राष्ट्रीय लोकअदालतीदरम्यान सयद गौस सयद अली यांच्या कुटुंबास मोठा दिलासा मिळाला. सयद गौस सयद अली यांचा दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी भोगाव देवी ते जिंतूर रोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. कुटुंबाचा आधार हरपल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात नुकसानभरपाईसाठी अर्ज दाखल केला होता.

या प्रकरणात लोकअदालतीत तडजोडीअंती लिबर्टी इन्शुरन्स कंपनीमार्फत ६४ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली व प्रकरण निकाली काढण्यात आले. अर्जदारातर्फे अॅड. एस. बी. गडदे यांनी तर विमा कंपनीतर्फे अॅड. व्यास यांनी बाजू मांडली.

*******