01 July, 2025
चारा लागवडीच्या उपक्रमाचे ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या हस्ते कलगाव येथे उद्घाटन
हिंगोली, दि. 01 (जिमाका): कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते आज हिंगोली जिल्ह्यातील कलगाव येथील शासकीय गायरान जमिनीवर एक हेक्टर क्षेत्रावर चारा लागवडीच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनिल माचेवाड, विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक) राजेंद्र नाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण), सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक), तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामरोजगार सेवक तसेच कलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी सांगितले की, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शाश्वत उत्पन्नासाठी दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. अशा कुटुंबांकडे चारा लागवडीसाठी स्वत:ची जमीन नसल्यामुळे शासनामार्फत गायरान जमिनीवर चारा लागवड करून त्यांना मदत करण्यात येत आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती, कार्बन क्रेडिट निर्माण, जमिनीची सुपीकता वाढविणे यासारखे अनेक फायदे होणार आहेत.
यावेळी कृषी विभागास चारा लागवड क्षेत्रास तार कुंपण करण्याच्या व वन विभाग प्रादेशिक हिंगोली यांना लागवडीच्या बाजूने सलग समतल चर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
******
जलयुक्त शिवारची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटारांना काळ्या यादीत टाका -- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 01 : जलयुक्त शिवारची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना संबंधित विभागाने काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षेतखाली जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा मृद व जल संधारण अधिकारी अनिल कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सामाजिक वनीकरण विभागाच्या पुष्पा पवार, जिल्हा परिषदेचे प्र.जिल्हा जलसंधारण अधिकारी यु.एस. अनमुलवाड, वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. खोडे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी व्ही. एन. हिरवळ, सर्व तालुका कृषि अधिकारी, पूर्णा पाटबंधारे, जिल्हा परिषद लघुसिंचन तसेच विविध विभागाचे अधिकारी, उगम संस्थेचे जयाजी पाईकराव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रस्तावित गाव आराखड्यानुसार राबविण्यात येणाऱ्या लघु पाटबंधारे तलाव दुरुस्ती, गाळ काढणे, वनतळे, खोल सलग समतल चर, मातीनाला बांध, अनघड दगडी बांधकाम, गॅबीयन बंधारा, सिमेंट नाला बांध, रोपवन, वृक्ष लागवड, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, नाला खोलीकरण, पाझरतलाव दुरुस्ती, केटीवेअर, शेततळे, रिचार्ज शॉफ्ट आदी कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी विभागनिहाय दिलेले उद्दिष्ट, झालेले काम, प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करुन त्याचा अहवाल सादर करावा. तसेच यावेळी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामाचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये शेतकरी उत्पादक गटांनी हळदीचे उपक्रम राबवावेत, अशा सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यात झालेल्या व होणाऱ्या कामांना भेटी देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
******
5 स्टार हिंगोलीकर उपक्रमाच्या माध्यमातून महिन्याला 150 झाडे लावावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यामधील सर्व नगर परिषद व नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये '5 स्टार हिंगोलीकर' या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज 5 झाडे याप्रमाणे महिन्याला 150 झाडे नागरिकांकडून लावून घ्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षेतखाली ऑनलाईन व्हीसीद्वारे जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची आज आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हिंगोली येथून नगरपालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त जगताप, मुख्याधिकारी अरविंद मुंढे तर व्हीसीद्वारे कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत, सेनगाव येथील मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, या उपक्रमांतर्गत नगर परिषद, नगर पंचायत यांच्या हद्दीतील सर्व घरे, शासकीय कार्यालये, शैक्षणिक आस्थापना, खाजगी आस्थापना इत्यादी ठिकाणी पावसाचे जलपुनर्भरण, घराभोवती किमान पाच झाडे, घरामध्येच कचऱ्याचे विलगीकरण, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील रूफ टॉप सोलर पॅनल, नगर परिषदेमार्फत आकारण्यात येणाऱ्या करांचा विहित वेळेमध्ये भरणा करणे या पाच निकषांच्या वेळेत पूर्तता करावी. वृक्ष लागवडीचा उद्देश भूगर्भातील पाणी पातळी वाढविणे आणि परिसराचे सुशोभिकरण करणे हा आहे, असे सांगितले.
तसेच यापुढे होणाऱ्या नवीन बांधकामांमध्ये पाचही निकषांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात संबंधित नागरिकांना कार्यक्रम घेऊन प्रोत्साहित करावेत. यासाठी हिंगोली जिल्ह्यातील पाचही नगर परिषद, नगर पंचायत शहरातील पक्क्या घरांची माहिती घ्यावी. प्रत्येक नगर पालिकेनी नागरिकांना प्रोत्साहित करुन दरमहा 30 प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील रूफ टॉप सोलर पॅनल बसवावीत. यासाठी नवीन बांधकाम परवाना घेताना अनामत रक्कम ठेवण्याबाबत ठरावा घ्यावा. तसेच 30 जलनपुनर्भरणाची कामे घ्यावीत. त्याची जीओ टॅगचे फोटो अपलोड करावीत. सार्वजनिक बोअरवेल, रिचार्ज शॉफ्टची कामे करावीत. मालमत्ता कर, पाणी पट्टी कराची शंभर टक्के वसुली करावी. मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने शहरातील नाल्यांची साफसफाई करावी. मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ठरावा घ्यावा. दैनंदिन घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. शहरातील काही महत्वाच्या ठिकाणचा जमलेला कचरा आठवड्यातून तीन वेळा उचलण्याची कार्यवाही करावी. सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिल्या.
*******
हिंगोली जिल्हा परिषद बहुविध प्रशाळेतील कायदेविषयक शिबीरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि.01: तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा परिषद बहुविध प्रशाळेत सोमवारी (दि.30) अंमली पदार्थ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी या विषयावर कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश बांगर यांनी नियमित व्यायाम केल्याने शरीर सुदृढ राहते व मानसिक तणाव येत नाही तसेच अमली पदार्थ सेवन न करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा वकील संघाचे सदस्य अॅड. अनिकेत कोकरे यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी व त्याबाबत मुलींनी घ्यावयाची काळजी याबाबत मागदर्शन केले.
कार्यकमास अध्यक्ष म्हणून लाभलेले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा तालुका विधी सेवा समितीचे समन्वयक वि.म. मानखैर यांनी विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी मेहनत करावी व चांगले ध्येय समोर ठेवावे व यशस्वी व्हावे, असे आवाहन केले. अमली पदार्थ सेवन केल्यास मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम या विषयावर सविस्तर उदाहरणे देवून विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवन न करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य एस. के. शिरसाठ, जिल्हा परिषद बहुविध प्रशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विशाखा सोनुने हे उपस्थित होत्या.
कार्यकमाचे प्रास्ताविक व सूत्र संचलन जिल्हा परिषद बहुविध प्रशाळेचे शिक्षक शिवलींग साखरकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन अनिस शहा यांनी केले. कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी अतुल चाटे, शितल मुंढे, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
******
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि.01: हरित क्रांतिचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना आज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महसूल विभागाचे तहसीलदार आश्विनकुमार माने, नायब तहसीलदार सचिन जोशी, संतोष बोथीकर, सी.आर.गोळेगावकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Posts (Atom)