01 July, 2025

जलयुक्त शिवारची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटारांना काळ्या यादीत टाका -- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 01 : जलयुक्त शिवारची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना संबंधित विभागाने काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षेतखाली जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा मृद व जल संधारण अधिकारी अनिल कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सामाजिक वनीकरण विभागाच्या पुष्पा पवार, जिल्हा परिषदेचे प्र.जिल्हा जलसंधारण अधिकारी यु.एस. अनमुलवाड, वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. खोडे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी व्ही. एन. हिरवळ, सर्व तालुका कृषि अधिकारी, पूर्णा पाटबंधारे, जिल्हा परिषद लघुसिंचन तसेच विविध विभागाचे अधिकारी, उगम संस्थेचे जयाजी पाईकराव उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रस्तावित गाव आराखड्यानुसार राबविण्यात येणाऱ्या लघु पाटबंधारे तलाव दुरुस्ती, गाळ काढणे, वनतळे, खोल सलग समतल चर, मातीनाला बांध, अनघड दगडी बांधकाम, गॅबीयन बंधारा, सिमेंट नाला बांध, रोपवन, वृक्ष लागवड, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, नाला खोलीकरण, पाझरतलाव दुरुस्ती, केटीवेअर, शेततळे, रिचार्ज शॉफ्ट आदी कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी विभागनिहाय दिलेले उद्दिष्ट, झालेले काम, प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करुन त्याचा अहवाल सादर करावा. तसेच यावेळी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामाचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये शेतकरी उत्पादक गटांनी हळदीचे उपक्रम राबवावेत, अशा सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यात झालेल्या व होणाऱ्या कामांना भेटी देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ******

No comments: