01 July, 2025

चारा लागवडीच्या उपक्रमाचे ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या हस्ते कलगाव येथे उद्घाटन

हिंगोली, दि. 01 (जिमाका): कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते आज हिंगोली जिल्ह्यातील कलगाव येथील शासकीय गायरान जमिनीवर एक हेक्टर क्षेत्रावर चारा लागवडीच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनिल माचेवाड, विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक) राजेंद्र नाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण), सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक), तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामरोजगार सेवक तसेच कलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी सांगितले की, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शाश्वत उत्पन्नासाठी दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. अशा कुटुंबांकडे चारा लागवडीसाठी स्वत:ची जमीन नसल्यामुळे शासनामार्फत गायरान जमिनीवर चारा लागवड करून त्यांना मदत करण्यात येत आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती, कार्बन क्रेडिट निर्माण, जमिनीची सुपीकता वाढविणे यासारखे अनेक फायदे होणार आहेत. यावेळी कृषी विभागास चारा लागवड क्षेत्रास तार कुंपण करण्याच्या व वन विभाग प्रादेशिक हिंगोली यांना लागवडीच्या बाजूने सलग समतल चर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ******

No comments: