28 February, 2026

जगात शांततेचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो योगगुरू रामदेव बाबा

 


मुंबई, दि. 28 - वेदवाणी आणि गुरुवाणी मानवतेला मार्गदर्शन करणाऱ्या असून आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात शांततेचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो, असा विश्वास योग गुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केला.

खारघर येथे आयोजित हिंद दि चादर कार्यक्रमात योगगुरू रामदेव यांनी गुरु परंपरेच्या त्याग, शौर्य आणि अध्यात्मिक वारशाचे स्मरण करून राष्ट्रएकतेचा संदेश दिला. गुरुंनी समाजासमोर महान आदर्श ठेवला असून आपण त्या परंपरेचे वारसदार आहोत, असे सांगत त्यांनी गुरुंच्या मार्गावर श्रद्धा आणि कृतज्ञतेने चालण्याचे आवाहन केले. 

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात बाबा रामदेव बोलत होते. यावेळी जत्थेदार ग्यानी बलदेव सिंग जी, श्री बाबू सिंग महाराज,  श्री शरदचंद्र ढोले, बाबा रामसिंग महाराज, बाबा हरिनाम सिंग जी,  ज्ञानी गुरुदयाल जी,  रघुवीर बाबा,  ग्यानी हरमिंदर साहेब,  प्रधान गुरुविंदर सिंग, हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, परभणीचे आमदार राहुल पाटील  आदिसह विविध संत ग्यानी उपस्थित होते.

या सोहळ्यात सिख समाजासह बंजारा, लबाना, वारकरी, सिंधी, वाल्मीकि आणि उदासीन परंपरेतील संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हा केवळ मेळावा नसून गुरु परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि समाज एकतेचा संकल्प दृढ करण्याचा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व असून धर्म, संस्कृती आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी गुरुंनी दिलेले बलिदान अतुलनीय असून त्यागामुळेच सनातन परंपरा आजही टिकून आहे. गुरु नानक देवांपासून गुरु गोविंद सिंह महाराजांपर्यंतची परंपरा हि शौर्य, त्याग आणि अध्यात्माची असल्याचे बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले.

रामेश्वर नाईक म्हणाले यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन आणि गुरु नानक नाम संगत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे विदर्भ व छत्तीसगडच्या संगतीच्या उपस्थितीत शहीदी समारंभ झाला. त्यानंतर २४ व २५ जानेवारीला नांदेड मधील तख्त श्री हजूर साहिब येथे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातील भाविकांच्या सहभागातून कार्यक्रम पार पडला. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी कोकण विभागासह राज्यभरातून आणि देश-विदेशातून आलेल्या संगतीने या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेत आहेत . विविध समाजघटक, उदासीन संप्रदाय आणि वारकरी परंपरेतील भक्तांनी एकत्र येत धार्मिक एकतेचा संदेश दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शीख गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानाची गाथा सांगताना त्यांच्या शौर्याचा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाचा उल्लेख करून काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेली शहादत ही मानवतेच्या इतिहासातील अद्वितीय घटना असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. यानिमित्ताने राज्य शासनाच्या वतीने शैक्षणिक संस्था, ग्रामसभा आणि विविध उपक्रमांतून गुरुंचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.

श्री रामराव महाराज यांनी महाराष्ट्र सरकार गुरु गोविंद सिंह महाराजांचा इतिहास घराघरांत पोहोचवत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

यावेळी भगवान संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचाही गौरव त्यांनी केला. संत सेवालाल महाराजांनी देशभर भ्रमंती करून समाजजागृती केली, व्यापार आणि संघटनाच्या माध्यमातून बंजारा समाजाला बळ दिले, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी उपस्थित संताचा, गुरूंचा सन्मान करण्यात आला.

000नंदकुमार वाघमारे000




खारघर येथील हिंद दि चादर कार्यक्रमास देश-विदेशातून संत- महंत आणि भाविकांची उपस्थिती

 

मुंबई, दि. 28 - खारघर येथे आयोजित हिंद दि चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी देश विदेशातून विविध संत, महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि कीर्तनात भाविक रममाण झाल्याचे दिसत होते.

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य समागमामुळे गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा संदेश देश-विदेशात अधिक दृढपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या ऐतिहासिक सोहळ्यास संत जत्थेदार ग्यानी बलदेव सिंग जी, श्री बाबू सिंग महाराज, श्री शरदचंद्र ढोले, बाबा रामसिंग महाराज, बाबा हरिनाम सिंग जी, सिंधी समाजाचे गुरु छोटू सिंग, जसकरन सिंग, ज्ञानी गुरुदयाल जी, रघुवीर बाबा, ग्यानी हरमिंदर साहेब, प्रधान गुरुविंदर सिंग, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, परभणीचे आमदार राहुल पाटील, सरदार जसपाल सिंग सिद्धू, सरदार अमृपाल सिंग, सरदार अवतार सिंग शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. विविध समाजघटकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त झाले.

*विदेशातील भाविकांचाही सहभाग*

लंडन, कॅनडा, अमेरिका तसेच न्यूयॉर्क येथूनही भाविकांनी विशेष उपस्थिती दर्शविली. विदेशातून सरदार हरभजन सिंग ढिल्लो, संत बाबा प्रेमसिंग, सरदार रणजीत सिंग, सरदार जगजीत सिंग, सरदार सुखदेव सिंग, सरदार गुरुप्रित सिंग, सरदार जयपाल आदी सहभागी झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व समाजातील भाविक एकत्र आल्याचे पाहून सरदार हरभजन सिंग ढिल्लो यांनी समाधान व्यक्त केले. 

000







हिंद दी चादर कार्यक्रमात भाविकांसाठी प्रशासनाच्या सर्व सोयी–सुविधा उपलब्ध

 

नवी मुंबई –  भव्य समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतूक, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा, स्वच्छता व पायाभूत सुविधांचे सूक्ष्म नियोजन  करण्यात आले आहे.

भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक मार्गयोजना आखण्यात आली असून, पोलीस विभागामार्फत आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला  आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्ष तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सायबर पोलीस व एटीएस यांचीही मदत घेण्यात आली आहे.

आरोग्य सेवांच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी  तात्पुरती वैद्यकीय केंद्रे व १ आयसीयू उभारण्यात येणार असून, जवळील रुग्णालयांमध्ये ३५० खाटा आणि ७५ आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत तात्पुरती वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. एकूण १०० पेक्षा अधिक डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी तैनात राहणार आहेत.


ओवे मैदानाची एकावेळी सुमारे ५ लाख भाविकांची क्षमता असून, मुख्य मंडपात ८० हजार ते १ लाख भाविक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारणी अंतिम टप्प्यात असून, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, प्रकाशयोजना व स्वच्छतागृहांची कामे प्रगतीपथावर आहेत. १ हजारांहून अधिक तात्पुरती स्वच्छतागृहे आणि ५०० पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असणार आहेत.


देशभरातून भाविक येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेसाठी ३० पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. जेएनपीए परिसरात दररोज होणाऱ्या सुमारे २५ हजार जड वाहनांच्या ये-जा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन करण्यात येत आहे. भाविकांच्या सोयीसाठी १५० पेक्षा अधिक विशेष एनएमएमटी बस सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच ३८ स्वतंत्र पार्किंग स्थळे, ३ हेलिपॅड, २५ हजार भाविकांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे.


लंगर व्यवस्थेसाठी सुमारे १ हजार गॅस सिलेंडर, आवश्यक इंधन व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. दोन दिवसीय कार्यक्रमासाठी १० हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती अधिकृत 

https://gurutegbahadurshahidi.com/home

संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक सोयी–सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

000

खारघर येथे “हिंद-दी-चादर” शहीदी समागमात भक्ती, सेवा आणि एकात्मतेचा संगम

 


नवी मुंबई,दि.२८ :खारघर नवी मुंबई येथे ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित समागमात भक्ती, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचे अद्वितीय वातावरण अनुभवायला मिळत आहे. देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसर पूर्णपणे आध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाला आहे.

समागमस्थळी अखंड कीर्तन सुरू असून “वाहे गुरु” आणि “बोले सो निहाल, सत श्री अकाल” च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले आहे. रागी जत्थेदारांच्या कीर्तनात भाविक भावनिकरित्या तल्लीन झालेले दिसत होते. विविध ठिकाणी लावलेल्या एलईडी स्क्रीनमुळे प्रत्येक भाविकाला कीर्तनाचा लाभ घेता आला.

‘विरासत-ए-सीख’ या प्रदर्शनातून शीख समाजाचा इतिहास, शौर्यगाथा आणि परंपरा सचित्र स्वरूपात मांडण्यात आल्या आहेत. शीख योद्ध्यांनी वापरलेली शस्त्रे आणि ऐतिहासिक माहिती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सेवा सुरू असून सर्व धर्मीयांना प्रेमपूर्वक भोजन दिले जात आहे. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने वाढप, स्वच्छता व व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे. हजारो स्वयंसेवकांच्या सहभागातून ‘सेवा हीच खरी श्रद्धा’ हा संदेश  दिला जात आहे.

समागमात मुख्यमंत्री सहायता निधी च्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध तपासण्या व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डोळ्यांची तपासणी करून मोफत *देवाभाऊ चष्मे* वाहनातून चष्मे  वितरित करण्याची सोयही करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. बंजारा व लबाना समाजाच्या महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविले.

 शिखांची पारंपरिक मार्शल आर्ट ची प्रात्यक्षिकेही पाहायला मिळाली.३३ पार्किंग स्थळे, मोफत पिकअप-ड्रॉप सुविधा, कडक वाहतूक नियोजन, पोलीस व अग्निशामक दलाचा बंदोबस्त यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडत आहे. स्वच्छता रथ व कचरा संकलन व्यवस्था सतत कार्यरत असल्याने परिसर स्वच्छ ठेवण्यात आला आहे.

एकंदरीत, श्री गुरु तेग बहादूर यांच्या त्याग आणि धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ आयोजित हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता सामाजिक सलोखा, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरत आहे.

००००००००००

‘हिंद-दी-चादर’ समागमात नऊ समाजांचे सामाजिक ऐक्य

 

नवी मुंबई, दि. २८ :  “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात नऊ समाजांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला. विविध समाज, पंथ आणि घटक एकत्र येत सामाजिक ऐक्याचे प्रभावी दर्शन घडले.

या समागमात सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीयम, उदासीन तसेच संत नामदेव महाराजांच्या वारकरी (भगत नामदेव) संप्रदायातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. समागमात सर्व समाजातील प्रतिनिधींनी उपस्थित राहून एकता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. श्रद्धा, सेवा आणि समतेच्या विचारांवर आधारित कार्यक्रमात सर्वांनी शांततेत आणि शिस्तीत सहभाग घेतला.

कार्यक्रमस्थळी सर्व समाजांनी परंपरा, संस्कृती आणि धार्मिक मूल्यांचा सन्मान राखत शांततेत सहभाग घेतला. विविध समाजांच्या उपस्थितीमुळे हा समागम केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु ग्रंथ साहिब यांच्या शिकवणीनुसार समता व मानवतेचा विचार अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध समाजांच्या सहभागामुळे हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोख्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला आहे.

0000

खारघरमध्ये ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम; भव्य पार्किंग व्यवस्थेची तयारी

 


- महामार्गपासूनच मार्गदर्शक फलक

- कलर कोडींग नुसार पार्किंगची व्यवस्था



खारघर, दि. 28 : अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी भाविकांच्या सोयीसाठी व्यापक आणि रंग-कोडनिहाय 33 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन बस, कार आणि दुचाकींसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक पार्किंग स्थळावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी मोफत पिकअप आणि ड्रॉप सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहन पार्क केल्यानंतर भाविकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. ओला-उबरसह सर्व टॅक्सी सेवांसाठी देखील स्वतंत्र पिकअप-ड्रॉप पॉइंट्स निश्चित करण्यात आले आहेत.


कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांची गर्दी टाळण्यासाठी ‘ब्ल्यू’, ‘ऑरेंज’ आणि ‘पिंक’ अशा तीन रंगांमध्ये पार्किंगचे वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक रंगानुसार विशिष्ट मार्ग व जिल्हे निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार वाहनचालकांना पार्किंग स्थळी मार्गदर्शन केले जाणार आहे.

*ब्ल्यू पार्किंग (नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आदी मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी)*

ओवे कॅम्प मैदान, इनामपुरी क्रिकेट मैदान, श्री सत्य साई हॉस्पिटल परिसर, मेट्रो स्टेशनजवळील मैदाने आदी ठिकाणी बस व कार पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या विभागात सुमारे ५५० बसेस आणि ११३५ कार पार्किंगची क्षमता उपलब्ध आहे.


*ऑरेंज पार्किंग (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांसाठी)*

पापडीचा पाडा सर्कल, सेक्टर ३५ ई, सेक्टर ३३, ३२, २७ आणि २३ मधील विविध मैदाने येथे मोठ्या प्रमाणावर पार्किंगची व्यवस्था आहे. या विभागात ४०० बसेस आणि तब्बल ४९९० कार पार्किंगची क्षमता उपलब्ध करून देण्यात आली आहे.


*पिंक पार्किंग (मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर येथून येणाऱ्या वाहनांसाठी)*

सेक्टर २४, १४, ११, १६, ७, ४, ८ आणि १० मधील मैदाने तसेच लिटल वर्ल्ड मॉल परिसर येथे वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. या विभागात २०० बसेस आणि २५६० कार पार्किंगची सुविधा आहे.

याशिवाय, कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी नियुक्त पोलिस व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी सेंट्रल पार्क, सेक्टर ६ परिसर आणि गुरुद्वारामागील टनेल रोड येथे स्वतंत्र पार्किंग राखीव ठेवण्यात आले आहे. येथे सुमारे १४५० कार आणि १००० मोटारसायकली उभ्या करण्याची क्षमता आहे.

*महामार्गपासून मार्गदर्शक फलक*

कार्यक्रमादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सुलभ प्रवेश मिळावा यासाठी प्रशासनकडून मार्गदर्शक फलक, स्वयंसेवक आणि पोलीस बंदोबस्ताचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. आयोजकांनी भाविकांनी दिलेल्या रंग-कोडनुसार पार्किंगचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

वाहतूक व्यवस्था व पार्किंग व्यवस्थेबद्दल नवी मुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त (वाहतूक ) तिरुपती काकडे यांनी सांगितले की, खारघर येथे ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या परिसरामध्ये जवळपास 33 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी पिकअप आणि ड्रॉप सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे; म्हणजे, ज्या ठिकाणी पार्किंगमध्ये आपण वाहन लावाल, तिथून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोफत पिकअप आणि ड्रॉपची सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर, या ठिकाणी येणारे ओला, उबर आणि टॅक्सी यांच्यासाठीसुद्धा पिकअप आणि ड्रॉपची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून, दिनांक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या दोन्ही दिवशी सकाळी 6:00 वाजल्यापासून ते रात्री 11:00 वाजेपर्यंत नवी मुंबईच्या आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये जड आणि वाजड वाहनांना प्रवेश करण्यास आणि पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर, खारघरमध्येसुद्धा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून, काही ठिकाणी रस्ते, पर्यायी रस्ते निर्माण केलेले आहेत आणि काही रस्त्यांवरती वाहतूक प्रतिबंधित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून, वाहतूक शाखेकडून एक डीसीपी, एक एसीपी, 20 अधिकारी आणि 500 अंमलदार यांच्यासोबत 500 वार्डन नेमण्यात आलेले आहेत; ज्यामुळे वाहतूक जी आहे, ती सुव्यवस्थित राखण्यासाठी मदत होईल.

 काही ठिकाणी वाहनं बंद पडण्याची संभावना लक्षात घेता, पुरेसा प्रमाणात क्रेन नेमण्यात आलेले आहेत. टोइंग व्हेईकल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्व पार्किंगच्या वाहनतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या रस्त्यावरती सर्वत्र साइन बोर्ड्स लावण्यात आलेले आहेत. एकंदरीत, या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था अबाधित राहील यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, यासाठी वाहतूक पोलीस आणि नवी मुंबई पोलीस सज्ज आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

000

हिंद-दी-चादर’ समागमात बंजारा महिलांचे पारंपरिक नृत्य सादरीकरण


नवी मुंबई, दि. २८ : “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

 रंगीत पारंपरिक वेशभूषा आणि आकर्षक दागिने परिधान करून सादर केलेल्या नृत्यामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे आणि सांस्कृतिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले. विविध राज्यांतून आलेल्या भाविकांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.

समागमाच्या निमित्ताने धर्म, संस्कृती आणि परंपरांचा संगम पाहायला मिळाला. बंजारा समाजाच्या महिलांनी आपल्या सादरीकरणातून एकता, बंधुता आणि सांस्कृतिक वैविध्याचा संदेश दिला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु ग्रंथ साहिब यांच्या शिकवणीनुसार समता आणि मानवतेचा विचार अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

00000





शीख समाजाचा इतिहास उलगडणारे 'विरासत-ए-सीख' प्रदर्शन ठरतंय भाविकांचे आकर्षण

 




▪️शीख योद्ध्यांनी वापरलेले शस्त्रात्रे पाहण्याची संधी


▪️शीख समाजासह नऊ समाजातील महापुरुषांच्या इतिहासाची सोप्या भाषेत आकर्षक सचित्र मांडणी



मुंबई, दि.28: : खारघर ओवे मैदान येथे सुरू असलेल्या हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त शीख समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारे 'विरासत-ए-सीख' हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन भाविकांसाठी आकर्षण ठरत असून या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले भाविक आवर्जून प्रदर्शनाला भेट देत आहेत. 

शीख धर्माच्या स्थापनेपासून ते गुरू गोविंद सिंग यांच्यापर्यंतच्या सर्व गुरूंचा इतिहास, त्यांनी दिलेले योगदान सचित्र स्वरूपात मांडण्यात आला आहे. विशेषतः हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासोबत शीख योद्ध्यांनी वापरलेली विविध शस्त्रास्त्रे या प्रदर्शन दालनात ठेवण्यात आली आहेत. शीख धर्माचे पहिले गुरु श्री गुरु नानक जी ते शेवटचे गुरु गोविंद सिंगजी यांचा इतिहास व श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे कार्य तसेच शीख धर्मासोबतच सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाजातील महापुरुषांचाही इतिहास या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आला आहे. 

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 शहीदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले भाविक आवर्जून 'विरासत-ए-सीख' या प्रदर्शनाला भेट देत आहेत. 

**** 


हिंद-दी-चादर’ समागमात भव्य लंगर व्यवस्था


*लाखो भाविकांनी घेतला लंगर सेवेचा लाभ*


  नवी मुंबई, दि. २८ : “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भाविकांसाठी भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. लाखो भाविक या लंगर सेवेचा लाभ घेत असून संपूर्ण परिसर सेवाभाव आणि समतेच्या संदेशाने भारावून गेला आहे. आज पहिल्या दिवशी अंदाजे दोन लाखांपेक्षा अधिक भाविक लंगर सेवेचा लाभ घेतील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.



   कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर व्यवस्था सुरू असून सर्व धर्मीय भाविकांना भोजन दिले जात आहे. संपूर्ण परिसरात आठ ठिकाणी लंगर सुरू असून एका वेळेस एका लंगर मध्ये सुमारे दोन ते अडीच हजार भाविकांना एकत्रितपणे भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत अखंडपणे भोजन व्यवस्था सुरू असून स्वयंसेवक आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने वाढप, स्वच्छता व व्यवस्थापन सुरळीत पार पडत आहे.

    स्वयंसेवक, सेवाभावी संस्था आणि गुरुद्वारातील सेवादार यांच्या संयुक्त प्रयत्नातून अन्न तयार करणे, वाढप, स्वच्छता आणि व्यवस्थापनाची चोख जबाबदारी पार पाडली जात आहे.

लंगरमध्ये पारंपरिक पद्धतीने रोटी, भाजी, डाळ, भात तसेच गोड पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो स्वयंसेवक सेवेत सहभागी झाले असून ‘सेवा’ हीच खरी श्रद्धा असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.

  या समागमात गुरु ग्रंथ साहिब यांच्या पावन उपस्थितीत कीर्तन सुरू असून “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात भाविक दर्शन व लंगर सेवेचा लाभ घेत आहेत.

लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग आणि धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमातून समाजात एकात्मतेचा संदेश दिला जात आहे.

             00000 




खारघर येथे गुरु तेगबहादूर साहेबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन


नवी मुंबई दि 28 फेब्रुवारी : मानवतेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे शिख पंथाचे नववे गुरू गुरू तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त खारघर येथे भव्य जनकल्याण चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी कोश यांच्या सौजन्याने आयोजित या उपक्रमास देशभरातून आलेल्या भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समागमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या आरोग्याची सर्वंकष काळजी घेत विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत बहुआयामी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरात फिजिओथेरपी सेवा कक्ष, दंतरोग तज्ञ कक्ष, अस्थिरोग तज्ञ कक्ष, कान-नाक-घसा तज्ञ कक्ष, हृदयरोग तज्ञ कक्ष, मेडिसिन विभाग, तसेच ईसीजी व रक्तदाब तपासणी कक्ष यांचा समावेश होता.

विशेष म्हणजे कॅन्सर स्क्रीनिंग चाचण्या आणि मोफत केमोथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक बांधिलकी जपत अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. गरजू रुग्णांसाठी मोफत औषध वाटपाचीही सोय करण्यात आली होती.

या शिबिरात एमजीएम मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे  डीन डॉ. जी. एस. नरशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रदीप सावर्डेकर, डॉ. नव्या बाबू, डॉ. आदित्य ढाकणे, डॉ. मोहिनी धर्मा आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा दिली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका तसेच महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.

भाविकांनी मोठ्या संख्येने विविध तपासण्या करून घेत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले. आरोग्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे समागमाला सामाजिक उत्तरदायित्वाची भक्कम जोड मिळाली.

मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या महान बलिदानाच्या स्मरणार्थ आयोजित या आरोग्य शिबिराने “सेवा हीच खरी श्रद्धांजली” हा संदेश अधोरेखित करत समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण केला.




राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती

  

हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी विविध योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली जिल्ह्यातील येहळेगाव, खंडाळा, राजुरा, पहेनी, नांदापूर, सोडेगाव, दिग्रस कऱ्हाळे व सालेगाव आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

***** 





ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद


 





 हिंगोली (जिमाका), दि. 28 :  आज ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कवि संमेलनात कवींनी  सामाजिक, शैक्षणिक, गेय तसेच राजकीय विडंबनविषयक कवितांचे सादरीकरण केले. या कवि संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात  श्रीमती सिंधुताई दहिफळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी प्रमुख कवी डॉ. विष्णु सुरासे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

या कवी  संमेलनात श्रीमती सिंधुताई दहिफळे यांनी उठ युवका जागा हो आणि माय मराठी, सुनिल हुसे यांनी ग्रंथालयावर कविता, प्रा.विलास खरात यांनी शेतकरी आत्महत्येवर आधारित आधीच होता डोईवर कर्जाचा डोंगर, ॲड. स्वप्नील मुळे यांनी खेळणाऱ्या नातवाला आम्हाला पाहायच वृद्धाश्रमात नको आम्हाला घरातच राहायचे ही कविता, श्रीमती कांताबाई कल्याणकर यांनी होळी निमित्त होळी ग होळी तू येतीस दरवर्षी , श्रीमती अर्चनाताई मेटे यांनी सामर्थ्य लेखनीचे, दिगंबर जाधव यांनी पेराल ते उगवेल, श्रीमती सुप्रियाताई दापके यांनी तू बंड बुडाचे झाड, राजकुमार नायक यांनी बाप जगाचा पोशिंदा आणि कापूस गेलाय बाराच्या भावात ऊसाला नाही भाव मला शेती विकायची राव, शिवाजीराव लाखकर यांनी बंगाली कविता व वानर ग वानर हुप हुप करीत आली, श्रीमती दुर्गा मस्के यांनी मायत्व जाण्याने, श्रीमती ज्ञानदा चौधरी यांनी लक्ष्मण रेषा, विलास आदमाने यांनी स्वभाच्या प्रेमात पडणारा, राजकुमार मोरगे यांनी वाटणी, निखील नाईक यांनी वाटे हृदयात आता सोडून तुला जाताना ही प्रेम कविता, आयुष गुप्ता यांनी ऐसा क्या है माता तेरे भाव मे, महासेन प्रधान यांनी मशाल व त्यांच नाव भिमराव, सुधाकर मोरे यांनी दाही दिशा घुमते रे वाणी गुरुवीन नाही ग्यानी, समाधान लोणकर यांनी भिडेवाडा, विजय गुंडेकर यांनी शिवबा यांच्यासह श्रीमती सविता देशमुख, अंकीत हरकळ, भारती तुकाराम, शिल्पा दोडेकर आदी विविध कवींनी  या कवि संमेलनात  शेतकरी समस्या, सामाजिक जाणीवा, कुटुंबव्यवस्था, मातृभाषा, प्रेमभावना आदी विषयांवर कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.

यावेळी हास्य कवी डॉ. विष्णु सुरासे यांनी बायकांनो ऑफिसात आता थम आले नवरे वेळेवर ऑफिसात जातील तुम्ही घरावरही एखादे थम बसवा तेंव्हा हे घरी वेळेवर येतील आणि मालिकेतील प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले तिचे सासू सासर भाकरीसाठी केंव्हाचे वाट पाहू लागले व मोबाईलची  रिंगटोन आता मौतित सुद्धा वाजत आहे नको ते गाणं ऐकून आज प्रेत सुद्धा लाजत आहे यासह इतर गंभीर स्वरुपाच्या रचना सादर करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर या कवि संमेलनाचा अध्यक्षीय समारोप श्रीमती सिंधुताई दहिफळे यांनी कुणबी कांडतो मरण ही कविता सादर करुन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार नायक, राजकुमार मोरगे यांनी केले. तर शेवटी आभार गजानन शिंदे यांनी मानले.

या कवी संमेलनास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

******

ग्रंथ वाचनातूनच समाजाची खरी प्रगती – ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख

 


हिंगोली (जिमाका), दि. 28 : समाजातील वाढत्या समस्या, असमानता आणि विचारांतील गोंधळ यावर प्रभावी उपाय म्हणजे ग्रंथ वाचन व विचारांची चिकित्सा होय. प्रत्येकाने दरवर्षी किमान काही रकमेची पुस्तके खरेदी करून वाचनाची सवय लावली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी केले.

येथील कै. रं.रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2025 चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. विलास वैद्य, प्रा. खंडेराव सरनाईक, अशोक अर्धापूरकर, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, विभागीय ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीकांत देशमुख यांनी सांगितले की, लोकसंख्या वाढत असताना माणुसकी कमी होत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. इतिहासातील महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महान व्यक्तींच्या विचारांचा अंगीकार केल्यास समाज अधिक सक्षम होऊ शकतो. वाचनामुळे विवेक, प्रश्न विचारण्याची क्षमता आणि सामाजिक जाण विकसित होते, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक घरात लहानसे ग्रंथालय असावे, असे आवाहनही त्यांनी केले.


वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


अध्यक्षीय भाषणात राहुल गुप्ता यांनी विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांसोबत विविध साहित्याचे वाचन करावे, असे आवाहन केले. दर महिन्याला किमान एक पुस्तक वाचण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा, असे ते म्हणाले. वाचनामुळे विचारांमध्ये व्यापकता येते आणि योग्य निर्णयक्षमता विकसित होते. स्पर्धा परीक्षांसाठीही वाचन अत्यंत उपयुक्त ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.


ग्रंथोत्सव ही वैचारिक चळवळ – प्रा. विलास वैद्य


ग्रंथोत्सव हा केवळ साहित्यिक कार्यक्रम नसून हिंगोलीची वैचारिक परंपरा जपणारी चळवळ असल्याचे प्रा. विलास वैद्य यांनी सांगितले. साहित्य वाचनामुळे संवेदनशीलता व विचारांची परिपक्वता वाढते, त्यामुळे प्रत्येकाने वाचनाकडे वळावे, असे त्यांनी नमूद केले.


प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. यामध्ये  परिसंवाद, व्याख्याने, कवी संमेलन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या ज्ञानोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यंदा साहित्यिकांचा सत्कार, QR कोडद्वारे सभासद नोंदणी आणि अभिप्राय संकलन उपक्रम राबविण्यात आला आहे.


ग्रंथालय सहायक संचालक सुनिल हुसे यांनी हिंगोली जिल्हा हा समृद्ध जिल्हा असून अभिप्राय संकलन पेटी व क्यूआर कोडचा वापर करणारा हिंगोली जिल्हा पहिला ठरला आहे. संत गाडगेबाबा व बहिणाबाईची शिकवण ग्रंथातून मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी ग्रंथ वाचले पाहिजेत. ग्रंथातून आनंद मिळतो. त्यामुळे सर्वांनी ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा व येथे उभारण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलला भेटी देऊन पुस्तके खरेदी करावीत. प्रत्येकांनी किमान एक तरी पुस्तक खरेदी करुन घर समृद्ध करावे, असे आवाहन केले. यावेळी प्रा. खंडेराव सरनाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नामदेव दळवी व गजानन शिंदे यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे प्रा. विलास खरात यांनी मानले. यावेळी संगीता चौधरी लिखित 'रंग जीवनाचे' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गंगादेवी देवडा अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमात साहित्यिक व ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतलेल्या शाळांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 

या कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीला उस्फूर्त प्रतिसाद


ग्रंथोत्सवानिमित्त आज सकाळी येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयापासून  ते जुनी नगर परिषद येथून ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन नगरसेवक श्रीराम बांगर यांच्या हस्ते ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आले. या ग्रंथदिंडीला शालेय विद्यार्थी, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ग्रंथदिंडीमध्ये सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, माणिक स्मारक आर्य विद्यालय, विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल, सत्यनारायण विद्यामंदिर, गुरुदास काम माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत सुदर असे वेशभूषा, लेझीम नृत्य सादर केले.  

या ग्रंथोत्सवामध्ये  शासकीय  ग्रंथागार  छत्रपती संभाजीनगर,  संविधान जागर अभियान ग्रंथ विक्री, प्रणवी बुक सेंटर, सम्राट बुक स्टॉल, प्रगती बुक स्टॉल, श्री गणेश बुक डेपो यासह विविध पुस्तकाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यावेळी शासकीय ग्रंथ भांडाराचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांनी येथे लावलेल्या ग्रंथ स्टॉल भेटी देवून ग्रंथांची पाहणी केली.

******** 











27 February, 2026

 "हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन


सीबीडी बेलापूर ते ओवे मैदानापर्यंतचा परिसर भक्तीमय वातावरणात निघाला न्हावून


'बोले सो निहाल'चा जयघोषाने दुमदुमले खारघर 


   नवी मुंबई, दि.27(विमाका) : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या महान शहिदी समागम सोहळ्यानिमित्त खारघर नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. 'बोले सो निहाल... सत श्री अकाल' चा गगनभेदी जयघोष आणि या सोहळ्यात संत, भाविक, लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात आज भव्य 'नगर कीर्तन' सोहळा पार पडला.

      या ऐतिहासिक नगर कीर्तनाला आज (दि.27) सायंकाळी 5.00 वाजता गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा, सीबीडी बेलापूर येथून प्रारंभ झाला. यानंतर डी.वाय.पाटील चौक बेलापूर, आरबीआय कॉलनी चौक, बेलपाडा मेट्रो, खारघर रेल्वे स्टेशन चौक, उत्सव चौक, ग्राम विकास चौक, गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा, खारघर येथून समागम स्थळ ओवे खारघर येथे या नगर किर्तनाचा समारोप करण्यात आला. हे किर्तन केवळ एक शोभा यात्रा नाही तर गुरुसाहेबांच्या त्याग, सहास, धर्म रक्षा आणि मानवतेचा संदेश सर्व जनतेपर्यंत पोहोचविण्याचा माध्यम आहे. 

    सुशोभित आणि भव्य रथामध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान होते. या पवित्र पालखीमध्ये भाई कश्मीर सिंघ जी यांनी पवित्र सेवा अत्यंत भक्तीभावाने केली.

   कलगीधर दशमेश पित्याच्या छत्र छायाखाली, शब्द किर्तन आणि सेवेच्या सहवासात ही अलौकिक यात्रा आपल्या एकता, बंधुभाव आणि अध्यात्मिक जागृतीकडे घेवून जाणार आहे, असा विश्वास या नगर किर्तनातून मिळाला. धार्मिक कीर्तन, गुरु वाणीचे पठण आणि शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. विविध समाजघटक, स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी नगर कीर्तनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

      या नगर कीर्तनात शीख धर्माची परंपरा आणि महाराष्ट्राची लोकधारा यांचा संगम पाहायला मिळाला. मिरवणुकीच्या अग्रभागी शीख तरुणांची थरारक 'गतका' प्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होती, तर हजारो शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेले 'लेझीम' नृत्य आणि ढोल-ताशांचा गजर वातावरणात उत्साह भरत होता. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हातात 'मानवता की सच्ची मिसाल' आणि 'हिंद दी चादर' असे फलक घेऊन सामाजिक संदेश दिला.

      या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहिदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, रायगड उपजिल्हाधिकारी व नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, कोकण प्रांत प्रमुख महेंद्र रायचुरा, नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जसपाल सिंग सिध्दू, खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल, महाराष्ट्र राज्य शीख समितीचे चरणदिप सिंह (हॅपी सिंग), हिंद दी चादर कार्यक्रमाचे नवी मुंबई सचिव सुखविंदर धिल्लन आदींसह लोकप्रतिनिधी यांनी विशेष उपस्थिती लावून गुरुचरणी नतमस्तक होत कीर्तनात सहभाग नोंदवला. 

    यावेळी शीख, मोहयाल, बंजारा, सिकलीगर, लबाना, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तसेच भगत नामदेव संपद्राय या विविध समाज्याचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर भाविकांनी गुरुंच्या शहादतीचे स्मरण करत देशाच्या एकात्मतेचा आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश दिला. संपूर्ण आयोजनात प्रशासनाने वाहतूक, सुरक्षा आणि इतर सुविधांची योग्य व्यवस्था केल्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.

     हा समागम पुढील दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी रंगणार असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

       शालेय विद्यार्थ्यांकडून स्वागत

 रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारो शालेय विद्यार्थ्यांनी रांगा लावून शिस्तीत उभे राहत रथाचे भव्य स्वागत केले आणि गुरु ग्रंथ साहिबजींचे दर्शन घेतले.विद्यार्थ्यांनी केलेली फुलांची उधळण आणि त्यांचा उत्साह पाहून उपस्थित भारावून गेले. या संपूर्ण मार्गावर खारघरवासियांनी आपल्या घरांसमोर सडा-रांगोळी काढून नगर कीर्तनाचे जंगी स्वागत केले.

000000






 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंद दी चादर कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बस व चित्ररथास दाखलिला हिरवा झेंडा


नाशिक, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : खारघर, मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च, 2026 रोजी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम निमित्त कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या बस व चित्ररथास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून ओझर विमानतळ येथून मार्गस्थ केले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, माजी आमदार बाळासाहेब सानप, क्षेत्रीय समिती सहअध्यक्ष (बंजारा व लभाना समाज) रवींद्र गांगोले- नाईक, क्षेत्रीय समिती सहअध्यक्ष (शीख समाज) गुरमीतसिंग संधू, धर्म जागरण विभाग, जिल्हा समन्वयक संजय लढ्ढा आदी उपस्थित होते.

खारघर, मुंबई येथे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यकमास जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या 62 व 118 खासगी बसेसमधून भाविक जाणार आहेत.  

000000




 कानिफनाथ यात्रेत आरोग्य विभागाचा जागर; अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया तपासणीसाठी विशेष जनजागृती



हिंगोली(जिमाका), दि. 27  :  सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथील कानिफनाथ यात्रेचे औचित्य साधून अरुणोदय 'सिकलसेल ॲनिमियाबाबत विशेष जनजागृती करण्यात येत आहे. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाचा जागर करण्यात येत आहे. 

यावेळी ​जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्रीमती मनिषा वडकुते यांनी उपस्थित नागरिकांना सिकलसेल आजाराबद्दल माहिती दिली.

​सिकल सेल म्हणजे काय? हा एक रक्ताचा अनुवांशिक आजार असून, यामध्ये रक्तातील लाल पेशींचा आकार विळ्यासारखा होतो, ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते.

​लक्षणांची ओळख: सतत थकवा जाणवणे, सांधेदुखी, वारंवार आजारी पडणे हिमोग्लोबिनची कमतरता (ॲनिमिया) ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत.

​तपासणीचे महत्त्व: वेळेवर निदान झाल्यास या आजारावर योग्य उपचार करणे शक्य आहे.

​"सिकल सेल हा आजार टाळण्यासाठी आणि वेळीच तपासणी करून घेणे आवश्यक आहे. उपचार घेण्यासाठी आपली आरोग्य स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन सिकलसेलची मोफत तपासणी करून घ्यावी. यामुळे यात्रेत येणाऱ्या हजारो भाविकांपर्यंत आरोग्य संदेश पोहोचण्यास मदत होत आहे. सिकल सेलमुक्त हिंगोली, असा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.

*****

 गंभीर आजारांच्या रुग्णांना आता घरबसल्या मिळणार 'पॅलिएटिव्ह केअर' ची सेवा 



​हिंगोली(जिमाका), दि. 27 : जिल्ह्यातील गंभीर आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी आरोग्य विभागातर्फे 'पॅलिएटिव्ह केअर' कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील गाव स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक थेट रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी, उपचार आणि समुपदेशन करत आहे.

*​रुग्णांच्या दारी आरोग्य सेवा*

 या अभियानातून कर्करोग, अर्धांगवायू, मूत्रपिंडाचे आजार किंवा वृद्धत्वामुळे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना रुग्णालयात येणे शक्य होत नसते. अशा रुग्णांची होणारी परवड थांबवण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हिंगोली जिल्ह्यात गृहभेटी देऊन आरोग्य सेवा दिल्या जात आहेत.

समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत रुग्णांचा रक्तदाब, मधुमेह आणि इतर शारीरिक तपासणी करण्यात येत असून रुग्णांना आवश्यक असलेली औषधी घरपोच उपलब्ध करून दिली जात आहेत.


 *"शासनाचा आधार, संवेदनशील उपचार, सन्मानाने जगण्याचा नवा निर्धार!"*   

केवळ शारीरिक उपचारच नव्हे, तर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये यासाठी तज्ज्ञांमार्फत समुपदेशन केले जात आहे. हालचाल करू न शकणा-या रुग्णांना अशा​"गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचे आयुष्य सुसह्य करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 

​आरोग्य विभागाच्या या 'होम केअर' सुविधेमुळे दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळत आहे. *नागरिकांकडून समाधान व्यक्त* रुग्णालयात जाण्याचा खर्च आणि शारीरिक त्रास वाचल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या नव्या उपक्रमामुळे प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.

 

डॉ. कैलास शेळके 

जिल्हा आरोग्य अधिकारी

*****

विभागीय माहिती कार्यालयाच्या हिंद-दी-चादर निबंध व घोषवाक्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचार व कार्यावर आधारित निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. विभागीय माहिती कार्यालयाकडे शेकडो प्रवेशिका प्राप्त झाल्या. विद्यार्थी व खुल्या गटामध्ये घेण्यात आलेल्या या निबंध व घोषवाक्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर एका शानदार वातावरणात विभागीय माहिती कार्यालयात पार पडला. 


28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी नवी मुंबईतील खारघर येथे गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे महाराष्ट्र शासनाने आयोजन केले आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये विभागीय माहिती कार्यालयाने उपसंचालक प्रवीण टाके यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन केले होते. आज एका शानदार कार्यक्रमात मराठी भाषा अभ्यासक प्रा.डॉ. अरुण शिंदे, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष पत्रकार समीर देशपांडे, उर्दू व इंग्रजी भाषा अभ्यासक इनायत अली शेख, उपसंचालक प्रवीण टाके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.


*निबंध स्पर्धेसाठी खुल्या व विद्यार्थी गटातून मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधून निबंध व घोषवाक्य स्पर्धेसाठी शेकडो प्रवेशिका प्राप्त झाल्या. या स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे -*


 निबंध स्पर्धा (शालेय गट) प्रथम क्रमांक : आरती सागर नाईक (ज्योतिर्लिंग विद्यामंदिर, वडणगे, निगवे दुमाला, कोल्हापूर) द्वितीय : चेतना राजेंद्र चव्हाण (शां.कृ,.पंत वालावलकर हायस्कूल, कोल्हापूर), तृतीय : आसिया इरफान बहादूर (अँग्लो उर्दू हायस्कुल, औरवाड, ता. शिरोळ) तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी अक्षरा जयकुमार पाटील (महात्मा गांधी विद्यालय, रुकडी), जसविरसिंग पवित्रसिंग दुधानी (भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल, कोल्हापूर), अक्षरा विभिषण यादव (अनंतराव देसाई विद्यालय, पट्टणकोडोली- कोल्हापूर) या विद्यार्थ्यांनी पारितो‍षिक मिळविले. 


निबंध स्पर्धा (खुला गट)- प्रथम क्रमांक : दीपक सर्जेराव पाटील, कोल्हापूर,  द्वितीय : अक्षय अरुण नलावडे, कोल्हापूर, तृतीय सुनील नातू, बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी सत्यजित शरद शिंदे (मु. पो. सांगडेवाडी, ता. पलूस, जि. सांगली), वैष्णवी सुधाकर माळी ( मु. पो. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली), साहिल रघुनाथ कासार ( मु.पो.माणगाव कासारवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग)  यांनी पारितो‍षिक मिळविले. 


घोषवाक्य स्पर्धा (शालेय गट)  : प्रथम क्रमांक: रेहान रियाज बागवान (निवासी शाळा जत, जि. सांगली), द्वितीय : ईशा निलेश बळते (विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर),  तृतीय : अनुष्का मोरे (एसजीयु विद्यापीठ, हातकणंगले) तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पायल वाघ, (एम.एस. पटेल इंग्लिश मिडीयम हायस्कूल, कोल्हापूर),  सेजल सुनील परब (कलेश्वर विद्यामंदिर नेरुर, जि. सिंधुदुर्ग), शाहीद शेख (रमजान शेठ बालदार विद्यालय, शिरढोण) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.


घोषवाक्य स्पर्धा (खुला गट)- प्रथम क्रमांक : संजय  शामराव सौंदलगे, कोल्हापूर, द्वितीय :अनुराधा शरद व्हटकर, कोल्हापूर, तृतीय : डॉ.राधिका उदय पेंडसे यांनी तर  उत्तेजनार्थ क्रमांकासाठी मिनाज शरीफभाई बागवान, कोल्हापूर, उद्देश  सर्जेराव पाटील, पन्हाळा, कोल्हापूर व प्रदीप  राजाराम देवरुखकर, मु.पो. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांनी उत्तेजनार्थ पारितो‍षिक मिळवले.


यावेळी हिंद -दी -चादर श्री गुरुतेग बहादुर साहेब जी यांच्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या प्रसिद्धी विषयक उत्कृष्ट कामाबद्दल  सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक संचालक वृषाली पाटील, माहिती अधिकारी फारुक बागवान, तसेच लघुलेखक वृषाली कदम यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

0000000

विशेष लेख : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून सय्यद युनूस यांना जीवनदायी मदत

 

* उपचारांना मिळाली नवी दिशा

* ७३ रुग्णांना ९७ लाख रुपयांची मदत 


हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील  कुरुंदा येथील सय्यद युनूस हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिवसेंदिवस कष्ट करत कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांना अचानक मेंदूविकाराचा गंभीर आजार झाला आणि कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते.

घरची आर्थिक परिस्थिती  हलाखीची असल्याने  महागड्या उपचारांचा खर्च उचलणे कुटुंबासाठी अशक्य झाले होते. अशा कठीण प्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत त्यांना एक लाख रुपये इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. ही रक्कम थेट रुग्णालयात जमा झाल्यामुळे त्यांच्या उपचारांना तात्काळ गती मिळाली.

या मदतीमुळे सय्यद युनूस व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. "अचानक आलेल्या आजारामुळे आम्ही पूर्णपणे खचून गेलो होतो; मात्र शासनाच्या मदतीमुळे आम्हाला नव्याने आशा मिळाली," अशी भावना श्री. सय्यद यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. 

या सहाय्याबद्दल सय्यद युनूस सय्यद हमीद व त्यांच्या कुटुंबीयांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही योजना गरजू रुग्णांसाठी संजीवनी ठरत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा आधार देत आहे. हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत 73 रुग्णांना एकूण 56 लाख 95 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. 

गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठा खर्च होत असल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवते. अशा परिस्थितीत या निधीतून मिळणारी मदत रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासा देणारी ठरत आहे. मुख्यमंत्री सहायता कक्ष, हिंगोली यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गरजू रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य उपलब्ध होत असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. 

गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भोसले यांनी केले आहे.


संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली


****** 



राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती



हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी विविध योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली जिल्ह्यातील माथा, रुपूर, करवाडी, असोला तर्फे, गोळेगाव, भोसी आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

****** 



महिला व बाल विकास विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आढावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांचा व उपक्रमांचा सविस्तर आढावा बैठक आज संपन्न झाली.

यावेळी बालविवाह (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अन्वये आयोजित या बैठकीत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा कृती दल (Task Force – Covid-19), प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व योजना, बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल, सखी वन स्टॉप सेंटर, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, बाल कल्याण समिती, जिल्हा सनियंत्रण समिती, समुपदेशन केंद्र, महिला सक्षमीकरण उपक्रम तसेच चाइल्ड हेल्पलाइन 1098 व महिला हेल्पलाइन 181 यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती कार्यक्रमांचा तसेच मिशन वात्सल्य, एनसीपीसीआर पोर्टल, घर पोर्टल, पीएम केअर पोर्टल व गती शक्ती पोर्टलवर नोंदविण्यात येणाऱ्या माहितीचा आढावा घेण्यात आला. प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व योजना आणि बालविवाह निर्मूलनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची विविध माध्यमातून जनजागृती करावी. इयत्ता पहिली ते 10 वी पर्यंतच्या वर्गनिहाय विद्यार्थिनींची ट्रॅकींग करुन किती विद्यार्थी प्रवेशित आहेत. किती मुली शाळेत गैरहजर आहेत याची वर्षनिहाय माहिती सादर करावी. तसेच एप्रिल 2025 पासून आतापर्यंत धडक मोहीम राबवून सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली त्यांची माहिती द्यावी, अशा सूचना दिल्या. 

जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड हेल्पलाइन 1098 यांच्या माध्यमातून जिल्ह्यात बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी प्रभावी नियोजन करून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. आर. दरपलवार यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा सादर केला.

या बैठकीस जिल्हा संरक्षण अधिकारी नितीश मकासरे, विधी सल्लागार श्रीमती पराते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, चाइल्ड हेल्पलाइन 1098 चे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे तसेच महिला व बाल विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

***** 




नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गासाठी 284 उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध

 


हिंगोली (जिमाका), दि. 27 : नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई ‘गट-ड’ संवर्गातील 284 उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

 तसेच प्रतीक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची यादीही विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही सर्व यादी www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांनी ती पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अंतिम निवड यादीतील उमेदवारांचे समुपदेशन करून नियुक्ती देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील बहुउद्देशीय सभागृह (पाचवा मजला) येथे सोमवार, दि. 02 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

यासंदर्भातील सविस्तर माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

******

वसतिगृह प्रवेश अर्जासाठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ * विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : सन 2025-26 करिता राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची मागणी तसेच वसतिगृह प्रवेशासाठी अपेक्षित अर्ज संख्या प्राप्त न झाल्याने प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील (बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज करण्याचा कालावधी दि. 10 मार्च 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

स्वयंम व आधार योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शपथपत्र सादर करणे बंधनकारक असून, त्यामध्ये विद्यार्थी भाड्याने राहत असल्याबाबत, स्थानिक रहिवासी नसल्याबाबत, शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतल्याबाबत, आई-वडिलांसोबत राहत नसल्याबाबत तसेच शिक्षण घेताना कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करणार नसल्याबाबतची प्रतिज्ञापत्रे सादर करावी लागतील.

शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही गुणवत्तेनुसार किंवा क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जाणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी शासनाने दिलेल्या मुदतीत दि. 10 मार्च 2026 या पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे.

*******

 विज्ञानवारीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला हिरवी झेंडी दाखवून रवाना


* आयुका पुणे येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन



हिंगोली (जिमाका), दि. 26 : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील 46 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संशोधन संस्था आयुका, पुणे येथे शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी जाणाऱ्या ‘विज्ञानवारी’ बसला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी नामदेव केंद्रे, गटशिक्षणाधिकारी दत्ता नांदे, केंद्रप्रमुख, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होऊन भविष्यात संशोधन क्षेत्राकडे वळण्यासाठी या विज्ञानवारीचा उपयोग होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

ही सहल 27 व 28 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली असून, हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या जागतिक दर्जाच्या इंडिया प्रयोगशाळेची मातृसंस्था असलेल्या आयुका येथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैज्ञानिक कार्यपद्धतीची ओळख होणार आहे. हा उपक्रम हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, संशोधन वृत्ती वाढीस लागावी आणि शास्त्रज्ञांच्या कार्याची जवळून ओळख व्हावी, या उद्देशाने या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विज्ञानाधिष्ठित समाज निर्मितीस निश्चितच चालना मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

**