* गणिताचा पेपर शांततेत पार पडला
हिंगोली (जिमाका), दि. 22 : हिंगोली जिल्ह्यात दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 12 वीच्या गणित विषयाची परीक्षा शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील विद्यानिकेतन माध्यमिक शाळा परीक्षा केंद्रावर तब्बल दोन तास थांबून परीक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.
परीक्षा केंद्रांवरील शिस्त, व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. परीक्षा गैरप्रकारमुक्त, शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन, शिक्षण विभाग व संबंधित यंत्रणांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्ह्यातील एकूण 40 परीक्षा केंद्रांवर गणित विषयाची परीक्षा पार पडली असून ती कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत झाली. या परीक्षेसाठी नोंदणीकृत 5 हजार 672 विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 558 विद्यार्थी उपस्थित होते, तर 114 विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला होता. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सर्व परीक्षा केंद्रांवरील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात आले.
एकूणच, इयत्ता 12 वी गणित विषयाचा पेपर जिल्ह्यात शांततापूर्ण, शिस्तबद्ध व सुरळीतरीत्या पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
*******



No comments:
Post a Comment