24 August, 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत
शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून अर्ज भरण्याचे आवाहन
-- जिल्हाधिकारी अनिल भंडारी

            हिंगोली, दि. 24: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र आणि सी. एस. सी. सेवा केंद्रावर ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे.
राज्य शासनाची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी ग्रामपंचायतींच्या ठिकाणी 378 ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ( ASSK) ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. तसेच सदर ( ASSK) केंद्रामधील 200 केंद्रावर बायोमॅट्रीक मशिन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. 
            जिल्ह्यात आतापर्यंन्त एकूण 32 हजार 131 शेतकऱ्यांची आपले सरकार या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच यापैकी एकूण 27 हजार 134 अर्ज आपले सरकार या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेले आहेत.
            तसेच दिनांक 23 ऑगस्ट, 2017 पासून भरलेल्या अर्जात दुरुस्ती ( Edit Mode) करण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत देण्यात आलेली आहे. मयत व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना कर्जमाफीचा अर्ज भरता येईल.
            जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र आणि सी. एस. सी. केंद्रास भेट देवून ऑनलाईन अर्ज सादर करावेत. जेणेकरुन शेवटच्या दिवसांमध्ये अर्ज भरण्यामध्ये गर्दी होणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे.

*****
पुर परिस्थितीत नागरीकांनी काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन
      नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हिंगोली, दि. 24 : नागरीकांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्यापुर आपत्तीपासून स्वतःचा बचाव करावा याबाबत जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आवाहन केले आहे. राज्यात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत असून नद्यांची पात्रे भरून वाहत आहेत यामुळे नद्यांना पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास अनुसरून नदी/नाले/ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावांसाठी उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
काय करावे : 1) गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पुराबाबतपूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. 2) गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. 3) गावात/घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या. 4) पुर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवा. 5) घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा. 6) कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्या. 7) पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. तसेच घाबरून जाऊ नका, सरकारी सुचनांचे पालन करा.
काय करू नये : 1) पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका. 2) पुराच्या पाण्यात चुकुनही जावू नका, तसेच पुर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करून नका. 3) दुषित/उघड्यावरील अन्न पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.) 4) सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या व विद्युत तारांना स्पर्श होऊ देऊ नका.

*****  
गट शेती योजनेसाठी शेतकरी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन
              हिंगोली, दि. 24 : एका समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील संलग्न भौगोलिक  क्षेत्रामध्ये सामूहिकरित्या नियोजनबद्ध शेती करणे, शेतमालावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे, एकत्रित साठवण करणे, एकत्रित विपणनासाठी सामूहिक सुविधा निर्माण करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम व्यवसाय, दुग्धव्यवसाय  या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे ही नवीन योजना राबविण्याचे ठरवले आहे.
त्यानुषंगाने जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपले अर्ज आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात दि. १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****  
नेत्रदान पंधरवडा शिबीराचे आयोजन
हिंगोली, दि. 24 : प्रतिवर्षी नेत्रदान पंधरवडा हा दि. 25 आगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येतो. या पंधरवाड्यात ज्या नागरिकांनी जिल्हा रुग्णालय हिंगोली व अधिनस्त रुग्णालये येथे जावून नेत्रदान संमती भरुन द्यावे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम व जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यात राबविल्या जाणाऱ्या 32 वा नेत्रदान पंधरवडा शिबीराचे आयोजन समारंभ दि. 25 ऑगस्ट, 2017 ते दि. 08 सप्टेंबर, 2017 या कालावधीत रविवार वगळून साजरा होत आहे.
नेत्रदान पंधरवडा साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे नेत्रदान संमती पत्र भरुन घेणे व नेत्रदानाविषयी माहिती देणे तसेच नेत्रविकार नेत्र विकाराचा प्रतिबंध निदान आणि व्यवस्थापन करणे हा हेतु आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी कळविले आहे.

***** 
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत
 बीजभाडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 24 : महाराष्ट्रातील ज्या जातीजमातींच्या सुशिक्षित बेरोजगारासाठी कर्ज योजनेबाबत कोणतेही महामंडळ उपलब्ध नाही, अशा खुल्या प्रवर्गातील जाती / जमातीसाठी हिंगोली जिल्ह्याचे रहिवासी असणाऱ्या 18 ते 45 या वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही बीजभाडवल कर्ज योजना आहे. यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना जास्तीत-जास्त रु. 5 लक्ष इतक्या रक्कमेएवढे कर्ज देण्यात येते. यामध्ये 60 टक्के हिस्सा दत्तक बँकेचा, 35 टक्के हिस्सा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा तर 5 टक्के हिस्सा स्वत:चा असावा.
सदरील योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यासाठी सन 2017 साठी 80 कर्जप्रकरणे मंजूर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गरजूंनी सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahaswayam.in या वेबपोर्टलवर लॉग इन करावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नोडल अधिकारी हिंगोली यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, हिंगोली येथे संपर्क साधावा.

*****
नगर परिषद/नगर पंचायत येथील तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द

            हिंगोली,दि.24: जिल्हाधिकारी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणात नगर परिषद वसमत येथील नगर परिषद सदस्स्या श्रीमती अनिसा बेगम मोहमद असगर, यांना दि. 12 सप्टेंबर, 2001 नंतर एकूण मुलांच्या संख्येमध्ये भर पडून ती दोनपेक्षा जास्त झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्र नगरपरिषद/नगरपंचायती औद्योगीक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 (1) (ट) अन्वये, तर कळमनुरी नगर परिषद येथील तत्कालीन नगर परिषद सदस्य श्री. अरविंद कोंडबाराव बेंद्रे (पाटील) यांना आरक्षित जागेवर अनाधिकृत बांधकाम केलेले आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नगरपरिषद/नगरपंचायती औद्योगीक नगरी अधिनियम 1965 चे कलम 44 (1)(ड) अन्वये आणि सेनगांव नगर पंचायत येथील नगर पंचायत सदस्या श्रीमती शिल्पा निलेश तिवारी यांनी कर्तव्य बजावीत असताना निविदा स्विकृतीसाठी त्यांच्या पतीच्या बाजूने ठरावामध्ये मतदान केले त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नगरपरिषद/नगरपंचायती औद्योगीक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 (3) खंड (ख) व कलम 44 (1) खंड (ख) अन्वये सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

23 August, 2017

जिल्ह्यात नवीन 61 सजांची निर्मिती


हिंगोली, दि.23: जिल्ह्यात महसूल प्रशासनातील क्षेत्रीय यंत्रणेतील महसूल सजांची पुनर्रचना, नवीन सजा निर्मिती करण्यात येणार असून, जिल्ह्यात 61 नवीन तलाठी सज्जे निर्माण होणार आहेत. महसूल सजांची पुनर्रचना, नवीन सजा निर्मिती व तलाठीची होणारी वाढ यामुळे महसूल विभागात कामकाज वेगाने होण्यास मदत होणार आहे.
या नव्या सजांच्या पुनर्रचना व नवीन सजा निर्मिती करण्यात येणार असल्यामुळे तलाठ्याकडील अतिरिक्त कार्यभार कमी होऊन कामाकाजाला गती प्राप्त होण्यास मदत होणार आहे. याकरीता जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 4 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली असून ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून 31 ऑगस्ट, 2017 पर्यंत शासकीय वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. अधिसूचनेबाबत कोणत्याही प्रकारच्या हरकती, सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात 31 ऑगस्ट, 2017 पर्यंत संबंध‌ित तहसील कार्यालयात दाखल कराव्या लागणार आहे. उशीरा दाखल केलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


*****