22 June, 2018


बँकांनी उद्दिष्टानुसार पीक कर्ज वितरण पूर्ण करावे
-- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली,दि.22: जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना           बि-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पीक कर्जाच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत देण्यात येते. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पीक कर्ज वितरण करण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांनी आपल्या उद्दिष्टानुसार पीक कर्जाचे वितरण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मार्च तिमाही अखेरची जिल्हा समन्वय समितीची आणि पीक कर्ज आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व बँकांचे नोडल अधिकारी आणि भारतीय स्टेट बँकेच्या ज्या शाखांचे कर्ज वाटप कमी आहे, त्या बँकांचे शाखाधिकारी उपस्थित होते.
पिक कर्ज वितरणाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले,  जिल्ह्यात एकूण 9 हजार 402 शेतकऱ्यांना 47.53 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या केवळ 5 टक्के पिक कर्जाचे वाटप झाले असून बँकांनी शेतकऱ्यांप्रती सहानूभुती दाखवावी. पीक कर्ज वितरणाची गती वाढवावी.  जिल्ह्यातील सर्व बँकांनी सर्व उपस्थित शाखाधिकाऱ्यांना पिक कर्जाचे उद्दिष्ट लवकरात-लवकर जून 2018 अखेर पुर्ण करावे.
या बैठकीमध्ये पिक कर्जाव्यतिरिक्त priority क्षेत्र वाटप (mudra), कर्जमाफी वाटप आणि कर्जमाफी झालेल्या लोकांना दिलेले नवीन पिक कर्ज वाटप याचा आढावा घेण्यात आला. दरम्यान 1 एप्रिल 2018 पासुन जिल्ह्यात एकूण 4 हजार 745 सभासदांना 17.13 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी बँकांची ठेवी आणि कर्ज अनुपात याचा आढावा घेतला. ज्यांच्या ठेवी जास्त आणि कर्ज वाटप कमी अशा बँकांना कर्ज वाटप वाढविण्याचे आदेश देण्यात आले.
जिल्ह्यातील विविध विकास महामंडळांनी बँकांना दिलेल्या 2017-18 साठीच्या उद्दिष्ट पुर्तीचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात अल्पसंख्यांकांना होणाऱ्या कर्ज वाटपाचा देखील आढावा बैठकीमध्ये घेतला. यावेळी बँकांचे प्रतिनिधी, संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****

जिल्ह्यात 24 तासात सरासरी 4.30 मि.मी. पावसाची नोंद


जिल्ह्यात 24 तासात सरासरी 4.30 मि.मी. पावसाची नोंद

हिंगोली, दि. 22 : जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 22 जून, 2018 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील  24  तासात एकुण 21.51 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्ह्यात दिवसभरात सरासरी  4.30  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 158.00 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर एकुण 17.70 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात  शुक्रवार दि. 22 जून, 2018 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 16.71  (153.39), वसमत - 2.14 (200.27), कळमनुरी - 00.33 (176.67), औंढा नागनाथ - 00.00  (117.50) , सेनगांव - 02.33 (142.15) आज अखेर पावसाची सरासरी 33.32 नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांनी कळविले आहे.
*****

21 June, 2018

रासायनिक खतांची विक्री पॉस मशिनव्दारे करण्याचे आवाहन


रासायनिक खतांची विक्री पॉस मशिनव्दारे करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.21:  जिल्ह्यातील सर्व परवानाधारक रासायनिक खत विक्रेत्यांनी केंद्र शासनाच्या DBT धोरणानुसार PoS मशिनद्वारे रासायनिक खतांची विक्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सद्यस्थितीत हिंगोली जिल्ह्यात PoS मशिन उपलब्ध झालेल्या असुन ज्या परवानाधारक रासायनिक खत विक्रेत्यांनी अद्याप PoS मशिन घेतली नाही त्यांनी त्वरीत खाली नमुद कागदपत्रांसह कृषि विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली येथे संपर्क साधुन तात्काळ PoS मशिन घेवुन जावी. PoS मशिन न घेतलेल्या परवानाधारक कृषि निविष्ठा विक्रेत्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल.
पॉस मशिन साठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे : 1) वैध रासायनिक खत विक्री परवान्याची झेरॅाक्स प्रत. 2) Retailer ID क्रमांक. 3) आधार कार्ड झेरॅाक्स प्रत. 4) PAN कार्ड झेरॅाक्स प्रत. 5) रा. खत विक्री केंद्राचे Letter Pad शिक्क्यासह (दोन प्रतीत). 6) GST नोंदणी प्रमाणपत्र. 7) नजिकच्या काळातील एक Passport Photograph. 8) रा. खत विक्रीची अद्यावत साठा नोंद वही.
वरील नमुद कागदपत्रांसह परवानाधारक रा. खत विक्री केंद्राच्या प्रोप्रायटरने समक्ष हजर राहुन व PoS मशिनवर रजिस्ट्रेशन नोंदणी करुनच PoS मशिन घेवुन जावे. तसेच सर्व रा. खत विक्रेत्यांना आवाहन करण्यात येते की यापुढे सर्व अनुदानाची रा. खतांची विक्री PoS मशिनद्वारेच करण्यात यावी. व त्यावर विक्री झालेल्या रा. खतांच्या नोंदी अद्यावत घेण्यात याव्यात. जे परवानाधारक रा. खत विक्रेते PoS मशिनचा वापर करणार नाहीत त्यांनी PoS मशिन सुस्थितीत कृषि विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली कार्यालयात जमा करावीत. अन्यथा सदरील कृषि निविष्ठा धारकावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे कृषि विकास अधिकारी श्री. डुबल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

लहान मुलांच्या शौर्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


लहान मुलांच्या शौर्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
        हिंगोली,दि.21: लहान मुलांच्या शौर्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार योजना 60 वर्षापुर्वी 1957 ला सुरू करण्यात आली. या अंतर्गत एक मुलगा एक मुलगी यांना त्यांच्या समचसुचकतेसाठी सन्मानित केले जाते.
            सदर पुरस्कार देण्यामागचा मुख्य उद्देश हा की, मुलांनी केलेल्या कार्यास प्रोत्साहन मिळावे व त्याप्रमाणे इतरांनीही त्यांचे अनुकरण करावे. या पुरस्कारासाठी सर्व विभागाकडून माहिती मागविली जाते तसेच पोलीस विभागाकडून ही माहिती घेतली जाते. सदर पुरस्कारासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविले जातात. अर्जासोबत 250 शब्दात केलेल्या कार्याचे विवरण देणे अपेक्षित आहे. तसेच नामांकन अर्जासोबत जन्माचा दाखला सदरची बातमीचे कात्रण तसेच पोलीसाचा प्रथम खबरी अहवाल किंवा पोलीस डायरीतील नोंद या बाबींची पुर्तता होणे आवश्यक आहे. तसेच सदर घडलेल्या घटनेचा अहवाल हा सदर्भीय विभागाने शहानिशा करून देणे अपेक्षित आहे.
सदर पुरस्कार हा फक्त 6 ते 18 वयोगटातील मुलगा किंवा मुलगी यांना देण्यात येईल. या नामांकनासाठी पुढील 2 व्यक्तींची शिफारस आवश्यक आहे. 1) अर्जदार ज्या शाळेत शिक्षण घेत आहे. त्या शाळेचे मुख्याध्यापकांनी शिफारस करावी. 2) मुलांच्या विकासासाठी कार्यरत एखाद्या कमिटीचे अध्यक्ष किंवा सदस्य सचिवांनी शिफारस करावी. 3) जिल्हाधिकारी / जिल्हा न्यायदंडाधिकारी / समान स्तरावरील इतर शासकीय संस्था यांनी शिफारस करावी. 4) पोलीस अधिक्षक / सदर कार्यक्षेत्राचे पोलीस अधिक्षक किंवा त्यापेक्षा उच्चस्तरीय पोलीस अधिकारी यांनी शिफारस करावी.
            सदर घटना ही दि.  1 जुलै, 2017 ते 30 जून, 2018 या कालावधीत घडलेली पाहीजे तेव्हा अर्ज 2017 च्या पुरस्कारासाठी ग्राह्य राहील. सदर अर्ज करण्याचा शेवटचा दि. 30 सप्टेंबर, 2018 पर्यंत आहे. निवड प्रक्रिया ही उच्चस्तरीय समितीकडून केली जाईल. समितीने एकदा नाकरलेले प्रकरण परत विचाराधीन राहणार नाही.
            अर्ज केल्याने निवड होईलच यांची शाश्वती धरु नये योग्यतेनुसार अर्जाची छाननी करण्यात येईल. सदर सर्व प्रक्रियेबाबतची माहिती वेबसाईट www.iccw.co.in या संकेतस्थळावर मिळेल व आपले अर्ज iccw.delhi@gmail.comiccw@bol.net.in यावर पाठवावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

हिंगोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


हिंगोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा



हिंगोली, दि.21 : शरीर, मन, आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी योग हा अतिमहत्त्वाचा असून, आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. हिंगोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, जिल्हा प्रशासन आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या उपस्थितीत संपन्न्‍ झाला.
या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, सेनगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, पतंजली योग समितीचे अध्यक्ष दत्तराव लेकुळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी योग प्रशिक्षक बालाजी जाधव यांनी योग दिनामध्ये सहभाग झालेल्या प्रत्येकाने आपले मित्र व कुटुंबीयांना योगाचे महत्त्व समजावून सांगावे. तसेच योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन केले. तसेच  सहभागी अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिकांनी श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार योगासने व प्राणायामाचे विविध प्रकार केले.

*****

19 June, 2018

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगदिनाचे आयोजन


आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगदिनाचे आयोजन
हिंगोली, दि. 19:-   संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय  योगदिन  म्हणून घोषित  केलेला आहे . 5000 वर्षाहून अधिक  परंपरा असणारी  योगविद्या  ही भारताने  जगाला  दिलेली देणगी  आहे. व्यक्तीच्या शारिरीक  आणि आत्मिक  विकासासाठी  योगविद्या  सहाय्यभूत  आहे . हिंगोली  जिल्ह्यात  जिल्हा प्रशासन , जिल्हा क्रिडा  अधिकारी  कार्यालय , शिक्षणाधिकारी  प्राथमिक / माध्यमिक व पतंजली योगपीठ, हिंगोली  यांच्यावतीने  चौथ्या  जागतिक  योगदिनाचे  आयोजन  हे तीन  योजिले असून  दिनांक 19 जून रोजी योग शिबीराचे उद्घाटन  होणार असून  दिनांक  20 जून रोजी  हिंगोली शहरात  योगाचा प्रचार व प्रसार  होण्याकरिता  योगदिंडीचे आयोजन सकाळी 7.00 वा . शहरातील  विविध  मार्गातून  करण्यात  येणार आहे . दिनांक 21 जून 2018  रोजी जिल्हा परिषद प्रशाला , हिंगोलीच्या मैदानावर सकाळी 6.00 वा. आंतरराष्ट्रीय  योगदिनाचे  आयोजन  मान्यवरांच्या व योगसाधक  विद्यार्थी  यांच्या उपस्थितील  संपन्न होईल.  तसेच या आयोजनामध्ये पावसाचे  व्यत्यय  आल्यास पर्यायी  व्यवस्था म्हणून  नगर पालिकेचे कल्याण मंडपमची व्यवस्था  करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय  योगदिनाच्या निमित्ताने  योगदिनास  सहभागी होण्यासाठी  हिंगोली  जिल्ह्यातील  सर्व क्रीडा प्रेमी, योग साधक, अधिकारी, कर्मचारी  क्रीडा मंडळे, महिला मंडळे , विविध खेळ संघटना , सामाजिक  संघटना  , युवक संघटना , शाळा , महाविद्यालय  यांना आवाहन  करण्यात येत आहे की त्यांनी या योगदिनानिमित्त  दिनांक 21 जून 2018 रोजी मोठ्या प्रमाणात  सहभागी होऊन या योगदिनाचा  लाभ घ्यावा . या योगदिनामध्ये  सर्वांसाठी योग, योगाचे महत्व  , आरोग्यासाठी योग प्रात्यक्षिकासह  आयोजन करण्यात येणार असून  तज्ञमार्गदर्शकांचे  मार्गदर्शनही लाभणार आहे.
            करिता  आंतरराष्ट्रीय  योगदिनानिमित्त सर्वांनी  उपस्थित राहून या आंतरराष्ट्रीय  योगदिनाचा लाभ  घ्यावा , असे आवाहन  शिक्षणाधिकारी श्री. सोनटक्के आणि  जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. पवार यांनी केले आहे . 00000

बालकल्याण समितीची स्थापना

बालकल्याण समितीची स्थापना
        हिंगोली, दि. 19:-  बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2015 ची अंमलबजावणी  करण्यात येते . या अधिनियमातील कलम 29(1) नुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या  बालकांच्या प्रकरणी  त्यांच्या पुनर्वसन व सामाजिक पुन:स्थापनासाठी  निर्णय घेण्याचे  अधिकार  अधिनियमातील कलम 27(1) नुसार स्थापन करण्यात  आलेल्या बाल  कल्याण समितीस आहेत. त्यामुळे  काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक समिती समोर सादर होऊन  त्या बालकास  अधिनियमाच्या कलम 50 (1) अन्वये  स्थापन करण्यात  आलेल्या  बालगृहात  दाखल करण्याचे अधिकार बाल कल्याण समितीस आहेत व कलम 27(8) नुसार मा.जिल्हाधिकारी  तथा जिल्हा  न्यायदंडाधिकारी  यांना बाल कल्याण समितीचा  त्रैमासिक  आढावा घेण्याचे अधिकार आहेत. हिंगोली जिल्ह्यात  बाल न्याय  (मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2015 नुसार नवीन बाल कल्याण  समिती नियुक्त झाली  असून सदर च्या  नवनियुक्त  बाल कल्याण  समितीची प्रथम बैठक  दिनांक 8 जून 2018 रोजी सायं. 5.00 वाजता जिल्हाधिकारी , हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
            हिंगोली जिल्ह्याच्या नवनियुक्त बाल कल्याण समितीचे अध्यक्ष श्री. अभय कुमार भरतीया (मो. 7020430520) व इतर 3 सदस्य  पुढीलप्रमाणे आहेत- श्रीमती जया  करडेकर (मो.9850076835) श्री. संभाजी माने (मो.9822991143) आणि श्री. विक्रम जावळे (मो.9850377020)  हे आहेत. बाल कल्याण समितीचे कामकाज आदर्श कॉलेज  जवळ , सावरकर नगर , हिंगोली येथून चालते . अनाथ , काळजी व संरक्षणाची गरज  असलेल्या मुलांबाबत  आवश्यक  असल्यास बालकल्याण समितीस वरील पत्यावर संपर्क साधावा असे आवाहन  जिल्हा महिला व बालविकास  अधिकारी श्री. शिंदे यांनी केले आहे.
000000