22 May, 2019

मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज


मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

हिंगोली,दि.22:  हिंगोली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी गुरुवार दि. 23 मे रोजी लिंबाळा एमआयडीसी परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी 7 वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रुम) उघडण्यात येणार असून प्रत्यक्ष मतमोजणीला 8 वाजता सुरूवात होणार आहे. सकाळी 8.00 वाजता सर्व ई.व्ही.एम. मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे. यात एकूण 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामध्ये मतदारसंघ क्रमांक (कंसात फेऱ्यांची संख्या) 82-(25), 83-(24), 84-(27), 92-(27), 93-(25), 94-(25) याप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. 
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीसाठी आयोगाने दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली असून विधानसभा मतदारसंघ क्रमांक 82-उमरखेड, 83-किनवट, 84-हदगांव या मतदारसंघासाठी डॉ. जे. रवीशंकर यांची तर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 92-वसमत, 93-कळमनुरी, 94-हिंगोली या मतदारसंघासाठी उमेशकुमारअग्रवाल यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मतमोजणी प्रक्रियेत 98 मतमोजणी सहायक, 98 मतमोजणी पर्यवेक्षक, 110 सुक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघासाठी 14 टेबलवर 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार व्हीव्हीपॅट मधील मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे. 
यावर्षी 5 हजार 812 टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये 768 सैनिकांच्या मतपत्रिका असून उर्वरीत मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मतपत्रिकांचा समावेश आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी पोलीस अधिक्षक योगेशकुमार यांच्या अधिपत्याखाली एक अप्पर पोलीस अधिक्षक, तीन पोलीस उपअधिक्षक असे एकूण सुमारे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. 
*****

20 May, 2019

मतमोजणी विषयक माहिती व तक्रारीसाठी ‘1950’ हेल्पलाईन


मतमोजणी विषयक माहिती व तक्रारीसाठी ‘1950’ हेल्पलाईन

हिंगोली,दि.20: भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करिता प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी हिंगोली येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे गुरुवार, दि. 23 मे, 2019 रोजी 82- उमरखेड मतदार संघात 14 टेबल, 83- किनवट-14 टेबल, 84-हदगांव -12 टेबल, 92- वसमत-12 टेबल, 93- कळमनुरी-14 टेबल, 94- हिंगोली -14 टेबल  तसेच पोस्टल बॅलेट चे 4 टेबल  तर ईटीपीबीएस चे तीन टेबल वरुन मतमोजणी होणार असून मतमोजणीची प्रक्रीया सकाळी 8.00 वाजेपासून सुरु होणार आहे.
मतमोजणी विषयक माहिती आणि तक्रारीसाठी ‘1950’ क्रमांकाची हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असून, हि सुविधा मतमोजणीच्या पुर्वी 72 तासापासून कार्यरत होणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रूचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
*****

17 May, 2019

*राज्यातील तापमानात वाढ होणार* वाढत्या तापमानापासून लोकांनी काळजी घ्यावी


*राज्यातील तापमानात वाढ होणार*
वाढत्या तापमानापासून लोकांनी काळजी घ्यावी

मुंबई, दि 17: राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे २५ मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील. या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशापर्यंत पोहचेल. उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान ४२ अंशाच्या आसपास राहील असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. १८ ते २१ मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
000000


16 May, 2019

अधिग्रहन केलेल्या बोअर व विंधन विहीरींचे देयके त्वरीत पारीत करावेत -- पालक सचिव नितीन गद्रे


अधिग्रहन केलेल्या बोअर व विंधन विहीरींचे देयके त्वरीत पारीत करावेत
           -- पालक सचिव नितीन गद्रे

हिंगोली, दि. 16 : टंचाईच्या परिस्थीतीत अधिग्रहन केलेल्या बोअर व विंधन विहीरींचे देयके त्वरीत पारीत  करण्याची सूचना लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव तथा हिंगोली जिल्ह्याचे पालक सचिव नितीन गद्रे यांनी केली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीत श्री. गद्रे बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री.  दाताळ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील,  सर्व तालुक्याचे तहसिलदार व गट विकास अधिकारी, यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी पालक सचिव श्री. गद्रे म्हणाले की, टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील सद्यस्थितीत अधिग्रहन केलेल्या बोअर व विंधन विहरींची पुन:तपासणी करुन तात्काळ सद्य:स्थितीचा आढावा घेवून त्वरीत उपाययोजना कराव्यात. तसेच जिल्ह्यातील टंचाईच्या काळात रोजगार हमी योजनेची विहीरींचे कामे वगळता नाला बांध, गाळ काढण्याची कामे , तलाव खोद कामे इत्यादी कामे राबवून नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे असेही श्री. गद्रे यावेळी म्हणाले.  
            पालक सचिव श्री. गद्रे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती पाहणी दौ-याअंतर्गत ज्या गावांना भेट दिली तिथे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेमार्फत टंचाईबाबत करण्यात आलेल्या नियोजनाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच प्रशासनामार्फत टंचाईच्या विविध कामांची शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची माहिती त्वरीत माझ्याकडे सादर करावी, अशी सूचनाही यावेळी त्यांनी दिली.
            प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार यांनी पॉवर पॉईंट प्रेझेनटेशनद्वारे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा, सन 2018 मधील खरीप पिकांच्या सुधारीत पैसेवारीचा गोषवारा, जिल्ह्यातील पाणी टंचाई आराखडा, तालुका निहाय टँकर व अधिग्रहन, पशुधनास आवश्यक वैरण उपलब्धतेविषयी सविस्तर माहिती दिली.
            पालक सचिव श्री. गद्रे यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांची पाहणी करतांना सिरसम खु, पेडगांव वाडी, कणका, कोंडुर, हातमाली व उमरखोजा या गावांना भेटी देवून तेथील ग्रामस्थांशी संवाद साधुन सद्य:स्थितीत पाण्याची उपलब्धता, टँकर आणि अधिग्रहण करण्यात आलेल्या बोअर-विहिरींची माहिती  घेतली.
*****

15 May, 2019

टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने केले नियोजन



टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने केले नियोजन

हिंगोली,दि.15 : राज्यात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून, त्यावरील उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिनांक 9 व 10 मे 2019 रोजी  जिल्ह्यात टंचाईग्रस्त परिस्थितीचा पाहणी दौरा करुन नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आवश्यकतेनुसार पाणी टंचाई दूर करण्याकरिता सूचना दिल्या होत्या .
तसेच दिनांक 12 मे रोजी विविध वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई  संदर्भात हिंगोली तालुक्यातील  मौ. जयपूरवाडी  येथे पाण्याच्या टँकरची एक फेरी  व मौ. माळसेलू येथील 12 हजार लीटर क्षमतेचे टँकर मार्फत दररोज 3 फेऱ्या करुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच मौ. येहळेगाव सोळंके ता. औंढा ना. येथे 2 टँकर द्वारे 5 फेऱ्या सुरु आहेत.तसेच मौ. शिवणी खु. ता. कळमनुरी येथे 1 टँकर द्वारे दररोज 2 फेऱ्या मंजूर करण्यात येऊन नगर पालिका येथील पाणी शुध्दीकरण प्लांट वरुन सदर टँकर ला पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणेबाबत संबंधित गट विकास अधिकारी पं.स. कळमनुरी व मुख्याधिकारी न.प. कळमनुरी यांना कळविण्यात आले आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील टंचाई ग्रस्त 39 गावे व तांड्यांना 52 टँकरद्वारे व 346 गावांमध्ये 415 विहिर व बोअर अधिग्रहण करुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच 44 गावांमध्ये नळ योजना विशेष दुरुस्ती च्या प्रस्तावांना , 8 गावांमध्ये तात्पुरती पुरक नळ योजनेच्या प्रस्तावांना, 136 नवीन विंधन विहीरींच्या प्रस्तावांना टंचाई अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.
 तसेच सर्व संबंधित विभागांना टंचाई अंतर्गत अधिग्रहण, टँकर मंजुरीच्या प्रस्तावाना  प्रलंबित  न ठेवता तात्काळ मंजुरी देणे बाबत सूचना  देण्यात आल्या आहेत. तसेच शहरी व ग्रामीण भागाकरिता पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणांमध्ये आवश्यकतेनुसार  दिनांक 15 जुलै 2019 पर्यंत पुरेल इतक्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000000

14 May, 2019


आपत्तीच्या परिस्थितीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे
- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी


हिंगोली, दि. 14 : येणा-या मान्सून ऋतुचा विचार करता व जिल्ह्यातील पुरप्रवण 70 गावे गृहीत धरुन सर्व विभागांनी परस्परात समन्वय ठेवून कामे करण्याची सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सून पुर्वतयारी बैठकीत श्री. जयवंशी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक कीशोर श्रीवास, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहीत कंजे आदिसह सर्व विभागांचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. जयवंशी म्हणाले की, तालुकास्तरावर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी नियंत्रण कक्ष स्थापन करुन तालुका आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा व या आराखड्यात पुरप्रवण गावांचा समावेश करावा. तसेच पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशन निहाय अधिकारी यांचे नावे व भ्रमणध्वनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास विहीत नमुन्यात सादर करुन तालुका निहाय तयार करण्यात आलेले शोध व बचाव पथक अद्ययावत करण्याची सुचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली.
            आरोग्य विभागानेही नियंत्रण कक्ष स्थापन करुन आपत्ती व्यवस्थापन करिता नोडल ऑफीसरची नियुक्ती करावी व तसा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास त्वरीत सादर करावा. तसेच जिल्हा परिषदेनेही आपल्या अंतर्गत येणा-या  आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याची सुचनाही यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
            नगरपालीका प्रशासनास सुचना देतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, नगरपालिका प्रशासनानेही नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करुन , अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावीव आपत्ती व्यवस्थापन करीता नोडल ऑफीसरची नियुक्ती करावी. वस्तीमध्ये पाणी शिरणार नाही याकरीता योग्य ते नियोजन करुन शहरातील नाल्याची दुरुस्ती करावी जेणेकरुन शहरामध्ये पाणी तुंबणार नाही व पाण्याचा विसर्ग होण्यास मदत होईल असेही जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले.
            रेल्वे प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भारत संचार निगम लिमिटेड, राज्य राखीव पोलीस दल क्र. 12, गृहरक्षक दल या बरोबरच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत असणा-या विभागांनाही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी सुचना देतांना, आपत्ती व्यवस्थापासंबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्याचा दुरध्वनी क्रमांक 02456-222560 तर टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधण्याचेही त्यांनी सांगितले.
            यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन परिस्थीतीत काय करावे व काय करु नये? यासंबंधीत लघुपटाचे उद्घाटन करण्यात आले. 

*****


23 मे रोजी सकाळी 8.00 वाजता मतमोजणीस होणार प्रारंभ




23 मे रोजी सकाळी 8.00 वाजता मतमोजणीस होणार प्रारंभ

हिंगोली, दि.14: 15- हिंगोली लोकसभा निवडणुक मतदार संघातील उमेदवार / उमेदवार यांचे प्रतिनिधी यांना मतमोजणी संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आज संबंधितांची बैठक घेण्यात आली . या बैठकीत संबंधितांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी 82- उमरखेड मतदार संघात 14 टेबल, 83- किनवट-14 टेबल, 84-हदगांव -12 टेबल, 92- वसमत-12 टेबल, 93- कळमनुरी-14 टेबल, 94- हिंगोली -14 टेबल  तसेच पोस्टल बॅलेट चे 4 टेबल  तर ईटीपीबीएस चे तीन टेबल वरुन मतमोजणी होणार असून मतमोजणीची प्रक्रीया सकाळी 8.00 वाजेपासून सुरु होणार असल्याचे यावेळी सांगितले.
 तसेच श्री. जयवंशी यांनी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना पुढीलप्रमाणे सूचनाही दिल्या- स्ट्राँगरुम सकाळी 7.00 वाजता उघडण्यात येणार असून उमेदवार/ उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी वेळेवर ओळखपत्रासह  उपस्थित रहावे, उमेदवार/ उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी मतमोजणी प्रक्रीया संपेपर्यंत मतमोजणी केंद्र सोडून बाहेर जाता येणार नाही, एकदा बाहेर गेल्यास त्यांचे ओळखपत्र जमा करण्यात येईल व त्यांना परत देण्यात येणार नाही , उमेदवारांनी त्यांचे नियुक्त केलेल्या चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था या कार्यालयाने नियुक्त केलेल्या अभिकर्त्यामार्फत  ठरवून दिलेल्या दराप्रमाणे उमेदवारांनी त्यांच्या स्तरावर करावी, मोबाईलचा वापर मतमोणी केंद्रामध्ये करता येणार नाही , एक फेरी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या फेरीची सुरुवात करण्यात येईल,  सर्व फेऱ्या पूर्ण झाल्या नंतरच व्हीव्हीपॅट ची मतमोजणी होईल, यासाठी वेळ लागणार असल्यामुळे उमेदवारांनी आपल्या प्रतिनिधींना अवगत करावे, फेरीनिहाय तसेच उमेदवार निहाय प्राप्त झालेल्या मतांची आकडेवारी काऊंटींग सेंटर  च्या ठिकाणी असलेल्या स्क्रीनवर दर्शविण्यात येईल, तसेच आयोगाने दिलेल्या ॲपवर सुध्दा मतमोजणीची माहिती प्राप्त होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस उमेवार व त्यांचे प्रतिनिधी क्रमश: किशोर नाभीराज मास्ट, बालाजी नारायणराव वानखेडे, वसंत किसन पाईकराव, अ. कदीर मस्तान सय्यद, सुनिल दशरथ इंगोले आदी उपस्थित होते.
000000