12 July, 2019

महिला लोकशाही दिनाचे 15 जुलै रोजी आयोजन


महिला लोकशाही दिनाचे 15 जुलै  रोजी आयोजन
        हिंगोली, दि.12: राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी यांची शासकीय यंत्रणेकडून होण्यासाठी व समाजातील पिडित महिलांना  सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी  यासाठी  एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात दिनांक 15 जुलै 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही  दिन होणार आहे.
ज्या महिलांना तक्रारी करावयाच्या असतील त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  कार्यालयात  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हिंगोली यांच्या कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्हि.जी. शिंदे यांनी केले आहे.
00000

11 July, 2019

व्यायामशाळा विकास,क्रीडांगण विकास,युवक कल्याण अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन



व्यायामशाळा विकास,क्रीडांगण विकास,युवक कल्याण अनुदानासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 11 : सन 2019-20 या आर्थिक वर्षात व्यायामशाळा विकास, क्रीडांगण विकास,युवक कल्याण (सर्व साधारण/विशेष घटक/आदिवासी) योजनेअंतर्गत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
तसेच ज्या संस्थांना व्यायामशाळा विकास, क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत सन 2018-19 मध्ये प्रथम हफ्ता/व्दितीय हफ्ता वितरीत करण्यात आला त्या संस्थांनी आपल्या उर्वरीत अनुदानासाठी, साहित्यासाठी प्रस्ताव सादर करावेत.
 तसेच नवीन व्यायामशाळा विकास अनुदान योजनेसाठी नवीन शासन निर्णय दि. 08 जानेवारी 2019 नुसार शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अनुदानीत शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद, सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, शासकीय उप जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासनाने मान्यता दिलेल्या अनुदानित शैक्षणिक शाळा, महाविद्यालय, पोलिस कल्याण निधी/ पोलिस विभाग, शासकिय कार्यालय इ. कडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. (सेवाभावी संस्था, व्यायामशाळा, क्रीडा मंडळ, महिला मंडळ इ.हे अपात्र आहेत. यांनी प्रस्ताव सादर करुन नयेत)
तसेच युवक कल्याण विषयक अनुदान योजना सन 2018-19 या आर्थिक वर्षात ज्या संस्थांना अनुदान देण्यात आले आहे अशा संस्थांनी कार्यक्रमाचा अहवाल, विनियोग प्रमाणपत्र, ऑडीट रिपोर्ट प्रस्तावासोबत सादर करावेत. तसेच धर्मादाय आयुक्त, हिंगोली  यांनी रद्द केलेल्या संस्थांनी प्रस्ताव सादर करु नयेत. कार्यक्रमाचा अहवाल, विनियोग प्रमाणपत्र सादर न केल्यास सदरील संस्था अपात्र करण्यात येईल.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत विहित अर्जाचे नमुने दि.11  ते 20 जुलै 2019 या कालावधीत दुपारी 12.00 ते 3.00 वा. या वेळेत विक्रीस उपलब्ध आहेत. परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख दि.25 जुलै 2019 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंत राहील. विहित मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत, तरी इच्छुकांनी परिपूर्ण प्रस्ताव विहित नमुन्यात व वेळेत सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार  यांनी केले आहे.
00000
           


10 July, 2019

शासकीय तंत्रनिकेतन मध्ये वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपन


शासकीय तंत्रनिकेतन मध्ये वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपन

        हिंगोली, दि.10:  येथील एम. आय.डी.सी. लिंबाळा परिसरात असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन येथे 33 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत वृक्षारोपनाचा कार्यक्रम प्राचार्य डॉ. आर. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  संपन्न झाला. यावेळी संस्थेतील शिक्षकीय तसेच शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
000000



वाहन धारकांनी HSRP नंबर प्लेट वाहन वितरकांकडून बसवून घेण्याचे आवाहन


 वाहन धारकांनी HSRP  नंबर प्लेट वाहन वितरकांकडून बसवून घेण्याचे आवाहन

हिंगोली, दि.10 :  रस्ते वाहतुक महामार्ग मंत्रालय यांचे निर्देशानुसार दिनांक 1 एप्रिल 2019 पासून नवीन उत्पादीत होणाऱ्या वाहनांना HSRP  नंबर प्लेट बसविण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्या नुसार दिनांक 1 एप्रिल 2019 नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांना केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार HSRP  नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. त्यानुसार वाहन वितरकांद्वारे ही नंबर प्लेट बसविण्यात येणार आहे. तरी सर्व वाहन धारकांनी HSRP  नंबर प्लेट वाहन वितरकांकडून बसवून घ्यावी, असे  आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
0000

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत
अर्ज सादर करण्याचे आवाहन
        हिंगोली, दि. 10 : जिल्हयातील अनु.जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेवू शकत नसलेल्या अनु.जाती  व नवबौध्द विद्यार्थ्यापैकी इयत्ता 11 वी 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामधील मुलां-मुलीप्रमाणे भोजन, निवास,शैक्षणीक साहीत्य,निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. सदर योजने अंतर्गत सन 2019 -20 करीता अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावा सदर याजने अंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांनी केले आहे.
योजनेचे निकष -  विद्यार्थी शासकीय वसतिगृहास प्रवेश घेण्यास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहीवाशी असावा, शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा,  विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा, विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल, या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या अनु.जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल, विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयीकृत शेडयूल्ड बँक खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे,विद्यार्थी स्थानिक रहीवाशी नसावा. (ज्या महाविद्यालय/ शैक्षणीक संस्थेत विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी ते महाविद्यालय, शैक्षणिक संस्था ज्या महानगर पालिका/ ग्रामपंचायत यांच्या हद्दीत आहे त्या महानगर पालीका/ग्रामपंचायत येथील रहीवाशी नसावा.), नगर पालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परीसरात असलेल्या महाविद्यालय/शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी सुध्दा  या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील, विद्यार्थी 11 वी, ‍12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा,   12 वी मध्ये विद्यार्थ्यांस किमान 50 टक्के गुण असल्यावर या योजनेचा पुढे पदवी/पदव्युत्तर शिक्षणासाठी         लाभ घेता येईल,  या योजनेचा पुढे लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस अभ्यासक्रमाचे मागील प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान 50% गुण किंवा   त्याप्रमाणात ग्रेडेशन /CGPA असणे आवश्यक राहील, विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या मान्यता प्राप्त अभ्यासक्रमाचा कालावधी  2 वर्षापेक्षा कमी नसावा,  विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल, या योजनेमध्ये दिव्यांग (अनु.जाती व नवबौध्द घटकातील )विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. त्यांना गुणवत्तेचे  टक्केवारी 40% इतकी राहील, या योजनेसाठी खास बाब सवलत लागु राहणार नाही.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (साक्षांकीत प्रती)- जातीचा दाखला,महाराष्ट्राचा रहीवाशी असल्याचा पुरावा, आधार कार्डची सत्यप्रत, बँक पसबूक सत्यप्रत, उत्पनाचे  प्रमाणपत्र 2.50 लाखाच्या आत./ फॉर्म नंबर 16,विद्यार्थी दिव्यांग अल्याबाबतचे प्रमाणपत्र, इयत्ता 10 वी, 11 वी, 12 वी, व पदवी परीक्षेचे गुणपत्रक, महाविद्यालयाचे बोनाफाईट सर्टीफीकेट,विद्यार्थीनी विवाहीत असल्यास पतीचा उत्पनाचा पुरावा, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा,विद्यार्थ्यांने कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र,विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा.(खाजगी वसतीगृह, भाडे करारनामा इ.), महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र, सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत.
 या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी  ज्या जिल्हयामध्ये शिकत आहे त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समजा कल्याण यांचेकेडे त्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावा, विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थीती किमान 75 टक्के आवश्यक राहील. याबाबत संबधीत संस्थेचे प्रत्येक सहामाहीतील उपस्थीती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देवून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणीक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नौकरी व व्यावसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12% व्याजासह वसूली केली जाईल असे सहायक आयुक्त समाज कल्याण भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.
000000

अनुदान योजना व बिजभांडवल योजनेसाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

अनुदान योजना व बिजभांडवल योजनेसाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

हिंगोली, दि.10 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (मर्या)जिल्हा कार्यालय हिंगोली करीता सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेअंतर्गत 20 व बिजभांडवल योजने अंतर्गत 10 उदिष्ट प्राप्त झाले आहे. या दोन योजना राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. चांभार समाजा अंतर्गत असणाऱ्या चांभार,ढोर,मोची,होलार या समाजातील अर्जदरांकडुन विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत स्वत:अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहुन दाखल करावेत. त्रयस्थ/मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारले जाणार नाहीत.
कर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याकडुन घेतलेला असावा.), अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला(तहसिलदार यांच्या कडुन घेतलेला असावा.)  नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या तीन प्रती जोडाव्या, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, राशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड/मतदान कार्ड/पॅन कार्ड झेरॉक्स, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन), व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती/करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा(नमुना नं.8) लाईट बिल, टॅक्स पावती, बिज भांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल , वाहनासाठी लायसन्स, परवाने बॅच , व्यवसायाचे ग्रा.पं./न.प/यांचे नाहरकत प्रमाणपत्र , व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला , अनुदान न घेतल्या बाबत 100 च्या बाँन्ड वर प्रतिज्ञापत्र. वरील प्रमाणे कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करुन घोषणापत्र देण्यात यावे.
         वरील योजनांचा कर्जपस्ताव महामडळाच्या विहित नमुन्यात अर्ज 05 जुलै 2019 पासुन कार्यालयीन वेळेत  (सकाळी 9:45 ते संध्याकाळी 5:45 ) स्थळ: जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार हिंगोली  या ठिकाणी स्विकारले जातील.हिगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील बेरोजगार युवक, युवतीना तसेच होतकरु गरजु अर्जदारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. चे जिल्हा व्यवस्थापक हिरालाल गतखणे यांनी केले आहे.

000000 

08 July, 2019

सन 2018-19 वर्षातील महाडिबीटी पोर्टलवरील प्रलंबित शिष्यवृत्तीचे अर्ज मुदतीत सादर करण्याचे आवाहन




सन 2018-19 वर्षातील महाडिबीटी  पोर्टलवरील  प्रलंबित  शिष्यवृत्तीचे  अर्ज
मुदतीत सादर करण्याचे आवाहन

                हिंगोली, दि.8 : जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गातील  विद्यार्थी  यांनी सन 2018-19 या वर्षापासून भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजुर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी ही संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
                ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाडिबीटी या संगणक प्रणालीवर कागदपत्राच्या किंवा तांत्रिक अडचणीमुळे महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत अशा सर्व महाविद्यालयस्तरावर प्रलंबित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती   शिक्षण फी  परिक्षा फी प्रतिपुर्तीचे अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन   अर्जातील त्रुटींची पुर्तता करुन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या लॉगीन ला दि. 09 जुलै 2019 पर्यंत सादर करावेत. तसेच महाविद्यालयाचे लॉगीन ला सध्या प्रलंबित असलेले नव्याने प्राप्त होणारे सर्व अर्जाची छाननी करुन पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज लॉगीन ला दि. 09 जुलै 2019 पर्यंत सादर करावेत . या मुदतीपर्यत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण  हिंगोली यांना फॉरवर्ड  केलेले अर्ज  प्रणालीतुन  रद्द पात्र (ऍ़टो रिजेक्ट - (AUTO REJECT) ठरविण्यात येतील.
सन 2018-19 या वर्षातील अर्ज सादर करण्याची शेवटची संधी देण्यात आलेली आहे. सन 2018-19 हे आर्थिक वर्षे संपुष्टात आले आहे. सन 2018-19 या वर्षातील प्रलंबित अर्ज या कार्यालयाचे लॉगीनला सादर  करण्यासाठी  महाडिबीटी  ही संगणकीय प्रणाली दि. 09 जुलै 2019 पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. त्यानंतर महाडिबीटी हे पोर्टल बंद होणार असुन भविष्यात अर्ज प्रलंबित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महाविद्यालयाचे प्राचार्य, पालक विद्यार्थी  यांची राहील.
                ज्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे लॉगीनला अर्ज प्रलंबित आहेत. असे प्रलंबित असलेले अर्ज दि. 09 जुलै 2019 पर्यंत या कार्यालयाचे लॉगीनला पाठविण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली हे शेवटचे आवाहन करीत आहेत.
0000000